तिरंदाज मासा (टॉक्झोटीस जॅक्युलेटर).

तिरंदाज मासा : पार्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झटिडी कुलातील हा मासा आहे. त्याचे शास्त्रीय नाव टॉक्झोटीस जॅक्युलेटर आहे. हा जावा व मलाया द्वीपसमूहातील बेटांवर गोड्या पाण्यात आढळतो. हा देखणा असून याची लांबी २० सेंमी. पर्यंत असते, रंग पिवळा व त्यावर काळे आडवे पट्टे असतात. पाण्याच्या काठच्या झाडाझुडपांच्या पाण्यावर आलेल्या फांद्यांवरील किड्यांवर अचूक नेम धरून हा तोंडातून पाण्याची चिळकांडी जोराने उडवितो व ते खाली पाडून खातो. सु. १·५ मी. अंतरावरील किडादेखील तो अशा तऱ्हेने खाली पाडतो. मुखाच्या टाळ्यावर असलेल्या लांब खाचेवर जीभ दाबून तो पाण्याची ही चिळकांडी उडवितो.

कर्वे, ज. नी.