विज्ञानशिक्षण : प्रचलित विज्ञानशिक्षणात विज्ञानाच्या अनेकविध शाखोपशाखा, विषयोपविषय यांच्याबरोबरच तंत्रविद्येच्या अभ्यासाचाही अंतर्भाव होतो. विज्ञान हा अवतीभवतीचे स्थूल/जड जग व निसर्ग जाणून घेण्याच्या मानवाचा पद्धतशीर आणि प्राचीन काळापासून चालत आलेला प्रयत्न आहे. त्यासाठी मानवाने निसर्गाचे, निसर्गातील घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण केले व निसर्गातून आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू कशा मिळवाव्यात, याची साधने शोधली. या ज्ञानाचा उपयोग अनेक उपयुक्त कार्यासाठी त्याने केला, त्यामुळे मानवी जिज्ञासेचे क्षेत्रही व्यापक झाले, तसेच मानवाचे ज्ञान समृद्ध होत गेले आणि आपल्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी तंत्रविद्या त्याला विकसित करता आली. निसर्ग जाणून घेण्याच्या व निसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याच्या प्रक्रियेचा विज्ञानात मुख्यत्वे अंतर्भाव होतो. मानवाचे जीवन सुखी व सुरक्षित करण्याचे एक साधन, ही विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी सुरूवातीपासूनच विकसित होत गेली आहे. यात महत्त्वाची बाब अशी, की प्रगतीचा वेग सतत वाढत आहे. शंभर वर्षापूर्वीच काय, दहा-पंधरा वर्षापूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज साध्य झाल्या आहेत.

आधुनिक जगात विज्ञान व तंत्रविद्येला विशेष स्थान व महत्त्व असून, मानवी जीवनव्यवहाराची जवळजवळ सर्वच क्षेत्रे त्यांनी व्यापली आहेत. शेती व अन्नधान्य, आरोग्य, पोषण व वैद्यकव्यवसाय, उद्योगधंदे व औद्योगिक विकास, निवास व सार्वजनिक वास्तु-बांधकाम, नैसर्गिक साधनसंपत्ती, वाहतूक, माहिती व जनसंज्ञापन, शिक्षण, मनोरंजन आदी सर्व क्षेत्रांत मानवी जीवनाचे कल्याण साधण्याची प्रभावी साधने म्हणून विज्ञान व तंत्रविद्या यांस असाधारण महत्त्व आहे. त्यासाठी वैज्ञानिक ज्ञान तसेच त्याचा उपयोजित तंत्र म्हणून केलेला व्यावहारिक वापर यांवर अधारित अशी कार्यपद्धती व फलिते वापरली जातात. वैज्ञानिक ज्ञान फार झपाट्याने विस्तारत गेले आहे. अज्ञाताचा चिकित्सक पद्धतीने सतत शोध घेण्याच्या मानवी वृत्तीतून विज्ञानाचा हा आजवरचा विकास-विस्तार घडून आला आहे. त्यामुळे सतत विकास पावत असलेल्या विज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे, ही आजच्या मानवाची व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने नित्याची गरज ठरली आहे.

विज्ञानशिक्षणाची मूलभूत प्राथमिक उद्दिष्टे म्हणजे व्यक्तिमध्ये वैज्ञानिक वृत्ती रूजवणे, वैज्ञानिक दृष्टिकोणाची जापासना करणे, निसर्गातील व मानवी जीवनव्यवहारांतील समग्र-व्यक्तिगत, सामाजिक, सांस्कृतिक इ.–घडामोडींचे विज्ञाननिष्ठ दृष्टीने आकलन व चिकित्सा करणे इ. होत. वैज्ञानिक दृष्टिकोणातून जीवनव्यवहारांकडे पाहणे ह्याचा अर्थ जिज्ञासू व चिकित्सक वृत्ती, वस्तुनिष्ठ विचारपद्धती आणि तर्काधिष्ठित बुद्धिवादी दृष्टिकोन स्वीकारणे होय. निसर्गात घडणाऱ्या घटना निसर्गनियमानुसारच घडतात. त्यात स्पष्ट कार्यकारणभाव असतो. एका व्यक्तीला हा कार्यकारणभाव समजला, की ते ज्ञान सर्वांना देता येते. म्हणून ह्यात अंधश्रद्धा, रूढीप्रामाण्य, परंपराशरणता, विभूतिपूजा अशा प्रवृत्तींना थारा नसतो. त्यामुळे अशा अवैज्ञानिक प्रवृत्तींचा व्यक्तींवरील व समाजमानसावरील पगडा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण व बुद्धिवादी विचारसरणी समाजात रूजवणे हे विज्ञानशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. विज्ञानाची कार्यपद्धती जाणून घेऊन तिचा वापर जीवनातील व्यक्तिगत व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी कसा कारावा, हेही विज्ञानशिक्षणाद्वारे कळू शकते. विज्ञान व तंत्रविद्येचा आजवर घडून आलेला विकास म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा व स्वाभाविक जिज्ञासा यांचा परिपूर्तीसाठी केल्या गेलेल्या मानवी प्रयत्नांचाच एक भाग आहे, हे या संदर्भात लक्षात घेणे जरूरीचे आहे. वैज्ञानिक ज्ञानाची एक कसोटी म्हणजे शक्य तितक्या अचूक, यथातथ्य वास्तुनिष्ठतेच्या पायावर ज्ञानाची उभारणी करणे होय. ते बुद्धिप्रामाण्याधिष्ठित असावे लागते. विज्ञानाचे निष्कर्ष केव्हाही तपासता योतात. त्यांचे प्रामाण्य शाबीत करता येते किंवा ते त्या कसोटीला न टिकल्यास फेटाळता येतात. त्यामुळेच ते परिवर्तनशील असतात. विज्ञानाच्या अभ्यासात तत्त्वे, सिद्धांत व उपपत्ती यांच्या बरोबरीनेच प्रत्यक्ष निरीक्षणे, प्रयोग व प्रात्याक्षिके या घटकांनाही फार महत्त्वाचे स्थान आहे. [⟶विज्ञानाचे तत्त्वज्ञान; वैज्ञानिक पद्धति].

विज्ञान व तंत्रविद्या यांच्या शिक्षणाची व्याप्ती खूपच मोठी असून, त्यात अनेकविध विषयोपविषयांचा अंतर्भाव होतो. रसायनशास्त्र, भौतिकी, जीवविज्ञान (प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान), गणित, ज्योतिषशास्त्र (खगोलशास्त्र) इ. निसर्गविज्ञाने त्यात येतात. ही सर्व विज्ञाने मूलभूत व विशुद्ध विज्ञाने म्हणून ओळखली जातात. ही प्रामुख्याने तत्त्वे व तथ्ये वापरात आणून निरनिराळ्या जीवनोपयोगी वस्तू घडवल्या वा तयार केल्या जातात. मानवी जीवन सुखी व सुरक्षित करण्यासाठी उपयोजित विज्ञानाच्या साहाय्याने अनेकविध तंत्रसाधने निर्माण केली जातात. शुद्ध किंवा उपयोजित विज्ञानाची कोणतीही शाखा घेतली, तरी इतर कितीतरी शाखांचा आणि उपशाखांचा अभ्यास त्यात अनिवार्य आहे, असे आढळून येते. म्हणूनच विज्ञानशिक्षण आता बहुशाखीय झाले आहे.

मनुष्याचे व्यक्तिगत व सामूहिक जीवन, वर्तनविशेष, कृती व त्यांमागील प्रेरणा, उद्दिष्टे इत्यादींचा अभ्यास सामाजिक शास्त्रांमध्ये केला जातो. समाजशास्त्र, मानवशास्त्र, पुरातत्त्वविद्या, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भाषाभ्यास इ. सामाजिक शास्त्रे होत. ह्या शास्त्रांचा अभ्यास बव्हंशी मानव्यविद्यांखाली केला जात असला, तरी त्यांतही विज्ञानाचा उपयोग वाढत असल्याचे दिसते.

आधुनिक विज्ञानाचे मूळ प्राचीन ग्रीक, भारतीय, ईजिप्शियन आणि रोमन संस्कृतीत आढळते. पदार्थाच्या आणि घटनांच्या घडणीचे नियम गणिती असातात, ही ग्रीक मर्मदृष्टी पायथॅगोरस (इ. स. पू. सहावे शतक) इतकी मागे जाते. ग्रीकांची दुसरी आणि संबंधित देणगी म्हणजे, गणिती सिद्धांतांचे प्रामाण्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी रूढ केलेली प्रमाणक पद्धती होय. ह्या पद्धतीने गणित ही स्वायत्त, स्वयंप्रेरित अशी ज्ञानशाखा बनते. सोळाव्या-सतराव्या शतकांत यूरोपमध्ये आधुनिक विज्ञान उदयास आले. त्यासाठी अनुकूल ठरलेले घटक म्हणजे गणिती विज्ञान या ग्रीक संकल्पनेचे झालेले पुनरूज्जीवन होय. त्याचप्रमाणे दृश्य निसर्गातील वस्तूंच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मानवी ज्ञानशत्की समर्थ असल्याची जाणीव या काळात निर्माण झाली. त्याचप्रमाणे तंत्रविद्येचा विकास करून तिच्या साहाय्याने मानवाचे भौतिक जीवन सुखी व सुरक्षित करण्याची शक्ती माणसात आहे, ह्या आत्मविश्वासपूर्ण वृत्तीचा उदय झाला. पाश्चिमात्य विज्ञानशिक्षणात या काळात भरीव प्रगती झाली. विज्ञानात घडून येणाऱ्या प्रगतीचा तत्कालीन शिक्षणपद्धतीवरही अनेक मार्गांनी प्रभाव पडला. शालेय पातळीवर विज्ञान शिकवले जाऊ लागले. मात्र साधारणतः अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुख्य विषयांत त्याचा अंतर्भाव झालेला नव्हता. तथापि सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच पाश्चात्त्य विद्यापीठे व महाविद्यालये यांतून विज्ञान विषयांचा विस्तृत अभ्यासक्रम शिकवला जावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. विज्ञान, तंत्रविद्या आणि कारखानदारी यांच्या परस्परसंबंधाचा तत्कालीन शिक्षणावर अनुकूल परिणाम झाला. औपचारिक शिक्षण हे काही क्षेत्रांतून आवश्यक करण्यात आले. पूर्वी शेतीचे (कृषीचे) पारंपरिक पद्धतीचे शिक्षण हे वडिलांकडून मुलांपर्यंत पोहचत असे पण कृषिक्षेत्रात आमूलाग्र तांत्रिक सुधारणा झाल्या, नवनवी यांत्रिक अवजारे आली, पारंपरिक शेतीला आधुनिक वैज्ञानिक पद्धतीची जोड मिळाली, त्याचबरोबर कृषिक्षेत्रातही विशेषीकृत वैज्ञानिक तंत्रविद्येला व तिच्या पद्धतशीर शिक्षणाला महत्त्व येत गेले. ⇨ औद्योगिक क्रांतीच्या आगमनाबरोबर (सु. १७५०) कारखान्यांची झपाट्याने वाढ झाली आणि कारखान्यांत कामे करण्यासाठी तंत्रकुशल कामगार, तंत्रज्ञ, अभियंते यांची गरज मोठ्या प्रामाणावर निर्माण झाली. त्यांच्या प्रशिक्षणासाठी यूरोपच्या अनेक भागांत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणसंस्था उदयास आल्या. विज्ञानशिक्षणाचा प्रसारही मोठ्या प्रमाणात झाला. जसजशी यांत्रिक प्रगती होत गेली, तसतशी यूरोपमध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस व अमेरिकेमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी तांत्रिक शिक्षणाला वैज्ञानिक वैठक असण्याची जरूरी भासू लागली म्हणून या शिक्षणात विज्ञान, गणित व तंत्रविद्येतील मूलतत्त्वे यांच्या समावेश केला गेला. अमेरिकेमध्ये बेंजामिन फ्रँक्लिन, टॉमस जेफर्सन प्रभृतींनी शालेय अभ्याक्रमात उपयुक्त, म्हणजे झपाट्याने वाढत जाणाऱ्या उद्योगधंद्यांना उपयुक्त व पूरक ठरतील असे विज्ञानशिक्षणाचे विशिष्ट मुदतीचे अभ्यासक्रम (कोर्स) शिकवण्यावर जास्त भर दिला जावा, असे आग्रही प्रतिपादन केले. यूरोपमध्ये साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाची झपाट्याने वाढ झाली.

पाश्चात्त्य देशांत विज्ञानशिक्षणाबाबत ग्रेट ब्रिटन व यूरोपमधील अन्य देश अघाडीवर होते. अमेरिकेवर सुरूवातीस त्यांचा प्रभाव असल्याने एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतही विज्ञानशिक्षण सुरू झाले. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर विज्ञानशिक्षण हे सृष्टिविज्ञानापुरते-तेही वर्णनापुरते- मर्यादित होते. माध्यमिक स्तरावर सुरूवातीच्या काळात भौतिकी व रसायनशास्त्र हे स्वतंत्र विषय व जीवविज्ञान हा संयुक्त विषय असे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस जीवविज्ञानाचे वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान असे दोन भाग पडले व शालेय शिक्षणात भौतिकी व रसायनशास्त्र यांबरोबर ते विज्ञानशिक्षणात स्वतंत्रपणे सामविष्ट झाले. विज्ञानशिक्षणात गणिताचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने प्राथमिक स्तरावर व्यावहारिक गणित व शालेय स्तरावर औपपत्तिक गणित सामविष्ट झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वच विज्ञानाच्या आकलनासाठी सांख्यिकी (संख्याशास्त्र) हा विषय अनिवार्य ठरल्याने, शालेय स्तरावरच या शास्त्राची ओळख करून देण्यात आली. उच्च शिक्षणात वरील विषयांच्या स्वतंत्र समावेशाव्यतिरिक्त नव्याने निर्माण झालेले मिश्र विषय-उदा., भौतिकीय रसायनशास्त्र (फिजिकल केमिस्ट्री), सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायॉलॉजी) इ.–समाविष्ट झाले. शहरी जीवनात वाहतूकव्यवस्था, आधुनिक घरबांधणी, विद्युत्‌‍शक्तीचा उपयोग, घराघरातून नळाने पाण्याचा व इंधनवायूचा पुरवठा, भूमिगत गटारे इ. गोष्टी विसाव्या शतकाच्या सुरूवातीस यूरोप-अमेरिकेत वास्तवात आल्या होत्या. यांतूनच विविध पातळ्यांवरील तांत्रिक शिक्षणास सुरूवात झाली. शालेय वयाच्या मुलांसाठी व्यावहारिक कौशल्यांचे शिक्षण ज्यांना पारंपरिक उच्च शिक्षण घ्यावयाचे नव्हते अशांसाठी पदविका शिक्षण काही निवडक तरूणांसाठी पदव्युत्तर शिक्षण अशा तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या.

निरनिराळ्या देशांमध्ये प्राथमिक स्तरावरील विज्ञानशिक्षणाची सुरूवात वेगवेगळ्या इयत्तांपासून करण्यात आलेली आहे, असे दिसून येते. उदा., अफगाणिस्तान, व मालदीव येथे इयत्ता पहिलीपासून ऑस्ट्रेलिया, भारत, इंडोनेशिया, तुर्कस्थान, या देशांमध्ये इयत्ता दुसरीपासून बांगलादेश, चीन, इराण, जपान, मलेशिया, पाकिस्तान, पापुआ न्यु गिनी, फिलिपीन्स, कोरिया, श्रीलंका, थायलंड, या देशांत इयत्ता तिसरीपासून न्यूझीलंड, रशिया, आणि सिंगापूर येथे इयत्ता चौथीपासून तर नेपाळ, व्हिएटनाम या देशांत इयत्ता पाचवीपासून विज्ञानशिक्षणास सुरूवात होते. मात्र बहुतेक देशांत भौतिकी, रसायनशास्त्र, प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान हे विषय स्वतंत्रपणे इयत्ता सातवी वा आठवीपासून शिकवण्यात येतात.

भारतातील विज्ञानशिक्षण : प्राचीन भारतात वैदिक काळात ज्योतिषशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान इ. विज्ञाने उदयास आली. ती तत्कालीन लोकांना प्राथमिक पातळीवर अवगत होती. नित्याच्या दैनंदिन जीवनव्यवहारांत उपयुक्त म्हणून तसेच जिज्ञासापूर्तीच्या प्रेरणेतून ही विज्ञाने यथाकाल विकसित होत गेली. अंकगणित व शुल्त्रसूत्रे (भूमितीतील प्रमेये व गृहीतके) यांत खूप प्रगती झाली होती. रसायनशास्त्राचा उपयोग लोहयुगातील कुंभारकाम, भांडी तयार करणे इ. बाबतींत केला जात असे. धातू गाळण्यापर्यंत या शास्त्राची प्रगती झाली होती. लोखंड व पोलाद निर्माण करणे, काचकाम हे प्रगतीचे पुढचे टप्पे होत. ब्रँझयुगात शेती हा मानवाचा प्रमुख उत्पादन व्यवसाय बनला व त्यातून कृषिविज्ञान प्रगत झाले. शेतीच्या प्रगतीतून वृक्षांचे प्राथमिक स्वरूपाचे सेंद्रिय ज्ञान व वनस्पतिविज्ञान या विषयांची जडणघडण झाली व त्यातून आयुर्वेद व वैद्यकशास्त्र विकसित झाले. पराशर ऋषींच्या वृक्षायुर्वेद (इ. स. पू. पहिले शतक) या ग्रंथाने पूर्वीच्या वनस्पतिविज्ञानात व वैद्यकात एकसूत्रीपणा आणला. मनुष्याच्या शरीरातील वात, पित्त, व कफ या त्रिधातूंचा रोगनिदानाशी संबंध जोडला गेला. युद्धासाठी हत्ती, घोडे, इ. प्राणी पाळणे आवश्यक झाल्याने त्यांचे शरीरशास्त्र व इंद्रियविज्ञान अभ्यासणे जरूरीच ठरते. वैदिक वाङ् मयात सु. २६० प्राण्यांचे उल्लेख व वर्णने आढळतात. तक्षशिला विद्यापीठात पुनर्वसू आत्रेय (इ.स. पू. सहावे शतक) वैद्यक शिकवत असल्याचे उल्लेख आढळतात. नालंदा विद्यापीठातही वैद्यक, ज्योतिषशास्त्र इ. विषयांची चर्चा व वैचारिक देवाणघेवाण होत असे. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता हे ग्रंथ इ.श.पू. सहाव्या शतकाच्या सुमारास रचले गेले असावेत, असा तर्क आहे. व्यासंग व प्रत्यक्ष आचरण यांच्या साहाय्याने हे ज्ञान दीर्घ काळ पिढ्यान् पिढ्या जोपासले गेले व प्रसृत झाले. चर्चामधून तसेच पूर्वीच्या व्यावसायिक वौद्यांच्या अनुभवांतून हे ज्ञान वाढत गेले.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात एतद्देशीय पारंपारिक शिक्षण द्यावे की पाश्चात्त्य शिक्षण द्यावे, हा सुरू झालेला वाद ⇨ मेकॉलेच्या खलित्याने (१८३५) संपुष्टात आला. या खलित्यात भारतातील लोकांना इंग्रजीच्या माध्यमातून पश्चिमी विद्यांचे व विज्ञानाचे शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन केले होते. त्यानुसार १८५० च्या सुमारास भारतातील शाळांमधून इंग्रजी भाषेतून पाश्चात्त्य ज्ञान द्यावे हे मान्य झाल्यावर, तसेच १८५७ मध्ये स्थापन झालेल्या मुबंई, मद्रास, व कलकत्ता विद्यापीठांच्या अख्यत्यारीत मॅट्रिक्युलेशन परीक्षा आल्यानंतर, येथील शाळांतून औपचारिक पद्धतीने विज्ञानशिक्षणाचा समावेश झाला. विसाव्या शतकापासून हे विषय शिकवण्यास सुरूवात झाली, तरी विज्ञानशाखेतील पदवी विसाव्या शतकापर्यंत सुरू झाली नव्हती. विसाव्या शतकाची पहिली काही दशके विद्यार्थी बी. ए. परीक्षेस पदार्थविज्ञान (भौतिकी) वा रसायननशास्त्र हे विषय घेऊ शकत. अगदी १९४० पर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर सृष्टिज्ञान व भोवतालच्या परिसराची माहिती इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत वनस्पतिविज्ञानासह सामान्यविज्ञान व नववी ते अकरावी या इयत्तांसाठी भौतिकी-रसायनशास्त्र अथवा शरीराद्भ, आरोग्यशाद्भ हे विज्ञानविषय अभ्यासक्रमात होते. शालेय अभ्यासक्रमात या विषयांची औपपत्तिक माहिती, शिक्षकांनी वर्गात करून दाखविलेल्या प्रयोगांचे निरीक्षण तसेच स्वतः प्रयोग करून त्यातील निरीक्षणांचे व निष्कर्षांचे टाचण, अशी स्थूलमानाने अध्ययन-अध्यापन पद्धती होती. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात (१९३९-४४) रसायनांच्या कमतरतेमुळे तसेच स्वातंत्र्यलढ्यात ही रसायने वापरली जातील, या भीतीमुळे शालेय स्तरावर रसायनशास्त्रातील प्रयोगांना उत्तेजन मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांचे निवेदन, स्पष्टीकरण व खडू-फळ्याच्या साहाय्याने केलेले विवेचन याच अध्यापनाच्या पद्धती रूढ होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात मॅट्रिक्युलेशन या परीक्षेचे स्वरूप विद्यापीठाची प्रवेशपरीक्षा असे न ठेवता, शालान्त परीक्षा असे ठेवण्याचा निर्णय झाल्याने विद्यापीठांकडून मॅट्रिक्युलेशन परीक्षेचे काम काढून घेण्यात आले व शालान्त परीक्षेसाठी प्रत्येक राज्यात मंडळे स्थापन झाली. त्यामुळे शालेय शिक्षणात प्रमाणीकरण करणे शक्य आणि आवश्यक झाले. अकरावीच्या शालान्त परीक्षेच्या अभ्यासक्रमात भौतिकी व रसायनशास्त्र अथवा शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र हे विषय वैकल्पिक विषय म्हणून समाविष्ट झाले मात्र या विषयांच्या मूल्यमापनात प्रात्यक्षिक परीक्षा नव्हती. १९६४-६६ या कालखंडात कोठारी आयोगाची नेमणूक झाली. सर्वच स्तरांवरील शिक्षणाबाबत या आयोगाने ज्या शिफारशी केल्या, त्यांतील बव्हंशी भारत सरकारने मान्य केल्या व त्या १९६८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट झाल्या. दुसऱ्या माहायुद्धानंतर जगात सर्वत्र प्रगत विज्ञानाचा आणि तंत्रविद्येचा प्रसार सुरू झाल्याने कोठारी आयोगाने असा विचार मांडला, की भारत अता विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे, आज शालेय शिक्षण घेणाऱ्यांना एकविसाव्या शतकात जीवन जगावयचे आहे, दैनंदिन जीवनातही त्यांना आधुनिक तंत्रविद्या वापरावयाची आहे, त्या दृष्टीने कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार शालान्त परीक्षेत विज्ञान-रसायन हे विषय अनिवार्य करण्यात आले आणि त्यांचे मूल्यमापन करताना लेखी परीक्षेबरोबरच प्रत्यक्षिक परीक्षाही अनिवार्य करण्यात आली. १९६८ च्या धोरणानुसार इयत्ता सातवीपर्यंत सृष्टिज्ञान व परिसराचे ज्ञान आणि आठवी ते दहावी या इयत्तांमध्ये भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान, जीवविज्ञान हे विषय अभ्यासक्रमात सामविष्ट झाले. १९७४ मध्ये शालेय शिक्षणच्या ढाच्यात आणखी एक बदल करून १० वर्षे शालेय शिक्षण, २ वर्षे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आणि ३ वर्षे महाविद्यालयीन शिक्षण ही (१०+२+३) पद्धत रुढ करण्यात आली. त्यानुसार शालेय शिक्षणात गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य करण्यात आले. १९८६ च्या शैक्षणिक धोरणानंतर ह्या विज्ञान विषयांची मांडणी एकात्म पद्धतीने करण्यात आली. महाविद्यालयीन स्तरावर पारंपरिक विषयांबरोबर नवनवे मिश्र विषय समाविष्ट झाले. तसेच भूगोल आणि प्रयोगिक मानसशास्त्र हे विषयही त्यांच्या विकासविस्तारामुळे विज्ञानशिक्षणात दाखल झाले. विज्ञानाच्या अध्ययनात लेखी परीक्षा व प्रात्यक्षिके यांचा अंतर्भाव करण्यात आला.

इंग्रजांच्या अमदानीत स्थानिक उद्योगांना राजकीय पाठिंबा नव्हता अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही उद्योगपतींनी कापडगिरण्या, यंत्रे बनवण्याचे कारखाने व पोलाद कारखाने काढले. त्यांना लागणाऱ्या तंत्रज्ञांचे शिक्षण कारखान्यांतच देण्याची तरतूद होती. विविध रेल्वे कंपन्या तसेच युद्धसाहित्य तयार करणारे कारखाने यांना लागणारा कर्मचारीवर्गही त्या त्या कारखान्यांतच प्रशिक्षण घेत असे. स्थापत्य विभागातील निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता  १८४७-५८ च्या दरम्यान वर्ग उघडण्यात आले, त्यांचेच पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयांत रूपांतर झाले. रूडकी (१८४७), पुणे (१८५४), कलकत्ता (१८५६) व चेन्नई  येथे अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली व  ती स्थानिक विद्यापीठांना संलग्न करण्यात आली. ‘व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट’ (व्हिजेटीआय्‌), मुंबई (स्था. १८८७) येथे प्रथमतः पदविका शिक्षण व पुढे १९४७ पासून पदवी शिक्षण दिले जाऊ लागले. १९०७ साली बंगलोर येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये पदव्युत्तर तांत्रिक शिक्षणाची सोय झाली. बनारस विद्यापीठाची स्थापना १९१७ साली झाली व तेथे विविध शाखांतील तांत्रिक शिक्षण दिले जाऊ लागले. मात्र अद्यापही अणुऊर्जा विभाग, अवकाश-संशोधन संस्था, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांसारख्या संस्था होतकरू पदवीधर निवडून त्यांना पुढील शिक्षण संस्थेतच देण्याची व्यवस्था करतात.

महाराष्ट्रात पद्धतशीर वैज्ञानिक शिक्षणास व संशोधनास साधारणतः अव्वल इंग्रजी काळात (एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध) सुरूवात झाली. हे शिक्षण देणाऱ्या काही खास संस्था या काळात भरभराटीस आल्या. ‘एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट’, मुंबई (स्थापना १८४१) या संस्थेत गणित, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान आणि निसर्गविज्ञान हे विषय शिकवले जात असत. १८४५ मध्ये मुंबईलाच वैद्यकीय शिक्षणाचे विद्यालय सुरू झाले. पुण्यामध्ये १८५४ साली ‘पुना एंजिनिअरिंग क्लास अँड मेकॅनिकल स्कूल’ या नावाने सुरू झालेले अभियांत्रिकी शिक्षणाचे विद्यालय पुढे विस्तारत जाऊन, त्याचेच रूपांतर ‘कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. त्याच प्रमाणे १८७८ मध्ये ‘बी. जे. मेडिकल स्कूल’ या नावाने सुरू झालेल्या वैद्यकीय विद्यालयाचे ‘बी. जे. मेडिकल कॉलेज’ मध्ये रूपांतर झाले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी न्या.रानडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सु.एक लाख रूपयांचा निधी गोळा करून पुणे येथे ‘द रानडे इंडस्ट्रिअल अँड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट’ ही संशोधनसंस्था १९०८ मध्ये स्थापन केली. पुढे हीच संस्था प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ द. वा. लिमये यांच्या संचालकत्वाखाली जागतिक कीर्तीचे संशोधन करणारी मान्यवर संस्था म्हणून नावारूपाला आली. मुंबईमध्ये वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने ⇨ बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीची स्थापना १८८३ मध्ये झाली. ‘अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटी ऑफ बाँबे’ ही मानवशास्त्रविषयक अभ्यासास वाहिलेली संस्था १८८६ मध्ये स्थापन झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात सर्वच राज्यांत वैज्ञानिक, तांत्रिक औद्योगिक व कृषिविषयक व्यासंग-संशोधनाला फार मोठ्या प्रमाणात उत्तेजन व साहाय्य मिळाले असले, तरी वैज्ञानिक शिक्षण व संशोधन यांची सुरूवात त्या आधीच सु. शंभर वर्षे झाली होती, हे यावरून लक्षात येते.

शिक्षणविषयक प्रशिक्षण देणारे मुंबई इलाख्यातील पहिले महाविद्यालय ‘सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज’ हे १९०६ मध्ये मुंबईस सुरू झाले. त्यात पहिल्यापासूनच विज्ञान-अध्यापनाचा अंतर्भाव होता, तसेच त्यासाठी पुरूषांबरोबरच स्त्रियांनाही प्रवेश दिला जात असे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण व आदिवासी भागांत प्राथमिक स्तरावरील शालेय विज्ञानशिक्षणात काही सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने ⇨ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेतील होमी भाभा विज्ञानशिक्षण केंद्राने एक संशोधन-प्रकल्प १९७५ ते १९७८ या काळात हाती घेतला होता. जळगाव जिल्ह्यातील खिरोदा व त्याच्या परिसरातील पंधरा खेड्यांत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांच्या आधारे विज्ञान कसे शिकवावे, ह्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले. प्रयोगसाहित्य नसले तरीही आसपास सहज मिळणाऱ्या जवळजवळ टाकाऊ अशा वस्तू वापरून शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त प्रयोग कसे करता येतील, ह्यावर या प्रकल्पात भर देण्यात आला. तसेच विज्ञान शिक्षणात दुर्बोध पुस्तकी भाषेचा अडसर ग्रामीण मुलांना जाणवत असल्याने, अकारण येणारी क्लिष्टता, परिभाषेची संस्कृतप्रचुरता शक्य तितकी टाळून, सोप्या व सुटसुटीत भाषेत विज्ञानपुस्तके तयार करण्याचे प्रयोग यशस्वी रीत्या करण्यात आले. दुर्बोध भाषेचा अडसर दूर केल्यावर समाजाच्या सर्वच स्तरांतील अगदी गरीब मागासवर्गातील मुलेसुद्धा विज्ञानासारखा विषय आत्मसात करू शकतात, हे या व नंतरच्या प्रयोगांतून सिद्ध झाले.

सर्वानाच इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण सलग घेता येत नाही. अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करू पाहणारे, किंवा एखाद्या खास विषयाचे घरबसल्या शिक्षण घेऊ पाहणारे यांच्यासाठी आता मुक्तविद्यापीठाची सोय झाली आहे. मुक्त विद्यापीठ आता विज्ञान, तंत्रविद्या यांसारख्या प्रयोगनिष्ठ विषयांचेही शिक्षण देऊ शकते. महाराष्ट्रापुरतेच पहावयाचे, तर नासिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे आपले ब्रीदवाक्य खरे करीत आहे.

प्राथमिक पातळीवर मुलांना शालेय वयातच जीवनावश्यक अशी तांत्रिक कौशल्ये शिकवावीत हा विचार १९३६-३७ मध्ये, जेव्हा भारतातील बऱ्याच प्रांतांत काँग्रेस पक्षाची मंत्रिमंडळे स्थापन झाली व त्यांनी महात्मा गांधींची ⇨ मूलोद्योग शिक्षणाची कल्पना रूजविण्याचे ठरविले, तेव्हा अंमलात आला. इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील मुलामुलींना सुतारकाम, विणकाम, शिवणकाम, कागदकाम यांपैकी एक हस्तकला वा कारगिरीचा विषय (क्राफ्ट) अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकविण्याचे ठरले. १९५२ च्या मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार माध्यमिक शालेय स्तरावर बहुपर्यायी अभ्यासक्रम सुरू झाले. यांमध्ये तांत्रिक व कृषी अभ्यासक्रम विशेष मान्यता पावले. भारताच्या उत्तरेकडील अनेक राज्यांत मुदलियार समितीच्या शिफारशींप्रमाणे उच्च माध्यमिक शाळा स्थापन झाल्या आणि पारंपारिक अभ्यासक्रमाला समांतर असा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाला. कोठरी आयोगाने (१९६४-६६) सर्व देशभर १०+२+३ अशा अभ्यासक्रमाची शिफारस केली होती. प्रत्यक्षात १९७४ च्या सुमारास बहुसंख्य राज्यांत हा अभ्यासक्रम सुरू झाला. या अभ्यासक्रमात साधारण पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी +२ (कनिष्ठ महाविद्यालयीन) स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडणे अपेक्षित होते. या अभ्यासक्रमात तांत्रिक विषय, इलेक्ट्रॉनिकी, कृषी, पादत्राणे तयार करण्याची तंत्रविद्या अशा अनेकविध जावनोपयोगी विषयांचा समावेश होता. १९८० च्या सुमारास विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक विद्यापीठांना पदवी स्तरावर व्यावसायिक विषय शिकविण्याची परवानगी दिली. भारतात १९५० नंतर झपाट्याने औद्योगिकीकरण होऊ लागले. या उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कामगारवर्गाची जरूरी भासू लागली. यांशिवाय समाजाच्या दैनंदिन गरजांसाठीही (पाण्याचे नळ जोडणे व दुरूस्त करणे, किरकोळ सुतारकाम करणे, विजेची उपकरणे दुरूस्त करणे  इ.) प्रशिक्षित मनुष्यबळाची जरूरी भासू लागली. त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय्‌टीआय्‌) सुरू झाल्या. या संस्थांत अनेक तांत्रिक कौशल्ये शिकविली जातात. शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ज्या मुलांना तांत्रिक शिक्षण घ्यावयाचे असते पण पदवी मिळविण्याइतकी आर्थिक वा अन्य तऱ्हेने तयारी नसते, त्यांच्यासाठी तंत्रनिकेतने (पॉलिटेक्निक) सुरू झाली. किंबहुना एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई, पुणे, चेन्नई, रूडकी येथे प्रथमतः स्थापत्य विषयातील परवानाधारक स्थापत्य अभियंता हा अभ्यासक्रम सुरू झाला, नंतर तेथेच पदविका अभ्यासक्रम सुरू झाले व कालांतराने या अभ्यासक्रमांसाठी वेगळी विद्यालये स्थापन होऊन मूळची महाविद्यालये स्वतंत्र अभियांत्रिकी महाविद्यालये म्हणून कार्य करू लागली व आजही ती कार्यरत आहेत. ‘लायसेन्सिएट मेडिकल प्रॅक्टिशनर’ (एल्‌एम्‌पी) हा वैद्यक अभ्यासक्रमही परवापरवापर्यंत उपलब्ध होता. पदविका अभ्यासक्रमांनंतरचे उच्च स्तरावरचे अभ्यासक्रम म्हणजे प्रथम पदवीपातळी आणि नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम होत. सामान्यतः जेथे पदव्युत्तर विषय शिकविले जातात, तेथे संशोधनही चालते. वरील औपचारिक शिक्षण देणाऱ्या संस्थाव्यतिरिक्त अनेक खाजगी संस्था वेगवेगळी तांत्रिक कौशल्ये शिकविणारे, वेगवेगळ्या मुदतींचे अभ्यासक्रम राबवतात. १९९५ नंतर मोठ्या शहरांतून तांत्रिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था स्थापन झाल्या असून तेथे मुख्यत्वे संगणकविषयक वेगवेगळे अभ्यासक्रम शिकविले जातात.

मुंबई विद्यापीठाने १९३४ मध्ये रासायनिक तंत्रविद्या विभाग (यूनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी यूडीसीटी) सुरू केला. तेथे प्रथम रासायनिक अभियांत्रिकी व वस्त्रनिर्माण रसायनशास्त्र हे विषय पदवीपातळीवर शिकविले जात. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच संस्था होय. हळूहळू या संस्थेत अन्न तंत्रविद्या, तेले व वसा प्लॅस्टिक तंत्रविद्या, रंगलेप-तंत्रविद्या, औषधी आणि रंजक द्रव्ये या विषयांतील पदवी-अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. आता देशात या प्रकारच्या अनेक संस्था आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पुणे, रूडकी आणि चेन्नई येथे पदवीचे शिक्षण देणारी जी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली, त्यांत सुरूवातीला फक्त स्थापत्य अभियांत्रिकी आणि विद्युत् अभियांत्रिकी या शाखांची नंतर भर पडली. सुमारे पंचाहत्तर वर्षांहून अधिक काळ अभियांत्रिकी महाविद्यालयांतून केवळ हेच तीन पदवी अभ्यासक्रम शिकवले जात. दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान व तंत्रविद्याविषयक ज्ञानाचा जो अफाट विस्तार घडून आला, त्यामुळे कितीतरी नवनव्या विषयांची व अभ्यासक्रमांची शिक्षणक्रमात भर पडत गेली. त्यांत प्रामुख्याने धातुविज्ञान, इलेक्ट्रॉनिकी, वैमानिकी, बहुवारिक, खनिज तेल, खाणकाम, खनिज तेल रसायने, रसायन-उत्पादन अभियांत्रिकी, स्वयंचल अभियांत्रिकी, संगणक, मुद्रण, रबर, जैव अभियांत्रिकी, नाविक अभियांत्रिकी, जहाजबांधणी, रेडिओ अभियांत्रिकी, संदेशवहन अभियांत्रिकी, कागद अभियांत्रिकी, काच अभियांत्रिकी, मृत्तिकाशिल्प, रंगलेप-तंत्रविद्या इ. विषयोपविषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो. निरनिराळ्या अभियांत्रिकी विषयांप्रमाणेच आता वैद्यक, औषधनिर्माणशास्त्र, कृषिविज्ञान, पशुपालन, गृहविज्ञान, रूग्णपरिचर्या, खाद्यपेय आयोजन, जोडणीकाम, वास्तुशास्त्र, गृहशोभन इ. अनेकविध विषयोपविषयांतील तंत्रविद्या शिक्षणाचे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत.

विज्ञानशिक्षण व संशोधनविषयक संस्था : स्वातंत्र्योत्तर काळात शास्त्रविषयांचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रमाणात व्हावे, तसेच ह्या विषयांतील संशोधनाला चालना मिळावी, ह्या दृष्टीने देशात ⇨ राष्ट्रीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. या प्रकारची रासायनिक विषयाची प्रयोगशाळा (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) पुण्यात आहे. अशा सर्वच प्रयोगशाळांतून एम्‌. फिल्‌., डी. एस्‌सी. व पीएच् .डी. पातळ्यांवरील अध्यापनही चालते. देशाच्या औद्योगिक विकासासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षित अभियांत्रिकी पदवीधर उपलब्ध व्हावेत, म्हणून १९५० च्या सुमारास मुंबई, चेन्नई, दिल्ली, कानपूर आणि खरगपूर (खड्‌गपूर), कलकत्ता या ठिकाणी स्वायत्त स्वरूपाची तांत्रिक महाविद्यालये (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय्‌आय्‌टी) स्थापण्यात आली. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, रशिया, इ. देशांनी ही महाविद्यालये स्थापण्यास भरघोस आर्थिक साहाय्य केले. केंद्र शासनामध्ये विज्ञान आणि तंत्रविद्येच्या विकासात साहाय्य करणारा एक विभाग (डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी) आहे. या विभागाच्या साहाय्याने देशामध्ये १३ स्वायत्त संस्था मूलभूत आणि उपयोजित विज्ञानांतील संशोधनाचे कार्य करतात. त्या पदव्युत्तर आणि पीएच्‌.डी. अभ्यासक्रमही चालवितात. या संस्था म्हणजे बोस इन्स्टिट्यूट, कलकत्ता आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे [⟶ महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स], श्री चित्रा तिरूमल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, तिरूअनंतपुरम् आय्‌. ए. सा. एस्‌., कलकत्ता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी, पुणे इंडियनइन्स्टिट्यूट ऑफ प्लॅझ्मा रिसर्च, भाट, गांधीनगर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बंगलोर जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲड्‌व्हान्स्‌ड सायंटिफिक रिसर्च, बंगलोर रामन रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगलोर एस्. एन्. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, कलकत्ता बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओबॉटनी, लखनौ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, मुंबई आणि वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी. डेहराडून. यांशिवाय इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग, नवी दिल्ली इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, अलाहाबाद आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, कलकत्ता या संस्थांना केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रविद्या विभागाकडून आर्थिक आणि व्यवस्थापकीय साहाय्य मिळते.

विज्ञान आणि तंत्रविद्या क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती होत आहे. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा अहर्निश रूंदावत आहेत. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रविद्या शिक्षणाच्या सुविधाही भावी काळात वाढतच जाणार, हे उघड आहे.

पहा : औद्योगिक शिक्षण; कृषिशिक्षण; तंत्रविद्या; तांत्रिक शिक्षण; विज्ञान; वैद्यकीय शिक्षण; व्यवसाय शिक्षण; शिक्षण.

संदर्भ : 1. Tannenbaum, Harold E. Stillman, Nathan, Science Education for Elementary School Teachers, Boston, 1960.

२. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रकाशन, विज्ञानाचा इतिहास, नासिक, १९९०.

गोगटे, श्री. ब.