[गु., त., क., शिंगाडा; सं. शिंगाटा, शिंगाटक, त्रिकोनफल, जलफल; इं. वॉटर चेस्टनट, कॅल्ट्रॉप्स, शिंगाडा नट; लॅ. ट्रापा नटान्स  प्रकार बायस्पिनोजा, ट्रा. बायस्पिनोजा , ट्रा. क्वाड्रीस्पिनोजा; कुल-ट्रापेसी (ऑनेग्रेसी)]. या जलीय, खूप भिन्नता असलेल्या ओषधीचा प्रसार भारतभर सर्वत्र तलाव, तळी, डबकी यांत आढळतो. श्रीलंका, मलाया, यूरोप, उष्णकटिबंधी आफ्रिका यांतही ती लागवडीखाली आहे. तिचे खोड मऊ, लवचिक, कित्येक मीटर लांब असून त्यापासून खाली पाण्यात मुळासारखी व फणीप्रमाणे समोरासमोर उगवलेली व हिरवी लांब इंद्रिये असतात. मुळे आगंतुक व दोन प्रकारची असतात. खोडाच्या खालच्या टोकास असणारी मुळे चिखलात रुततात व दुसरी पाण्यावर इतस्तत: तरंगत असतात. पाने एकांतरित (एकाआड एक), समचतुर्भुजी, टोकास त्रिकोणी, दातेरी, खालील बाजूस तांबूस-जांभळी व लवदार आणि वरून गर्द हिरवी, गुळगुळीत, देठ लांब व टोकास फुगीर भाग, उपपर्णे पातळ रेषाकृती-कुंतसम (भाल्यासारखी), फुले पांढरट, एकएकटी व पानांच्या बगलेत फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. फुलांची संरचना व अन्य शारीरिक लक्षणे ⇨ ऑनेग्रेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ कपाली (कवची) प्रकारचे असते व ते पाण्याखाली पिकते, त्यावर दोन संदले कठीण शिंगाप्रमाणे असतात. फळांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) तृतीय कल्पात (६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वी ) सर्वत्र आढळतात.

शिंगाड्याचे विविध प्रकार भारतात निरनिराळ्या भागांत लागवडीत आहेत. काश्मीरात बासमती, डोग्रू इ. आग्रा (उत्तर प्रदेश) येथे बुरियाके-तालके-सिंगारे हा प्रकार फार लोकप्रिय आहे. राजस्थानात कोटा सुधार, नागझा हे प्रकार निवड पद्धतीने मिळविले आहेत. त्यांचे उत्पन्न जास्त येते. हे उष्ण हवामानातील पीक असल्यामुळे दक्षिण भारतातील तळी व जलाशयात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची शिफारस करतात.

तलावातील जमीन भारी व चिकण मातीची असावी. त्यात शेणखत व अमोनियम सल्फेट ही खतेही घालतात. मोठ्या आकाराची परिपक्व फळे बी म्हणून वापरतात. ती जमिनीत पायाने किंवा काठने दाबून लावतात. एका हेक्टरमधील रोपे ३-४ हेक्टरला पुरेशी होतात. तिच्या पानांवर ठिपके रोग (बायपोलॅरिस टेट्रामेरा) उत्तर प्रदेशात पडतो. त्यावर कॅप्टन हे कवकनाशक उपयुक्त आहे. शिंगाडा भुंगेरा (गॅल्युरुसेला बिर्मॅनिका) ही महत्त्वाची व सर्वत्र अढळणारी कीड आहे. तिच्यावर बीएचसी कीटकनाशकाची फवारणी फार उपयुक्त व प्रभावी आहे. गॅल्युरुसेला सिंघाला ही कीड अंबाला, गुरुगाव, गुरुदासपूर भागांत उग्ररूप धारण करते. याखेरीज इतर अन्य किडीही तिच्यावर आढळतात. शिंगाड्याचे हेक्टरी १,७६० – ४,४४० किग्रॅ. उत्पन्न येते, पण १३,२०० किग्रॅ. एवढे विक्रमी उत्पन्नही मिळाले आहे.

शिंगाड्याच्या फळांचा वास चेस्टनटासारखा असतो. ते खाद्य आहे. ते उकडून व भाजूनही खातात. महाराष्ट्रात मुख्यत: उपवासाला त्याच्या पिठापासून खाद्यपदार्थ तयार करतात. पिठापासून गुलाल बनवितात. बी थंड, गोड, अतिसार व पित्तविकारावर गुणकरी, तसेच घसादुखी, मूत्ररोग, रक्तदोष, कफ वगैरे विकारांवर उपयुक्त असते.

 

कुलकर्णी, उ. के.; चौधरी, रा. मो.