सैनिक कल्याण मंडळ : भारतीय भूसेना, नौसेना व वायुसेना या दलांतील विद्यमान व निवृत्त सैनिकांसाठी कल्याणकारी कामे करणारी निमसरकारी संस्था.
लष्करात भरती झालेल्या सैनिकांना सामान्यतः आपल्या घरादारापासून अतिदूर असलेल्या व्यावसायिक कर्मभूमीवर कामगिरीसाठी जाणे भाग असल्याने घरगुती व इतर नागरी जबाबदाऱ्या आणि नैमित्तिक कामकाजांवर लक्ष ठेवून तो क्षमतेने पार पाडण्याची दक्षता घेणे फार त्रासाचे व कालापव्ययी असते. ज्यामुळे साहजिकच घरच्या चिंतांचा त्यांच्या मनावर ताण पडून त्याचा अनिष्ट परिणाम त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेवर होत असतो. ह्या सैनिकांवरील मानसिक व्यथांचा भार कमी करून त्यांचे मनोधैर्य व त्यांचा पेशाभिमान कायम राखण्यासाठी ह्या संस्थांची स्थापना भारतातील ब्रिटिश अमदानीत सुरू करण्यात येऊन स्वातंत्र्योत्तरकाळातसुद्धा त्याचे अस्तित्व व कार्य परंपरेने आजतागायत चालू आहे.
दूरवर विखुरलेल्या भारतीय सैनिकांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांची वास्तपुस्त करून सैनिकांच्या अनुपस्थितीत अडलेली न्यायालयीन, शासकीय कामे, कायदेशीर सल्लामसलत, कुटुंबियांना मिळणारे निवृत्तिवेतन, मुलाबाळांच्या संगोपनास योग्य ती मदत करणे अशी व इतर प्रकारची कल्याणकारी कामे ह्या संस्थांमार्फत साधली जातात. सैनिकदिन साजरा करणे, त्यानिमित्त सैनिक कल्याण कार्यासाठी निधी गोळा करणे यासाठी सार्वजनिक कामे, समारंभ वगैरे घडवून आणण्यासही ह्या संस्था मदत करतात. “तसेच सैन्यातील भरती करण्यासाठीसुद्धा ह्या संस्थांचा उपयोग असतो. भारतीय मध्यवती सैनिक मंडळ, प्रादेशिक व जिल्हानिहाय सैनिक मंडळे असा ह्या संस्थांचा व्याप व स्वरूप असते. त्यांचे जाळे भारतभर पसरलेले असते. साधारणतः सेवानिवृत्त स्थानिक सैन्याधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पुढारी व प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांच्या जोडीला संबंधित नागरी शासकीय अधिकारी यामधून स्थानिक शासकीय अधिकारी प्रमुखामार्फत व त्याच्या सल्ल्याने निवडलेल्या नागरिकांची ह्या संस्थांचे कार्यकारी सभासद म्हणून नेमणूक केलेली असते. स्थानिक प्रमुख जसे, जिल्हाधिकारी, राज्यपाल वगैरे त्या त्या सैनिक मंडळाचे अध्यक्ष असतात. वेळोवेळी वा कारणपरत्वे हा सभासदांच्या बैठका घेऊन वरील प्रकारची सैनिकी कल्याणकारी कामे मडळाच्या स्थायी कार्यालयाकडून चालविली जातात. ह्या मंडळांच्या संबधनांसाठी वार्षिक अनुदानाची शासनाद्वारे तरतूद केलेली असते.
सैनिक कल्याण मंडळाद्वारे माजी सैनिक अंशदान आरोग्य योजनेखाली निवृत्तिवेतन अथवा अपंग निवृत्तिवेतन मिळणाऱ्या निवृत्त सैनिकांना व त्यांच्यावर अवलंबून असणारे आईवडील, पतिपत्नी, मुले इत्यादीसाठी निवृत्तिवेतन दिले जाते. त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेऊन मोफत वैद्यकीय सेवाही पुरविली जाते.
पाटणकर, गो. वि.