एडनचे आखात : अरबी समुद्राचा पश्चिमेकडील फाटा. आफ्रिकेतील गार्डाफूई भूशिर व अरबस्तानातील दक्षिण येमेनचा किनारा यांदरम्यान हा फाटा आत शिरला असून तो तांबड्या समुद्राला बाब-एल्-मांदेब ह्या सामुद्रधुनीने जोडला आहे. याची पूर्वपश्चिम लांबी सु. ८८० किमी. आहे. १८७० पासून यूरोपहून सुएझमार्गे वाहतूक सुरू झाल्यानंतर या आखातास महत्त्व आले. एडन व मुकल्ला ही अरबस्तान किनारपट्टीवरील आणि जिबूती व बर्बरा ही आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील महत्त्वाची बंदरे आहेत.

१८३९ सालापासून यावर ब्रिटिशांचा अंमल होता. तांबड्या समुद्रातील पेरिम बेट १८५७ मध्ये व अरबी समुद्रातील सोकोत्रा बेट १८७६ मध्ये ब्रिटिशांकडे आले. अरबस्तान, इराण, भारत, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांकडून यूरोपकडे जाणार्‍या बोटी या आखातातून जात असल्याने यास फार महत्त्व होते. सुएझ कालवा बंद झाल्यामुळे याचे महत्त्व काहीसे कमी झाल्यासारखे वाटले तरी आजही मध्यपूर्वेतील तेलराष्ट्रे, ईजिप्त, इस्राएल इत्यादींच्या परिसरात असल्याने याचे महत्त्व टिकून आहे.

शाह, र. रू.