लॅटिन अमेरिकेतील नवस्वतंत्र देश. व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यापासून केवळ १५ ते २० किमी. अंतरावर असणारे ४,८२८ चौ. किमी.चे त्रिनिदाद बेट आणि त्याच्या ईशान्येस ३३ किमी. अंतरावरील ३०१ चौ. किमी.चे टोबॅगो हे दुसरे बेट अशी दोन बेटे मिळून हा देश बनला आहे. एकूण क्षेत्रफळ ५,१२८ चौ. किमी. अक्षवृत्तीय विस्तार १० ५’ ते ११ ४’ उत्तर, रेखावृत्तीय विस्तार ६० २०’ ते ६२ प. लोकसंख्या ९,३१,०७१ (१९७०). पूर्वी वेस्ट इंडीजच्या ब्रिटिश वसाहतीमध्येच ही बेटे होती. ३१ ऑगस्ट १९६२ रोजी तो ब्रिटिश कॉमनवेल्थचा स्वतंत्र देश म्हणून स्वतंत्र करण्यात आला. पोर्ट ऑफ स्पेन ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : त्रिनिदाद हे बरेच मोठे बेट असून कोलंबसास तिसऱ्या सफरीमध्ये १४९८ साली ते सापडले. व्हेनेझुएलापासून हे बेट ड्रागोन्स माउथ व सर्पंट्स माउथ या सामुद्रधुन्यांनी वेगळे केले आहे. भूशैलदृष्ट्या ते दक्षिण अमेरिकेचाच तुटलेला भाग आहे. व्हेनेझुएलातील काडेना देल लिटोरल ओरिएंटल या डोंगररांगेचाच भाग या बेटाच्या उत्तर भागात असून सरासरी उंची ३५० मी. असून सर्वोच्च उंची सेरो आरीपो येथे ९४० मी. आहे. या रांगेच्या उत्तर उतारावर अनेक धबधबे आहेत. ब्ल्यू बेसीन व माराकास हे धबधबे ९१ मी. उंच आहेत. या रांगेपेक्षा कमी उंचीची सेंट्रलरेंज नैर्ऋत्य ईशान्य दिशेने जाते, या रांगेतील सर्वोच्च शिखर तामाना केवळ ३०८ मी. उंच आहे. अगदी दक्षिणेस एक डोंगराळ रांग आहे. या प्रकारच्या भूरचनेमुळे नद्यांची लांबी कोठेही ८० किमी. पेक्षा जास्त नाही. बहुतेक नद्या ३०-३५ किमी. लांबीच्याच आहेत. बेटाभोवती १३ दलदलींचे प्रदेश आहेत. पैकी करोनी स्बँप प्रसिद्ध आहे. सु. २,००० चौ. किमी. प्रदेशात तेल असणारे खडक आहेत. अनेक ठिकाणी वायू व तेल यांच्या वाहण्याने चिखली ज्वालामुखी बनले आहेत. डेव्हिल्स वुडयार्ड हा विशेष प्रसिद्ध आहे. बेटाच्या नैर्ऋत्य भागात अवसादी ज्वालामुखीमुळे डांबराचे तळे बनले असून त्यात १ कोटी टन डांबर असावे असा अंदाज आहे.

टोबॅगो हे चिरूटसारखे दिसणारे छोटे बेट त्रिनिदादचाच पुढचा तुटलेला भाग आहे. त्याची ईशान्य-नैर्ऋत्य लांबी ४२ किमी. आहे. त्यावर पसरलेल्या डोंगररांगेतील सर्वोच्च पिजन शिखराची उंची ५७९ मी. आहे. जवळच लिटल टोबॅगो हे केवळ पक्षी अभयारण्य म्हणून राखलेले बेट आहे.

हवामान : हवामान उष्ण कटिबंधीय आहे. समुद्र प्रभावाने ते वर्षभर सम आढळते. जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये थंड तपमान असते (२० से.) व मे महिन्यात ३२ से. हे कमाल तपमान आढळते. दिवस-रात्र यांच्या तपमानात खाऱ्या वाऱ्यामुळे फारच फरक पडतो. वार्षिक पर्जन्य सरासरी १५० सेंमी. पेक्षा जास्त आहे. जून ते नोव्हेंबर या काळात मुख्यत: पाऊस पडतो. ही बेटे वादळमार्गापासून दूर आहेत, त्यामुळे क्वचितच वादळे होतात.

वनस्पती व प्राणी : उंच डोंगराळ भागातच दाट जंगले आहेत. इम्मॉर्टेल हे झाड विशेष प्रसिद्ध आहे. लहान प्राणीच या बेटावर आहेत. त्यांपैकी इग्वाना हा घोरपडीसारखा मोठा प्राणी असून ॲगुटी, क्वेंक व आर्मडिलो हे इतर छोटे प्राणी आढळतात. साप, कासव व मगरही आहेत. पक्षिजीवनासाठी ही बेटे प्रसिद्ध आहेत. दलदलीच्या भागात हंसक, इग्रेट व सोनेरी आयबिस हे पक्षी विशेष महत्त्वाचे आहेत. सोनेरी आयबिस हा राष्ट्रीय पक्षी आहे.

इतिहास : कोलंबसाने शोधून काढल्यानंतर येथे स्पॅनिश लोकांची सत्ता होती. १७९७ साली ही बेटे ब्रिटिश नाविक दलाने घेतली. स्पॅनिश लोकांनी बेटांच्या विकासासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. सुरुवातीस तंबाखू व कोको हीच प्रमुख उत्पादने महत्त्वाची होती. सुरुवातीस अमेरिकन इंडियन वंशाचे काही लोक बेटावर होते; पण मळ्यात काम करण्यास भाग पाडल्याने व अत्याचारांमुळे ते नष्ट झाले. त्यानंतर आफ्रिकेतून निग्रो गुलाम मजूर मळ्यात काम करण्यासाठी आणण्यात आले. एकोणिसाव्या शतकात दक्षिण अमेरिकेतून काही लोकांनी येथे स्थलांतर केले तसेच उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी भारतीय मजूरही आणण्यात आले. चिनी मजूर येथे फारसे टिकले नाहीत. टोबॅगो बेटाबाबत फ्रेंच, डच, स्पॅनिश व ब्रिटिश यांमध्ये वाद होता. १८०२ मध्ये इंग्लंडही येथे आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी बनले. १८८९ पर्यंत त्याचा कारभार स्वतंत्र होता; पण त्यानंतर त्रिनिदाद आणि टोबॅगो असे संयुक्त शासन निर्माण करण्यात आले. १९२३ मध्ये स्वातंत्र्याच्या दिशेने पहिली सवलत देण्यात आली व सात निवडलेल्या मंडळांकडे कारभार सोपविण्यात आला. त्यानंतर त्रिनिदादच्या तेल कामगारांनी संप केले आणि त्यामुळे १९४५ पासून सार्वत्रिक मतदानाचा हक्क देण्यात आला. १९५६ मध्ये एरिक विल्यम्स यांच्या पिपल्स नॅशनल मुव्हमेंट पक्षाने निवडणुका जिंकल्या आणि १९६२ साली देशास स्वातंत्र्य देण्यात आले.

राज्यव्यवस्था : घटनेप्रमाणे द्वीगृही संसद असून सीनेट हे वरिष्ठ व हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे कनिष्ठ सभागृह आहे. सीनेटचे सभासद २४ असतात आणि ते पंतप्रधानाकडून १३, विरोधी पक्षनेत्याकडून ४, धार्मिक गट ७ अशा प्रकारे नियुक्त केले जातात. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये ३६ सभासद प्रौढ गुप्त मतदानाने निवडले जातात. बहुमतवाला पक्ष पंतप्रधान व मंत्रिमंडळ निवडतो. उच्च न्यायालय आणि मॅजिस्ट्रेट कोर्ट यांमार्फत न्याययंत्रणा चालते. देशात ६ उच्च आणि २८ मॅजिस्ट्रेट कोर्ट आहेत. काही वेळा खास अपील न्यायालये स्थापिली जातात. अल्प प्रमाणात इंग्लंडमधील प्रिव्ही कौन्सिलकडे दार मागता येते. देशात आठ काऊंटीज, तीन नगरपालिका व दोन वार्ड आहेत.

आर्थिक स्थिती : देशाची अर्थव्यवस्था मुख्यत: खनिज तेलावर अवलंबून आहे. एकूण निर्यातीमध्ये खनिज तेलाचे प्रमाण ८३ % होते (१९७०). एकूण उत्पन्नाच्या ३०% उत्पन्न या उद्योगापासूनच मिळते; पण यात फारच थेडा रोजगार निर्माण होतो. केवळ ७ % श्रमिक या उद्योगात आहेत. उलट शेतीपासून केवळ ८% उत्पन्न मिळते पण २२% श्रमिक या व्यवसायावर अवलंबून आहेत. साखर, कॉफी व कोको ही प्रमुख पिके आहेत. लिंबू जातीची फळे, कुक्कुट उत्पादने, भाजीपाला व मका, तांदूळ इ. अन्य पिकांचे उत्पादन होते. सु. ५०% प्रदेशावर शेती होते. ऊस ४७,३४८ हे., कोको  ४८,४६८ हे., नारळ १४,००० हे. आणि लिंबू जातीची फळे ५,२३० हे. असे प्रमुख पिकाखालील क्षेत्र होते (१९७३). १९७३ मध्ये १,८१,१६५ मे. टन साखरेचे उत्पादन झाले.

खनिज तेलाशिवाय इतर उद्योगांचा १९६० पूर्वी फारसा विकास झालेला नव्हता. आत्मनिर्भरतेचे धोरण व कॅरिबियन फ्री ट्रेड असोसिएशनचे सभासदत्व यांमुळे बराच उद्योगविकास अलीकडे घडून आला आहे. सिमेंट, लाकूडसामान, तयार कपडे व मोटार उद्योग हे उद्योग सुरू झाले आहेत. तेल उत्पादनात १९०९ पासूनच सुरुवात झाली आहे. १९७२ मध्ये एकूण उत्पादन ५.१२ कोटी पिंपे व १९७३ मध्ये ६.६ कोटी पिंपे होते. निम्मे खनिज तेल जमिनीवर व निम्मे समुद्रतळावरून काढले जाते. त्रिनिदाद येथे तीन तेलशुद्धीकरण कारखाने असून त्यांची वार्षिक क्षमता १४.४२ कोटी पिंपे आहे. शुद्धीकरणासाठी व्हेनेझुएला, एक्वादोर, ब्राझील, सौदी अरेबिया व इंडोनेशिया इ. देशांतूनही त्रिनिदाद तेलाची आयात करतो. याशिवाय डांबराचे उत्पादन महत्त्वाचे असून १९७३ साली १,०७,८०० टन उत्पादन झाले.

व्यापार : निर्यात व्यापारात खनिज तेल ११२ कोटी (त्रिनिदाद व. टोबॅगो डॉलर), रसायने ७.२ कोटी, अन्नधान्ये ८.१३ कोटी आणि पक्का माल २.२ कोटी यांची निर्यात महत्त्वाची होती. आयात व्यापारात खनिज तेल व अन्नधान्याची आयात महत्त्वाची होती. आयातीत सौदी अरेबिया, अमेरिका, इंग्लंड व इंडोनेशिया महत्त्वाचे होते, तर निर्यातीत ५२.६% निर्यात अमेरिकेला होते. इतर देशांत कॅरिबियन देश, स्वीडन व इंग्लंड महत्त्वाचे आहेत.

दळणवळण : देशात ४,२०० किमी. लांबीचे रस्ते आहेत. १९६९ मध्ये ४६,५०९ मोटारी, ८,८६७ भाडोत्री मोटारी, १३,०७८ मालट्रक, ३०३ बसेस, ३,५४६ ट्रॅक्टर आणि १,६१४ मोटारसायकली होत्या. त्रिनिदादवर पीआर्को इंटरनॅशनल एअरपोर्ट हा विमानतळ असून अमेरिकेतील शहरांशी येथून वाहतूक चालते. टोबॅगो बेटावर क्राउन पॉइंट येथे विमानतळ आहे; पण तो त्रिनिदाद-टोबॅगो वाहतुकीसाठीच वापरला जातो. पोर्ट ऑफ स्पेन हे प्रमुख बंदर असून येथे १० मी. खोलीपर्यंतची जहाजे येऊ शकतात. शिवाय प्वँतापीअर, ब्राइटन या बंदरांतून खनिज तेलाची निर्यात होते. बेटावर दूरध्वनीची सोय आहे. आज उपग्रहामार्गे दूरसंदेशवहन सेवाही उपलब्ध आहेत.

लोक व समाजजीवन : देशाची १९७० च्या जनगणनेप्रमाणे एकूण लोकसंख्या ९,३१,०७१ होती (त्रिनिदाद ८,९२,३१७; टोबॅगो ३८,७५४). त्यात ४,५९,५१२ पुरुष व ४,७१,५५९ स्त्रिया होत्या. पोर्ट ऑफ स्पेन हे राजधानीचे शहर असून त्याची वस्ती ६२,६८० आहे. सान फेर्नांदो (३६,८७९) आणि अरीम (११,६३६) ही महत्त्वाची शहरे आहेत. अगदी सुरुवातीस त्रिनिदादवर आरावाक रेड इंडियन लोक होते. जात त्यांचे फारच थोडे वंशज आहेत व तेही मिश्रवर्णीय बनले आहेत. टोबॅगोवर कोलंबसाच्या आगमनापूर्वी वस्ती नव्हती. नंतरच्या काळात स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटिश, आफ्रिकन, भारतीय व चिनी या सर्ववंशीयांच्या मिश्रणातून आजची वस्ती निर्माण झाली आहे. प्रमुख वांशिक गट पाहिल्यास आफ्रिकी लोक ४२.८३%, भारतीय ४०.११%, मिश्रवर्णीय १४.७% असे वर्गीकरण आहे. इंग्रजी, हिंदी या प्रमुख भाषा आहेत. धार्मिक दृष्ट्या रोमन कॅथलिक ख्रिश्चन सर्वांत जास्त असून हिंदू धर्मीयांचा दुसरा क्रमांक आहे. त्या खालोखाल अँग्लिकन, प्रेसबिटेरियन, मेथडिस्ट इ. अनेक ख्रिस्ती पंथीय व काही इस्लाम धर्मीय लोक आहेत. आरोग्य, गृहनिर्माण या सेवा अपुऱ्या आहेत. शिक्षणसेवांमध्ये ४७१ प्राथमिक शाळा, ११२ माध्यमिक शाळा होत्या (१९६९). प्राथमिक शाळेत २,१९,००० व माध्यमिक शाळेत २०,१३० विद्यार्थी होते. ५ प्रशिक्षण महाविद्यालये व ४ तांत्रिक शाळा होत्या. शिक्षणाचा नवीन कार्यक्रम आखण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीचा प्रभाव खूपच आहे. दिवाळी व पूजा (कालीपूजा) हे येथेही प्रमुख सण आहेत. चातुर्वर्ण्यव्यवस्थाही काही प्रमाणात टिकून आहे. आफ्रिकन लोकांवर यूरोपियन व हिंदी दोन्हींचा प्रभाव आहे. स्पॅनिश वास्तुशिल्प कला व फ्रेंच संगीत महत्त्वाचे घटक आहेत. पोर्ट ऑफ स्पेन हे शहर सर्व संस्कृतींचे मीलनस्थान आहे कलिप्सो हा संगीतप्रकार विशेषत: येथूनच जगभर पसरला.

त्रिनिदाद बेटावरील पोर्ट ऑफ स्पेन, सान फेर्नांदो, अरीम, रेडहेड व टोबॅगोवर स्कारबरो, रॉक्सबरो, प्लिमथ ही प्रमुख शहरे आहेत. पर्यटन विकासासही बराच वाव आहे. (चित्रपत्रे ३, २०).

शहाणे, मो. ज्ञा.; डिसूझा, आ. रे.

 

अस्फाल्टची वाहतूक, डांबर सरोवर परिसर, त्रिनिदाद
आनंदोत्सवातील झगमगते नृत्यप्रदर्शन, त्रिनिदाद
ऊसतोडणी व पार्श्वभागी खत कारखाना, साव्होनेत्ता, त्रिनिदाद
मोहरमच्या मिरवणुकीचे दृश्य, त्रिनिदाद
तेलशुद्धीकरण कारखाना, प्वँतापीअर, त्रिनिदाद
पोर्ट ऑफ स्पेनजवळील हिंदू मंदिर, त्रिनिदाद