चरित्रे – आत्मचरित्रे : महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांच्या जीवनातील संस्मरणीय व उद्बोधक घटनांची भक्तिपूर्वक नोंद करावी, या प्ररेणेतून म्हाइंभट्टाने संकलित केलेले लीळाचरित्र हे मराठीतील पहिले चरित्र. त्यानंतरच्या सु. साडेपाचशे वर्षाच्या काळात म्हणजे इंग्रजांच्या राजवटीचा प्रारंभ होईपर्यत त्याच भक्तीच्या आणि उद्बोधनाच्या प्ररेणेतून अनेक लहानमोठी गद्यपद्यात्मक चरित्रे मराठीत लिहिली गेली. आख्याने, खंडकाव्ये, पोवाडे, ऐतिहासिक बखरी यांमधून ती विखुरलेली आहेत. समाजाच्या धर्मजीवनाचे आणि इतिहासाचे साधन म्हणून चालत आलेली चरित्रलेखनाची ही परंपरा ब्रिटिश राजवटीत योजनाबद्ध रीतीने सुरू झालेल्या शिक्षण प्रसारामुळे आणि त्यात लैकिक विद्यांच्या अभ्यासावर जो भर दिला गेला त्यामुळे हळूहळू बदलू लागली. शाळेतील विद्यार्थ्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींचे जीवनवृत्तांत आदर्श म्हणून ठेवावेत या बोधवादी भूमिकेत कोलंबस ( महादेवशास्त्री कोल्हटकर, १८४९ ), सॉक्रेटिस ( कृष्णशास्त्री चिपळूणकर, १८५२ ), नाना फडणवीस ( १८५२ ), बेंजामिन फ्रॅन्कलिन ( रा. गो. करंदीकर, १८७१ ) आदीबद्दलचे वृत्तांत लिहिणार्या या काळातील लेखकांनी साहजिकपणेच, त्या त्या व्यक्तींच्या इंग्रजीत उपलब्ध असणार्या चरित्रांचा भरपूर आधार घेतलेला आहे. कोलंबसाचा वृत्तांत ( महादेवशास्त्री कोल्हटकर ) आणि नाना फडनवीस ह्यांची बखर हे दोन चरित्रग्रंथ तर अनुक्रमे रॉबर्ट्सन आणि मॅक्डॉनल्ड ह्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे अनुवादच होत. ह्याच पद्धतीची पण स्वतंत्र स्वरूपाची असणारी म. वि. चौबळ संपादित हनुमंतस्वामीकृत रामदासस्वामीचे चरित्र ( १८७१ ), रा. पां. आजरेकर कृत श्रीविष्णुबाबा ब्रम्हचारी यांचे चरित्र ( १८७२ ) अशी चरित्रे उपलब्ध होत असतानाच थोड्याफार वेगळ्या वाङ्मयीन प्रयोजनातून साकार झालेली विष्णुशास्त्री चिपळूणकरांची डॉ. जॉन्सनसंबंधीची लेखमाला निबंधमालेतून प्रसिद्ध होऊ लागली ( १८७६ -७७ ). तिच्यात विद्वान, ध्येयवादी, मेहनती पण काहीशा विक्षिप्त स्वभावाच्या डॉ. जॉन्सनने स्वत:भोवतालच्या परिस्थितीवर मात करून इंग्रजी भाषेच्या व साहित्याच्या इतिहासात जे प्रचंड काम केले, ते सांगताना चिपळूणकरांनी जॉन्सनकडे एक गुणदोषयुक्त व्यक्ती म्हणून पाहिलेले होते इतके रंजक आणि तरीही त्या व्यक्तीच्या असामान्यत्त्वातून त्याच्या राष्ट्रातील ज्ञानलालसेने भारलेल्या वातावरणाची ओळख करून देणारे दुसरे चरित्रपर लिखाण तत्पूर्वी मराठी वाचकाला वाचावयास मिळाले नव्हते एखाद्या चरित्रलेखकाची कल्पनाशक्ती उपलब्ध माहितीला जो आकार देते तो इतिहासाच्या वा कादंबरीच्या कसा आणि कुठे जवळपास येतो हेही त्याला त्यामधून प्रथमच कळत होते. चरित्रनायकाचा स्वभाव आणि त्याच्यापुढील समस्यांचे दर्शन घडविणारी चिपळूणकरांची ही नवी दृष्टी लेखनाला लालित्याचा स्पर्श घडविणारी असल्याने जाणकार वाचकांकडून या पुढील काळात यथातथ्तत्वाबरोबर थोडी कलात्मकतेची अपेक्षाही चरित्रांकडून केली जाऊ लागली. त्या नमुन्यानुसार लेखकांकडून सत्याधिष्ठित जीवनचित्रण करण्याच्या हेतूने पत्रे, रोजनिश्या, आठवणी गोळा केल्या जाऊ लागल्या. त्यामुळे नंतरच्या काळात परिपूर्ण पुनर्निर्मितीच्या स्वरूपाची कलात्मका जरी नाही, तरी जसजसा शिक्षणप्रसार वाढत तसतशी बहुविधते बरोबरच यथार्थता आणि वाचनीयता चरित्रांमधून अधिकाधिक दिसू लागली.
आजही चरित्रविषय होणार्या बहुतेक सर्व थोर व्यक्तींच्या जीवनांचा संबंध समाजातील विविध चळवळींशी आणि मतप्रणालींशी घनिष्ठ स्वरूपाचा असल्याने त्यांची चरित्रेही त्यांच्या कार्याच्या प्रसाराची साधने कळत-नकळतच झालेली असतात. चरित्रनायकांबद्दल लिहिताना गुणदोषांचे संमिश्र चित्रण झाले, तर व्यक्तीच्या थोरवीला बाध तर येणार नाहीना, असे भयही अनेकांना वाटताना दिसते. त्यामुळे मानवी मनाच्या वास्तावातील गुंतागुंतीना सामोरे न जाता आकर्षक निवेदनाच्या साहाय्याने नायकाचा घटनाप्रधान जीवनक्रम सांगता आला, की लेखनातील साहित्यिक बाजू चांगली सजली असल्याचे समाधान लेखक-वाचक मानताना आढळतात. चरित्रसामग्रीतृन अर्थपूर्ण अशी पुनर्रचना करणे साधलेले नसेल, तर साहित्य या दृष्टीने एखाद्या थोर व्यक्तीचे चरित्र सामान्य होऊ शकते आणि ती साधल्यास सामान्य व्यक्तीचे चरित्रही थोर होऊ शकते हे अद्याप मराठी वाचकांना पुरेसे प्रतीत झालेलेच नाही.
डॉ. जॉन्सनचे विष्णुशास्त्रीयकृत चरित्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच जनमानसाची अस्मिता जागृत करण्याचे निबंधमालेचे प्रमुख उद्दिष्ट सुशिक्षितांवर प्रभाव पाडू लागलेले होते. त्याचा सर्वसाधारण परिणाम सुशिक्षितांमध्ये मराठेशाहीच्या इतिहासाबद्दल आस्थेची भावना निर्माण होण्यात झालेला होता. १८७५ ते १९७५ या पुढील शंभर वर्षाच्या कालखंडात साने, मोडक, शाळिग्राम, खरे, पारसनीस, राजवाडे, सरदेसाई, शेजवलकर आदींनी सातत्याने जुनी कागदपत्रे आणि त्यांचे ऐतिहासिक अन्वयार्थ प्रसिद्ध करून जे उत्तेजक वातावरण निर्माण केले त्यांतून इतिहासकालीन थोर व्यक्तींच्या जीवनाबद्दल कुतूहल निर्माण झाले व चरित्रसाहित्याला एक चांगला बहरच आला. त्यामध्ये पूर्वकाळात असामान्य कर्तबगारी करून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून नजीकच्या काळात हौतात्म्य पतकरून गेलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील शूर व्यक्तीपर्यत अनेकांची निवड लेखकांनी केलेली आढळते मात्र घटना, हकीगती यांना प्राधान्य देत, थोड्याशा रंजक पद्धतीने लिहिलेला हा व्यक्तिजीवनाचा इतिहासच असल्याने या चरित्रांबद्दल जी चर्चा झाली, ती त्यांतील सत्यासत्यांच्या संदर्भात,साहित्य म्हणून नव्हे. त्यामुळे महादजी शिंदे ( वि. र. नातूकृत चरित्र, १८९४ ) आणि नाना फडणवीस ( वासुदेवशास्त्री खरेकृत चरित्र, १८९२ ) यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण ह्याची त्यांच्या चरित्रांच्या अनुषंगाने सुरू झालेली चर्चा चिं. ग. भानूंचे नाना फडणवीसविषयक नवे संशोधन पुढे येण्याला कारणीभूत झाली. या वातावरणात पूर्वी शिवचरित्रे प्रसिद्ध झालेली असतानाही इंग्रजी – फार्सीतील नव्या माहितीच्या आधारावर लिहिलेले कृ. अ. केळुसकरांचे …छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ( १९०७ ) जेवढे वाचकप्रिय झाले, तेवढीच नवनवीन माहितीची भर पडून निर्माण झालेली पुढील काळातील वा. कृ. भावे ( युगप्रवर्तक शिवाजी महाराज, १९५५ ), दि. वि. काळे ( छत्रपती शिवाजी महाराज, १९५६ ), गो. स. सरदेसाई ( राजा शिवाजी , १९५७ ), वि. क. वाकरूकर ( छत्रपती श्री शिवप्रभूंचे चरित्र, १९५८ ), ब, मो. पुरंदरे ( राजा शिवछत्रपती, १९५८) यांची चरित्रेही ( त्याच कारणांनी ) लोकप्रिय झाली.
उपलब्ध होणार्या नवीन ऐतिहासिक माहितीच्या साहाय्याने व्यक्तिमत्वाचे जे नवे मूल्यमापन झाले त्यात शिवाजी महाराजांचे विभूतिमत्व अधिकच उजळत गेले व अस्मिता जागृतीला अपेक्षित असे साह्यही झाले. तथापि, अद्याप लेखकांकडून वास्तव आणि परिपूर्ण शिवचरित्राची अपेक्षा केली जात असून त्यासाठी त्र्यं. शं. शेजवळकरांनी गोळा केलेली शिवचरित्राची साधने एका विस्तृत ग्रंथाच्या रूपाने जाणकारांसमोर ठेवली गेलेली आहेतच ( श्रीशिवछत्रपती– संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने, १९६४ ).
या प्रकारची इतिहासविषयक चर्चेला प्रेरक ठरलेली वाचनीय चरित्रे पुढीलप्रमाणे उल्लेखिता येतील.
बापू गोखले यांचे चरित्र ( शं. तु. शाळिग्राम, १८७७ ), श्रीमंत बाजीराव बल्लाळ ऊर्फ पहिले बाजीरावसाहेब पेशवे ( ना. वि. बापट, १८७९ ), नाना फडनवीस ( बा. ना. देव, १९०४ ), झांशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब ह्यांचे चरित्र ( १८९४ ),महापुरूष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार ( द. ब.पारसनीस, १९०० ), देवी श्री. अहल्याबाई होळकर हिचे सचित्र चरित्र ( वि. ना. देव ऊर्फ ‘पुरूषोत्तम’, १९१३ ), चक्रवर्ति नेपोलियनचे चरित्र ( वि. ल. भावे, १९१७ ), प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी म्हणजेच सातार्याच्या राज्यक्रांतीचा इतिहास ( के. सी. ठाकरे, १९४८ ), छत्रपती संभाजी महाराज ( वा. सी. बेंद्रे १९६० ). यांपैकी पारसनीस, भावे आणि ठाकरे आणि ठाकरे यांचे लिखाण आकर्षक लेखनपद्धतीमुळेही ध्यानात रहावे असे आहे. पारसनिसांनी राणी लक्ष्मीबाईची तडफदार व्यक्तिरेखा विशेष सूक्ष्मपणाने व समप्राण उभी केली ठाकर्यांनी पेशवाईच्या अस्तालगतचे रंगो बापुजींचे अदभुतरम्य, साहसी जीवन ग्रथित करताना वापरलेली उपरोधपूर्ण, खटकेबाज निवेदनपद्धती आणि समाजप्रवृत्तीवर केलेली भाष्ये लेखकाचा आक्रमक आवेश प्रगट करणारी व रसरशीत झालेली आहेत, तर वि. ल. भावे यांना चक्रवर्ती नेपोलियनचे चरित्र परमेश्वराने घडविलेले एक अतिकुशल प्रतिभासंपन्न नाटक असावे तसे करूणोदत्त दिसले आहे. नेपोलियनच्या जीवनातील चढउतारांशी मनाने समरस होऊन त्यांनी रंगविलेले नेपोलियनच्या शौर्याचे, शृंगाराचे आणि कारुण्याचे क्षण त्यांच्या लेखनाला अपेक्षेप्रमाणे चटकदार कादंबरीची रम्यता आणतात.
अशी इतिहासाधिष्ठित चरित्रे प्रसिद्ध व्हायला नुकताच प्रारंभ झाला होता, तेव्हापासून सातत्याने चौतीस वर्षे विनायक कोंडदेव ओकांचे बालबोध ( १८८१ ) मासिक दर महिन्याला एखाद्या थोर व्यक्तीची थोडक्यात ओळख करून देऊन सांस्कृतिक संदर्भात चरित्रनिर्मितीस अनुकूल वातावरण तयार करीत होते. न्या. रानडे, लोकहितवादी यांच्यासारख्या अनेक समकालीन व्यक्तींवर लिहिताना त्यांचे काही स्वभावविशेषही टिपले जावेत अशी आधिनिक दृष्टी संपादक –लेखकांनी त्यात दाखविल्यामुळे या लेखनात एकेका व्यक्तिमत्वाचे अनौपचारिक स्वरूपही व्यक्त होऊन जाई. या वातावरणात ह्याच प्रकारचे पण प्रदीर्घ स्वरूपाचे दर्जेदार लेखन केले ते लक्ष्मणशास्त्री चिपळूणकर आणि काशीबाई कानिटकर ह्यांनी लक्ष्मणशास्त्र्यांनी त्यांचे थोरले बंधू विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्र लिहिताना ( १८९४ ) विष्णुशास्त्र्यांनीच प्रतिपादिलेला बॉझ्वेल ह्या प्रसिद्ध इंग्रज चरित्रकाराचा वास्तव चित्रणाचा आदर्श काटेकोरपणाने स्वत:समोर ठेवला. नायकाचे व्यक्तिमत्त्व कोणत्या संस्कारांतून घडले, याचा वेध घेऊन त्याचे त्याच्या लोकप्रसिद्ध विचारांशी असणारे नाते सूचित केले चरित्रलेखकाला आवश्यक असणारी आत्मीयता आणि तटस्थता लेखकाच्या जवळ होती, हे त्यांनी जी काही थोडी अप्रिय सत्ये प्रगट केली त्यावरून कळत होते. ह्याच कारणाने बा. ना. देव या तत्कालीन सुजाण समाक्षकाने या चरित्राचा गौरव केला, तर वा. दा. मुंडले यांच्यासारख्या काही विभूतिपूजकांनी त्याबद्दल खेदही नोंदविला. काशीबाईनी डॉ. आनंदीबाई जोशी ह्यांचे चरित्र लिहिले ( १८९१ ). आनंदीबाईनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना जे साहस अनुभवले होते, ते काशीबाईनी सांगितलेच परंतु एक स्त्री म्हणून आनंदीबाईनी जे सांसारिक सुखदु:ख तीव्रतेने अनुभवले, तेही मन:पूर्वकतेने धाडसाने साध्यासुध्या शैलात व्यक्त केले.
या दोन दर्जेदार चरित्रांपासून सुरू झालेला आधुनिक काळातील व्यक्तींच्या जीवनाचे वास्तव चित्रण करण्याचा प्रघात पुढील काळात विविध जीवनक्षेत्रांतील व्यक्तींची चरित्रे लिहिली गेल्याने बराच विस्तारला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्राच्या लोकजीवनावर प्रभाव पाडून गेलेली बराच विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत आणि कार्यकर्ती मंडळी माहितीपर चरित्राचे आणि चरित्रमालिकांचे विषय झाली. अव्वल इंग्रजीतील बाळशास्त्री जांभेकर – दादाभाई नवरोजी यांच्यापासून तो स्वातंत्र्योत्तर काळांतील नेहरू – आंबेडकरांपर्यतच्या, सु. दीडशे वर्षाच्या कालखंडातील व्यक्तींवर लिहिताना निरनिराळ्या लेखकांनी डोळ्यापुढे ठेवलेल्या विभिन्न प्रयोजनांतून एका व्यक्तींची अनेक चरित्रेही निर्माण होऊ लागली. लोकशिक्षण व मतप्रसार असे हेतू मनात असणार्या काही लेखकांनी स्वत:च्या प्रतिपक्षाचे परामर्श स्वत: लिहिलेल्या चरित्रांमधून घेतले. अशा लेखनाला सामाजिक इतिहासाच्या संदर्भात महत्त्व असल्याने या काळातील बहुतेक चरित्रांच्या शीर्षकांत ‘काल आणि कर्तृत्व’ हे वा या अर्थाचे शब्द वरचेवर दिसू लागले. चरित्राचा घाट या दृष्टीने पहिल्या भागात बालपण, विद्याभ्यास, सांसारिक अनुभव येऊ लागले आणि दुसर्या भागात संबंधित व्यक्तीचे जे कार्यक्षेत्र असेल, त्याची ओळख करून दिली जाऊ लागली. या घाटात फरक पडला, तो चरित्राच्या लहान-मोठ्या आकारानुसार किंवा लेखकाला अपेक्षित असणार्या वाचकांच्या लहानमोठ्या वयोमानानुसार. इथे बहुसंख्य चरित्रलेखकांनी स्वीकारलेली हकिगतीच्या निवेदकाची भूमिका जी पुनर्निर्मिती साधू शकत नव्हती, ती साधण्यासाठी १९५० च्या सुमारास साहित्यक्षेत्रात चरित्रात्मक कादंबरीचा जन्म झाला परंतु विशेष लोकप्रिय झालेला हा साहित्यप्रकार धड ना चरित्र, धड ना कादंबरी अशा स्वरूपाचा आहे, चांगल्या दर्जेदार चरित्रांना तो पर्याय नाही अशी खंतही जाणकारांकडून वरचेवर प्रगट झाली.
या प्रकारची काल आणि कर्तृत्व ह्यांचा परिचय करून देणारी समाजहितचिंतकांची काही महत्त्वाची चरित्रे पुढीलप्रमाणे आहेत :
(१)श्री. ना. कर्नाटकी यांनी लिहिलेली, थोर प्राच्यविद्याविशारद रा. गो. भांडारकर (१९२७ ), विद्वान सुधारक न्या. का. त्र्यं. तेलंग ( १९२९ ), संशोधक – सामाजसेवक डॉ. भाऊ दाजी लाड ( १९३१) यांची चरित्रे. (२) धर्मशील वृत्ताचे, रामशास्त्री बाण्याचे रावसाहेब वि. ना. मंडलीक ह्यांचे ग. रा. हवलदार ह्यांनी लिहिलेले चरित्र ( २ भाग, १९२७ ). मंडळीकांनी त्यांच्या वर्षानुवर्षाच्या रोजनिश्या अत्यंत साक्षेपाने लिहिलेल्या होत्या. त्यांचा भरपूर उपयोग केल्याने या चरित्रातून अव्वल इंग्रजीच्या काळाचीही बरीच कल्पना येते. ( ३) याच काळातील एक द्रष्ये पुरूष शतपत्रकर्ते गोपाळराव हरि देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचे, त्यांच्या चरित्रसाधनांची केलेली जुळवाजुळवच वाचकांसमोर ठेवणारे, कृ. ना. आठल्येकृत चरित्र ( १९२६ ). पुढे ह्याच सामग्रीत अधिक भर घालून त्र्यं. शं. शेजवलकर, गं. बा. सरदार, अ. का. प्रियोळकर, गोवर्धन पारीख इत्यादींनी चिपळूणकर युगात संशयास्पद झालेल्या लोकहितवादी ह्यांच्या वैचारिक मोठेपणाचे प्रतिपादन अभिमानपूर्वक केलेले आढळते. गोपाळराव हरि ( १९७९ ) हा लोकहितवादींच्या व्यक्तिमत्त्वाची आणि विचारसरणीची एकात्म मूर्ती उभी करणारा सरोजिनी वैद्यकृत चरित्रग्रंथ ह्याच मालिकेतील एक म्हणावा लागेल. ( ४) मुंबईचे वर्णन लिहिणार्या गोविंद नारायण माडगावकरांचे, जुना काळ उभा करणारे, अ. का. प्रियोळकरकृत चरित्र ( १९६४ ). (५) पु. बा. कुलकर्णीकृत जगन्नाथ शंकरशेट ( १९५८ ), मामा परमानंद ( १९६३ ), शेठ जावजी दादाजी ( निर्णयसागराचे संस्थापक ) ( १९६७ ) ह्यांची चरित्रे, अव्वल इंग्रजीत महाराष्ट्राचे शैक्षणिक, सांस्कृतिक, जीवन या व्यक्तींकडून कसे प्रयत्नपूर्वक आकाराला आणले गेले, त्याची चांगली ओळख करून देतात. ( ६) भिषग्वर्य, ब्रह्षी अण्णासाहेब पटवर्धनांच्या ऋषितुल्य, असाधारण जीवनाचा ‘अप्रबुद्धी’नी करून दिलेला परिचय भारतीयत्वाचे वेगळे दर्शन घडवतो ( १९२६ ). (७) विधवाविवाहाच्या प्रश्नावर जिवाचे रान करणारे विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांचे श्री. स. पंडितकृत चरित्र ( १९३६) किंवा बाळशास्त्री जांभेकरांचे दुर्मिळ झालेले लेखन तीन खंडांत एकत्र करताना ग. गं. जांभेकरांनी प्रारंभी त्याला जोडलेले बाळशास्त्रींचे चरित्र ( १९५० ), सुधारकाग्रणी गो. ग. आगरकरांची जगन्नाथ धोंडू भांगले ( १८९५), मा. दा. आळतेकर ( १९०१ ) यांनी लिहिलेली, आगरकरांची थोरवी व तळमळ व्यक्त करणारी चरित्रे.
वर उल्लेखिलेल्या ग. गं. जांभेकरांप्रमाणेच वंशजांनी अभिमानपूर्वक आपल्या पूर्वजांबद्दल लिहायचे, ही पद्धतीही आता लेखनक्षेत्रात रूढ झालेली आहे.[(१) यांत्रिकाची यात्रा ( लक्ष्मणराव किर्लोस्करांचे चरित्र : शं. वा. किर्लोस्कर, १९५८ ), (२) वडिलांचे सेवेसी ( म. म. जोशी, वा. म. जोशी, ना.म. जोशी चरित्रे अ.म. जोशी, १९६० ), (३) वाळवंटातील पाऊले ( न. चिं. केळकरांविषयी – का. न. केळकर, १९६३ ), (४) राजारामशास्त्री भागवत…. ( दुर्गा भागवत, १९४७ ), (५) सांगे वडिलांची कीर्ती ( व. पु. काळे, १९७५ ) ]. याचप्रमाणे एखाद्या कर्तबगार व्यावसायिकाची कर्तबगारी मेहनती लेखकाकडून मुद्दाम चरित्र लिहवून घेऊन ग्रथित करून ठेवण्याचे महत्त्व जाणकारांना कळू लागले आहे (वालचंद हिराचंद : व्यक्ती, काळ व कर्तृत्व – गं. दे. खानोलकर, १९६५ ). सांस्कृतिक इतिहासाचे एक साधन या दृष्टीने हे चरित्रलेखन फार आवश्यकही ठरते.
एखाद्या व्यक्तीने जीवन तिच्या काळाशी अनेक संदर्भात एकरूप झालेले असेल, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकेक पैलू लक्षात घेऊन तिची एकाहून अधिक चरित्रे लिहिली जाणे स्वाभाविकच होते. न्या. रानडे, ना. गोखले, लो. टिळक, म. गांधी, दलितोद्वारक आंबेडकर, क्रांतिकारक सावरकर व धर्मसंजीवक विवेकानंद यांची या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण चरित्रे मराठीत आता विपुलतेने उपलब्ध आहेत. संख्येने पाउणशेहून अधिक असणाऱ्या टिळकचरित्रांच्या निर्मितीस टिळकांच्या पन्नासाव्या वाढदिवसापासून जन्मशताब्दीपर्यत अनेक निमित्ते झालेली आहेत. सर्वागीण परिचयाची भूमिका घेणाऱ्या न. चिं. केळकरांच्या बृहद टिळक चरित्रापासून ( लौ. टिळक यांचे चरित्र – पूर्वार्ध, १९२३ उत्तरार्ध – खंड २, १९२८ उत्तरार्ध खंड ३, १९२८ ) स. वि. बापटांनी शेकडो लोकांकडून मिळविलेल्या टिलकांच्या लहानमोठ्या आठवणींपर्यत ( लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका – ३ खंड १९२४, १९२५, १९२८ ) अनेक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथांचा त्यांत समावेश आहे. चरित्रनायकांबद्दलच्या नवनवीन माहितीपासून नव्या मूल्यमापनापर्यतचा प्रवासही त्यांत आढळतो. न. र. फाटकांचे लोकमान्य पुरूषोत्तम म्हणून टिळकांचा गौरव करते ( १९७२ ) पण केवळ विभूतिपूजेची वृत्ती न ठेवता त्यांच्या कार्याच्या मर्यादांची आणि अपपरिणामांची चिकित्साही करते. लोकमान्य प्रसिद्ध होण्यापूर्वीच न्या. रानडे यांचे चरित्रलेखक म्हणून फाटकांचे लेखनतंत्र निश्चित झालेले होते. प्रारंभी थोर व्यक्तींच्या खाजगी आवश्यक तेवढीच ओळख करून देऊन मग कालक्रमाने त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख चितारावयाचा आणि ऐतिहासिक संदर्भात त्यांचे मूल्यमापन सूचित करायचे, अशी साधारणपणे एका प्रकारची मांडणी त्यांच्या न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि टिळक ह्यांच्या चरित्रांमध्ये आहे. पेशवाईच्या अस्तानंतरचे महाराष्ट्राचे सर्वागीण पुनरूस्थान रानडे यांच्या व्यापक धर्मशील विचारप्रणालीतून कसकसे घडले याचा अस्सल कागदपत्रांच्या पुराव्यावर आधारलेला अभ्यास, हे फाटकांच्या रानडेचरित्राचे वैशिष्ट्य ( न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र, १९२४ ), तर पाश्चात्य संस्कारांतून नामदार गोखल्यांचे आधुनिक भारतीयत्व कसे घडले होते, हे सांगणे फाटककृत आदर्श भारतसेवकाचे ( १९६७) वैशिष्ट्य म्हणता येईल. फाटकांची गद्यशैली कधी रूक्षतेच्या, क्लिष्टतेच्या व अनावश्यक उपरोधाच्या खुणा दाखवीत असली, तरी त्यांच्या ग्रंथांतील स्वतंत्र दृष्टिकोण व अभ्यासू वृत्ती मनावर परिणाम केल्याखेरीज राहात नाही.
नामदार गोखल्यांची पु. पां. गोखले ( १९६६ ) आणि वा. ब. पटवर्धन यांनी लिहिलेली ( मा. मनोरंजन, मध्ये प्रसिद्ध, १९१९) चरित्रेही उल्लेखनीय आहेत. पहिल्यामध्ये माहितीचे संकलन भरपूर असून दुसऱ्यामध्ये गोखल्यांच्या पूर्व-पश्चिमेच्या संस्कृतीतून संस्कारित झालेल्या व्यक्तिमत्त्वाचे व त्या निमित्ताने जाणवलेले मानवी जीवनाच्या स्वरूपाचे गंभीर, काव्यात्म असे चिंतन आलेले आहे. दुर्देवाने हे सुंदर स्वच्छंदतावादी इंग्रजी साहित्याचा संस्कारांतून लिहिले गेलेले गोखल्यांचे चरित्र अपुरेच राहिल्याने पुस्तकरूपानेही आलेले नाही. पु. पां. गोखल्यांनी १९३० मध्ये प्रसिद्ध झालेल्या मा. दा. अळतेकरकृत आगरकरचरित्रात ( गोपाळ गणेश आगरकर .. ) होती, त्यापेक्षा अधिक नवी माहिती मिळवून लिहिलेले सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांचे चरित्र ( १९३९ ), माहिती आणि कार्याचा गौरव अशा दोनही दृष्टींनी मौलिक आहे. सावरकरांच्या अनेक चरित्रांमध्ये शि. ल. करंदीकर ( १९४३ ), भा. कृ. केळकर ( १९५२ ), वि. स. वाळिंबे ( १९६७ ) आणि धनंजय कीर ( १९७२ ) यांनी लिहिलेली चरित्रे सावरकरांच्या तेजस्वी क्रांतिकार्याची विविध घटना-विचार यांमधून उत्तम ओळख करून देतात. स्वातंत्र्योत्तर काळात, महात्मा जोतिबा फुल्यांच्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सामाजिक कार्याचे एक वेगळेच आकलन विचारवंतांना आणि कार्यकर्त्याना झाल्याने जोतिबांच्या लिखाणाबद्दल आणि जीवनाबद्दल अलीकडे बरेच गौरवपूर्वक लिहिले गेले आहे. त्यामध्ये धनंजय कीरलिखित फुलेचरित्र ( १९६८ ) हा अतिशय महत्त्वाचा, प्रौढ आणि प्रशंसनीय असा प्रयत्न आहे. डॉ. आंबेडकरांनी अनुभवलेला जीवनकलह, जातिबांधवांसाठी उभे केलेले संधर्षमय लढे आणि निर्माण केलेली कार्य परंपरा त्यांच्या चां. भ. खैरमोडेलिखित पंचखंडात्मक चरित्रात ( डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, १९५२ – ६८) त्याचप्रमाणे धनंजय कीरलिखित बृहद्चरित्रात, ( विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानस आणि तत्त्वाविचार, ( १९६६) सविस्तर प्रगटलेली आहे. यांव्यतिरिक्त आंबेडकरांचे धर्मातर, राज्यघटनाकर्तृत्व, मानवताप्रेम हे विषयही स्वतंत्रपणाने अनेक आठवणींच्या संग्रहांचा विषय झालेले आहेतच. १९१८ साली प्रसिद्ध झालेल्या अवंतिकाबाई गोखले यांच्या महात्मा गांधीच्या चरित्रापासून ( ज्याला लोकमान्य टिळकांची गांधीजींविषयीच्या प्रस्तावना लाभली), दा. न. शुखरे व त्र्यं. र. देवगिरीकर यांच्या अनुक्रमे १९४४ व १९४९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या गांधीचरित्रांपर्यत विविधांगी माहिती आणि विवेचन यांची भर गांधी चरित्रांतून पडलेली आहे. आधुनिक भारतकर्ते आचार्य जावडेकर यांचे टिळक-गांधी तुलनात्मक विवेचन ही त्याची एक अपरिहार्य परिणतीच आहे ( लो. टिळक व म. गांधी १९४६ ). ना. ग. गोरे ( १९६५ ) आणि पां. वा. गाडगीळ ( १९६६ ) ह्यांच्या नेहरू- चरित्रांना दर्जेदार चिंतनाचा सूर लाभलेला आहे. तथापि आटोपशीरपणाने व्यक्तिवैशिष्ट्ये सांगणारे आचार्य अत्रे यांचे सूर्यास्त ( पं. नेहरूचरित्र – १९६४ ) तसेच कादंबरीकार ना. सी. फडके यांची दादाभाई नवरोजी ( १९२० ), लो. टिळक ( १९५० ) व राष्ट्रपिता महात्मा गांधी ( १९५१ ) ही चरित्रे निवडक प्रसंग आणि आकर्षक शैली यांमुळे सर्वसामान्य वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली आहेत. बडोदा संस्थानचे प्रजाहितदक्ष महाराज सयाजीराव गायकवाड यांचीही अशीच अनेक चरित्रे लिहिली गेली असून त्यांतील दा. ना. आपटे यांचे विसतृत असे त्रिखंडात्मक सयाजी-चरित्र ( १९३६ – ३७ ) विशेष लक्षणीय आहे.
या शंभर वर्षाच्या काळात ज्यांचे शौर्य लोकमानसाला हादरवून व भारावून टाकीत होते अशा सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही भरपूर लिहिले गेले. आहे. त्यांमध्ये वि. श्री. जोशी यांनी लिहिलेली वासुदेव बळवंत फडके ( १९४७, सुधारित आवृ. १९७४ ) आणि अनंतराव कान्हेरे, तात्या टोपे, विष्णु गणेश पिंगळे, खुदीराम बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदींची १९५१ पासून प्रसिद्ध झालेली आणि विशेष माहितीपूर्ण होत गेलेली चरित्रे क्रांतिकारकांची ओजस्वी वृत्ती प्रतीत करून देणारी आहेत.मृत्युंजयाचा आत्मयज्ञ ( १९५१, १९७२ ), कंठस्नान आणि बलिदान ( १९७३ ) या शीर्षकांवरूनही त्यातील आशयाची आणि शैलीची कल्पना येते. क्रांतिकारकांच्या झळझळीत जीवनक्रमात अनेकदा काही सामान्य-असामान्य व्यक्ती पडद्यामागे राहून मोठी कामे करीत असतात. द. न. गोखले यांचे क्रांतिवीर बाबाराव सावरकर ( १९४७ ) अशा उपेक्षित जीवनाची भावोत्कट ओळख करून देते. वा. कृ. परांजपे यांनी लिहिलेले काळकर्ते शिवरामपंत परांजपे-जीवन ( १९४५ ) कौटुंबिक माहितीबरोबरच परांजपे यांच्या तेजस्वी विचारसरणीची, तिच्यातील स्थित्यंतरांची पार्श्वभूमी चांगल्या प्रकारे टिपते. लोकमान्य टिळकांच्या आसपास असणाऱ्या, त्यांनी सांगितलेली महत्त्वाची कामगिरी निष्ठापूर्वक पार पाडणाऱ्या व्यक्तीही काही वैशिष्ट्यपूर्ण चरित्रांचा विषय झालेल्या आहेत. उदा., वासुकाका जोशी व त्यांचा काल ( त्र्यं. र. देवगिरीकर, १९४८ ), दादासाहेब खापर्डे ह्यांचे चरित्र ( बा. ग. खापर्डे, १९६२ ).
स्त्रीसुधारणा हा या कालखंडातील एक ज्वलंत विषय. ज्यांच्या प्रयत्नांनी तो अधिकच ज्वलंत झाला, त्या पंडिता रमाबाईचे महाराष्ट्राच्या तेजस्विनी असे वर्णन करणारे दे. ना. टिळककृत चरित्र ( १९६१ ) रमाबाईच्या कार्याच्या, व्यक्तिमत्त्वाच्या आणि माहितीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. रमाबाई रानड्यांचे उमाकांतकृत जीवन परिचयात्मक चरित्र ( १९२५ ) त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना विशेष आत्मीयतेने देते. कमलाबाई देशपांडे यांच्यावर कोवळ्या वयातच वैधव्याची आपत्ती आली परंतु मनोधैर्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी जे सार्थ जीवन व्यतीत केले. त्याची ओळख विद्या बाळ यांच्या कमलाकी मध्ये होते. परंतु ऐतिहासिक काळातील स्त्री-चरित्रे वगळता स्त्रियांची चरित्रे मराठीत संख्येने अगदी थोडीच आढळतात. १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेले, शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक हे ताराबाईचे कर्तृत्व व संघर्षमय जीवन ह्यांचा अविष्कार करणारे पद्मजा फाटककृत चरित्र हा एक सन्माननीय अपवाद आहे.
वरील सर्व काल आणि कर्तृत्व यांचे चित्रण करणारी, सामाजिक जीवनावर अधिक भर असणारी चरित्रे प्रसिद्ध होत होती. तेव्हाच ‘व्यक्ती आणि वाड्मय’ यांची ओळख करून देणारी महानुभाव पंथीय भास्करभट्ट बोरीकर यांच्यापासून तो रविकिरण मंडळाच्या माधव जूलियनांपर्यत अनेक कवी-लेखकांची चरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. या चरित्राचा प्रारंभीचा चरित्रात्मक भाग पुढील वाड्मय विवेचनाला पार्श्वभूमी निर्माण करून देत असल्याने त्यांचा समावेश अनेकदा समीक्षासाहित्यातही केला जात असतो. या प्रकारचे श्री. र. भिंगारकरलिखित श्री ज्ञानदेव चरित्र ( १८८६ ) ज्ञानेश्वरांचे चरित्र आणि काव्य यासंबंधीच्या चर्चाना प्रेरक ठरले. संतसाहित्याचे भक्त आणि अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी या पद्धतीने ज्ञानेश्वरांपासून मोरोपंतांपर्यत अनेकांवर रसाळपणे लिहून आम्ल सुशिक्षितांचे लक्ष जुन्या साहित्याकडे वेधून घेण्याचे मोठेच काम केले. परमार्थबुद्धी सांगितल्याप्रमाणे व्यक्तीचे शील घडत नाही आणि महात्म्यांच्या ग्रंथांत दोष संभवत नाहीत, अशी दृढ भूमिका असणारे पांगारकर, ज्ञानेश्वर ( १९१२ ), एकनाथ ( १९११), तुकाराम ( १९२० ), मोरोपंत ( १९०८ ) यांची व्यक्तिमत्वे त्यांच्या संतत्वाला महत्त्व देऊन उभी करतात. त्यांमध्ये विशेष चांगले उमटले आहे ते मोरोपंतांचे व्यक्तिमत्त्व. सुशील, कुटुंबवत्सल मोरोपंत, तत्कालीन कोटुंबिक – धार्मिक संस्कृतीची उत्तम ओळख करून देतात. पांगारकरांच्या प्रमाणेच ज. र. आजगावकरांनी महाराष्ट्र कविचरित्रमालेचे आठ भाग प्रसिद्ध करून ( १९०७ – २७ ) ह्याच प्रकारे जुन्या काळातील लेखकांचा परिचय करून दिला आहे. सप्रमाण लेखनाच्या अभावासंबंधीच्या स्वत:वरील प्रतिकूल टोकेला उत्तर देताना प्राचीन कालच्या संदर्भात चरित्र लेखनाची बॉझ्वेलची पद्धती कागदपत्रांच्या उपलब्धीखेरीज अगदी फोल ठरते हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. गं. दे. खानोलकरांची अर्षा चीन मराठी वाडमयसेवक ही चरित्रमाला अर्वाचीन साहित्यिकांचा थोडक्यात परिचय होण्याच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरली, १९७० साली प्रसिद्ध झालेले ल. ग. जोगांचे नामदेव-चरित्र-कार्यासंबंधीचे पुस्तक आजवरच्या नामदेवविषयक संशोधनाचा सविस्तर परामर्श घेते. ह्या प्रकारे आता मराठी एकेका विषयाबाबतचे पुनर्लेखन जसे होते आहे तसेच नव्याने संकलनही होते आहे. शं. दा. पेंडसे यांनी लिहिलेल्या …संत एकनाथ ( १९७१ ), साक्षात्कारी संत तुकाराम ( १९७२ ), राजगुरू समर्थ रामदास ( १९७४ ) यांमधून हा प्रत्यय येतो. प्राचीन संतजीवन आणि साहित्य यांकडे ऐतिहासिक काळातील प्रेरणा आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले आहे ते न. र. फाटक यांनी. ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यतच्या प्रमुख संतांवरील त्यांच्या चरित्रात्मक भाष्यांत त्यांनी मुसलमानी राजवटीच्या आणि संस्कृतीच्या हिंदुसमाजजीवनाशी व साहित्याशी झालेल्या संमीलनाची आणि आक्रमाणांची विविध रूपे लक्षात घेतली आहेत. फाटकांची भाष्ये भाविकांच्या व इतिहाससंशोधकांच्याही दृष्टीने वेळोवेळी वादाचा विषय झाली. प्राचीन संतांप्रमाणेच आधुनिक काळात होऊन गेलेल्या अनेक धर्मचिंतकांची, संतांची, महाराजांची वा सद्गुरूंची भक्तिरसपूर्ण चरित्रे ( गोदवलेकर, उपासनी, गुलाबराव, तुकडोजी, गाडगे महाराज इत्यादी ) आजही मोठ्या संख्येने मराठीत लिहिली-वाचली जात असतात. चरित्रातील उदात्तता, अद्भुतता यांमुळे ती श्रद्धापूर्वक वाचली जातात. रामकृष्ण परमहंस, शारदामाता आणि स्वामी विवेकानंदविषयक अनेक चरित्रांत प्रारंभी व्यक्तिजीवन थोडक्यात येते व भर राहतो तो विचारांच्या प्रकटीकरणावर. त्यांचे जीवनचिंतन हाच महत्त्वाचा आशय त्यांत असतो. स्वामी विवेकानंदांचे नऊ भागांतील भा. वि. फडके, रा. वा. बर्वे, रा. ना. मंडलिक यांनी लिहिलेले चरित्र ( १९१७ – २० ) हे या प्रकारच्या लेखनाचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल ). शं. गो. तुळपुळेकृत गुरूदेव रानडे यांचे चरित्र आजही ह्याच प्रकारे त्यांच्या गुरूदेवांचे पारमार्थिक जीवन भक्तिभावाने चित्रित करते व ते करताना गुरूदेव रानड्यांनी केलेल्या संतसाहित्याच्या चिंतनावर भर देते ( १९५८ ). पु. मं. लाडलिखित अपूर्ण राहिलेले वैशिष्ट्यपूर्ण तुकाराम-चरित्र ( १९५७ ) तुकारामांच्या साहित्याचा आधार घेत तुकारामांचे मानसिक जग सुंदर रीतीने उभे करीत जाते.
आधुनिक साहित्यिकांबद्दल मा. का. देशपांडे व वि. स. खांडेकर यांनीही लिहिले आहे. देशपांड्यांनी वि. स. खांडेकर ( १९४१ ), आचार्य प्र. के. अत्रे ( १९४१ ), न. चिं. केळकर ( १९४२ ) आणि ग. त्र्यं. माडखोलकर ( १९४८ ) आदींबद्दल, तर खांडेकरांनी राम गणेश गडकरी ( १९३२ ) आणि गोपाळ गणेश आगरकर ( १९३२ ) आदींबद्दल लिहिले. दोघांनीही दोन भिन्न प्रकारच्या आलंकारिक शैलीच्या आहारी जाऊन व्यक्तिजीवनाच्या वा साहित्याच्या फारसे खोल पाण्यात उतरण्याचे नाकारलेलेच आहे. ना. म. पटवर्धनलिखित वा. म. जोशी चरित्र ( १९४४ ) किंवा वि. ना. कोठीवालेकृत गडकरी जीवनचरित्र ( १९७० ) हे माहितीपर लेखनाचे आणखी एक प्रकारचे नमुने आहेत. सर्वसाधारणपणे विद्यापीठात वाङ्मयाभ्यास करणारा विद्यार्थी डोळ्यांपुढे ठेऊन लिहिलेली ही उपयुक्त चरित्रे शिक्षणाच्या प्रसाराबरोबर साहजिकपणेच निर्माण होत आहेत. याहून अधिक आणि वेगळा आवाका ज्या साहित्यिकांच्या चरित्रांचा आहे, ती काही पुढीलप्रमाणे आहेत : वेणूबाई पानसे किंवा नी. म. केळकर यांनी लिहिलेल्या हरि नारायण आपटे यांच्या चरित्रांत ( १९३१ , १९३३ ) एक गुणदोषयुक्त कलावंत व्यक्ती या दृष्टीने हरिभाऊंचे अंतरंग शोधण्याचा चांगला प्रयत्न आढळतो. द. न. गोखलेकृत ज्ञानकोशकर डॉ. केतकरांचे ( १९५९ ) व माधव जूलियनांचे चरित्र ( १९७८ ) ही त्या त्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिमा, पांडित्य, विक्षिप्तपणा, परिश्रम, पूर्वसंस्कार, मनोरचना असे सर्व घटक ध्यानात घेऊन जीवनातील सुसंगती-विसंगती हेरत दर्जेदारपणे लिहिलेली चरित्रे आहेत. नायक व्यक्तीची वाङ्मयनिर्मिती त्यांना कधी ती व्यक्ती समजून घेण्यास उपयोगी पडलेली आहे परंतु वाङ्मयाची समीक्षा करण्यावर चरित्रात त्यांचा भर नाही. चरित्रवाचनात ती व्यक्ती भेटावी, अशी जी अपेक्षा असते ती या ठिकाणी पुष्कळ अंशाने पूर्ण होते. याउलट गं. दे. खानोलकरांनी लिहिलेली माधव जूलियन्( १९५१ ), रवीद्रनाथ टागोर ( १९६१ ), श्री. कृ. कोल्हटकर ( १९२७, सुधारित आवृ. १९७२ ) यांची प्रदीर्घ चरित्रे नायकव्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांचे वाड्मय आणि त्या वाङ्मयाची जाणकरांनी केलेली समीक्षा सर्वच एकत्रितपणे व विस्तार पूर्वक देतात.
या ठिकाणी चरित्राची कक्षा समीक्षेच्या इतिहासात शिरते. लेखक आणि एक ध्येयवादी कार्यकर्ते म्हणून परिचित असलेली साने गुरूजींची मातृधर्मी प्रतिमा पु. ल. देशपांडे ( १९७० ), राजा मंगळवेढेकर ( साने गुरूजींची जीवनगाथा, १९७५ ) यांच्या चरित्रांतून भावपूर्ण रीतीने साकार झालेली आहे. कृ. वा. मराठेलिखित बालकवींचे चरित्र ( १९६२ ) व्यक्तिजीवन आणि काव्य यांचा परस्परसंबंध परिश्रमपूर्वक जमविलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट करते. ह्याच पद्धतीचे, साहित्याच्या चरित्रपर मानसशास्त्रीय समीक्षेला साहाय्यभूत ठरेल असे, पण कुतूहल चाळवीत लिहिलेले श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर आणि हिराबाई पेडणेकर यांचे सहजीवन म. ल. वर्हाडपांडे यांच्या कोल्हाटकर आणि हिराबाईमध्ये आढळते ( १९६९ ). कवी काव्यविहारीकृत देवल व्यक्ति आणि वाङ्मय ( १९६३ ) आणि पु. रा. लेले, का. ह. खाडिलकरलिखित नाटककार खाडिलकरांची चरित्रे उभयतांचा साहित्यिक व्यक्ती म्हणून मर्यादित रीतीने केवळ परिचय करून देतात ( १९२२ १९४९ ). रवीद्रनाथ, टॉलस्टॉय यांच्या प्रसिद्ध झालेल्या अनेक चरित्रांमध्ये बा. भ. बोरकरांचे आनंदयात्री ( १९६४ ) आणि सुमती देवस्थळे यांचे टॉलस्टॉय एक माणूस ( १९७४ ) वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाची आहेत. रवीद्रजीवनाचा अनेकांगी आलेख हे खानोलकरांचे, त्यांच्या संस्कारसाधनेतून काव्यात्मतेचा वेध हे बोरकरांचे, तर टॉलस्टॉयच्या व्यक्तिमत्त्वातील विचारवंत, साहित्यिक, कार्यकर्ता इ. पैलूंच्या मुळाशी असणारा माणूस नाट्यमय पद्धतीतून मूर्त करणे हे सुमती देवस्थळे ह्यांच्या लिखणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. यापूर्वी ( १९१९ ते १९२२ ) मध्ये प्र. श्री. भसे यांनी कौंट टॉलस्टॉय हे पंचखंडात्मक विस्तृत चरित्र लिहून वाचकांना टॉलस्टॉयची चांगली ओळख करून दिलेलीच होती.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांच्या क्षेत्रात अण्णासाहेब किर्लोस्कर आणि गो. ब. देवलांसारखे प्रतिष्ठित लोक नट-नाटककार-दिग्दर्शक म्हणून उतरले, तेव्हा नाट्यव्यवसायाकडे पाहण्याचा समाजाचा अवहेलनेचा दृष्टिकोण बदलून त्या क्षेत्रातील कलावंतांची चरित्रे गौरवपूर्वक लिहिली जाऊ लागली. शं. बा. मुजुमदारलिखित लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र ( १९०१ ) आणि ऩट-नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे चरित्र (१९०४ ) दोन्हीही –लेखकाचा स्वानुभव, संशोधनपूर्वक जमविलेली चरित्रात्मक माहिती आणि समकालीन नाट्यसमीक्षा जमेस धरून लिहिलेली असल्यामुळे विशेष जिवंत वठलेली आहेत. ह्यानंतरच्या साहित्यिक, खेळाडू, गायक, कारागीर इत्यादींच्या चरित्रांत अशा सर्व गोष्टी क्वचित एकत्र आल्या. बहुतेक चरित्रे म्हणजे आठवणी आणि आख्यायिकांचे रंजक संग्रह झाले. त्यामुळे देवल-कोल्हटकर-गडकऱ्यांसारखे लोकप्रिय नाटककार आणि बालगंधर्व-दीनानाथ-गणपतराव जोशी यांच्यासारखी दैवते बनलेली नटमंडळी अद्यापही आपणास उत्तम पूर्णाकारी चरित्रांतून व्यक्तिमत्तांच्या वैशिष्ट्यांसह, मूर्त झालेली आढळत नाहीत. त्यातल्यात्यात व. शां. देसाई यांची कलावंतांच्या सहवासात ( १९३९ ), कलेचे कटाक्ष ( १९४५ ), बालगंधर्व : व्यक्ती आणि कला ( १९५९), मखमालीचा पडदा ( १९४७ , दुसरी आवृ. १९६२ ) ही आठवणीवजा पुस्तकेच लक्षणीय ठरतात. बालगंधर्व या व्यक्तीची आणि गंधर्व युगाचीही गृढरम्यता देसाई ह्यांच्या लिखाणात प्रतीत होते. नटसम्राट गद्यनाट्याचार्य गणपतराव जोशी यांचे चरित्र ( ल. ना. जोशी, १९२३ ) अभिनयसम्राटांची हकिगत सांगते, तर बाबुराव पेंटर व्यक्ती आणि कला ( ना. सी. फडके, १९५४ ) चित्रमहर्षीच्या जीवनाची फारच वरवरची ओळख करून देते. त्यामुळे असे म्हणता येईल, की कलावंतासंबंधीच्या लोकमानसातील कुतूहलाला यापुढील काळात थोडा समाधानकारक प्रतिसाद दिला तो चरित्रांपेक्षा त्यांच्या स्वत:च्या लेखनानेच, म्हणजे आत्मचरित्रांनीच.
चरित्रसाहित्याचे या प्रकारचे इतिहास डोळ्यांपुढे ठेवून ह्या साहित्याचे एक विमर्शक प्रा. अ. म. जोशी यांनी सारांशाने असे मत नोंदविलेले आहे, की गेल्या शंभर वर्षात विविधता आणि विपुलता बरीच आलेली असली, तरी अद्याप कलापूर्ण चरित्रे लिहिणाऱ्या लेखकांची परंपरा मराठीत निर्माण झालेली नसून चरित्रविषयक मूलभूत दृष्टिकोणातही फारसा फरक पडलेला नाही. कालमानानुसार मांडणीत आणि भाषाशैलीत आकर्षकता आलेली आहे पण अद्यापही वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्याचा पाठपुरवठा न करता चरित्रनायकाच्या उघड किंवा छुप्या गुणसंकीर्तनातच आपण अडकलेले आहोत. चरित्रांच्या मानाने तुलनेने, आत्मचरित्रसाहित्य मात्र अधिक प्रगत झालेले आहे. प्रा. जोशींच्या या निष्कर्षाचा प्रत्यय गेल्या दीडशे वर्षातील आत्मचरित्रांच्या ओझरत्.या आढाव्यातूनही येतो.
प्राचीन काळात संत नामदेव, बहिणीबाई इत्यादींनी आत्मपर लेखन केलेल असले, तरी विपुल संख्येने बराचसा पूर्णाकार प्राप्त झालेली आत्मचरित्रे लिहिली गेली आहेत ती अव्वल इंग्रजीच्या काळापासूनच. स्वत:ची माहिती देणे, एखाद्या प्रसंग रंगविणे, उद्बोधन घडविणे, स्वकैफियत मांडणे, आठवणी सांगणे अशा मर्यादित प्रेरणा आत्मपर लेखनाच्या मागे असल्याने आजही आत्मचरित्र हा साहित्यप्रकार पुरेसा विकसित झालेला दिसत नाही. वास्तविक पेशवाईच्या अखेरीस लिहिल्या गेलेल्या नाना फडणविसांच्या आत्मवृत्ता स्वत:च्या वासना-विकारांचा शोध घेत तारूण्यकाळापर्यतची जी हकिकत त्यांनी सांगितली आहे ( नानांचे आत्मचरित्र व्याख्याते – प्रो. चिं. ग. भानु १९१० साली पुस्तकरूपाने तत्पूर्वी काव्येतिहाससंग्रहात प्रकाशन झालेले ), ती आत्मचरित्र-साहित्याचा प्रारंभ या दृष्टीने एक योग्य दिशा होती परंतु पुढील शंभर वर्षाच्या काळात आत्मचरित्रांतून आवश्यक असा व्यक्तिनिष्ठ भाग वाढला असला, तरी आत्मशोधनाची अत्यावश्यक भूमिका मात्र क्वचित राहिली, बहुतेक सर्वाचा भर राहिला तो स्वत:च्या व्यवसायातील किंवा काळातील महत्त्वाचे वाटलेले अनुभव बहिर्मुख वृत्तीने सांगण्यावर. अव्वल इंग्रजीतील अनेक विद्वान रोजनिशी लिहीत, परंतु त्या आधारे स्वजीवनाचा शोध घेत केलेले लेखन आढळत नाही. १९५८ मध्ये अ. का. प्रियोळकरांनी प्रो. केरुनाना छत्रे यांची टिपणवही प्रसिद्ध केलेली आहे. या तुटपुंज्या लेखनाचेही सामाजिक इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपल्याला महत्त्व वाटत राहते. अव्वल इंग्रजीत सामाजिक परिस्थितीत झालेल्या मूलगामी बदलांमुळे दादोबा पांडुरंग तर्खडकर ( आत्मचरित्र व चरित्र संपा. अ. का. प्रियोळकर, १९४७ ), विष्णुबुवा ब्रह्मचारी ( वेदाक्त धर्मप्रकाश, १८५९ ), केशव शिवराम भवाळकर यांचे आत्मवृत्त ( संपा. भवानिशंकर पंडित, १९६१ ) यांना स्वत:चे कुटुंब, शिक्षण, धार्मिक-व्यावसायिक वातावरण यांची माहिती पुढील पिढीसाठी टिपून ठेवावी, असे जे वाटले, तीच त्यांची आत्मचरित्रे आहेत. १८५७ च्या बंडाचा रोमहर्षक अनुभव सांगताना माझा प्रवास ( प्रकाशन, १९०७ ) लिहिणाऱ्या वरसईकर गोडसे भटजींनी स्वत:ची कौटुंबिक परिस्थिती आणि वेळोवेळीची मन:स्थितीही जाता जाता व्यक्त केली म्हणून ती त्यांचे आत्मचरित्र म्हणता येईल. याप्रकारे आत्मपरतेचा भाग लेखनात येऊ लागला असतानाच बाबा पदमनजींचे अरूणोदय हे पहिले पूर्णाकृती आत्मचरित्र ‘ईश्वराने प्राण्यांवर जी दया केली,’ ती सांगण्याच्या हेतूने लिहिले गेले ( १८८४ ). ख्रिस्ती धर्मस्वीकार केलेल्या बाबांना जो ‘प्रकाश’ आपल्याला दिसला तो इतरांनाही दिसावा अशी इच्छा असली, तरी केवळ प्रचारासाठी त्यांनी लेखन केलेले नाही. स्वप्रवृत्तीचा वेध घेत, स्वत:च्या आयुष्यातील स्थित्यंतर साध्या प्रांजळ भाषेत-क्वचित ख्रिस्ती वळणाने – त्यांनी मन:पूर्वक व्यक्त केले आहे. मात्र अरूणोदयानंतर साहित्यात आत्मचरित्रलेखनाची पद्धती पूर्णपणे रूजू लागली असे झाले नाही. आजही विविध जावनक्षेत्रांतील बऱ्याच व्यक्ती आपले काही काही अनुभव सांगण्यास पुढे सरसावत आहेत आणि मधूनच एखादे आत्मचरित्र या पदवीस साजेसे लिखाण वाचकांच्या हाती पडते आहे.
डोंगरीच्या तुरुंगात आमचे १०१ दिवस ( १८८२ ) मध्ये गोपाळ गणेश आगककरांनी त्यांच्या व लोकमान्य टिळकांच्या पहिल्या तुरूगवासाची हकिगत लिहून लोकनेत्यांसाठी एक चांगला पायंडा घातला. आत्मवृत्तामध्ये ( १९१५ ) महर्षी धों. के. कर्व्यानी महाराष्ट्रातील विधवाजीवन सुधारावे या हेतूने स्वत: जे शैक्षणिक – सामाजिक कार्य केले होते, त्याची हकिगत नोंदविली. लोकमतास अमान्य असणारा पुनर्विवाह केलेला असूनही लेखनात आपल्या व्यक्तिगत अनुभवांवर महर्षीना भर द्यावयाचा नाही. माझी घडण ( १९६१ ) मध्ये अ. वा. सहस्त्रबुद्धयांनी व माझी जीवनयात्रा ( १९५६ ) मध्ये अप्पा पटवर्धनांनी टिळक-गांधी युगात समाजोन्नतीचे जे प्रयत्न झाले, त्यांतील स्वत:चा वाटा ‘स्व’ला कमीतकमी महत्त्व देऊन सांगितला. विठ्ठल रामजी शिंदे, माधवराव बागल, पां. चि. पाटील यांच्या अनुक्रमे माझ्या आठवणी व अनुभव ( दोन भाग, १९४० १९४४ ), जीवनप्रवाह ( १९५४ ), माझ्या आठवणी ( १९६४ ) यांमध्ये ब्राह्मणेतर समाजाचे सामाजिक जीवन प्राधान्याने महाराष्ट्रातील ब्राम्हण-ब्राह्मणेतर समाजांतील वादाच्या संदर्भात व्यक्त झाले. धर्मानंद कोसंबी आणि ग. य. चिटणीस ( निवेदन, १९२४ माझ्या आठवणी, १९५५ ) यांच्या लेखनात भर राहिला, तो स्वत:च्या धर्म व अध्यात्मविषयक विचारांतील परिवर्तन सांगण्यावर. कोसंबी केवळ ज्ञानसंपादन करिताना झालेल्या प्रवासाची हकिगत सांगतात, तर उत्कट ऊर्मीने विविध वळणे घेत गेलेल्या चिटणीसांच्या आयुष्यप्रवाहात कला, राजकारण, मजूरचळवळी यांच्या संदर्भातील मौलिक अनुभव व नाट्य मोकळेपणाने आणि विश्लेषणासह आलेले असल्याने ते आत्मचरित्र विशेष वाचनीय झालेले आहे. राजकीय क्षेत्रात कार्य केलेल्या गंगाधरराव देशपांडे ( माझी जीवनकथा, १९६० ), न. वि. गाडगीळ ( पथिक, १९६४ ), पुंडलीकजी कातगडे ( पुंडलीक, १९५० ) यांनी स्वत:च्या हकिगतींमध्ये काँग्रेसच्या संपूर्ण देशातील चळवळींचा संबंध गृहीत धरून राजकीय – सामाजिक इतिहासाला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ही आत्मचरित्रे व्यक्तींच्या इतकीच काँग्रेसच्या इतिहासाशीही निगडित आहेत. अनसूयाबाई आणि मी ( १९६२ ) या पुस्तकात पु. बा. काळे यांनी काँग्रेसचे कार्य करणाऱ्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी पत्नीची – अनसूयाभाईची – गुणावगुणयुक्त व्यक्तिरेखा आस्थापूर्वक मोकळेपणाने चितारलेली आहे. पतीने पत्नीला प्राधान्य देऊन लिहिलेले हे पुस्तक अपवादात्मक म्हणावे लागेल. रँ. र. पु. परांजपे यांचे नाबाद ( ८९ ( १९६५ ) हे आत्मचरित्र शिक्षणतज्ञ, विधिमंडळ सदस्य, मत्री, राजदूत इ. नात्यांनी त्यांनी केलेल्या कामगिरीची केवळ ओळख करून देते. त्यातून त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी वृत्तीचाही प्रत्यय येतो. निरेप घेता – ना. भि. परूळेकर ( १९७५ ), अशी ही बिकट वाट – वि. स. माडीवाले ( १९७२ ), स्मृतींची चाळता पाने ( मा. पं. शिखरे ) ही वृत्तपत्रव्यवसायातील मंडळींची आत्मचरित्रेही उलाढालीपूर्ण आयुष्यांचा आलेख विशेष गंभीरपणाने काढतात.
सामाजिक वास्तवापेक्षा व्यक्तिगत जीवनातील वास्तव, तसा संदर्भ आय़ुष्याला असूनही, ज्यात थोडे अधिक प्राधान्याने प्रगटले आहे, अशी पुढील काही वैशिष्ट्यपूर्ण चरित्रे आहेत. स्वातंत्र्यावीर सावरकरांनी माझी जन्मठेप मध्ये त्यांच्या अंदमानमधील बारा वर्षाच्या काळातील वास्तव्याची भीषण, शौर्यशाली, उदात्त गाथा मूर्त केली आहे ( १९२७ ). सावरकरी वृत्ती आणि शैली एकमेकींच्या हातात हात घालून जात असल्यामुळे साहित्यदृष्ट्याही हे पुस्तक अजोड ठरते. रियासतका र. गो. सरदेसाईकृत माझी संसारयात्रा ( १९५६ ) त्यांच्या इतिहाससंशोधनांत व्यतीत झालेल्या कार्यरत जीवनाची सविस्तर ओळख करून देते. समाजनिरीक्षक ना. गो. चापेकरांच्या जीवनकथेत ( १९४३ ) स्वत:च्या आयुष्याकडे सामाजिक जीवनातील एक नमुना म्हणून अलिप्तपणे पाहिल्याचे आढळते. के. सी. ठाकरे माझी जीवनगाथा ( १९७३ ) ह्या आपल्या आत्मचरित्रात स्वत:च्या पुरूषार्थी, आक्रमक जीवनदृष्टीचा शैलीबाज लेखणीद्वारे पुन:पुन्हा उच्चार करतात. संस्थानिक बाळासाहेब भवानराव पंतप्रनिधींनी दोन खंडांतील प्रांजळस्ववृत्तांतात ( आत्मचरित्र – २ खंड, १९४६ ) राजे लोकांचे भ्रष्ट जीवन लोकांपुढे ठेवून धोक्याच्या कंदील दाखविला आहे. त्याच राजकुलात जन्माला येऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरलेले अप्पासाहेब पंत एक प्रवास एक शोध ( १९७५ ) मध्ये स्वत:ची कर्तृत्वक्षेत्रे न्याहळत अत्याधुनिक जीवनाचा विचार करताना आढळतात. आत्यांतिक गरीबीतून वर येऊन समाजोपयुक्त सेवाभावी आयुष्य काढणारे डॉ. सुधीर फडके कोठे आणि कधीतरी ( १९७२ ) मध्ये स्वत:चे आणि तळागाळाच्या समाजजीवनातील अनुभव फार दृद्य पद्धतीने टिपतात.
सामान्य परिस्थितीतील शिक्षक-प्राध्यापकांच्या आत्मचरित्रांतून ध्येयवादी आयुष्याची समाधानी चित्रे वरचेवर आढळतात. भावी पिढीवर सुसंस्कार व्हावेत हाच त्यांचा निर्मितिहेतूही असतो. ( १) विरंगुळा – ना. म. पटवर्धन – १९६०, (२) चित्रपट- श्री. म. माटे – १९६० , (३) कृष्णाकांठची माती – कृ. पां. कुलकर्णी – १९६१ , (४) वेचलेले क्षण – वा. गो. मायदेव – १९६५, (५) एका शिक्षकाची कथा – कृ. भा. बाबर – १९६२, (६) समाधान – ना. वि. पाटणकर १९६२, (७) माझी वाटचाल – के. ना. वाटवे – १९६४, (८) एका पथिकाची जीवनयात्रा – मो. वा. जोशी – १९६४ ही त्यांपैकी काही. याहून अगदी वेगळे असे कैदी नं. ३१४६७ ( १९७४ ) हे नारायण महाडिकांचे पुस्तक आहे. खुनाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याचे कैदेतील आणि तुरूंगाबाहेरील अनुभवांचे विदारक चित्रण त्यात आहे. गांधीहत्या आणि मी ( १९६७ ) या पुस्तकात गोपाळ गोडशांनी गांधीहत्येनंतरच्या काळातील स्वत:च्या कुटुंबाच्या कष्टमय जीवनाची हकिगत ग्रथित करून आपल्या आणि समाजाच्या मानसिक प्रतिक्रियांवर प्रकाशझोत टाकला आहे. अशा प्रकारे आत्मचरित्रांची अनुभवकक्षा रूंद होणे, हे प्रगतीचे एक लक्षणच म्हणावे लागेल.
गेल्या पन्नास वर्षात वादग्रस्त आशय आणि गुणवत्ता या संदर्भात चर्चेचा मोठा विषय झाला, तो कलावंतांची गुणवत्ता या संदर्भात चर्चेला मोठा विषय झाला, तो कलावंतांची आणि राजकारणी मंडळींची आत्मचरित्रे. कलावंतांमध्ये साहित्यिकांची आत्मचरित्रे त्यांच्या सफाईदार लेखनशैलीमुळे जरी वाचली गेली असली, तरी अपेक्षेप्रमाणे दर्जेदार मात्र क्वचितच ठरलेली आहेत. बहुतेकांत ‘स्व’- शोधापेक्षा स्वप्रसिद्धीची, आत्मगौरवाची आणि समाजमनातील आपल्या प्रतिमेला धरून लिहिण्याची जाणीव तीव्रतेने आढळत असल्याने एक प्रकारचा तोचतोपणाही जाणवतो. याउलट क्लोरोफॉर्म ( १९७८ ) लिहिणारे डॉ. अरूण लिमये डॉक्टरी व्यवसायातील वेगळ्या अनुभवांची अत्यंत मनमोकळी नोंद उत्तम साहित्यिकाप्रमाणे प्रत्यकारी, जिवंत शैलीत करतात.
या सामान्य उणिवा वगळून काही वैशिष्ट्ये घेऊन आलेली साहित्यिकांची महत्त्वाची काही आत्मचरित्रे अशी आहेत : गतगोष्टी ( १९३९ ) मध्ये न. चिं. केळकरांचा हेतू ‘हिवाळ्यातील चंद्रप्रकाशाचा आस्वाद’ वाचकांना द्यावा असा असल्याने त्यात अनेक रम्य-उद्बोधक स्मृतीचे विपुल संकलन आढळते. ह. भ. प. पांगारकरांना चरित्र- चंद्र ( १९३८ ) लिहिताना एखाद्या मुमुक्षूस आपले चरित्र स्फूर्तिप्रद व्हावे असे वाटत असल्याने ते रसाळपणे भर देतात तो त्यांच्या आयुष्यातील धार्मिकतेवर. आत्मवृत्त ( १९३५ ) मध्ये श्री. कृ. कोल्हटकर स्वत:च्या नाट्य-विनोद-समीक्षादी लेखनामागील प्रेरणांची त्रोटक पण महत्त्वाची नोंद फक्त करतात. मी कसा झालो ? (१९५३ ) या आगळ्या आत्मवृत्तात प्र. के. अत्रे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील शिक्षक, वक्ता, विडंबनकार आदी पैलूंचे प्रारंभापासूनचे रूप प्रसन्न विनोदी शैलीने सांगतात आणि कर्हेचे पाणी ( १९६३ – ६८ ) या पंचखंडात्मक प्रचंड लेखनात वरील मजकुराबरोबरच आणखीही व्यापक स्वरूपाच्या, व्यक्तीपेक्षा स्वकाळाशी संबंधित असलेल्या घटना, सविस्तर रीतीने स्वत:च्या खास शैलीत रंगवून ते लिहितात. दिवस असे होते… ( १९६१ ) मध्ये वि. द. घाटे यांनी आपल्या जवळच्या माणसांची नेटकी अशी व्यक्तिचरित्रे रेखाटली असून काव्यात्मतेच्या थोड्या आडपडद्याने स्वत:चे आंतरिक जीवनही हळुवारपणे प्रगट केले आहे. माझं जीवन एक कादंबरी ( १९६९ ) हे ना. सी. फडक्यांचे आत्मचरित्र त्यांच्या कादंबरीप्रमाणेच रंजक-आकर्षक असून आयुष्यातील खोलवरच्या समस्यांकडे फारसे लक्ष न देताच आत्मसंतुष्ट वृत्तीने लिहिलेले आहे. कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकरांच्या दोन तपे ( १९४६ ) आणि एका निर्वासिताची कहाणी ( १९४९ ) मधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीची आणि त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीची त्यांतील नाट्यमयतेसह कल्पना येते. आनंद साधल्यांची मातीची चूल ( १९७० ) ही आत्मकथा मध्यमवर्गीय संसारातील सत्य-स्वप्न-आभास यांचे गमतीदार मिश्रण प्रकट करते. काका कालेकर आणि ना. ग. गोरे यांनी अनुक्रमे स्मरणयात्रा व शंख आणि शिंपलेमध्ये (१९४९, १९५७ ) आपले बालपण फार संवेदनक्षमतेने टिपलेले असल्यामुळे ही पुस्तके विलक्षण आल्हाददायक झालेली आहेत. य. गो. जोशींची दिधाची घागर ( १९५५ ) ही आत्मकथा नुकत्याच दिवंगत झालेल्या आईच्या आठवणी सांगताना स्वत:ला आदर्श वाटणाऱ्या मध्यमवर्गीय संस्कारांनाही हेतुपूर्वक प्रगट करते. सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतूत ( १९६९ ) त्यांच्या विविध विषयांच्या व्यासंगाची आणि जीवनातील चमत्कृतिपूर्ण अनुभवांची गोष्टीवेल्हाळ वृत्तीने सांगितलेली मिष्कील हकिगत वाचावयास मिळते. स्त्री – किर्लोस्कर मासिकांचे ध्येयवादी संपादक शं. वा. किर्लोस्कर यांचे शंवाकीय (१९७४) हे आत्मचरित्र त्यांच्या ‘उद्योग- उत्साह -आत्मोन्नती’ या सूत्रांवर आधारलेल्या संपादकीय कारकीर्दीची व प्रसन्न वृत्तीची उत्तम ओळख करून देते. कादंबरीकार गो. नी.दांडेकरांच्या कलंदर जीवनातील, लेखकाला अनुभवसमृद्ध करणाऱ्या भटकंतीची हकिगत, स्मरणगाथेत ( १९७३ ) वाचावयास मिळते, तर क्श्री. ना. पेंडसे स्वत:चा शोध त्रयस्थपणे घेण्यासाठी स्वत:च्या मित्राची भूमिका …लेखक आणि माणूस ( १९७४ ) मध्ये घेतात. प्रथमपुरूषी एकवचनी ( २ भाग, १९८०, १९८३ ) या पु. भा. भावे यांच्या आत्मचरित्रात हिंदुत्वनिष्ठ राजकारण, वृत्तपत्रीय संघर्ष आणि साहित्यक्षेत्रातील वाद–वादंग यांच्या हकिगती व त्यासंबंधातील चिंतन वाचावयास मिळते.
साहित्येतर क्षेत्रातील कलावंत मंडळींमध्ये विशेषत: रंगभूमी आणि संगीतक्षेत्राशी कलावंत मंडळींमध्ये विशेषत: रंगभूमी आणि संगीतक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या मंडळींनी आत्मचरित्रे लिहिण्यात बरीच आघाडी मिळविलेली आहे. माझी भूमिका ( १९४० ) मध्ये गणेश गोविंद ऊर्फ गणपतराव बोडसांना स्वत:च्या अभिनयसाधनेबरोबरच नाटककंपन्यांतील कलह सांगून स्वसमर्थ करावयाचे आहे. गोविंदराव टेंब्यांना माझा संगीत- व्यासंग ( १९३९ ) आणि माझा जीवनविहार ( १९४८ ) मध्ये स्वत: शिकलेले – ऐकलेले संगीत, वाद्यसंगीत आपण घेतलेल्या रसास्वादाच्या अनुभवांसह वाचकाच्या प्रत्याला आणून देण्याची इच्छा मुख्यत’ आहे. बहुरूपी ( १९५७ ) लिहिणाऱ्या चिंतमाणराव कोल्हटकरांनी प्रारंभी आत्मपर माहितीचे ‘स्वगत’ भाषण केले असून पुढे वाचकांशी जे प्रकट संभाषण केले आहे, ते त्यांच्या काळातील प्रमुख नाटककारांविषयीच्या अनुभवांच्या संदर्भात. रंगभूमिविषयक माहिती, चिंतन आणि घडविलेली नेटकी भाषाशैली असल्याने बहुरूपीला पुष्कळच सन्मान मिळाले.
बाबुराव पेंढारकर ( चित्र आणि चरित्र, १९६१ ), नानासाहेब फाटक ( मुखवट्यांचे जग, १९६३ ), शं. नी. चापेकर ( स्मृतिधन, १९६६), गजानन जाहगिरदार ( संध्याकाळ, १९७१ ) ही चित्रपट- रंगभूमिविषयक स्मृतिसंग्रहांचे स्वरूप असलेली आत्मचरित्रे कलावंतांच्या जीवनाविषयी उत्सुकता असलेल्या वाचकांनी फार प्रेमाने वाचली असून साहित्यिकांच्या लेखनापेक्षा ती अधिक कलात्मकतेनेही लिहिली गेलेली आहेत. लोकनाट्यातून नट म्हणून गाजलेल्या व नाभिक समाजात जन्माला आलेल्या राम नगरकरांना रामनगरीमध्ये ( १९७५ ) स्वत: च्या कौटूंबिक व कलाक्षेत्रातील सर्वसामान्य अनुभवांकडे मागे वळून पाहताना जे हसू आले आहे, ते त्यांच्या वाचकांनाही आणून देण्यात त्यांना यश मिळाल्याने मध्यमवर्गीय जीवनापलीकडच्या आत्मचरित्राचा एक वेगळाच नमुना मराठीत उपलब्ध होऊ शकला आहे.
तथापि सर्वाधिक दर्जेदार ठरली आहेत ती स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे. रमबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यांतील काही आठवणी ( १९९० ) पासून ही परंपरा सुरू झाली. स्वत:च्या लोकोत्तर पतीचे जीवन भक्तिभावपूर्वक सांगावे ही त्यांची प्रेरणा पुढील अनेक स्त्रियांनाही अनुकरणीय वाटली. रमाबाईचे मोठेपण न्या. रानड्यांचे असामान्यत्व समजून घेऊन शब्दांतून उमटविण्यात जसे आहे, तसे घरगुती वळणाच्या मराठी भाषेचे अभिव्यक्तीचे सामर्थ्य उपयोजिण्यातही आहे. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ( ४ भाग, १९३४ – १९३६ ) रेव्ह. टिळकांचे ‘जसे घडले तसे चरित्र’ सांगावे या हेतूने निर्माण झाली. पण अल्पशिक्षित लक्ष्मीबाईनी कवा टिळकांचे मोठेपण आणि विक्षिप्तपण, आयुष्यातील गंभीर व हलकेफुलके नाट्यप्रसंग असे समर्थपणाने चितारले, की स्मृतिचित्रे हे पुस्तक मराठी साहित्याचा एक मानदंड होऊन राहिले. आमची अकरा वर्षे ( १९४५ ) मध्ये लीलाबाई पटवर्धनांनी त्यांच्या आणि कवी माधवराव पटवर्धनांच्या सहजीवनाची चक्रावून टाकणारी सुखदु:खात्मक हकिगत विशेष प्रांजळपणाने सांगितल्याने हेही पुस्तक व्यक्तिमत्त्व उभे करण्याच्या संदर्भात मौलिक ठरले. महर्षी कर्व्याच्या पत्नी बाया कर्वे यांनी माझे पुराण ( १९४४ ) या छोट्या आत्मकथेत आपले कोकणातील दुर्दैवी बालपण, क्लेशदायक रीतीरिवाज आणि पुनर्विवाहोत्तर उपयुक्त सामाजिक जीवन नि:संकोचपणे सांगताना घरगुती भाषेतल्या म्हणींचा फार सहजतेने उपयोग केला आहे. विशेष असे, की ही सर्वच आत्मचरित्रे लेखिकांच्या स्वत:च्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे वेगवेगळे पैलू फार ठळकपणे व्यक्त करणारीही झाली. पार्वतीबाई आठवलेकृत माझी कहाणी ( १९२८ ) ह्यांच्या हिंगण्याच्या बालिकाश्रमाच्या कामातील अनुभव टिपण्याच्या दृष्टीने, कमलाबाई देशपांडेकृत स्मरणसाखळू ( १९४३ ) संस्थात्मक जीवनातील कडूगोड प्रसंग सांगण्याच्या दृष्टीने, राधाबाई आपट्यांचे उमटलेली पावले हे गांधीवादी चळवळीतील कौंटुंबिक वातावरणाच्या प्रत्यय घेण्यासाठी, सत्यभामाबाई सुखात्मे यांचे गेले ते दिवस ( १९६४ ) गरीब ब्राम्हण कुटुबांतील धार्मिक जीवन-संस्कारांची ओळख होण्याच्या दृष्टीने आणि यशोदाबाई जोशी यांचे आमचा जीवनप्रवास ( १९६५ ) सुसंस्कृत श्रीमंत ब्राम्हणी परिवाराची सांस्कृतिक पातळी परिचित होण्याच्या दृष्टीने फार प्रत्ययकारी झालेली आहेत.
लिखाणातील प्रांजलपणा हा या सर्वाचाच जो विशेष गुण, तो यांच्या आत्मचरित्रांना विलक्षण सच्चेपणाची जोड देतो. वाढत्या सिक्षणाबरोबरच स्त्रियांचे जीवन जसे बदलले तसे त्यांच्या आत्मचरित्रातील अमुभवही बदलत गेले. या, सदाशिव ( १९४८ ) मध्ये इंदिरा भागवंतांनी पतिविरहाची, तर दुर्दैवाशी दोन हात ( १९७५ ) मध्ये सरोजिनी सारंगपाणी यांनी पतीने केलेल्या फसवणुकीची हकिगत मनावरची दडपणे दूर सारीत लिहिली, स्नेहांकिता मध्ये ( १९७३ ) स्नेहप्रभा यांनी आणि अजुनी चालतेची वाट ( १९७० ) मध्ये आनंदीबाई विजापुऱ्यांनी आपल्या विवाहाची आणि विवाहबाह्य पुरूषमैत्रीतील सुखदु:खांची कथा धीटपणाने चित्रित केली. पण ऐकतं कोण ? ( १९७० ) मध्ये उषाताई डांगे यांनी एक जिद्दी, करारी कार्यकर्ती म्हणून स्वत: लढविलेल्या मजूर लढ्याचे चित्रण केले. माणूस जेव्हा जागा होतो ( १९७० ) मध्ये गोदावरी परूळेकरांनी १९४२ ते १९५३ या काळात डहाणूजवळील वारली समाजाची अस्मिता जागृत होण्यासाठी जे संघर्ष उभे केले त्याची हकिगत सांगितली, असे स्फोटक आत्मलेखन प्रसिद्ध होत होते, तेव्हा आनंदीबाई शिर्के यांचे सांजवात ( १९७२ ) साठ-सत्तर वर्षापूर्वीच्या मराठा समाजाचे दर्शन स्वत:च्या सोजवळ, खानदानी वृत्तीतून घडवून गेले. डॉ. केतकरांच्या पत्नी शीलवतीबाई केतकरांनी मीच हे सांगितलं पाहिजे ( १९६९ ) असे ठाम आत्मविश्वासपूर्वक म्हणत, डॉ. केतकरांच्या चरित्रकारांचा परामर्श घेत, स्वत:चे असामान्य सांसारिक जीवन खुले केले. सरोजिनी वैद्यांनी संपादित केलेल्या श्रीमती काशीबाई कानिटकर आत्मचरित्र पूर्णता देण्याचा एक नवा दृष्टिकोण आढळतो. शिक्षणाची आणि ललित लेखनाची गोडी लागलेल्या काशीबाईची आत्मकथा चे वातावरण, जे प्रश्न, जे व्यक्तिमत्त्व व नातेसंबंध आपल्यापुढे ठेवते, तेच ‘उत्तरायणा’त कोणकोणती रूपे घेऊन गेले हे त्यांच्या जीवनानुभवाला पूर्णता देण्याचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून संपादिकेने ललित पद्धतीने मांडलेले आहे.
गेल्या दहापंधरा वर्षात कलावंत स्त्रियांनी आपले घराबाहेरील विश्व, त्यातील समाधान आणि आपत्ती यांच्यासह, पुष्कळशा खुलेपणाने सांगितलेले आढळते. हंसा वाडकर यांचे सांगत्ये ऐका ( ९१७० ) हे या प्रकारचे सर्वात अधिक गाजलेले पुस्तक. पुढे चंदेरी दुनियेत ( १९८१ ) या लीला चिटणीसांच्या पुस्तकाने आमि मी दुर्गा – खोटे ( १९८२ ) या दुर्गा खोटे यांच्या पुस्तकाने भारतीय चित्रपटसृष्टीचीही ओळख आपल्या व्यक्तिगत जीवनातून करून दिलेली आहे. या प्रकारे स्त्रियांच्या आत्मचरित्रांमधून गुणवत्तेबरोबर विविधातही आढळू लागलेली आहे.
मराठी आत्मचरित्रांचा एकत्रित परामर्श घेताना प्रा. रमेसचंद्र पाटकर यांनी त्यांच्या अप्रकाशित प्रबंधात या साहित्यप्रकाराच्या बाह्यकक्षा विस्तृत झाल्याबद्दल आनंद प्रगट करून स्वत:चे निरीक्षण असे नोंदविलेले आहे. की लेखकांचे सत्याचा शोध घेण्याचे सामर्थ्य वाढलेले असले, तरी एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणूनम आत्मचरित्रांचे अस्तित्व अद्यापही पुरेसे प्रस्थापित होऊ शकलेले नाही.
गेल्या काही वर्षात म्हणजे १९६० -६५ पासून दलितांच्या आत्मकथांनी प्रा. पाटकर म्हणतात, ती बाह्यकथा अधिकच विस्तृत केली आहे. मध्यमवर्गीय जीवनातील अनुभवविश्व इंग्रजी अमदानीतील शिक्षणप्रसारामुळे साहित्यात जोवढ्या सहजतेने प्रगट होत आले तेवढ्या सहजतेनेच डॉ. आंबडकरांनी उभ्या केलेल्या दलित चळवळीतून दलित साहित्यही जन्माला आलेले आहे. हे दलित साहित्य प्राधान्याने आत्मपर अनुभवांशीच बांधलेले असून कधी –कादंबरीच्या रूपाने तर कधी सरळ आत्मचरित्राच्या रूपानेच अधिक सकसपणे प्रगटलेले आहे. अशी अलीकडच्या काळात गाजलेली आत्मचरित्रे म्हणून पुढील पुस्तकांचा उल्लेख करता येईल. (१)बलुतं – द्या पवार ( १९७८ ), ( २) आठवणींचे पक्षी – प्र. ई. सोनकांबळे ( १९७९ ), (३) मुक्काम पोस्ट, देवाचे गोठणे – माधव कोंडविलकर ( १९७९ ), (४) तराळ – अंतराळ – शंकरराव खरात ( १९८१ ). या आत्मकथा एकेका व्यक्तीइतकेच त्या त्या समाजाचे जीवनही कधी निर्लेप मनाने, तर कधी विद्रोहाच्या, अन्यायाच्या भावनेने पेटून प्रगट करतात. त्यांची भाषाही अनेकदा ज्या वर्गाचे, जातीचे जीवन आत्मकथेत येते त्या जातीचीच बोलीभाषा असते. ज्या समर्थपणाने वाड्मयीन आविष्काराचे माध्यम म्हणून ती उपयोजिली जाते आहे, तिने समग्र मराठी साहित्यातील अभिव्यक्तीलाही भरघोसपण येण्यास साह्य केले आहे. मराठी आत्मकथेची श्रीमंती यांच्यामुळे पुष्कळच वाढलेली आहे.
वैद्य,सरोजिनी
निबंध : इंग्रजी सिक्षण घेतलेल्या पहिल्या महाराष्ट्रीय सुशिक्षित पिढीतील बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, दादोबा पांडूरंग, स. म. दीक्षित, भारकर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पदमनजी, जोतीराव फुले, विष्णु परशुरामशास्त्री पंडित इत्यादिकांनी मराठी निबंध लेखनास प्रारंभ केला. ही निबंधवाड्मयाची परंपरा अखंड रीतीने आतापर्यत ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये विस्तारत गेली. कविता, कथा, नाटक या मराठी वाड्मयप्रकारांस ब्रिटिशपूर्व कालातील शेकडो वर्षाची संस्कृतमधील परंपरा जशी उपलब्ध होती, तशी निबंध ह्या वाड्मयप्रकारास नव्हती. पश्चिमी – विशेषत: इंग्रजी भाषेतील – वैचारिक वाड्मयातील निबंध हा आकृतिबंध मराठी आधुनिक सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये निर्माण केला आणि अनेक विद्यांच्या शाखोपशाखांनी तो समृद्ध होत गेला. इंग्रजीतील ‘एसे’ या शब्दाचाच पर्यायशब्द ‘निबंध’ हा आहे. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंधनामक ग्रंथ उपलब्ध आहेत. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांमध्ये एखाद्या ग्रंथाची टीका, भाष्य अथवा वृत्ती या रूपाचे नसलेल्या व स्वतंत्र रीतीने लिहिलेल्या पुस्तकास संस्कृतमध्ये ‘निबंध’ ही संज्ञा आहे. परंतु मराठीचे निबंध या नावाचा जो अधिकृतबंध रूढ झालेला आहे, त्याचे स्वरूप संस्कृतमधील निबंधाचे नाही. त्याचे स्वरूप हे इंग्रजीमधील ‘एसे’ या गद्यप्रकाराचे आहे. निबंध या वाड्मयप्रकारची काटेकोर व्याख्या करणे कठीण आहे. काही निबंध हे इतिहास या प्रकारातही मोडतात (…ऐतिहासिक निबंध – १९३१ – चिं. वि. वैद्य ), तर काही निबंध वस्तुस्थिताचे वर्णन, या स्वरूपात उपलब्ध होतात. उदा., गोविंद नारायण माडगावकरकृत मुंबईचे वर्णन ( १९६३ ). परंतु साधारणपणे दिग्दर्शन करता येण्यासारखी व्याख्या करता येते ती अशी : कोणत्याही विषयाचे सांगोपांन आणि आवश्यक तेथे अनेक मतांचा परामर्श घेणारे, साधकबाधक युक्तिवादाच्या आधाराने विविध मूल्यांचे मापन करणारे, नीटनेटके, मुद्देसूद, फार विस्तार नसलेले गद्यरूप विवेचन म्हणजे निबंध होय. त्यात प्रसंगत: भावनांचा आविष्कारही असतो.
आलंकारिक किंवा वक्तृत्वाची शैली त्यात आवश्यक तेथे वापरलेली असते. विशेषत: मानवी जीवनाशी, मानवी हिताहिताशी प्रत्यक्ष परिणामकारक संबंध असलेल्या, म्हणून प्रसंगी विवाद्य होणाऱ्या, विषयांचे सुसंबद्ध किंवा मुद्देसूद विवेचन म्हणजे निबंध होय. शुद्ध विज्ञान व तंत्रविज्ञान ह्यांसंबंधी केलेल्या विवेचनास निबंध म्हणता येते काय? येत असावे. माणसाच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, भावनात्मक किंवा सामाजिक जावनाशी संबद्ध विषय हे निबंधाचे महत्त्वाचे विषय ठरतात. जेव्हा निबंधाचा विषय अनेक प्रकरणांमध्ये विस्ताराने ग्रथित केलेला असतो, तेव्हा त्या दीर्घ निबंधास प्रबंध म्हणण्याची प्रथा आहे. परंपरागत लोकभ्रम किंवा अज्ञान किंवा अंधश्रद्धा ह्यांचे निरसन करण्याकरता किंवा विचार आणि नवी आचारपद्धती समजावून देण्याकरता केलेले निबंधलेखन प्रभावी ठरते.
निबंध हा वैचारिक स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून निर्माण झालेला एक गद्य वाङ्मयप्रकार होय. निबंधवाङ्मयाने गतानुगतिकता सोडून स्वतंत्रपणे साधकबाधक विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीची स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची बौद्धिक पात्रता वाढीस लागते. गतिशील समाजातील परंपरा आणि रूढी यांचे समीक्षण करून नव्या परंपरा आणि रूढी निर्माण करण्याची शक्ती त्यामुळे समाजात निर्माण होते.
मराठी निबंधवाङ्मयाची मांडणी प्रथम मुख्यत: मराठी नियतकालिकांत सुरू झाली. मुद्रणयंत्रे किंवा मुद्रणसंस्था मुंबईत स्थापन झाली. त्यानंतर निबंधाचा जन्म झाला. १८४१ मध्ये भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक काढले १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनीच १८४० मध्ये दिग्ददर्शन नावाचे मासिक काढले. जांभेकरांनी दर्पणाचा उल्लेख असा सांगितला : ‘स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी आणि एथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थल व्हावे या इच्छेने’ दर्पणाचा जन्म झाला. मराठी वृत्तपत्रकारितेमध्ये अजूनही जी निर्भय, स्पष्ट, बाणेदार लेखनप्रवृत्ती आढळते, तिचे अग्रदूत म्हणून भाऊ महाजन यांचा निर्देश करणे उचित ठरेल. प्रभाकर साप्ताहिक काढल्यानंतर त्यांनीच १८५३ मध्ये धूमकेतु हे साप्ताहिक आणि १८५४ मध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले. शुद्ध वैचारिक लेखनास अथवा निबंधवाङ्मयास वाहिलेले मराठी ज्ञानप्रसारक हे ‘उपयुक्त ज्ञानप्रसारक सभे’चे मासिकक निघाले ( १८५० ). मराठी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक १८४२ मध्ये प्रकाशित करण्यास प्रारंभ केला. यात हिंदुधर्माची टीका प्रसिद्ध होऊ लागली. यातील हिदुधर्मविरोधी मतांचे खंडन करण्याकरिता १८४४ साली मोरभट्ट दांडेकरांचे उपदेश-चंद्रिका हे मासिक निघू लागले. मिशनऱ्यांच्या चळवळीला आळा घालण्याकरिता विचारलहरी ( १८५२ ) हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे आणि सद्धर्मदीपिका हे बापू सदाशिव शेट यांचे ( १८५५ ) नियतकालिका निघाले. वृत्तपत्रसृष्टीत पुण्याचे ज्ञानप्रकाश ( १८४९ ) व मुंबईचे इंद्रप्रकाश ( १८६२ ) यांचे स्थान महत्त्वाचे ठरले. ð विष्णु परशुरामशास्त्री पंडित ( १८२७ – ७६ ) हे इंदपप्रकाशचे संपादक. ह्या पत्रातून बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरठकुमारीविवाह इ. विषयांवर त्यांनी आपले पुरोगामी विचार परखडपणे मांडले. महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीला उत्कृष्ट बौद्धिक विवेकयुक्त रूप देणारे विद्वान लेखक ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश या वृत्तपत्रांनी आपल्या भोवती गोळा केले. या साऱ्या नियतकालिकांनी सामाजिक न्यायबुद्धीच्या वाढीस आवश्यक असा विचारविनिमय व वादविवाद यांचे सामाजिक जीवनात महत्त्व स्थापन केले सुधारणांची महती पटविली राष्ट्रीयतेचे भरणपोषण केले विचाराचे नवेनवे विषय हाताळले: अन्यायाच्या विरूद्ध सनदशीर रीतीने आंदोलन निर्माण करून त्याला सतत दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करीत असता मराठी गद्यशैली लवचिक, विचारांच्या अंगोपांगाची तर्कशुद्ध जुळणी करणारी, डौल व शोभा आणणारी ढंगदार बनली. राजकीय, धार्मिक. सामाजिक किंवा सांस्कृतिक अशा सर्वच बाबींवर त्यांनी लेखन केले. गोपाळ हरि देशमुख ऊर्फ ⇨लोकहितवादी ( १८२३ – ९२ ) हे त्यांच्यापैकीच होत. त्यांची गाजलेली शतपत्रे भाऊ महाजनांच्या प्रभाकर मधूनच प्रसिद्ध झाली. मराठी वृत्तपत्रसृष्टीला तिच्या प्रारंभापासून पुढे सतत दीर्घकाळ विद्वान, व्यासंगी, बहुश्रुत तळमळीच्या व्यक्तींचे साहाय्य लाभलेले दिसते. या मंडळींनी धर्मातर, स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, जातिभेद, लोकशाही, जनतेची दु:खे आणि त्यांचे हक्क, राज्यकर्त्याचे अन्याय, अर्थकारण व अन्य सांस्कृतिक घडामोडी अशा विविध व वैचित्र्यपूर्ण विषयांवर प्रांजळ मतप्रकटीकरण केले. वाचकांची चिकित्साबुद्धी आणि जिज्ञासा वाढवून त्यांना बहुश्रुत केले त्यांच्यात वास्तव दृष्टी निर्माण केली एकाच प्रश्नाच्या निरनिराळ्या बाजू खंडन-मंडनांच्या द्वारा प्रकट होऊ लागल्याने कोणत्याही प्रश्नाचा चौरसपणे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागली या वृत्तीतून नवा आशय आणि नवे आविष्कारतंत्र घेऊन मराठी निबंध वाड्मय जन्मले. ते विविध विषयांचा परामर्श घेत, विस्तार पावत आजपर्यत अखंडपणे वाढत आहे. अनेक निबंध संग्रह वा लेखसंग्रह त्याच प्रवाहात अस्तित्वात येत आहेत. एक एका लेखकाचे वा अनेक लेखकांचे निबंधसंग्रह प्रसिद्ध झाले व होत आहेत. उदा., विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला एका लेखकाची, तर महाराष्ट्र जीवन ( परंपरा,प्रगती आणि समस्या ) हा गं. बा. सरदारसंपादित निबंधसंग्रह अनेक लेखकांचा.
१८३२ – ७४ हा निबंधवाङ्मयाचा प्रथम सर्जनकाल म्हणून निर्दिष्टि करता येतो. या कालात र्हस्व निबंध म्हणजे सुटसुटीत पंचवीस-तीस पृष्ठांच्यापेक्षा अधिक न लांबणारा निबंध आणि दीर्घ निबंध म्हणजे प्रकरणवारीने एका सबंध पुस्तकाचा आकार घेणारा असा निबंध ( प्रबंध ) निर्माण हेऊ लागला. १८३२ ते १८४९ या काळात जी नियतकालिके प्रकाशित होत होती, त्यांत संपादकीय लेख, स्फुटे, पुस्तक-परीक्षणे, वृत्ते आणि वाचकांची पत्रे असे जे गद्यलेखन होई, त्यातून निबंध आकारास येऊ लागला.
उपयुक्त मराठी ज्ञानप्रसारक हे मासिक निबंधांना प्राधान्य देणारे होते. उपयुक्त ज्ञानप्रसारक सभेचे हे प्रकाशन असल्यामुळे तिच्यामध्ये वाचल्या जाणाऱ्या निबंधापैकी काही निवडक निबंध या मासिकात प्रकाशित होत. धर्म आणि चालू राजकारण यांसंबंधी भाषण किंवा लेखन या सभेने वर्ज्य केले होते. सप्टेंबर १८४८ ते एप्रिल १८४९ या कालावधीत प्रस्तुत सभेत वाचल्या गेलेल्या निबंधांवरून मराठी निबंधविषयांची व्याप्ती लक्षात भरते. उदा., ( १) ‘सृष्टिसौंदर्याविषयी’ ( भास्कर दामोदर ), (२) ‘रसायनशास्त्राविषयी’ ( वासुदेव बापू ), (३) ‘मराठ्यांच्या उत्कर्षापकर्षाविषयी’ (लक्ष्मण नृसिंह जोशी ), (४) ‘हिंदु लोकांच्या त्रिकालस्थितिविषयी’ ( सखाराम दीक्षित ), (५) ‘सृष्टीमध्ये परमेश्वराची शक्ति दृष्टीगोचर होते याविषयी’ ( दाजी परशुराम ), (६) ‘उद्योगाविषयी’ ( विष्णू अमृतराव ), (७) ‘व्यवहारशास्त्राचे उद्देश आणि लाभ’ (विश्वनाथ नारायण ), (८) ‘हिंदुस्थानांतील स्त्रियांच्या स्थितिविषयी’ ( नारायण विष्णु ), (९) ‘एकीपासून लाभ’ ( बाळ भास्कर ), (१०) ‘हिंदुस्थानांतील विद्या व कला यांविषयी’ ( विनायक हरिश्चंद्र ), (११) ‘सत्याविषयी’ ( भिकाजी भास्कर ), (१२) ‘विद्येविषयी’ ( बाबाजी कृष्णनाथ ).
वरील निबंधांमध्ये ऐतिहासिक नवा दृष्टीकोण निबंधलेखकांच्या विचारसरणीमध्ये व्यक्त झालेला दिसतो. हे आधुनिकतेचे एक मुख्य लक्षण आहे. तसेच निबंधलेखातून स्वदेशाभिमानाची भावना भिनू लागलेली दिसते. उदा., ‘एकीपासून लाभ’ या निबंधात असा प्रश्न विचारला आहे, की जर हिंदू एकचित्त असते, तर अन्य देशींचे लोक येथे येऊन मुलुख कसे काबीज करते ? भारताच्या आर्थिक शोषणाची जाणीव किंवा आर्थिक दुरवस्थेची जाणीव यांतील अनेक निबंधांमध्ये दिसते. स. म. दीक्षित यांनी उत्कटपणे स्वदेशीचा पुरस्कार केला आहे. १८६५ च्या अंकात महादेव गोविंद रानडे यांनी ‘प्रजावृद्धी व तिजपासून होणारा परिणाम’ या विषयावर निबंध लिहिला. त्यात वाढती लोकसंख्या आणि समाजाचे आर्थिक जीवन हा मुद्दा मुख्यत: चर्चिला आहे. आर्थिक स्थैर्य व प्रौढ वय या गोष्टी लाभल्याशिवाय पुरूषाने विवाह करू नये असे सुचविले आहे. कुटुंबनियोजनाची संकल्पना या निबंधात गर्भित दिसते. ‘तरुण शिकलेल्या लोकांची कर्तृव्ये’, ‘मराठे राजेरजवाडे’, ‘मराठे व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाची चिन्हे व त्यांची तुलना’ इ. निबंध रानडे यांनी या सभेच्या अधिवेशनात वाचले होते. ‘नेत्र’, ‘हवाप्रकरण’, ‘कागद करण्याची रीत’ यांसारखे विज्ञान आणि तंत्रसंबंधी विषयांवरही निबंधया सभेत वाचले गेले. मराठी ज्ञानप्रसारकाने निबंधकरांची एक नवीन पिढीच निर्माण केली. काहींची भाषाशैली चित्तवेधक होती काही निबंध कारांचे विषय विशेष प्रौढ होते भाषा, भावना व विचार यांतील समतोलपणा हे प्रस्तुत मासिकातील निबंधांचे एक खास वैशिष्ट्य सांगता येईल.
चंद्रिका मासिक १८५४ साली निघाले. त्यात राज्यशास्त्रीय विवेचन प्रसिद्ध होऊ लागले त्याचबरोबर स्वाभाविकपणे इंग्रज राज्यशासनावरही तिखट टीका प्रसिद्ध होऊ लागली. कृष्षशास्त्री चिपळूणकर यांनी पुणे पाठशालापत्रक ( १८६१ ) हे मासिक सुरू केले. त्यात दादोबांच्या व्याकरणग्रंथाचा विस्तृत परामर्श घेणारे ‘मराठी व्याकरणावर निबंध’ या शीर्षकाचे त्यांचे २५ निबंध प्रसिद्ध झाले. मासिकात दीर्घ निबंध खंडश: प्रकाशित करण्याच्या पद्धतीचा आरंभ कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केला. व्याकरणाविषयक निबंधांत चिपळूणकरांनी नव्या परिभाषेचा तसेच नव्या व्याख्यांचा वापर केला असून व्याकरणाच्या संदर्भात काही मूलभूत स्वरूपाचे विचार मांडले आहेत.
विविधज्ञानविस्तार १८६७ साली जन्माला आले व त्याने मराठी निबंधशैलीमध्ये परिवर्तन घडवून आणले. समाजसुधारणेच्या बाबतीत पुरोगामी विचारांचा त्या मासिकाने विशेष पुरस्कार केला. इंग्रजी विद्येच्या व इंग्रजी राज्यकर्त्याच्या प्रभावाखाली मराठीचा अनादर होऊ लागला आहे, हे पाहून उत्पन्न झालेला खेद डिसेंबर १८७३ च्या अंकात ‘आपल्या भाषेची स्थिति’ या निबंधात तळमळीने व्यक्त झाला आहे. मराठी ज्ञानप्रसारक या मासिकाने गद्य निबंधाची मराठी वाङ्मयात सुस्थिरपणे स्थापना केली आहे त्याचा महिमा पुणे पाठशालापत्रक व विविधज्ञानविस्तार या मासिकांनी अधिक वाढविला वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकांना एक वेगळे विशिष्ट स्थान मराठी साहित्यिकांत मिळवून दिले. डौलदार व प्रत्ययपूर्ण निबंध लिहिले जाऊ लागले. शुद्धलेखन, व्याकरण, औचित्य आणि विद्धत्ता यांची श्रेयस्कर बंधने निबंधाला पाडली. त्यामुळे समर्थ व सुंदर गद्य निर्माण होऊ लागले.
अव्वल इंग्रजीतील नियतकालिकांनी पुढे आणलेला, मराठी वैचारिक लेखन करणाऱ्यांत सर्वात मोठा व मानाचे स्थान लाभलेला निबंधकार म्हणजे गोपाळ हरि देशमुख तथा लोकहितवादी. सामाजिक, धार्मिक, राजकीय इ. विषयांवर विचार व भावना यांचा सुसंवाद राखून कित्येकदा भावनावेशाने परंतु औचित्य न सोडता शतपत्ररूपाने पुरोगामी विचारांचे निबंध त्यांनी प्रसिद्ध केले. निबंधसंग्रह ( १८६६ ) हा लोकहितवादींचा अन्य एक निबंधग्रंथ. ‘कलियुग’, ‘भिक्षुक’, ‘जातिभेद’, ‘प्राचीन आर्यविद्या व रीति …’, ‘स्थानिक स्वराज्य संस्था’, ‘ग्रामरचना …’, इ. अनेक लेख त्यांनी लिहिले व प्रसिद्ध केले. अनेक इंग्रजी ग्रंथांचीही मराठी भाषांतरे करून ते ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. या कालखंडात बाबा पदमनजी यांचा अपवाद सोडल्यास लोकहितवादी यांच्याइतके विपुल वैचारिक वाड्मय अन्य कुणीही लिहिले नाही. समाज सुधारावा, समृद्ध व्हावा, समाजाचे आद्यात्मिक व नैतिक जीवन विकसित व्हावे, अंधश्रद्धा आणि विचारपराड्मुखता नष्ट व्हावी असे त्यांचे साहित्यिक उदिष्ट होते. ही त्यांची भूमिका त्यांनी स्वत:च शतपत्रांच्या अखेरीस स्पष्ट केली आहे. त्यांची सबंध वैचारिक भूमिका इतिहासनिष्ठ होती. त्यांनी भारताच्या इतिहासाचा जगातील इतर राष्ट्रांच्या इतिहासाशी तुलनात्मक असा अभ्यास केला आणि भारताच्या अदोगतीची मुख्य कारणे शोधली या अघोगतीतून बाहेर पडून भारताचा भावी विकास कसा होईल यासंबंधी चिंतन केले. या सर्व ऐतिहासिक चिंतनाचे स्वरूप आणि साधने म्हणजे त्यांचा मुख्य वाड्मयप्रपंच होय.
अव्वल इंग्रजीतील नियतकालिकांमधून मुख्यत: मराठी निबंध लेखनाची पद्धती निर्माण झाली, असे वर म्हटलेच आहे परंतु त्याच सिमारास स्वतंत्र ग्रंथरूपाने आपले निबंध अनेक निबंधकार प्रकाशित करू लागले. या कार्यात ख्रिस्ती मिशनरी लेखकांनीही विशेष भाग घेतला. श्रीमती फॅरार यांनी जे ग्रंथ लिहिले त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा ग्रंथ कुटुंबप्रवर्तननीति ( १८३५ ) हा. त्यात शीलसंपन्न कुटुंब कसे असावे, त्यात भाऊ –बहिणी, आई- बाप यांचे – किंबहुना सबंध परिवाराचे – परस्परसामंजस्य कोणत्या पद्धतीने निर्माण करावे यासंबंधी सविस्तर विवरण केले आहे. त्यात मुलगा व मुलगी असा भेद केल्याने होणारे दुष्परिणाम वर्णिले आहेत स्त्रीवर्गाच्या दु:स्थितीस कारण होणाऱ्या पद्धतींची मीमांसा केली आहे स्त्रीशिक्षणाचा महिमा वर्णिला आहे. या निबंधात अंत:करणातील उदात्त भावनांना आवाहन केले आहे. भाषाशैली कोमल, शुद्ध व लवचिक आहे शब्दकळा घरगुती आहे. स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन होण्याकरता लोकहितवादींनी पुष्कळ लेखनप्रपंच केला आहेपण त्यात कठोर टीका आहे.
लोकहितवादींचा विशेष परिणाम त्यांच्या नंतरच्या काही लेखकांवर झालेला दिसतो. उदा., बाबा पदमनजी, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि जोतिराव फुले. बाबा पजमनजी हे मूळचे हिंदू. विद्यार्थी असतानाच विद्वान ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या सहवासात ते आले. लोकहितवादींची शतपत्रे वाचून ब्राम्हण व हिंदू धर्म यांच्यावरील विश्वास डळमळला. १८५४ मध्ये उघडपणे ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. या धर्मपरिवर्तनाचे वर्णन त्यांनी अरुणोदय या आपल्या आत्मचरित्रात केले आहे. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षकाचा व्यवसाय त्यांनी केला.ऐक्यवर्धक पत्रिका व सत्यदीपिका ही नियतकालिकेही त्यांनी चालविली. आपल्या आयुष्यात त्यांनी शंभरहून अधिक लहानमोठी पुस्तके लिहिली. त्यांतील फार थोडी आज उपलब्ध आहेत. त्यांच्या विपुल व विविध वाङ्मयाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट हिंदु समाज व हिंदू धर्म यांचे दोष दाखवून ख्रिस्ती धर्माचा श्रेष्ठपणा सिद्ध करणे हा होता. र्हस्व व दीर्घ असे दोन्ही प्रकारचे निबंध त्यांनी लिहिले. अनेक इतिहास व कोश लिहिले. स्त्रीविद्याभ्यास नुबंध (१८५२) हा ५९ पानांचा निबंध स्त्रीशिक्षणाचा महिमा सिद्ध करणारा आहे. हा संवादात्मक निबंध आहे. संयम, सुसंगत युक्तिवाद, देशकल्याणाची, विद्यावृद्धीची व शुद्ध आचारविचारांची आस्था त्यांच्या निबंधात दिसून येते. शैलीत स्भाविक गोडवा आहे. टीकेत कठोरपणा नाही व ख्रिस्ती धर्माच्या प्रशंसेत अनावर अतिशयोक्ती नाही. विवेकनिष्ठा आहे. त्यांच्या अनेक निबंधांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध ( १८८१ ), कुटुंबाची सुधारणा ( १८५५), व्यक्तिचारनिवेधक बोध ( १८५४ ) इ. त्यांचे निबंध याची साक्ष देतात.
विष्णुबुवा ब्रह्मचारी ( १८२५ – ७१ ) ही सामाजिक समतेचा पुरस्कार करणारी अत्यंत त्यागी व्यक्ती. स्वयंभू प्रज्ञा. तीव्र स्मरणशक्ती, प्रभावी व वादकुशल वक्तृत्व हे त्यांचे विशेष गुण होत. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांतील वेदोक्त धर्मप्रकाश ( १८५९ ) हा ७०० हून अधिक पृष्ठांचा ग्रंथराज प्रसिद्ध आहे. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध ( १८६७ ) आणि वेदोक्त धर्मप्रकाश यांमध्ये आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे. ‘सर्व प्रजा एक कुटुंब’ ही मध्यवर्ती कल्पना होय. विष्णुबुवांच्या या आदर्श राज्याच्या कल्पनेला स्वप्नरंजनाचे रूप आहे.
ब्राह्मणांचे कसब ( १८६९ ), गुलामगिरी ( १८७३ ), शेतकऱ्याचा आसूड हे जोतिरावांचे काही उल्लेखनीय निबंध होत. धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजनसमाजाची चाललेली पिळवणूक जोतिरावांनी आपल्या निबंधांतून मांडली.
ज्यांनी मराठी भाषेचे सविस्तर व्याकरण प्रथम लिहिले त्या मौलिक विचारप्रवर्तक, धर्मसुधारक आणि भाष्यकार ⇨दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी ( १८१४ – ८२ ) धर्मविवेचन ( १८६८ ), पारमहंसिक ब्राह्मधर्म इ. निबंध लिहिले. त्यांचा सर्वोत्कृष्ट निबंध म्हणजे यशोदा पांडुरंगी या त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना होय.
दुसरे एक थोर विद्वान म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर हे होत. दादोबांच्या मराठी व्याकरणाचे मनन करून त्यांनी लिहिलेल्या व्याकरणविषयक निबंधांचा निर्देश पूर्वी आलेला आहेच. तथापि आधुनिक भौतिक विज्ञानांचा परिचय करून देण्याकरता सुबोध मराठीत इंग्रजी ग्रंथांच्या आधारे त्यांनी लिहिलेल्या अनेकाविद्यामूलतत्त्वसंग्रहाचा ( १८६१ ) उल्लेखही आवश्यक आहे. या ग्रंथात भौतिक विज्ञानाशिवाय इतरही अनेक निबंध आहेत. मराठी निबंधाला विज्ञान व्यक्त करण्याचे सामर्थ्य यावे परंतु त्याचे ललित रूपही आकर्षक रहावे .या उद्देशाने कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी यशस्वी रीतीने प्रयत्न केला आहे.
⇨गोविंद नारायण माडगावकर ( १८१५ – ६५ ) व विश्वनाथ नारायण मंडलीक ( १८३३ – ८९ ) हे दोन निबंधकारही उल्लेखनीय होत. शुचिर्मृतपणा ( १८४९ ), ऋणनिपेधक बोध (१८५० ), सत्यनिरूपण ( १८५२ ) हे माडगावकरांचे काही पुस्तकरूप निबंध. सवयी आणि अभ्यास ह्या दोन विषयांवर मंडलिकांनी निबंध लिहिले आहेत. ह्या दोन्ही निबंधकारांची भूमिका उपदेशकाची दिसते.
विष्णुशास्त्री चिपळूणकर ( १८५० – ८२ ) यांची निबंधमाला आधुनिक मराठी गद्याचा पहिला उत्कर्षबिंदु होय. निबंधमाला १८७४ ते १८८१ अखेरपर्यत चाललेले मासिक. या मासिकाचे एकंदर ८४ अंक निघाले. या ७ वर्षाच्या काळात निबंधमालेत एकंदर २७ विषयांवर लहान – मोठे निबंध लिहिण्यात आले, ते सर्व स्वत: विष्णुशास्त्री यांनीच लिहिले. या ७ वर्षाच्या काळात ज्या खळबळ उत्पन्न करणाऱ्या घटना घडल्या, त्यांचा उत्कट प्रभाव मालकारांच्या मनावर पडून त्याची प्रतिक्रिया या निबंधांमध्ये निर्माण झालेली आढळते. धर्मिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातील तत्कालीन संघर्ष या निबंधांमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. यात मराठी शैली प्रगल्भ, ओजस्वी, शब्दालंकर आणि अर्थालंकारांनी दिपवणारी, विचारांना आव्हान देणारी, वाचकास अंतर्मुख करून चिंतनशील बनवणारी अशी बनली आहे. त्या कालखंडात परंपरागत रूढ समाजव्यवस्थेवर व धार्मिक भावनांवर तीक्ष्ण प्रहार करणारे, परंपरेपासून विच्छेद करून नव्या वैचारिक अधिष्ठानावर उभे राहणारे, ब्राह्मो समाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज, आर्यसमाज इ. नव्या नव्या संस्था निर्माण करणारे सुधारकांचे अग्रणी जुना, जीर्ण भारत बदलून नवा, आधुनिक भारत निर्माण करण्याच्या प्रबोधनास प्रथमच प्रवृत्त झाले होते. रूढ कल्पनांवर हे सुधारक सतत प्रहार करू लागले होते. त्याचबरोबर जवळजवळ ६० – ७० वर्षे ख्रिश्चन मिशनरी हिंदु धर्माची नालस्ती करणारा प्रचार करीत होते व त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्याची सहानुभूतीही लाभली होती. हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रचाराची छाया या भारतीय नवप्रबोधनावरही उमटलेली दिसत होती. मालाकारांनी ह्या विरूद्ध आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रिय, पवित्र, हद्याशी बाळगलेल्या व जीवनात भिनलेल्या परंपरेवर आघात म्हणजे सर्वस्वाचा घात असे साधारण समाजास वाटत होते.
ह्या परंपरावादी साधारण जनमानसाशी संवादी अशी ही प्रखर प्रतिक्रिया मालाकारांच्या निबंधमालेच्या रूपाने प्रकट झाली. ब्राम्हो समाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज आणि अन्य सुधारक नवशिक्षित हे राष्ट्राला नवचैतन्य प्राप्त होऊन त्याचा कायापालट व्हावा याच उद्देशाने प्रवृत्त झाले होते परकीय ब्रिटिश राज्यसत्तेच्या तोजाचे नवशिक्षितांचा वर्ग दिपून गेला होता.याची जाणीव नसलेल्या सामान्य जनांशी त्यांचा संपर्कच नव्हता. परंतु त्या सत्तेचे शोषणतंत्र अधिक स्पष्ट दिसू लागले होते. अगोदर ब्रिटिशपूर्वकाळात अवनत होऊन जीर्ण झालेल्या भारत राष्ट्रांचे आर्थिक जीवन या परकीय शोषणामुळे अधिकच दैन्यमय होऊ लागले होते. या राष्ट्राने परकीयांपुढे संपूर्णपणे शरणागती पतकरली होती. हा देश पूर्ण थंड गोळा होऊन पडला होता. ह्याचे निराशाजनक दर्शन ज्या थोड्या प्रज्ञावंतांना होऊ लागले होते, त्यांचे महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे प्रतिनिधी म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर होत.
वर उल्लेखिलेल्या प्रबोधनकारांच्या पेक्षा राष्ट्राच्या राजकीय गुलामगिरीचे अगदी वेगळे निदान विष्णुशास्त्रीयांनी केले. हे राष्ट्र पराभूत होऊन गुलाम झाले, याचे कारण कालमहिमा होय दुसरे काही नाही. ह्या राष्ट्राच्या प्रकृतीला काही झाले नाही कोठेही कसलीही व्याधी नाही चक्रनेमिक्रमाने उत्कर्षापकर्ष चालू असतात हे सगळ्याच राष्ट्रांना लागू आहे. ह्या राष्ट्राला आधुनिक ज्ञानाने संपन्न करा ते पुन्हा उत्कर्षाला जाईल. त्याला जागृत करा त्याची मानखंडना करू नका सगळे सुधारक या राष्ट्राची मानखंडना विनाकारण करत आहेत, अशा आशयाचा हा विष्णुशास्त्रांचा सगळ्या प्रबोधनकारांपेक्षा वेगळा दृष्टिकोण होता. तो त्यांनी आपल्या निबंधमालेमध्ये मांडला आहे.
विष्णुशास्त्र्यामचे भाषा आणि साहित्यिविषयक निबंध सौम्य आणि सर्वसंमत होण्यासारखे आहेत. परंपरेचे जीव तोडून समर्थन त्यांनी सामाजिक सुधारणेच्या संदर्भात केले असले, तरी साहित्यिविषयक लेखांमध्ये त्यांनी इंग्रजी भाषेचा महिमा मान्य केला आहे. काव्यशास्त्राविषयक विचारांच्या संदर्भात त्यांनी म्हटले आहे, की ‘काव्यविवेचनविषयक ग्रंथ इंग्रजी भाषेप्रमाणे संस्कृतात नसल्यामुळे काव्याचे स्वरूप काय, कवीस कोणते गुण आवश्यक आहेत. कवित्व ही ईश्वरी देणगी होय किंवा ती प्रयत्नामुळे मिळते वगैरे गोष्टीचे निरूपण केलेले त्या भाषेत कोठेच सापडत नाही’ ( विद्वत्व आणि कवित्व ). ‘आमच्या देशाची स्थिति’ हा निबंधमालेच्या अखेर अंक ७७ ते अंक ८४ पर्यत लिहिलेला प्रदीर्घ निबंध आहे. हा निबंध फार उशिरा म्हणजे १९१० साली ब्रिटिश सरकारने विनाकारण जप्त केला व त्याच्या प्रसारास कायद्याने बंदी केली पुढे २७ वर्षानंतर ही बंदी उठवण्यात आली. हा निबंध भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनातील परंपरानिष्ठ, पुराणमतवादी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारा, भारतीय वाङ्मयातील पहिला मूलभूत निबंध होय. भारतीय राष्ट्रवादाचे दोन प्रवाह त्यांतील चिपळूणकरांचा हा पहिला आणि सामाजिक व धार्मिक सुधारणेचा सर्वागीण पुरस्कार करणारा व पुरोगामी आधुनिक बुद्धिवादावर आधारलेला दुसरा राष्ट्रवाद होय. या दुसऱ्या राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यामधील थोर महाराष्ट्रीय प्रज्ञावंत म्हणजे ð महादेव गोविंद रानडे होत. मराठी निबंधकार म्हणून या राष्ट्रवादाच्या प्रवाहाचे दोन वेगवेगळे प्रतिनिधी सांगायचे झाले, तर लोकहितवादी हे दुसऱ्या प्रकारच्या राष्ट्रवादाचे आणि चिपळूणकर हे पहिल्या प्रकारच्या राष्ट्रवादाचे अध्यर्यू म्हणून सांगता येतात.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या विचारांना तात्विक म्हणजे शास्त्रीय स्वरूप देणाऱ्यांमधले अग्रगण्य निबंधकार ⇨गोपाळ गणेश आगरकर ( १८५६ – ९५ ) होत. त्यांनी आपले महत्त्वाचे निबंध स्वत: संपादित केलेल्या केसरी ( १८८१ – ८७ ) आणि सुधारक ( १८८८ – ९५ ) या नियतकालिकांमधून प्रसिद्ध केले. धर्म, सामाजिक व धार्मिक चालीरीती, समाजरचना व राज्यसंस्था ह्यांच्यामध्ये बदल करण्याचा, सर्व मानवांची आणि स्त्री-पुरूषाची समानता मानून परंपरेमध्ये बदल करण्याचा अधिकार माणसांना आहे धर्म किंवा धार्मिक आचारविचार यांना इतिहास आहे आणि तो विकासाचा इतिहास आहे, असा विकासवादाचा सिद्धांत आगरकरांनी इंग्रज तत्वज्ञ व समाजशास्त्र हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्ट्यूअर्ट मिल, बेथॅम, तसेच फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्तेअर इ. पश्चिमी विद्वानांच्या ग्रंथांचे मनन करून मान्य केला. आगरकरांचा काळ हा महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा काळ होता. काव्य, ललित वाङ्मय, कला, नाट्य, साहित्य, राजकारण, अर्थव्यवस्था इत्यादिकांची चिकित्सा करून त्याप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरविणे, त्याकरिता वैचारिक संघर्ष चालू ठेवणे हे या प्रबोधनाचे स्वरूप होते. राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही संवादी गोष्टी होत. विशिष्ट प्रकारच्या राजकीय सुधारणा या त्यांस अनुरूप अशी सामाजिक स्थिती नसेल, तर राबवता येणार नाहीत व विशिष्ट तर्हेची सामाजिक सुधारणा स्थिरावयास राजकीय संस्थादेखील त्यास संवादी किंवा अनुरूप असाव्या लागतात. राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ह्या परस्परावलंबी आहेत. आधी सामाजिक का आधी राजकीय, असा वाद आगरकर व टिळक यांच्यामध्ये निर्माण झाला. या दोन्ही प्रवृत्तींना समान महत्तव आहे, व त्या हातात हात घालून चालल्या पाहिजेत अशा मताचे आगरकर होते. टिळक हे आधी राजकीय व नंतर सामाजिक या मताचे होते. आता स्वातंत्र्यप्रापतीनंतर आगरकरांच्या मताचे य़थार्थत्व पटू लागले आहे. परंपरागत विषम समाजरचना, अंधश्रद्धा, जातिभेद. अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक रूढी लोकशाही जीवनपद्धतीशी विसंगत आहेत व त्यामुळे लोकशाहीला धोका पोहोचू लागला आहे, ही गोष्ट निदर्शनास येऊ लागली आहे. आगरकरांनी लिहिलेल्या निवडक निबंधांचे संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
आगरकरांच्या सामाजिक-राजकीय निबंधांबरोबरच ‘कवि, काव्य, काव्यरति’ ‘शेक्सपिअर, भवभूती व कालिदास’ हे त्यांचे वाङ्मयीन निबंध अजूनही लक्षणीय आहेत. त्यांच्या विकारविलसिताच्या प्रस्तावनेचाही ह्यात अंतर्भाव होतो. मराठी निबंधसाहित्यात आगरकरांनी मोलाची भर घातली आहे. मराठीतील सामाजिक सुधारणेचा आशय असलेले नाट्य, काव्य इ. ललित साहित्य हे आगकरांच्या मानवता वादी विचारसरणीच्या प्रकाशात वाढले आहे.
भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाला जनतेच्या आंदोलनाचे स्वरूप देणाऱ्या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या म्हणजे श्रेष्ठ विभूती दोनच होत. पहिले ⇨ बाळ गंगाधर टिळक ( १८५६ १९२० ) व दुसरे महात्मा गांधी. टिळक हे सर्वागीण बिद्वान आणि ‘य: क्रियावान स पण्डित:’ या बोधवाक्याप्रमाणे आपल्या विचारांप्रमामे जन्मभर स्वत: आचरण करणारे वैचारिक नेते होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी भारताचा भूतकाळ भव्य होता, असे मोठ्या आग्रहाने प्रतिपादले परंतु ते प्रमाण देऊन सिद्ध केले नाही. टिळकांनी वेदांचे आणि भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे खोल अध्ययन करून ओरायन, आर्टिक्टक होम इन द वेदाज आणि गीतारहस्य हे तीन ग्रंथ लिहून प्रकाशित केले ( त्यांपैकी गीतारहस्य हा श्रेष्ठ मराठी प्रबंधाचा नमुना आहे ). चिपळूणकर जसे परंपरेला कसलाही धक्का लावू नये अशा मताचे होते, तसे टिळक नव्हते. आगरकर व टिळक या दोघांच्या विचारांची पद्धती बुद्धिप्रधान, तार्किक युक्तिवादावर आधारलेली होती. समाजसुधारणा राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर लोकांनी करावी व लोक आपोआप करतीलच असा आगरकरांपेक्षा वेगळा द्दिष्टीकोण टिळकांनी प्रतिपादला. टिळकांच्या केसरीतील व अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या समग्र लेखांचा संग्रह अनेक खंडांमध्ये आज उपलब्ध आहे. दीर्घ निबंध या द्दष्टीने गीतारहस्य हा ग्रंथ मराठी साहित्याचा एक सुंदर अलंकार म्हणून कायम टिकणारा आहे.
टिळकांच्या प्रभावाखाली काम केलेले व चतुरस्त्र विद्वान असलेले अनेक निबंधकार झाले. त्यांत काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, नरसिंह चिंतामण केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर इत्यादिकांचे लेखसंग्रह अनेक खंडांत प्रसिद्ध झालेले आज उपलब्ध आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हेही टिळकांच्या प्रभावळीतले. ह्या साऱ्यांबरोबरच विनायक दामोदर सावरकर हेही मराठीचे ओजस्वी निबंधकार म्हणून आणि निबंधांच्या द्वारे राजकीय आणि सामाजिक क्रांतीच्या विचारांची प्रेरणा देणारे, विपुल साहित्य निर्माण करणारे, महाराष्ट्र साहित्यात दीर्घकाळ अविस्मरणीय लेखक म्हणून मानले जातील. त्यांचा गाजलेला व ब्रिटिश राज्यकर्त्याना धोक्याचा वाटलेला प्रदीर्घ निबंध म्हणजे १८५७ चे भारताचे स्वातंत्र्यसमर. त्यांचे सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे, पारंपरिक भावनांना धक्का देणारे अनेक सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचे निबंध आहेत. समग्र सावरकर वाङ्मय ह्या त्यांच्या लेखसंग्रहांतील खंड तिसरा – ‘निबंध’ ह्या ग्रंथातील ‘ क्ष- किरणे’, ‘जात्युच्छेदक निबंध व इतर स्फुट निबंध’, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ हा निबंधसमुच्चय सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी विचार सांगणारा आहे. सामान्य हिंदुभावनेला धक्का देणारा त्यांचा प्रसिद्ध निबंध म्हणजे ‘गाय : एक उपयुक्त पशु. माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे’ हा होय. त्याच्याच जोडीला ‘पुन्हा एकदा गाय – हानिकारक धर्मभावना’ हाही वाचावा.
निबंध- प्रबंधाच्या संदर्भात ज्ञानकोशकार केतकरांचे नावही आवर्जून उल्लेखिले पाहिजे. त्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड हे इतिहास व संस्कृतिविषयक प्रदीर्घ निबंधच होत. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ( १९२८ ) हाही त्यांचा एक ग्रंथरूप निबंधच होय.
रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी सुरू केलेले विविधज्ञानविस्तार हे मासिक ( १८६७ – १९३७ ) वैचारिक लेखनाचे म्हणजे निबंधसाहित्याचे मुख्य माध्यम ठरले. हे विद्वान लेखकांचे व्यासपीठ बनले. राजारामशास्त्री भागवत. वा. बा. केळकर. विनायक कोंडदेव ओक, नी. ज. कीर्तने, जनार्दन बाळाजी मोडक. वामन आबाजी मोडक, मं. वि. तेलंग, पुरूषोत्तमपंत नाडकर्णी हे अशा लेखकांपैकी काही होत. त्यानंतर विविधज्ञानविस्ताराचे स्थान घेणारे लेकशिक्षण हे मासिक गीर्वाणलघुकोश हा संस्कृत-मराठी कोश तयार करणारे ज. वि. ओक यांनी सुरू केले ( १९१२ ). हे काही वर्षे चालले. नंतर प्रसिद्ध गांधीवादी शंकरराव देव यांनी नवभारत हे वैचारिक विषयाला वाहिलेले मासिक १९४७ साली सुरू केले ते १९५७ पासून वाई प्राज्ञपाठशाला मंडळाने चालू ठेवले. त्याचे संपादक म्हणून वि. म. वेडेकर यांनी प्रथम अनेक वर्षे काम केले नंतर गोवर्धन पारीख व त्यानंतर मे. पुं. रेंगे हे संपादक म्हणून काम पहात आहेत. स्वातंत्र्योत्तर कालात अनेक नाणावलेले निबंध नवभारताने प्रसिद्ध केले. निबंध हा साहित्यप्रकार मराठीमध्ये कायम रूजला आहे.
१९८० पर्यत मराठीत झालेल्या संपूर्ण निबंधवाङ्मयाचा परामर्श घेणे येथे शक्य नसले, तरी त्यातील काही ठळक निबंध असे : वि. गो. विजापूरकर ह्यांचे ‘राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी चळवळीचे प्रधान अंग आहे काय?’, ‘सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा’ हे, तसेच मराठ्यांच्या संबंधाने चार उद्गार ( १८८७ ), ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म किंवा वेद व वैदिक धर्म ( १८८९– राजारामशास्त्री भागवत ), हिंदु धर्म सुधारणा ( १८९८– म. शि. गोळे ), नीतिशास्त्र – प्रवेश ( १९१९ – वा. म. जोशी ), मराठे व इंग्रज … ( १९१८ – न. चिं. केळकर ), संस्कृत भाषेचा उलागडा ( १९२०– वि. का. राजवाडे ), कोदंडाचा टणत्कार ( आवृ. दुसरी, १९२५ – के. सी. ठाकरे ), धर्मरहस्य ( १९२६ – के. ल. दप्तरी ), अस्पृश्यांचा प्रश्न ( १९३३ – श्री. म. माटे ), भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ( १९३३ – विठ्ठल रामजी शिंदे ), विज्ञानप्रणीत समाजरचना ( १९३६ – पु. ग. सहस्त्रबुद्धे ), आधुनिक भारत ( १९३८ – शं. द. जावडेकर ). हिदूधर्माची समीक्षा ( १९४१ – लक्ष्मणशास्त्री जोशी ), संतति- नियमन – विचार व आचार ( १९२३ – र. धों. कर्वे ), संतषाड्मयाची सामाजिक फलश्रुती ( १९५० – गं. बा. सरदार ), सौदर्य आणि साहित्य ( १९५५ – बा. सी. मर्ढेकर ), भारतीय साहित्यशास्त्र ( १९५८ – ग. त्र्यं. देशपांडे ), भाषा : इतिहास आणि भूगोल ( १९६४ – ना. गो. कालेकर ), हिंदूची समाजरचना ( १९६४ – इरावती कर्वे ), प्राचीन भारतीय राजनिति ( १९६९ – र. पं. कंगले ), संगीताचे सौदर्यशास्त्र ( १९७१ – अशोक रानडे ), महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास ( १९७२ – नलिनी पंडित ), सौंदर्य – मीमांसा ( १९७४ – रा. भा. पाटणकर ), कालिदास ( १९७५ – वा. वि. मिराशी ), सौंदर्यानुभव, ( १९७९ – प्रभाकर पाध्ये ) सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य ( शरच्चंद्र मुक्तिबोध, १९८१ ).
जोशी, लक्ष्मणशास्त्री
समीक्षा : प्राचीन मराठी साहित्यात ‘भटो ग्रंथु निका जाला परिनिवृत्ताजोग नव्हेचि’ यासारखे उद्गार आढळतात त्यांतून काहीएक वाड्मयीन दृष्टी सूचित होते. तथापि आधुनिक मराठी साहित्यसमीक्षा अव्वल इंग्रजीच्या कासखंडात सुरू झाली. अव्वल इंग्रजीच्या काळापासून १९८० – ८४ पर्यतच्या प्रदीर्घ कालखंडात मराठी समीक्षेचा विस्तार झाला आहे. स्थूल मानाने ह्या दीर्घ कालखंडाचे १८१८ ते १८७४ १८७४ ते १९२० १९२० ते १९४० १९४० ते १९६० आणि १९६० नंतर असे पाच कालखंड पाडता येतात. १८७४ पूर्वी विविध नियतकालिकांमधून येणाऱ्या पुस्तकपरीक्षणांमधून साहित्यसमीक्षात्मक विचार आढळतात. विविधविज्ञानविस्तार, मराठी ज्ञानप्रसारक अशांसारख्या नियतकालिकांचे कार्य ह्या संदर्भात उल्लेखनीय होय. ह्या कालखंडातील साहित्यविचारावर प्राचीन संस्कृत साहित्याचा प्रभाव दिसतो. त्याचप्रमाणे वाड्मयविषयक पश्चिमी विचारही पुढे येऊ लागलेले दिसतात. गणेशशास्त्री लेलेकृत साहित्यशास्त्र ( १८७२ ), दाजी शिवाजी प्रधान ह्यांचा रसमाधव ( १८६८ ) हे ह्या कालखंडातील ग्रंथ संस्कृत साहित्यविचाराचे प्रतिनिधी होत. दादोबा पांडुरंग तर्खडकर व परशुरामपंततात्या गोडबोले ह्यांनी मोरोपंतांच्या केकावलीकर लिहिलेल्या अनुक्रमे यशोदा पांडुरंगी ( १८६५ ) आणि केकादर्श ( १८६७ ) ह्या टीका जुन्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. दादोबांची टीका पांडित्यप्रचुर आहे परंतु मोरोपंतांसारखा कवी सामान्य वाचकाला समजावा, असा हेतू परशुरामपंततात्यांचा होता.
महादेव मोरेश्वर कुंटे ह्यांनी आपल्या राजा शिवाजी ह्या काव्याला लिहिलेल्या इंग्रजी प्रस्तावनेतू पश्चिमी साहित्यशास्त्रातील तत्त्वांच्या आधारे काव्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ह्या विवेचनात काव्यभिरूची, टीकाप्रकार, महाकाव्याचे स्वरूप, ‘रोमँटिक’ आणि ‘क्लासिकल’ संप्रदाय इ. विषयांचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे. का. बा. मराठे ह्यांच्या नावल व नाटक ह्यांविषयी निबंधात ( १८७२ ) वास्तववादाचा पुरस्कार दिसतो. हे सर्व लेखन ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.
१८७४ – १९२० : ह्या कालखंडात मराठी समीक्षेला भक्कम पाया दिला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी. वाङ्मयविषयक तात्विक विचार करणारे निबंध त्यांनी लिहिले. ‘विद्वत्व आणि कवित्व’ हा निबंध त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. ग्रंथटीका कशी केली जावी. ह्याचेही विवेचन त्यांनी केले. पौर्वात्य व पाश्चात्य साहित्यशास्त्राचे ज्ञान असणारे व त्याचे भान ठेवून लेखन करणारे पहिले समीक्षक चिपळूणकर ठरतात. त्यानंतरच्या समीक्षापर लेखनात आगरकरांची त्यांच्या विकारविलसित …ह्या नाटकासाठी लिहिलेली प्रस्तावना, तसेच ‘कवि, काव्य व काव्यरति’, ‘शेक्सपिअर, भवभूती, कालिदास’ हे निबंध अंतर्भृत होतात. ह्या लेखनामुळे वाङ्मयाच्या स्वरूपाचा मानसशास्त्रीय दृष्टीने वेध घेणारे पहिले मराठी समीक्षक म्हणून आगरकरांचा उल्लेख करण्यात येतो.
१८७४ ते १९२० ह्या कालखंडातील समीक्षेच्या संदर्भात आरंभी हरिभाऊ आपटे ह्यांचे नाव प्रामुख्याने द्यावे लागेल. हरिभाऊंनी साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भात नीतिवादी दृष्टीने विचार मांडले. कलावंताचे स्वातंत्र्य नष्ट होता कामा नये परंतु कलेने आपले नियम आपणच तयार करावेत मधुर अनुपानातून रसिकांना सत्याचे औषध द्यावे, अशी त्यांची भूमिका होती. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘कादंबरी’ हा लेख लिहून त्या साहित्यप्रकाराचा तात्त्विक परामर्श घेतला. अद्भुत व वास्तविक असे कादंबऱ्यांचे दोन प्रकार, अद्भुत व काल्पनिक सृष्टी, तिचा सामाजिक जीवनावरील प्रभाव, मराठीतील अद्भुत व वास्तविक कादंबऱ्या, कादंबरीरचनेचे मर्म ह्यांसारखे अनेक मुद्दे ह्या लेखात राजवाड्यांनी विवेचिले आहेत. कादंबरी या वाड्मयप्रकाराची ही महत्त्वपूर्ण समीक्षा होय. रामदास, मराठी छंद ह्या विषयांवरील राजवाड्यांचे लेखही महत्त्वाचे आहेत. शि. म. परांजप्यांनी ठाकूरसिंगांच्या ‘प्रणयिनीचा मनोभंग’ या चित्रावर लेख लिहिला. संस्कारवादी, रसग्रहणात्मक कलासमीक्षेचा हा प्रारंभ म्हणता येईल. वासुदेव बळवंत पटवर्धन ह्यांनी काव्य आणि काव्योद्य ( आवृ. दुसरी, १९२१ ) ह्या आपल्या ग्रंथातून अर्वाचीन कवितेचा पुरस्कार व विवेचन केले.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी वाड्मयनिर्मिती बरोबरच वाङ्मय विचारही केला. ‘पण लक्ष्यांत कोण घेतो’, ‘संगीत सौभद्र’, ‘तुलसी रामायण’, ‘मॅक्बेथ नाटकाची दोन भाषांतरे’ ‘रागिणी व तिची भावंडे’ असे अनेक परीक्षणात्मक लेख त्यांनी लिहिले मराठी वाङ्मयातील विशेष, मराठीतील कथात्मक वाङ्मय मराठी वाड्मय व स्वालंबन अशा विषयांवरही त्यांनी व्यासंगपूर्ण लेख लिहिले. (कोल्हटकरांचा लेखसंग्रह, १९३२ ). कोल्हटकरांची भूमिका कलावादी होती. त्यांच्या समीक्षालेखनाने मराठी समीक्षेला तात्त्विक बैठक, शास्त्रीयता, पद्धतशीरपणा, वाड्मयेतिहासाची दृष्टी, जागरूकता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तोतयाचे बंड या न. चिं. केळकरांच्या नाटकावरील त्यांचे प्रदीर्घ परीक्षण या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांप्रमाणेच न. चिं. केळरकांनी विपुल टीकात्मक लेखन केले आहे. सुभाषित आणि विनोद ( १९०८ ), हास्यविनोदमीमांसा ( १९३७ ) हे त्यांचे ग्रंथ, त्यांनी केलेली भाषणे, अभ्यासलेख आणि ग्रंथपरीक्षणे ह्यांतून त्यांचे वाङ्मयविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांनी मांडलेल्या ‘सविकल्प समाधी’ या काव्यानंदाच्या उपपत्तीने काव्यानंद हा ब्रह्मानंदसहोदर असतो हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरी सविकल्प समाधी निर्माण करू शकते. ते वाङ्मय अशी वाङ्मयाची व्याख्या त्यांनी केली. अनेक वाङ्मयीन प्रश्र्नांची चर्चा त्यांनी केली. केळकरांच्या लेखनाने एक वाङ्मयीन वातावरण तयार झाले सर्वसाधारण वाचकाला वाङ्मयाची आणि वाङ्मयचर्चेची गोडी लागली. ह्या कालखंडातील एक समीक्षक बाळकृष्ण अनंत भिडे ( १८७४ – १९२९ ) ह्यांचाही निर्देश आवश्यक आहे. भिडे ह्यांनी आधुनिक मराठी कवितेवर समीक्षात्मक लेखन केले. मराठी कवितेच्या संदर्भात केशवसुतांनी केली, ती उत्क्रांती क्रांती नव्हे, असा विचार त्यांनी मांडला होता. ना. म. भिडे ( १८८४ – १९६७ ) ह्यांनीही आधुनिक कवितेवर लिहिले. केशवसुतांची समग्र कविता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांनी केशवसुतांवर लेख लिहून त्यांच्या कवितेचे अंतरंगदृष्ट्या वर्गीकरण केले.
ह्या कालखंडात मराठी समीक्षा अधिक विस्तारली. साहित्याचे स्वरूप, प्रयोजन पारंपारिक व पाश्चात्य साहित्यशास्त्रातील तत्वाविचार ह्यांचा कधी निर्ययात्मक आणि तुलनात्मक पद्धतीने, तर कधी रसग्रहणात्मक भूमिकेवरून ती विचार करू लागली.
१९२० – १९४० : ‘कलेकरता कला की जीवनासाठी कला’? हा वाद ह्या कालखंडात प्रभावी ठरला. वि. स. खांडेकर हे जीवनवादाचे खदे पुरस्कर्ते होत, तर ना. सी. फडके हे कलावादाचे. साने गुरूजीनी टॉलस्टॉयच्या ‘कला म्हणजे काय?’ ( मराठी शीर्षकार्थ ) ह्या ग्रंथांचा मराठी अनुवाद करून जीवनवादाची पाठराखणी केली. अर्थात जीवनवाद आणि कलावाद हे परस्परांच्या पूर्ण विरोधात नव्हते. लोकजागृती, लोकशिक्षण हा ललित साहित्याचा आद्य आणि प्रधान हेतू ठरतो काय, ह्या प्रश्नाबाबत खरा वाद होता. न. चिं. केळकर आणि वामन मल्हार हे जीवनवादाचे, तर श्रीपाद कृष्ण हे कलावादाचे पूर्वप्रतिनिधी म्हणता येतील. वामन मल्हार जोशी ह्यांचा विशेष म्हणजे समन्वयवादी दृष्टीकोणातून त्यांना वाङ्मयीन प्रश्नांकडे पाहिले. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांची वाङ्मयीन दृष्टी मुख्यत: समाजशास्त्रीय होती. आंग्लपूर्व महाराष्ट्रातील वाङ्मयाभिरूचीचा इतिहास सांगण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ( १९२८ ) ह्या ग्रंथात त्याचा प्रयत्न येतो. ह्या कालखंडातील समीक्षात्मक ग्रंथांत लालजी पेंडसे ह्यांचा साहित्य आणि समाजजीवन ( १९३५ ) या ग्रंथाचा उल्लेख आवश्यक आहे. विशिष्ट भौतिक परिस्थितीत विशिष्ट प्रकारच्या विचारसरणी व कलाकृती निर्माण होत असतात व भौतिक परिस्थितीतील प्रत्येक फरकाला अनुकूल असे कलेचे स्वरूप व तंत्र बनत असते, असा विचार पेंडसे ह्यांनी आपल्या ग्रंथांत मांडलेला आहे. ⇨ रामचंद्र श्रीपाद जोग ( १९०३ – ७७ ) ह्यांचा अभिनव काव्यप्रकाश हा ग्रंथ १९३० मध्ये प्रसिद्ध झाला. आपल्या पारंपारिक साहित्यशास्त्रावर योग्य ते संस्कार करून अर्वाचीन वाङ्मयाची, विशेषत: काव्याची, समीक्षा करण्याच्या दृष्टीने ते समर्थ करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. मराठीतील समीक्षेला ह्या ग्रंथाने खोल, व्यापक आणि मजबूत पाया घालून दिला. सौदर्यशोध आणि आनंदबोध ( १९४३ ) आणि काव्यविभ्रम ( १९५१ ) ह्या त्यांच्या ग्रंथाचा उल्लेखही ह्या संदर्भात करायला हवा.
ह्याच कालखंडात काव्यालोचन ( १९३१, द. के. केळकर ), सारस्वतसमीक्षा ( १९३४, य. र. आगाशे ) ह्यांसारखे ग्रंथ लिहिले गेले. के. ना. वाटवे ह्यांचा रसविमर्श हा ग्रंथ १९४२ साली प्रकाशित झालेला असला, तरी त्याचे स्वरूप लक्षात घेता, परामर्शासाठी त्याचा अंतर्भाव ह्याच कालखंडात करणे उचित होईल. संस्कृत साहित्यशास्त्रातील रसव्यवस्थेचा विचार श्रीपाद कृष्णांनी खोलात जाऊन केला होता. न. चिं. केळकरांनीही अलंकार व रस ह्यांचा परस्परसंबंध काय, असा प्रश्न उपस्थित करून त्याची चर्चा केली होती. वाटवे ह्यांनी रसविमर्शात मानसशास्त्राच्या अंगाने रसव्यवस्थेचा विचार करून आधुनिक मराठी साहित्याशी त्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला आहे.
१९४० – १९६० : ह्या कालखंडावर बाळ सीताराम मर्ढेकर ह्यांचा प्रभाव विशेषत्वाने पडलेला दिसतो. वाङ्मयीन महात्मता ( १९४१ ), सौदर्य आणि साहित्य ( १९५५ ) हे मर्ढेकरांचे समीक्षात्मक ग्रंथ. साहित्य आणि सौंदर्यशास्त्र ह्यांचा संबंध कोणता, कलाकृतीच्या सुसंघटनेच्या संदर्भात लयतत्वांचा विचार किती महत्त्वाचा आहे, काव्यात नवीनता कशामुळे निर्माण होते, वाङ्मयीन महात्मता कशात आहे. सौंदर्यवाचक विधानांचे स्वरूप कसे असते, सौंदर्यभावना म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची मर्ढेकरांनी सखोल चर्चा केली. मराठी समीक्षेला मर्ढेकरांनी एक काटेकोर कलाविषयक परिभाषा व दृष्टी दिली. कलाविषयक प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक निश्चित भूमिका मर्ढेकरांकडून मराठी समीक्षेला मिळाली. मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारातील काही उणिवा नंतरच्या मे. पुं. रेगे, प्रभाकर पाध्ये, रा. भा. पाटणकर यांसारख्या समीक्षकांनी दाखवून दिलेल्या आहेत. पु. य. देशपांडे ह्यांनी नवी मूल्ये ( १९४६ ) ह्या आपल्या ग्रंथातून सामयवादी तत्त्वज्ञान व कलावंताची आत्मपरता ह्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.
⇨ वामन लक्ष्मण कुळकर्णी : (१९११ – ) ह्यांचे समीक्षात्मक लेखन विपुल असून ललित वाङ्मयाची प्रकृती, प्रयोजन, भाषा आशय आणि अभिव्यक्ती सुखात्मिक आणि शोकात्मिका हे नाट्यप्रकार साहित्य आणि इतिहास नाट्य आणि काव्य अशा अनेकविध विषयांचा परामर्श त्यांनी मुख्यत: रूपवादी भूमिकेत घेतला. त्यांच्या समीक्षालेखनात तात्विक भागाबरोबरच त्याचे उपयोजन म्हणून नवे लेखक, नवे वाङ्मयीन प्रवाह यांच्यावाटे नवेपण नेमकेपणाने दाखवून देण्याची रसिक वृत्ती आढळते. लेखक-रसिकांत अधिक सामंजस्य निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या समीक्षेने केले. तात्विक व उपयोजित समीक्षा हे गंगाधर गाडगीळ यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य, खडक आणि पाणी ( १९६० ), साहित्याचे मानदंड ( १९६२ ), पाण्यावरची अक्षरे ( १९७९ ) आणि आजकालचे साहित्यिक ( १९८० ) ह्या त्यांच्या ग्रंथांतील लेखांवरून दिसून येते. मर्ढेकरांच्या सौंदर्यविचाराच्या काही छटा त्यांच्या समीक्षेत दिसतात. गो. वि. करंदीकर ह्यांचे परंपरा आणि नवता ( आवृ. २ री, १९८० ) हे पुस्तकही उल्लेखनीय आहे.
पु. शि. रेग्यांनी आपल्या छांदसीमधून रूपवादी सौंदर्यविचाराची मीमांसा वेगळ्या दृष्टीकोणाने केलेली आहे. कलाकृतीतील आकारिक संघटना आणि लय यांची निर्मिती व प्रक्रिया यांचा ऊहापोह त्यांनी केला आहे आणि हे करताना लेखक व वाचक या दोन्ही बाजू ते विचारात घेतात. परंपरेकडे एका नव्या, ताज्या दृष्टीने पाहणे हे त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य.
या रूपवादी समीक्षेला प्रतिरोध करणारे ⇨ दिनकर केशव बेडेकर ( १९१० – ७३ ) व कुसुमावती देशपांडे यांचे लेखन आहे.साहित्य : निर्मिती आणि समीक्षा ( १९५४ ), साहित्यविचार ( १९६४ ) या ग्रंथातून बेडेकरांनी साहित्यनिर्मितीच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे. कलावंताचे व्यक्तिमत्व व बाह्य वास्तव ह्यांच्या द्वंद्वात्मक प्रक्रियेतून कलाकृती कशी निर्माण होते. कलाकृतीची समीक्षा करीत असताना सामाजिक शास्त्रांचे साहाय्य कसे आवश्यक ठरते, सौदर्यमूल्ये ही इतिहासनिष्ठ कशी असतात, ह्यांसारख्या बाबींचा परामर्श बेडेकरांनी घेतला आहे.
कुसुमावतीबाई कलेचा विचार व्यक्तिसमाज संबंधाद्वारे करतात. त्यांच्या मते सामान्याला व कलावंताला जी सोंदर्यप्रतीती येते, ती त्यांच्या सांसकृतिक संचितांनी रंगलेली असते. पण सामान्यांची प्रतीती समष्टीमध्ये रूळलेल्या कल्पनांनी मर्यादित असते, तर प्रतिभावंताची सौंदर्यप्रतीती ही ठराविकाला आश्लेषून ज्ञानाच्या पलीकडे जाते. म्हणून मानवी अनुभवाचे क्षितिज विस्तारण्यासाठी या प्रतीतीचा उपयोग होतो. श्रेष्ठ कलेचे हे सामाजिक क्रांतिकार्य पासंग ( आवृ. २ री, १९६१ ) मधील अनेक लेखांतून त्यांनी मांडलेले आहे. त्यांच्या मते मराठी टीकेत विविधता. व्यासंगप्रियता आधिक्याने आली : पण टीकावाङ्मय समाजजीवनाजवळ आले नाही. कला आणि जीवन यांच्या संबंधावर दि. के. बेडेकर आणि कुसुमावती देशपांडे ह्यांनी चांगला प्रकाश टाकलेला आहे.
१९६० नंतर : आपल्या सांस्कृतिक जीवनाला १९६० नंतरच्या कालखंडात आणखी एक छेद गेला. या कालखंडात लघुमासिकांची चळवळ, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे तीन प्रवाह अधिक जोरकसपणे पुढे आले.
माधव आचवलांचे जास्वंद ( १९७४ ), रसास्वाद…( १९७२ ) इ. टीकालेखन याच काळातले. ही समीक्षा सौंदर्यतत्वाधिष्ठित आस्वादक समीक्षा आहे. कलावंतांचे व्यक्तिमत्त्व, कलाकृतीच्या आविष्काराची समस्या, त्या समस्येच्या सोडवणुकीची पद्धत यांवर ती भर देते.
द. ग. गोडसे यांच्या पोत ( १९६३ ), शक्तिसौष्ठत ( १९७२ )इ. ग्रंथांतून आशयवादी समीक्षा साकार होते. त्यांच्या विवेचनामागे समूहसापेक्षा हे सूत्र आहे. ते जेव्हा आपल्या जीवनविषयक निष्ठांचे विश्लेषण करतात. तेव्हा प्रवृत्त निसर्गाशी संवादी अशा निष्ठा आणि निवृत्त, कृत्रिम संकेतांशी जखडलेल्या निष्ठा असा मुख्य भेद करतात.
आशयवादी आणि रूपवादी अशा दोन्ही प्रकारच्या समीक्षेत सौंदर्यसंकल्पनेचा उहापोह कमीअधिक प्रमाणात झालेला आहेच पण या सौंदर्यसंकल्पनेचे अधिक मूलगामी विवेचन प्रभाकर पाध्ये आणि रा. भा. पाटणकर यांनी केलेले आहे.
प्रभाकर पाध्ये यांच्या मते कलाकृतीत ज्या अनुभवाची प्रतिमात्मक मांडणी असते, तो अनुभव कसदार असला पाहिजे. त्या अनुभवाने आपल्या मनातील चैतन्यशक्तीच्या मूलस्त्रोताला जाग आली पाहिजे. कलेचे हेच अंतिम कार्य आहे. प्रभाकर पाध्ये यांचा सौंदर्यविचार कलेची क्षितिजे ह्या ग्रंथातून व आस्वाद ( १९७७ ) मधील ग्रंथसमीक्षेतून अधिक स्पष्ट झालेला आहे. पाध्ये ह्यांच्या सौंदर्यनुभव ( १९७९ ) ह्या ग्रंथात कलेचे अनुभवपूर्व तत्व, कलात्मक अनुभव, कलेचे प्रयोजन, प्रतिमा, आस्वाद आणि समीक्षा अशा बाबींचा परामर्श त्यांनी सखोलपणे घेतलेला आहे.
कलाव्यवहार हा स्वायत्त आहे आणि कलाव्यवहार हा सर्वसामान्य जीवनव्यवहाराचा एक अविभाज्य भाग आहे, ह्या दोन परस्परविरोधी संकल्पनाव्यूहांचा विचार पाटणकरांनी केला असून त्यांना अनुक्रमे अलौकिकतावाद आणि लौकिकतावाद अशी नावे दिलेली आहेत. दोन ध्रुवांसारखे असणारे हे संकल्पनाव्यूह परस्परविरोधी असले, तरी परपस्परपूरकही आहेत आणि बहुतेक कलांमध्ये ते निदान बीजरूपाने उपस्थित असलेले दिसतात, असे पाटणकरांचे प्रतिपादन आहे ( सौंदर्यमीमांसा , १९७४ ).
सौंदर्य व कलास्वरूप यांविषयी शरच्चंद्र मुक्तिबोधांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मते मानुषता हे तत्व मानल्याने ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण वेगळे व श्रेष्ठकनिष्ठतेचा निकष वेगळा ही आपत्ती येऊ शकत नाही. वाङ्मयीन ललितकृतीचे या दृष्टिकोणाच्या आधाराने मूल्यमापन करता येऊ शकते ( सृष्टी, सौंदर्य आणि साहित्य ).
ह्या कालखंडाच्या आरंभी लघुमासिकांच्या प्रवाह मराठीत अवतरला होता. त्या प्रवाहाचे एक अध्वर्यू अशोक शहाणे ह्यांचा ‘मराठी साहित्यावरील क्ष किरण’ हा लेख, तसेच दिलीप चित्रे ह्यांची ‘आधुनिक कवितेला सात छेद’ ही लेखमाला, हे नव्या दृष्टीकोणाने केलेले टीकालेखन आहे.
ह्या कालखंडात ग्रामीण-दलित अस्मिता जागृत झाली. ग्रामीण साहित्याची भूमिका ज्यांनी कंबीरपणे मांडली, त्यांत आनंद यादव आणि गो. मा. पवार ह्यांची नावे विशेष उल्लेखनीय होत. दलित साहित्य अवतरल्यामुळे कलेची स्वायत्तता आणि सामाजिक बांधिलकी ह्यांच्या संदर्भात जोरदारपणे विचार सुरू झाला. ह्या संदर्भात म. ना. वानखडे, म. भि. चिटणीस, बाबूराव बागूल, गंगाधर पानतावणे इत्यादींचे समीक्षात्मक लेखन महत्त्वपूर्ण ठरले.
स्वातंत्र्योत्तर काळातील समीक्षा केवळ अर्वाचीन साहित्याचा विचार करीत होती असे नाही, तर ती प्राचीन साहित्याचा आणि साहित्यशास्त्राचाही विचार करीत होती. ग. त्र्यं. देशपांडे, र. पं. कंगले ह्यांसारख्या अभ्यासकांनी हा विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे गंगाधर गाडगीळांनी संस्कृत साहित्यातील रसचर्चेला अडगळ मानल्यावर ती रसचर्चा अडगळ कशी नाही, गाडगीळांच्या विवेचनातल्या त्रुटी कोणत्या आहेत, याचे साधार विवेचन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत ( १९७२ ) या ग्रंथात केलेले आहे.
प्राचीन संस्कृत साहित्यातील रसविचार, व्यूहकल्पना इत्यादींचा सखोल विचार गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर, नरहर कुरूदंकर यांनी केला. प्राचीन साहित्याकडे एका वेगळ्या दृष्टीने रा. चिं. ढेरे, गो. म. कुलकर्णी, म. रा. जोशी, म. वा. धोंड, रा. ग. जाधव, व. दि. कुलकर्णी, ल. ग. जोग, द. भि. कुलकर्णी इत्यादींनी पाहिले. या समीक्षकांच्या लेखनाने प्राचीन साहित्याचे नवे अनुबंध रसिकांसमोर आले.
मर्ढेकरयुगात आणि १९६० नंतरही कवितेचा विचार आधिक्याने झालेला दिसतो. काव्याचे आढावे, कवींचा स्वतंत्रपणे अभ्यास, मार्क्सवादी, रूपवादी दृष्टींनी झालेला काव्य समीक्षा, कवितांची उपयोजित समीक्षा असे तिचे स्वरूप आहे. रसग्रहण – कला आणि स्वरूप ( गो. म. कुलकर्णी, आवृ. २ री, १९७३ ), अंधारयात्रा ( त्र्यं. वि. सरदेशमुख, १९६८ ), कविता फुलते कशी ? ( संपा. वा. रा. ढवळे, व. दि. कुलकर्णी, १९७५ ), दीपस्तंभ ( ल. ग. जोग, १९७१ ) इत्यादींचा या दृष्टीने उल्लेख करावयास हवा.
इतर वाड्मयप्रकारांत काही कथा व कथाकार ह्यांच्या संदर्भात विश्लेषणपर असे लेखन झाले आहे. [मरण आणि वेलबुट्टी ( म. द. हातकणंगलेकर ) आणि निळे पाणी (१९८२, रा. ग. जाधव )]. भालचंद्र नेमाडे ह्यांनी कादंबरीवर एक प्रदीर्घ लेख लिहून त्या वाड्मयप्रकारची सांगोपांग, मार्मिक चर्चा केली आहे. नरहर कुरूंदकरांचा धार आणि काठ ( १९७१ ) हा ग्रंथही मराठी कादंबरीच्या संदर्भात उल्लेखनीय होय.
आधारभूत पाश्चात्य समीक्षाग्रंथांची काही निर्देशनीय भाषांतरे विवेचने अशी : अँरिस्टॉटलचे काव्यशास्त्र ( आवृ. २ री, १९७८ गो. वि. करंदीकर ). क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य ९ १९७४ ) व कांटची सौंदर्यमीमांसा ( १९७७, रा. भा. पाटणकर ) साहित्य सिद्धान्त, स. गं. मालशे, ( रेने वेलेक आणि ऑस्टिन वॉरनलिखित थिअरी ऑफ लिटरेचरचे भाषांतर ) उपलब्ध झाले ( १९८२ ).
ही नवा समीक्षा कलेचा, तिच्या सारतत्वाचा, अंतिम उद्देशाचा, निर्मितिप्रक्रियेचा अधिक सजगपणे विचार करते आहे. वामन मल्हार जोशी, खांडेकर इ. समीक्षकांपुढे टॉलस्टॉय, कोलरिज, वर्ड्स्वर्थ, मॅथ्यू आर्नल्ड इ. आदर्श होते. आजच्या समीक्षकापुढे टी. एस्. एलियट, सार्त्र, काम्यू हे आदर्श आहेत. जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय तात्विक सौंदर्यशास्त्रीय , भाषावैज्ञानिक अशा विविध दृष्टीकोणांमुळे ही समीक्षा कलाविषयक जाणिवा विकसित करणारी ठरली आहे.
समीक्षेच्या विकासास ज्या नियतकालिकांनी विशेष साहाय्य केले त्यांचा निर्देश करणे आवश्यक आहे. विविधज्ञानविस्तार, रत्नाकर, अभिरूचि, सत्यकथा, आलोचना, प्रतिष्ठान इ. नियतकालिकांनी समीक्षाविचारास हातभार लावला. युगवाणी, प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, समाज प्रबोधन पत्रिका, अनुष्टुम, ललित इत्यादीचेही या संदर्भात कार्य उल्लेखनीय आहे. विद्यापीठांतूनही शोधप्रबंध लिहिणारी जी मंडळी बाहेर पडली, त्यांच्या लेखनानेही समीक्षाविचारात काहीएक भर घातलेली आहे. व्यामिश्र, तरल आणि अनेकार्थ व्यक्त करणाऱ्या कलाकृतींचा वेध घेताना मराठी समीक्षा अधिक लवचिक आणि स्वागतशील झालेली आहे. मानव्यविद्या, नैसर्गिक व सामाजिक विज्ञाने यांच्यातील विविध प्रमेयांचा आणि दृष्टिकोणांचा ती लीलया स्वीकार करते आहे. साहित्याने दिलेली आव्हाने नम्रपणे स्वीकारण्याचे सामर्थ्य या समीक्षेत खचितच आहे.
टापरे, पंडित
व्याकरण : मध्ययुगापासून मराठीत विपुल ग्रंथरचना झालेली असली, तरी मराठीचा भाषिक दृष्टीने अभ्यास करण्याची परंपरा नसल्याने भाषेचे नियमन आणि व्यनस्थापन करणाऱ्या व्याकरणग्रंथांची मात्र रचना झाली नाही. भीष्माचार्य या महानुभाव पंथातील कवीच्या नावावर मोडणारी ‘पंचवार्त्तिक’, ‘नामविभक्ति’, यांसारखी स्फुट प्रकरणे किंवा रामदासी संप्रदायातील गिरिधराने रचलेले छोटेसे ‘व्याकर्ण’ यांखेरीज मराठीचे व्याकरणलेखन झाले नाही.
फादर स्टीफन्सने पोर्तुगीजमध्ये मात्र एक व्याकरण लिहिले होते ( १६४० ). एकोणिसाव्या शतकात, विशेषत: मुद्रित ग्रंथांचा हळूहळू प्रसार होण्यास प्रारंभ झाल्यानंतर, ज्यांनी व्याकरणे लिहिली अशांत विल्यम कॅरे ( १८०५ ), महमद इब्राहीम मखबा ( १८२५ ), रे. स्टिव्हन्सन ( १९३३ ), जेम्स आर. बॅलेंटाइन ( १८३९ )व रे. बर्जेस ( १८५४ ) इत्यादींचा समावेश होतो.
मुंबईच्या हैंद शाळा पुस्तक मंडळीच्या सूचनेवरून जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके आणि बाळशास्त्री घगवे ह्यांनी एक हस्तलिखित व्याकरण तयार केले होते. ( १८२४ ).
पुढे गंगाधरशास्त्री फडके यांचे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण प्रसिद्ध झाले ( १८३६ ). मराठीतील हे पहिले मुद्रित व्याकरण. याच वर्षात बाळशास्त्री जांभेकर यांचे बाल व्याकरण तयार झाले. दादोबा पाडुरंग तर्खडकर यांचे मराठी भाषेचे व्याकरणही ह्याच वर्षी प्रसिद्ध झाले. संस्कृत व इंग्रजीच्या व्याकरणांचा अभ्यास करून हे लिहिले होते व त्यात मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लाविली होती. १८५० मधील दुसऱ्या आवृत्तीमध्ये दादोबांनी या व्याकरणात बरेच फेरफार केले. १८८१ मध्ये त्यानी याच व्याकरणाची एक ‘पूराणिक’ प्रकाशित केली. व्याकरणविषयक अनेक प्रश्नांची सविस्तर चर्चा करणारे आणि पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरलेले व्याकरण म्हणून दादोबांच्या व्याकरणाचे विशेष महत्त्व आहे. आपल्या याच व्याकरणाची एक छोटी आवृत्ती लघु व्याकरण या नावाने दादोबांनी १८६५ मध्ये तयार केली होती.
दादोबांच्या व्याकरणाने मराठीत व्याकरण-लेखनाची अखंड परंपरा निर्माण झाली. गंगाधर रामचंद्र टिळक ( मराठी लघु व्याकरण, १८५८ ), कृष्णशास्त्री गोडबोले ( मराठी भाषेचे नवीन व्याकरण, १८६७ ), रा. भि. गुंजीकर ( लहान मुलांकरिता सुबोध व्याकरण, १८८६ ), रा. भि. जोशी ( प्रौढबोध मराठी व्याकरण, १८८९ ), गो. ग. आगरकर (वाक्यमीमांसा ) अशी अनेक छोटी – मोठी पुस्तके तयार झाली. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी व्याकरणविषयक अनेक मूलभूत प्रश्नांचा उहापोह करणारे लेख .. शालापत्रक मासिकात लिहिले, ते १८९३ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
विसाव्या शतकाला प्रारंभ झाल्यानंतर १९११ मध्ये मोरो केशव दामले यांनी लिहिलेला शास्त्रीय मराठी व्याकरण … हा मराठी व्याकरणात मेरूमण्याप्रमाणे शोभणारा ग्रंथराज प्रकाशित झाला. पूर्वसूरीच्या प्रतिपादनाचा चिकित्सक परामर्श घेऊन मराठी व्याकरणातील विविध मतमतांरांची सांगोपांग चर्चा करणारा प्रौढ ग्रंथ म्हणून दामल्यांच्या व्याकरणाचे स्थान अनन्यसाधारण आहे.
म. पां. सबनीस कृत मराठी उच्चतर व्याकरण ( १९५१ ) या ग्रंथात दामल्यांच्या अनेक मतांचे आग्रहपूर्वक खंडन करण्याचा प्रयत्न आहे. अरविंद मंगरूळकरांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार, ( १९६४ ) या आपल्या पुस्तकात मराठीचे व्याकरण केवळ मराठीच्याच स्वभावानुरूप सिद्ध केले पाहिजे, या विचाराचा अभ्यासपूर्वक पाठपुरावा केलेला आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नवीन भाषाशास्त्राचा उद्य होऊन त्यातील विचारप्रणालीच्या आधाराने मराठी भाषा व तिच्या पोटभाषा यांचे अध्ययन होऊ लागले. त्यातूनच कृ. पां. कुलकर्णी यांचे मराठी भाषा : उद्गम व विकास ( १९३३ ), डॉ. गं. ब. ग्रामोपाध्येलिखित पेशवे दप्तरांतील मराठी भाषेचे स्वरूप ( १९४१ ), डॉ. शं. गो. तुळपुळेकृत यादवकालीन मराठी भाषा ( १९४२ , सुधारित दुसरी आवृ. १९७३ ), डॉ. वि. बा. प्रभुदेसाईकृत सतराव्या शतकातील गोमंतकी बोली ( १९६३ ), डॉ. व. कृ. वर्हाडपांडेकृत नागपुरी बोली … ( १९७२ ) असे अनेक उल्लेखनीय ग्रंथ निर्माण झाले. नव्या व्याकरणिक दृष्टिकोणाचा मागोवा घेऊन मराठी व्याकरणाची नव्या शास्त्रीय आणि स्वतंत्र पायावर उभारणी करण्याचे प्रयत्न आता नेटाने चालू आहे
कानडे, मु. श्री.
संशोधनपर साहित्य : मराठी वाङ्मयाच्या संशोधनकार्याचा खरा आरंभ एकोणिसाव्या शतकात झाला. मुद्रणकलेच्या आगमनामुळे तोपर्यत हस्तलिखित असलेले साहित्य मुद्रणबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले. एल्फिन्स्टन, मालकम ह्यांसारख्या इंग्रज राज्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या कामाला उत्तेजन दिले. डॉ. विल्सनसारख्या धर्मोपदेशकांनी संशोधनक्षेत्रात महत्त्वाची भर घातली. अज्ञानामुळे किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे त्यांच्या संशोधनात काही अपसिद्धान्त येऊ लागले. ते खोडून काढण्यासाठी आपणाकडे इतिहास, भाषा, वाङ्मय इत्यादींच्या संशोधनाला विशेष चालना मिळाली.
प्राचीन काळी महानुभाव पंडित म्हाइंभट ह्यांनी महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर ह्यांच्या आठवणी किंवा लोळा संकलित करण्याच्या दृष्टीने केलेले संशोधन वैशिष्ट्यपूर्ण आहे. महानुभवांचे तत्त्वज्ञान व आचारधर्म सांगणाऱ्या सूत्रांचे केशवराज सूरी ह्यांनी केलेले संकलनही प्राचीन संशोधनाचे एक उदाहरण. सोळाव्या शतकात संत एकनाथांनी ज्ञानोश्वरीची तयार केलेली पाठशुद्ध प्रतसुद्धा ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरते.
जुनी हस्तलिखिते मिळवून प्राचीन मराठी वाङ्मय करण्याचे जे प्रयत्न एकोणिसाव्या शतकात झाले, त्यांत परशुरामपंतातात्या गोडबोलो ह्यांनी काढलेले नवनीत ( १८५४ ) हे विशेष लक्षणीय. प्राचीन संत व पंडित कवींच्या निवडक वेच्यांचा हा संग्रह त्या कवींची ओळख करून देण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर माधव चंद्रोबा डुकले यांनी सर्वसंग्रह मासिक काढले ( १८६० ). विविध कवींच्या ग्रंथांचा संग्रह प्रसिद्ध करणे हे ह्या मासिकाचे धोरण होते.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेने ( १८७४ ) इतिहास व वाङ्मय ह्यांच्या संशोधनात चालना दिली. त्यांच्या ‘इतिहास’ हा निबंध वाचून प्रसिद्ध इतिहाससंशोधक वि. का. राजवाडे यांना व इतर अनेकांना संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. काव्येतिहास संग्रहाचे ( १८७८ ) संपादन जनार्दन बाळाजी मोडक व काशिनाथ नारायण साने यांनी केले असले, तरी त्यामागील प्रेरणा विष्णुशास्त्री यांची होती.
अप्रसिद्ध संस्कृत – मराठी काव्ये व महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे काव्येतिहाससंग्रहातून प्रसिद्ध करावी, असे ठरले. आरंभीच्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकरही त्याच्या संपादनात होते. का. ना. साने यांनी चित्रगुप्तविरचित शिवाजी महाराजांची बखर, भाऊ – साहेबांची बखर, पाणिपतची बखर, पेशव्यांची बखर, ह्यांसारख्या बखरींचे संपादन केले. निरनिराळी हस्तलिखिते मिळविणे, त्यांवरून पाठशुद्ध प्रत तयार करणे, निरनिराळ्या पाठभेदांची चिकित्सा करणे, बखरींचा कालनिर्णय करणे इ. अनेक गोष्टींमुळे संशोधनक्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे ठरले आहे.
शाहिरी वाङ्मयाच्या संशोधनाला सुरूवात ह्या काळाच्या सुमारासच झाली होती. विविधज्ञानविस्ताराने १८७२ साली प्रथम नारायणरावाच्या वधाचा पोवाडा ( पहिला ) छापून काढला. त्यानंतर निबंध माला व काव्येतिहाससंग्रह यांतूनही पोवाडे प्रसिद्ध झाले. त्यांपासून स्फूर्ती घेऊन शाहिरी वाङ्मयाच्या संशोधनाचे कार्य शं. तु. शाळिग्राम यांनी हाती घेतले. गोंधळ्यांकडून पोवाडे मिळवून त्यांतील काही निवडक, पुस्तकरूपाने त्यांनी १८७९ साली प्रसिद्ध केले ( थोर पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे – पूर्वार्ध ). त्यांना नंतर जोड मिळाली ऑक्कर्थ या इंग्रज विद्वानाची. या दोघांनी मिळून पोवाड्यांच्या संशोधनाचे कार्य केले. १८९१ साली त्या दोघांच्या नावे पोवाड्यांचा एक नवीन संग्रह निघाला ( इतिहासप्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे ). त्यानंतर गोविंद बल्लाळ शितूत ह्यांनीही जुन्या इतिहासाची विश्वसनीय साधने मिळविण्याच्या दृष्टीने पोवाड्यांचा संग्रह सुरू केला. शाळिग्रामांनी रामजोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, परशराम यांच्या लावण्या- पोवाड्यांचे संग्रहही यथावकाश प्रसिद्ध केले. हे प्रयत्न प्रशंसनीय होते पण तितकेसे व्यवस्थीत नव्हते. शाळिग्रामांच्या संग्रहात संपादनाच्या, मोडी वाचनाच्या, गोंधळ्यांच्या तोंडून पोवाडा ऐकताना उतरून घेण्याच्या, अशा अनेक चुका आहेत पण त्यांनी या बाबतीत घेतलेले परिश्रम मात्र मोलाचे आहेत.
जनार्दन बाळाजी मोडक यांनी काव्यसंग्रह हे मासिक १८९० मध्ये काढले. पुढे वामन दाजी ओक हे ह्या मासिकाचे संपादक झाले. त्यातून प्राचीन कवींच्या पुष्कळच कविता त्यांनी प्रसिद्ध केल्या. वामनपंडितांची यथार्थदीपिका, मुक्तेश्वराच्या महाभारताची काही पर्वे, मोरोपंतांची कविता, विविध कवींची स्फुट पद्यरूप कविता, विठ्ठल कवीची कविता इ. कितीतरी प्राचीन कविता त्यांनी प्रसिद्ध तर केलीच पण हे करीत असताना विवेचक प्रस्तावना लिहून, तळटीपांमध्ये निरनिराळे पाठ देऊन त्यांनी प्राचीन कवितेचे पाठशुद्ध व यथार्थ दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा होता. हा आणि अशा प्रकारचे अन्य प्रयत्न महत्त्वाचे होतेच परंतु त्यांत संशोधनापेक्षा संकलनच अधिक होते. प्राचीन काव्याची हस्तलिखिते मिळवून ती प्रकाशित करणे, त्यांवर चरित्रविषयक व अर्थनिर्णायक टीपा देणे, क्वचित पाठभेद हेच कार्य या काळात अधिक झाले.
वि. का. राजवाडे ‘इतिहासाचार्य’ म्हणून ओळखले जातात व त्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने त्यांनी २२ खंड प्रसिद्ध केले आणि त्यांतील काहींना त्यांनी विस्तृत व चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या. या संदर्भातच त्यांनी ऐतिहासिक मूल्य या दृष्टीने बखरींचे मूल्यमापन केले व त्यातून स्थल, काल, व्यक्ती, प्रसंग व कारणविपर्यास हे पंचविध विपर्यास कसे दिसून येतात, ते सप्रमाण सिद्ध केले.आपली चिकित्सक दृष्टी त्यांनी साहित्याकडेही वळविली. त्या दृष्टीने एकनाथपूर्वकालीन ज्ञानेश्वरीचे संशोधन व संपादन ( १९०९ ) हे त्यांचे महत्त्वाचे कार्य. राजवाडे ह्यांच्या हाती आलेल्या ज्ञानेश्वरीच्या पोथीतील भाषेचे स्वरूप, शब्दसंहिता व व्याकरण या सर्वाच्या आधारे, ही पोथी एकनाथपूर्वकालीन असून प्राचीनतेच्या दृष्टीने ज्ञानेश्वरकाळाच्या ती अधिकात अधिक जवळ असावी, असा सिद्धांत त्यांनी प्रस्थापित केला. त्यांच्या संशोधित ज्ञानेश्वरीची ( ज्ञानदेवीची ) प्रत भाषेच्या दृष्टीने आजही प्रमाण मानली जाते. याशिवाय राधामाधवविलासचंपू व महिकावतीची बखर यांचे संपादन ( १९२२ , १९२४ ) व त्यांना लिहिलेल्या चिकित्सा प्रस्तावना त्यांच्या संशोधनदृष्टीची साक्ष देतात. १९१० मध्ये महानुभवांची संकेत लिपी स्वतंत्रपणे उलगडून महानुभाव वाङ्मयाचे दालन त्यांनी संशोधनासाठी खुले केले.
महानुभाव पंथ व त्यांचे वाङ्मय यांबद्दलची माहिती मिळवून ती प्रकाशित करणे, संकेत लिपीमध्ये असलेल्या ग्रंथांचे रूपांतर करून ती प्रसिद्ध करणे या कार्याला जोमाने सुरूवात झाली. वि. ल. भावे यांनी महाराष्ट्र सारस्वताच्या दुसऱ्या आवृत्तीत महानुभाव पंथ –साहित्याचा परिचय करून दिला. याच आवृत्तीत त्यांनी महानुभाव पंथाच्या सकळी, सुंदरी व पारमांडिल्य यांसारख्या लिपींचा उलगडाही करून दाखविला. १९२४ मध्ये त्यांनी महानुभव – महाराष्ट्र – ग्रंथावली, कविकाव्य सूची व वच्छहरण ही प्रकरणे संपादून प्रसिद्ध केली. शिशुपालवध हे भास्करभट्ट बोरीकरांचे, वि, ल, भावे ह्यांनी संपादिलेले काव्य १९२६ मध्ये प्रसिद्ध झाले. या सर्व कार्यात त्यांना दत्तराज महंत आणि हरिराज बाबा महंत या महानुभावीय महंतांचे खूपच साहाय्य झाले. वि. ल. भावे यांचे महाराष्ट्रात हे कार्य चालू असताना विदर्भात य. खु. देशपांडे यांचेही या संशोधनाकडे लक्ष वळले होते. महानुभावीयमराठी वाङ्मय ( १९२५ ) हा महानुभवांच्या वाङ्मयाचा इतिहास देणारा संशोधनपर ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. तसेच त्यांनी यवतमाळ येथे ‘शारदाश्रम’ नावाची स्वतंत्र संशोधनसंस्था स्थापन केली ( १९२६ ). त्या संस्थेतर्फे त्यांनी पंडित नारायण व्यास बहाळियेकृत श्रीऋद्विपूरवर्णन हा महानुभवांचा काव्यग्रंथ प्रकाशित केला ( १९२९ ). १९३६ मध्ये श्रीचक्रपाणीचरित्र या नावाचा महानुभाव गद्यग्रंथ शारदाश्रम मालेत त्यांनी प्रकाशित केला. याशिवाय महानुभाव वाङ्मयावर त्यांनी अनेक स्फुट लेख लिहिले. य. खु. देशपांडे यांच्याबरोबरच शारदाश्रमाचे दुसरे आधारस्तंभ वामन नारायण देशपांडे यांनी आद्य मराठी कवयित्री हे महदंबेवरील पुस्तक प्रसिद्ध केले ( १९३५ ). याशिवाय स्मृतिस्थळ हा महानुभाव चरित्रग्रंथही संपादिला ( १९३९ ). नागपूर आणि अमरावती येथेही संशोधनकेंद्रे स्थापन झाली होती. नागपूरचे संशोधक हरि नारायण नेने ह्यांनी नीलकंठ बलवंत भवाळकर ह्यांच्या साहाय्याने श्रीचक्रधर – सिद्धांतसूत्रे
भाग पहिला – लक्ष्मणान्वय सूत्रपाठ ( १९३१ ), दृष्टांत – पाठ ( १९३७ ) हे ग्रंथ प्रकाशित केले. यांशिवाय ह. ना. नेने ह्यांनी लीळाचरित्राचे संपादन केले. ह्या उल्लेखनीय संपादनांखेरीज महानुभाव वाङ्मयावर संशोधनरप स्फुट लेखनही त्यांनी पुष्कळच केले.
महानुभाव वाङ्मयाच्या संशोधनात सर्वात मोठा वाटा आहे ⇨ विष्णु भिकाजी कोलते यांचा. भास्करभट्ट बोरीकर चरित्र व काव्यविवेचन ( १९३५ ), महानुभाव तत्त्वज्ञान ( १९४५ ) महानुभावांचा आचारधर्म ( १९४८ ), श्रीचक्रधरचरित्र ( १९५२ ) व महानुभाव संशोधन ( १९६२ ) हे त्यांचे ग्रंथ व्यासंगपूर्व आणि चिकित्सक संशोधनदृष्टीची साक्ष देणारे आहेत. भास्करभट्ट बोरीकरकृत उद्धवगीता ( १९३५ ) आणि शिशुपालवध ( १९६० ), मुनीव्यासकृत स्थानपोथी ( १९५० ), म्हाइंभटकृत गोविंदप्रभुचरित्र ( १९४४ ), आणि रवळो व्यासाचे सह्याद्रिवर्णन ( १९६४ ) हे त्यांनी संपादित केलेले काही महानुभाव ग्रंथ होत. ग्रंथांना जोडलेल्या प्रस्तावनांतून त्या त्या कवीच्या कालाचा, चरित्राचा, भाषाशैलीचा व त्या काव्यातील वादग्रस्त प्रश्नांचा अत्यंत विद्वत्तापूर्ण रीतीने ऊहापोह केला आहे. अगदी अलीकडेच त्यांनी लीळाचरित्राची हा महानुभावांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ अनेक पोथ्या व हस्तलिखिते यांचा आधार घेऊन संपादिला आहे ( १९८२ ). लीळाचरित्राची ही पाठशुद्ध संशोधित आवृत्ती हा त्यांचा संशोधनकार्याचा कळस मानावा लागेल.
यांशिवाय महानुभाव पंथाच्या संशोधनात अनेक विद्वानांनी रस घेतला. डॉ. सुरेश डोळके यांनी नरेंद्राच्या रूक्मिणी- स्वयंवराची संपूर्ण प्रत उपलब्ध करून देऊन एक वादळ निर्माण केले ( १९७१ ). डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी लीळाचरित्राचे साक्षेपपूर्वक संपादन केले व महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय हा ग्रंथही लिहिला ( १९७६ ). याशिवाय दत्तराज महंत, गोपीराज महंत, यक्षदेव महंत इ. अनेक महानुभाव पंथीय महंतांनी महानुभाव वाङ्मयाच्या संशोधनाला प्रत्याक्षा – प्रत्यक्ष साहाय्य केले.
ग्रंथसंशोधनाला अधिक शास्त्रशुद्ध स्वरूप विसाव्या शतकात विशेष प्रापत झाले. जुन्यातील जुनी हस्तलिखिते व पोथ्या मिळवून त्या हस्तलिखितांच्या आधारे पाठशुद्ध प्रत तयार करण्याचे संशोधनशास्त्र अवगत झाल्यामुळे अनेक विद्वानांनी अशा जुन्या काव्याच्या पाठशुद्ध प्रती संपादित करून प्रसिद्ध केल्या. या क्षेत्रात संस्कृत ग्रंथांचे अशा पद्धतीने संपादन करण्याचे कार्य भांडारकर प्राच्यविद्यासंशोधनमंदिर, डेक्कन कॉलेज या संस्थामधून चाललेच होते. मराठी संशोधन – क्षेत्रातही भारत इतिहाससंशोधक मंडळ ( पुणे ), राजवाडे संशोधन मंदिर ( धुळे ), शारदाश्रम ( यवतमाळ ), विदर्भ संशोधन मंडळ, ( नागपूर ) समर्थ वाग्देवता मंदिर ( धुळे ), मराठी संशोधन मंडळ ( मुंबई ) इ. संस्थांनी प्राचीन हस्तलिखित मिळवून त्यांची वर्गवारी लावणे, त्यांची जोपासना करणे, त्या हस्तलिखितांच्या आधारे अनेक पाठभेद विचारात घेऊन त्यांची पाठशुद्ध प्रत तयार करणे व ती प्रसिद्ध करणे असे मोलाचे काम केले आहे. या कार्याला नंतर महाराष्ट्रातील वेगवेगळी विद्यापीठे व साहित्यसंस्था यांनीही हातभार लावला. यांशिवाय व्यक्तिगत प्रयत्न चालले होते ते वेगळेच.
महानुभावीय वाङ्मयाची जुन्यात जुनी हस्तलिखिते मिळणे शक्य होते. कारण ती पंथीयांनी संकेतलिपीत बद्ध करून जतन केली होती. जुन्या संतकवींच्या बाबतींत हे शक्य नव्हते. त्यांच्या ग्रंथांची अथवा अभंगांच्या गाथांची भाषादृष्ट्या व अनेकदा आशयदृष्ट्या स्थित्यंतरे होत होती. त्यामुळे ज्ञानेश्वर- नामदेवकालीन हस्तलिखिते उपलब्ध होणे कठीण झाले. सोळाव्या शतकानंतरची हस्तलिखिते उपलब्ध होतात. तत्पूर्वींची हस्तलिखित दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे या काळातील संशोधकांना प्राचीन वाङ्मय प्रकाशित करण्याच्या बाबतीत अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. प्राचीन कवींच्या जन्मस्थळांबद्दल आणि जन्मशकांबद्दल अनेक वाद निर्माण झाले व त्याची निर्णायक उत्तरे देणेही पण अवघड होऊन बसले. उपलब्ध होणारी सर्व हस्तलिखिते जमवावयाची, त्यांतून जुन्यात जुनी संहिता निश्चित करावयाची, इतर हस्तलिखितांच्या आधारे पाठभेद निश्चित करावयाचे, हेच एक कार्य या संशोधकांपुढे मुख्य होते. या कार्यात महत्त्वाचा वाटा अनेकांनी उचलला. कृ. पां. कुलकर्णी यांनी मुकुंदराजाचा विवेकसिंधु हा ग्रंथ संपादित केला ( १९५७) आणि मुकुंदराजाच्या स्थलकाबद्दल चर्चाकेली. याशिवाय बंकटस्वामी, साखरेबुवा, बाळकृष्ण अनंत भिडे, शं. वा. दांडेकर, केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये अशा अनेकांनी ज्ञानेश्वरीची संहिता मिळवून पाठशुद्ध प्रत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांत शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीपेक्षा पारंपारिक – सांप्रदायिक दृष्टीच अधिक दिसून येते. १९४७ मध्ये रा. ग. हर्षे संपादित ज्ञानेदेवीच्या चिकित्सक आणि भाषाशास्त्रीय आवृत्तीचा पहिला अध्याय प्रसिद्ध झाला. त्यानंतर श्री. ना. बनहट्टी ह्यांनी अनेक हस्तलिखितांच्या साहाय्याने ज्ञानदेवीची पाठशुद्ध संहिता निष्पन्न करण्याचे कार्य आरंभिले. विविध हस्तलिखित पोथ्या मिळवून व त्यांचे नीट अवलोकन करून त्यांनी प्रथम बारावा अध्याय १९६७ साली प्रकाशित केला त्याला प्रदीर्घ प्रस्तावनेची जोड दिली. त्यानंतर आणखी एकदोन अध्याय झाले पण त्यांच्या मृत्यूमुळे ते काम बंद पडले. ज्ञानदेवीच्या मूळ संहितेच्या शोधप्रयत्नात तिची ओवीसंख्या चर्चाविषय झाला. ज्ञानेश्वरीची ओवीसंख्या ( १९५६ ) या ग्रथांत वि. मो. केळकर यांनी संदर्भ, अर्थ, रचना व भाषा या निकषांवर विवाद्य ओळ्यांबाबत निर्णय ओवीसंख्या निश्चित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी व अरविंद मंगरूळकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या काही अध्यायांत संशोधनाची एक नवी दृष्टी दिसते. द. सी. पंगू यांच्या संपादनात शास्त्रशुद्ध दृष्टी बऱ्याच प्रमाणात आढळते. ज्ञानेश्वरीचे सुटे अध्याय पुष्कळांनी संपादित केले, पण त्यांत संशोधनाची दृष्टी फार थोड्या प्रमाणात दिसून येते.
संतांच्या अभंगगाथा सिद्ध करणे हाही संशोधनक्षेत्रातील एक उपक्रम. ह्यात प्रक्षिप्त अभंग विपुल येत असल्याने प्रमाणगाथा सिद्ध करणे कठीण. तथापि असे प्रयत्न साखरे महाराज, वि. न. जोग. प्र. न. जोशी आदींनी केले. त्यात पुन्हा संशोधनापेक्षा सांप्रदायिक दृष्टीच अधिक आली. वि. ल. भावे यांनी ‘तुकाराम महाराजांची अस्सल गाथा’ म्हणून त्यांना मिळालेल्या जगनाडे या टाळकऱ्याच्या हस्तलिखितावरून तुकाराममांच्या काही अभंगांचे प्रकाशन केले पण ते फारसे मान्य झाले नाही. त्यानंतर तुकारामांची गाथा संशोधित करण्याचे बरेच कार्य पु. मं. लाड यांनी केले. महाराष्ट्र सरकारने ही गाथा प्रसिद्ध केली ( १९५० ). ⇨ वा. सी. बेंद्रे यांनी तुकाराम महाराज कृत …मंत्रगीता १९५० साली प्रकाशित करून तुकारामांचा गीतेचा व्यासंग किती होता याबद्दल आपला सिद्धांत मांडला.
सोळाव्या शतकानंतरची हस्तलिखिते उपलब्ध असल्याने त्यानंतरच्या पंडितकवींच्या किंवा संतकवींच्या काव्याच्या संपादनाच्या वा प्रकाशनाच्या कामी फारशा अडचणी नव्हत्या परंतु या काळातील एकेका ग्रंथांची अनेक हस्तलिखिते उपलब्ध होत असल्याने याही काव्याच्या बाबतींत संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यात ⇨ अनंत काकबा प्रियोळकर यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी रघुनाथ पंडिताचे दमयंतीस्वयंवर ( १९३५ ) व मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व यांचे संपादन केले ( खंड १ ते ४ १९५१ , १९५३, १९५६ आणि १९५९ ). ⇨ ल. रा. पांगारकर यांनी मोरोपंती वेचे ( १९०५ ) प्रसिद्ध केले. तसेच श्रीसमर्थ ग्रंथमांडार ( १९२७ ) आणि समर्थाचा श्रीदासबोध संपादिला ( १९३१ ). रामदासांच्या ग्रंथांच्या संपादनात महत्त्वाचा हातभार लावला ⇨ शं. श्री. देव यांनी. धुळ्यांला श्रीसमर्थ वाग्देवतामंदिराची स्थापना करून त्यांनी समर्थाच्या ग्रंथांची, समर्थ संप्रदायातील कवींची व इतरही अनेक कवींची हस्तलिखिते मोठ्या काळजीने जपून ठेवली व मोठ्या साक्षेपाने त्यांनी समर्थ रामदासांचे साहित्य संपादित करून प्रसिद्ध केले. शाहिरी वाङ्मयाच्या संशोधनालाही एक नवी अशी प्रेरणा मिळाली. यशवंत नरसिंह केळकर यांनी ऐतिहासिक पोवाड्यांचे खंड संपादित केले ( १९२८ , १९४४, १९६९ ). ते करताना शाळिग्राम किंवा इतर संशोधक यांच्या संपादनात पाठभेदामुळे न मोडी लिपीच्या सदोष वाचनामुळे जे दोष राहिले होते, ते त्यांनी दुरुस्त केले. अनुपलब्ध लावण्या मिळवून अंधारातील लावण्या (१९६५ ) या नावाने त्यांनी अनेक शाहीरांच्या प्रकाशात न आलेल्या लावण्या संपादित करून प्रसिद्ध केल्या. याशिवाय ख्रिस्ती साहित्याच्या संशोधनाचे कार्य अ. का. प्रियोळकर ( सांतु आंतोनीची जीवित्वकथा, १९५४, दौत्रिन क्रिस्तां – १९६५ ), स. गं. मालशे ( क्रिस्तपुराणा वरील प्रबंध ) , वि. बा. प्रभुदेसाई ( सतराव्या शतकांतील गोमंतकी बोली, १९६३ ) यांनी मोठ्या साक्षेपाने केले.
संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रबंधात्मक लेखनही पुष्कळ झाले. पण त्यातील पुष्कळसे समीक्षाणात्मक होते. काही आढाव्याच्या व वाङ्मयेतिहासाच्या स्वरूपाचे होते, तर काही विशिष्ट वाङ्मयीन प्रवृत्तींचा व प्रवाहांचा शोध घेणारे होते. मराठी वाङ्मयेतिहास लिहिण्याच्या प्रयत्नांत संशोधनापेक्षा संकलनाचा व रसग्रहणाचा भाग अधिक होता. तत्कालीन जीवनाच्या व साहित्याच्या परस्परसंबंधांतून वाड्मयाच्या अन्त:प्रवाहाचा शोध लावण्याचा प्रयत्न फार थोड्यांनी केला. किंबहुना असा प्रयत्न झालाच नाही, असे विधान केले तर फारसे चुकणार नाही. वाङ्मयेतिहासाच्या प्रयत्नात महाराष्ट्र सारस्वतकार ⇨ वि. ल. भावे यांचे नाव सर्वप्रथम येते. प्रतिकूल परिस्थितीत आणि साधनसामग्री फारशी उपलब्ध नसताना त्यांनी वाङ्मयेतिहास लिहिण्याचा केलेला प्रयत्न नि:संशय कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र सारस्वतमध्ये १८१८ पर्यंतचा मराठी वाङ्मयाचा इतिहास आला आहे. ल. रा. पांगारकर यांनी मराठी वाडंमयाच्या इतिहासाचे तीन खंड लिहिले पण त्यांच्या लेखनात कोणतीही शास्त्रीय पद्धती नव्हती. त्यांना आवडलेल्या कवींच्या कार्याचाच त्यांत प्रामुख्याने परामर्श आढळेल. त्यामुळे पहिला खंड ‘ज्ञानेश्वर-नामदेवां’चा दुसरा एकनाथ-तुकारामांचा व तिसरा ‘रामदासां’चा अशीच फक्त विभागणी झाली आहे. या कवीव्यतिरिक्त इतर कवींची फारच त्रोटक माहिती त्यांत आहे आणि रामदासांच्या पुढे ते गेलेच नाहीत. मूल्यमापनापेक्षा रसग्रहणाची दृष्टीच या वाङ्मयेतिहासात त्यांनी अवलंबिली आहे. त्यानंतर प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचे जे जे प्रयत्न झाले ते सामान्यत: अपुरे तरी राहिले किंवा विशिष्ट काळापुरते वा प्रवाहापुरते मर्यादित राहिले. बाळकृष्ण अनंत भिडे यांचा प्रयत्न असाच अपुरा राहिला. शाहिरी वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न श्री. म. वर्दे यांनी केला ( मराठी कवितेचा उप:काल किंवा मराठी शाहीर ). त्यानंतर शाहिरी वाङ्मयावर य. न. केळकर, म. ना. सहस्त्रबुद्धे ( मराठी शाहिरी षाड्मय, १९६१ ), वि. कृ. जोशी ( लोकनाट्याची परंपरा, १९६१ ) यांनीही लिहिले. संशोधनाचा भाग काही प्रमाणात तिघांच्याही ग्रंथांतून दिसत असला, तरी विवेचन रसग्रहणात्मक अधिक आहे. प्राचीन मराठी साहित्यातील एकेका कवीवर व त्याच्या काव्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. ते सारेच संशोधनात्मक नव्हते. त्या त्या कवीच्या काव्याचा परिचय व त्याच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन असेच या ग्रंथांचे स्वरूप असे. तो कवी संतकवी असेल, तर त्याच्या काव्यातील तत्त्वज्ञानमीमांसा व चिकित्सा अशा ग्रंथांतून येई. ल. रा. पांगारकर, ⇨ ज. र. आजगावकर, न. र.फाटक, शं. दा. पेंडसे ह्यांसारख्या अनेकांची नावे या संदर्भात घेता येतील. संतकवी किंवा पंडित कवी यांच्या चरित्रांचे संशोधन करताना अनेक वादही निर्माण झाले. मुकुंदराजांचा काल व त्यांचे समाधिस्थळ, ज्ञानेश्वर एक की दोन, नामदेवांचे व वामनपंडितांचे अनेकत्व, मुक्तेश्वराचा शोध, दमयंतीस्वयंवराचा कर्ता रघुनाथपंडित कोणता, असे अनेक प्रश्न संतकवींच्या व पंडित कवींच्या चरित्रांच्या संदर्भात निर्माण झाले.
अव्वल इंग्रजी काळापासून वाङ्मयाच्या प्रवृत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्नही अनेक संशोधकांनी व समीक्षकांनी केला. चिपळूणकरपूर्वकालीन वाङ्मयाच्या प्रवृत्ती सांगण्याचे कार्य ⇨ दत्तो वामन पोतदार व ⇨ गं. बा. सरदार यांनी अनुक्रमे मराठी गद्याचा इंग्रजी अवतार ( १९२२ ) व अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका …( १९३७ ) या पुस्तकांतून केले. इंदूरचे वि. सी. सरवटे यांचा मराठी साहित्य समालोचन …( ४ खंड १९३७ – ७१ ) हा ग्रंथ परिचयात्मक म्हणून उल्लेखनीय आहे. यांशिवाय आधुनिक मराठी काव्याचा आढावा घेऊन त्यातील प्रवृत्ती व प्रेरणा शोधण्याचे कार्य रा. श्री. जोग ( अर्वाचीन मराठी काव्य : केशवसुत आणि नंतर – १९४६ ) व भ. श्री. पंडित ( आधुनिक कवितेचे प्रणेते – १९७५ ) यांनी केले. मराठी कादंबरीचा चिकित्सक आढावा कुसुमावती देशपांडे यांनी घेतला ( मराठी कादंबरी : पहिले शतक, २ भाग, १९५३ १९५४ ). नरहर कुरुंदकर यांचेही या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. ( धार आणि काठ ). वाड्मयप्रकारांचा असा समालोचनात्मक परामर्श अनेक विद्वान साहित्यिकांनी घेतला. या सर्व प्रयत्नांत संशोधनापेक्षा समालोचन व समीक्षणच अधिक होते. त्यात मूल्यमापनाचाही प्रयत्न होता. प्राचीन आणि अर्वाचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप स्पष्ट करण्याचे आणि त्याचे यथार्थ मूल्यमापन करण्याचे वाङ्मयसंशोधकांचे प्रयत्न निश्चित मोलाचे आहेत. श्री. ना. बनहट्टी, वि. पां. दांडेकर, र. वि. हेरवाडकर, शं. गो. तुळपुळे, गं. दे. खानोलकर, अ. म. जोशी, वा. ल. कुळकर्णी, ल. ग. जोग, व. दि. कुलकर्णी इ. अनेक विद्वानांची नावे या संदर्भात विशेषत्वाने घेण्यासारखी आहेत. त्यांचे संशोधन समालोचनाच्या व समीक्षणाच्या पातळीवरील होते. मराठी साहित्यातील प्रेरणा व प्रवृत्ती यांचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्या मर्यादेत त्यांची कामगिरी उल्लेखनीय वाटते.
स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा, शिवाजी व एस्. एन्. डी. टी. या सर्वच विद्यापीठांतून संशोधनकार्याला चालना मिळाली. पीएच्. डी. पदवीच्या निमित्ताने वेगवेगळ्या दिशेने संशोधन होऊ लागले. याशिवाय अनेक विद्वानांनी संशोधनाकडे आपली दृष्टी वळविली. या संशोधनाचे क्षेत्र केवळ पाठचिकित्सा करून संशोधित आवृत्ती काढण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही. संशोधनाला वेगवेगळे फाटे फुटले. मराठीत प्रगत होत चाललेल्या समीक्षशास्त्राच्या साहाय्याने मराठी साहित्याचा वेगवेगळ्या अंगांनी शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि केवळ साहित्यापुरतेच हे क्षेत्र मर्यादित राहिले नाही. देव –देवता, लोकसाहित्य, महाराष्ट्रीतील वेगवेगळे संप्रदाय आणि त्यामधील तत्वप्रणाली, मराठीतील शिलालेख अशा अनेक विषयांकडे संशोधकांचे लक्ष वळले. पीएच्. डी. च्या निमित्ताने प्रबंधलेखनाला शिस्त येण्यासाठी त्याची मार्गदर्शक तत्वे चर्चलि गेली ( स. गं. मालशे, शोधनिबंधाची लेखनपद्धती ९ १९७५ ), दु. का. संत. संशोधन : पद्धती, प्रक्रिया, अतरंग ( १९६६ ) व शोध विज्ञान कोश.
रा. चिं. ढेरे हे मराठीतील संशोधनाच्या संदर्भातील महत्त्त्वपूर्ण नाव. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासापासून ते लोकसाहित्यापर्यत सर्व क्षेत्रांत त्याची शोधप्रतिमा सहजतेने विहार करते आणि त्यातून नवे नवे पैलू शोधण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या पातळ्यांवरून त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या बहुश्रुततेची, त्यांच्या चिकित्सक दृष्टीची साक्ष पटविते. संपादन हे त्याचे एक अंग. प्राचीन मराठी साहित्यकृतीची विपुल संपादने त्यांनी केली आहेत. श्रीकृष्णचरित्र ( १९७३ ), महिकावतीची बखर ( १९७३ ), नरेंद्राचे रूक्मिणीस्वयंवर ( १९६५ ), शिवदिग्विजय ( १९७५ ), समुद्रास्वयंवर ( १९६७ ), मुरारिमल्लाची बालक्रीडा ( १९७७ ) ही त्यांतील काही प्रमुख. ही संपादने विविध वाङ्मयप्रकारांतील आहेत व विवेचक प्रस्तावना, प्रमाणसंहिता व स्पष्टीकरणात्मक टीपा यांनी ती संपन्न आहेत. विविधा ( १९६७ ), गंगाजली ( १९७२ ), शोधशिल्प ( १९७७ ) यांतून त्यांचे अनेक स्फुट शोधनिबंध आले आहेत. या शोधनिबंधांतील प्रत्येक निबंध काही तरी नवा दृष्टी देणारा आहे. त्यांच्या काही ग्रंथांतून संतचरित्रांचा वेध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांतूनही काही तरी नवी दृष्टी ते देतात. त्यामुळे हे चरित्रग्रंथ केवळ परिचयात्मक राहात नाहीत. मराठी वाङ्मयाला प्रेरक ठरणाऱ्या व महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण करणाऱ्या वेगवेगळ्या संप्रदायांचा अर्थपूर्ण अभ्यास हाही त्यांच्या संशोधनाचा एक विषय आहे… नाथसंप्रदायाचा इतिहास ( १९५९ ), दत्त संप्रदायाचा इतिहास ( १९६४ ) प्राचीन मराठीच्या नवधारा ( १९७२ ), चक्रपाणी ( १९७७ ), श्री विठ्ठल : एक महासमन्वय ( १९८४ ) हे त्यांपैकी महत्त्वाचे ग्रंथ. त्यांतील चक्रपाणी हा त्यांच्या अभ्यासाचा व संशोधनपद्धतीचा उत्तम नमुना आहे. षट्स्थळ या विसोबा खेचरांच्या नवीन उपलब्ध ग्रंथातील गुरूपरंपरेचे निमित्त करून त्यांनी चक्रधरांच्या जीवनावर एक नवा प्रकाशझोत टाकला आहे. चक्रधर – चांगदेव राऊळ व हरिनाथ यांचे एकत्व प्रतिपादताना व षट्स्थळामधील गुरूपरंपरेचे संबंध उकलून दाखविताना त्यांनी महानुभवीयांच्या पारंपारिक श्रद्धांना धक्का दिला आहे. आपले निष्कर्ष ते निर्भींडपणे मांडतात, हा त्यांच्या संशोधनाचा एक विशेष.
त्यांनी देवताविषयक केलेले संशोधन तितकेच महत्त्वाचे आहे. खंडोबा ( १९६१ ) रामराज्याची स्फूर्तिकेंद्रे ( १९६६ ) महाराष्ट्राचा देव्हारा ( १९७८ ), लज्जागौरी ( १९७८) हे त्यांपैकी महत्त्वाचे ग्रंथ. त्यांतील लज्जागौरी हा त्यांच्या शोधबुद्धीचा उज्जवल आविष्कार आहे. उत्खनात सापडलेली कमलशीर्षा योनिमूर्तीची प्रतीकात्मकता स्पष्ट करता करता आदिमातेचे स्वरूप व उपासना यांचा अनेकांगी विचार लज्जागौरीत आला आहे. नवजीवन निर्मिणारी भूमी व वंशसातत्य अखंड राखणारी स्त्री यांच्या एकरूपतेच्या जाणिवेत मातृदेवतांचा उगम ते शोधतात.
ढेऱ्यांच्या देवतावैज्ञानिक अभ्यासाचा एक धागा धर्मसंप्रदायाच्या शोधाशी बांधलेला आहे, तसा एक धागा लोकसंस्कृतीशी निगडित झाला आहे. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक ( १९६४ ), लोकसंस्कृतीची क्षितिजे ( १९७१ ), संससाहित्य व लोकसाहित्य : काही अनुबंध ( १९७८ ) यांमधून लोकसंस्कृतीतून अस्तंगत होऊ घातलेल्या उत्सव-महोत्सवांचा, कथा-कहाण्यांचा, वासुदेव-गोंधळी, भुत्ये-वाघ्या-मुरळी अशा धार्मिक व लोकानुरंजन करणाऱ्या अनेक परंपरांचा त्यांनी अभ्यासपूर्ण परामर्श घेतला आहे. संतसाहित्याने लोकश्रद्धास लोकप्रतीके व लोकमाध्यमे यांचे साहाय्य घेऊन त्यांचे अंतरंग अव्यात्मविचाराने कसे भारून टाकले याचा त्यांनी संतसाहित्य व लोकसाहित्य या ग्रंथांतून केलेला विचार मूलगामी वाटतो.
एखाद्या कवीचा किंवा लेखकाचा, एखाद्या वाङ्मयप्रकाराचा, एखाद्या कालखंडाचा संपूर्ण व सूक्ष्म अभ्यास करून त्याबद्दलचे निर्णायक सिद्धान्त मांडण्याचे कार्य अनेक संशोधक हाती घेत आहेत. ‘हरिभाऊ’ पासून ‘मर्ढेकरां’ पर्यंत सर्व महत्त्वाचे लेखक व कवी त्याचप्रमाणे कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, चरित्र आणि आत्मचरित्रवाङ्मय, एकांकिका इ. वाङ्मयप्रकार प्रबंधांच्या अभ्यासाचे विषय झाले आहेत.
पीएच्. डी. करिता केलेले दर्जेदार संशोधन अनेक प्रबंधांतून झालेले आढळते. पण अशा संशोधकांचे कार्य प्रबंधापुरतेच थांबत नाही. ते पुढे चालू असतेच. वि. रा. करंदीकर, स. गं. मालशे, वि. बा. प्रभुदेसाई, म. रा. जोशी, प्र. न. जोशी. भालचंद्र फडके, यू. म. पठाण, निर्मलकुमार फडकुले, वसंत स. जोशी, आनंद यादव, भीमराव कुलकर्णी, द. भि. कुलकर्णी, अ. ना. देशपांडे, सुधीर रसाळ इ. कितीतरी विद्धानांचे संशोधनकार्य प्रबंधलेखनानंतर पुढे चालू आहे आणि संशोधनक्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
संशोधनाची आवड म्हणून आपापल्या आवडीच्या विषयात संशोधन करणारे अनेक विद्वान संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करताना आढळतात. लोकसाहित्य व लोकवाङ्मय यांत अनेकांनी संशोधन करून लोकसाहित्याचे वेगवेगळे पैलू प्रकाशात आणले आहेत. सरोजिनी बाबर यांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. वेगवेगळ्या प्रदेशांतील व वेगवेगळ्या बोलीभाषांतील लोकगीते व लोककथा जमवून त्यांनी त्या संग्रहरूपाने प्रकाशित केल्या आहेत. दुर्गा भागवत यांचा लोकसाहित्याची रूपरेखा ( १९५६ ) हा ग्रंथ लोकसाहित्याच्या अनेक अंगांवर महत्त्वपूर्ण प्रकाश पाडणारा आहे. कमलाबाई देशपांडे, मालतीबाई दांडेकर, नांदापूरकर, प्रभाकर मांडे, वामनराव चोरघडे इ. अनेक संशोधकांनी लोकसाहित्य जमवून ते प्रकाशात आणण्याचे प्रयत्न केले आहेत. लावणीवाङ्मयावरील संशोधन व त्यांचे मूल्यमापन म. वा. धोंड ( मर्हाडी लावणी, १९५६ ) व गं. ना. मोरजे ( मराठी लावणी वाङ्मय, १९७४ ) यांनी चिकित्सापूर्वक केले आहे. कीर्तनसंस्थेचा उगम आणि विकास यांचा मार्मिक शोध यशवंत पाठक यांनी घेतला आहे. संशोधनाचे क्षेत्र अशा अनेक दिशांनी विकसित होत आहे व त्यात नित्य नव्या नव्या प्रकल्पांची भर पडत आहे.
ग्रामीण साहित्य व दलित साहित्य हे दोन आजच्या संशोधकांचे नवे विषय झाले आहेत. ह्या बाबतीत स्वंत्रपणे, विद्यापीठीय स्तरावर विशेषत: पीएच्. डीच्या प्रबंधांच्या रूपाने – संशोधन केले जात आहे.
‘मराठी रंगभूमी व नाट्यसृष्टी’ हेही संशोधनाचा विषय झाले असले, तरी या विषयासंबंधी हवे तितके शास्त्रशुद्ध संशोधन झालेले दिसत नाही. मराठी रंगभूमी ( १९०३ ) हा आ. वि. कुलकर्णी यांचा ग्रंथ मराठी रंगभूमीच्या सुरूवातीच्या अवस्थेची मीमांसा करणारा आहे पण तो संशोधनपर आहे असे म्हणता येणार नाही. नाटके आणि नाटककार यांवर समीक्षात्मक ग्रंथरचना अनेकांनी केली. त्यात संशोधनापेक्षा गुणदोषदर्शनाचा भागच अधिक होता. मराठी नाट्यकला आणि नाट्यवाङ्मय ( १९५९ ) हा ग्रंथ श्री. ना. बनहट्टी यांनी लिहिला. त्यात मात्र रंगभूमीविषयक बरेचसे संशोधन आहे. मराठी नाटकातील तंत्राचा विकास, स्वगते, पौराणिक – सामाजिक – ऐतिहासिक नाटके इ. विषयांचा संशोधनपर, समीक्षणात्मक अभ्यासही काहींनी केला.
मराठी संशोधनाचे स्वरूप हे असे मिश्र आहे. आरंभी केवळ प्राचीन हस्तलिखित मिळवून ती प्रकाशित करण्याइतपतच संशोधनाचे स्वरूप होते. नंतर पाठचिकित्सा सुरू झाली आणि प्राचीन मराठी साहित्याच्या पाठशुद्ध, संशोधित आवृत्त्या काढण्याकडे संशोधकांचे लक्ष वेधले. स्वातंत्र्योत्तर काळात संशोधन व समीक्षा ह्यांचा समन्वय झालेला आढळतो. साहित्यात पाठचिकित्सेइतकेच साहित्यातील अंतरंगाचा, आशयाचा शोध घेण्याला महत्त्व आहे. ह्याची जाणीव संशोधकांना होऊ लागली. साहित्यातील मूल्यांचा, साहित्यातील सामाजिक – राजकीय जाणिवांचा, लेखक-कवी ह्यांच्या व्यक्तिमत्वांचा शोध घेण्याचा विशेष प्रयत्न सुरू झाला. किंबहुना साहित्य हा एक अखंड, न संपणारा शोध आहे, ह्याची जाणीव नव्या संशोधकांना होऊ लागली. त्यामुळे संशोधनाच्या कक्षा रूंदावल्या. आज हाच शोध अनेक अंगांनी पुढे चालला आहे आणि नवीन क्षितिजे शोधण्याचा संशोधकांचा प्रयत्न चालू आहे.
अदवंत, म. ना.
इतिहासलेखन : मराठ्यांचे राज्य इंग्रजांनी १८१८ मध्ये जिंकून घेतले. पेशवे आणि त्यांची जुनी राजवट जाऊन नवे इंग्रजी शासन आले. इंग्रजी राज्यकर्त्यानी नव्या पद्धतीचे शिक्षण सुरू केले. नव्या विद्येबरोबर मराठी समाजात नवे विचार, नव्या समजुती रूजू लागल्या. अठराव्या शतकात बखरवाङ्मय विपुल प्रमाणात निर्माण झाले होते. त्यापैकी बरेच काव्येतिहाससंग्रहात १८८० ते १८८२ च्या दरम्यान प्रकाशित झाले व काही विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नाशीत प्रकाशित झाले. तथापि नव्या शिक्षित समाजाचे बखरवजा लिखाणाने समाधान होण्यासारखे नव्हते पण अर्वाचीन चिकित्सक इतिहास लेखनाचीही त्याची अद्याप तयारी झाली नव्हती. बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ दाजी लाड यांनी प्राचीन कालातील काही ताम्रशिला – शासनांचे वाचन केले, त्यांवर टिपणे लिहिली पण हे अपवादात्मक कार्य होते. शिवाय या त्रोटक माहितीवर महाराष्ट्राचा प्राचीन इतिहासही लिहिता येण्यासारखा नव्हता.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र मराठ्यांच्या इतिहासाचा शोध सुरू केला. पुणे दरबारी असलेला इंग्रज वकील मॅलेट याने कित्येकदा आपल्या पत्रांत आपण मराठ्यांचा इतिहास लिहिण्यास घेतला आहे, असा उल्लेख केलेला आहे. मॅलेटचा मराठ्यांचा इतिहास तयार झाला नाही तथापि १७८१ मध्ये एक जर्मन संशोधक श्प्रेंगेल आणि १८१० मध्ये स्कॉट वेअरिंग या दोघांनी मराठ्यांचे उणेअधिक पुरेअपुरे इतिहास प्रसिद्ध केले. महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात जाताच एल्फिन्स्टनने ऑन द टेरिटरीज कॉकर्ड फ्रॉम द पेशवाज हे पुस्तक लिहिले. हे मराठ्यांच्या तत्कालीन सर्वागीण इतिहासाचा सारांश आहे. यापेक्षा अधिक प्रामाण्य मिळविणारा इतिहास १८२६ मध्ये प्रसिद्ध झाला. तो म्हणजे ⇨ग्रँट डफ याने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास होय. डेव्हिड केपेन ह्याने इतिहासाचे मराठी भाषांतर बखर मराठ्यांची ह्या नावने केले आहे ( १८३० ). डफ हा सातारा दरबारी १८१८ मध्ये नेमलेला पहिला इंग्रज रेसिडेंट. सातारचे राजे प्रतापसिंह यांच्या शिक्षणावर व कार्यावर देखरेख ठेवून त्यांच्या मार्फत सातारा संस्थानाचे राज्य चालवावयाचे हे रेसिडेंटचे काम. हे काम करताना पूर्वीची पद्धत कशी होती याची विचारपूस डफ करू लागला आणि त्यातून त्याच्या इतिहासलेखनाची सुरूवात झाली. सातारकर राजे, त्यांचे चिटणीस, दरबारातील मानकरी, बाळाजीपंत नातू इत्यादीकडून डफने अगदी कसोशीने आणि चिकाटीने माहिती जमा केली, बखरी मिळविल्या, काही फार्सी- मराठी कागदपत्र मिळविले. दरबारी मंडळीकडून डफ कसोशीने माहिती जमा करी. सुमारे अर्ध शतक डफकृत मराठ्यांचा इतिहास हा प्रमाणभूत म्हणून सर्वजण मानत आले.
डफच्या इतिहासापासून महाराष्ट्रात इतिहाससंशोधननास सुरूवात झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ मध्ये झाली. नवविद्येचा प्रसार समाजात होऊ लागला, समाजातील काही घटकांना नवीन दृष्टी प्राप्त झाली. देशाभिमानाचे वारे वाहू लागले तसे आमच्या भूतकालाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहिले पाहिजे, अशी जाणीवही निर्माण झाली.डफच्या इतिहासात मराठ्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला आहे. पण ह्या इतिहासककथनातही कित्येक वेळा त्याने मराठ्यांना प्रतिकूल व अनैतिहासिक अशी विधाने केली आहेत. सर्वसाधारण मराठ्यांना व मराठा राज्यसंस्थापक शिवाजी महाराजांना डफने नावे ठेविली. त्यामुळे त्याच्या इतिहासाबद्दल मराठी मनात अढी निर्माण झाली. नीलकंठ जनार्दन कीर्तने ह्यांनी ग्रांट डफकृत मराठ्यांच्या बखरीवर टीका ( १८६८ ) ह्या निबंधात डफच्या इतिहासग्रंथातील उणिवा दाखवून दिल्या. डफने कालविपर्यास केला आहे आणि त्याचे निरूपण काही ठिकाणी अपुरे, चुकीचे व मराठेविरोधी आहे, असा या टीकेचा रोख होता. कीर्तन्यांचा आवाज एकाकी नव्हता. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी लिहून ठेवले. की डफच्या इतिहासातील राजकारणी इतिहास चुकीचा आहे आणि त्यात मराठ्यांचा धर्म, कला, विद्या, वाड्मय, चालीरीती यासंबंधीची माहिती अगदी जुजबी आहे. त्यांनी मागणी केली, की मराठ्यांचा समग्र, शास्त्रशुद्ध इतिहास नव्याने लिहिला पाहिजे.
जनार्दन बाळाजी मोडक आणि काशीनाथ नारायण साने ह्यांनी काव्येतिहाससंग्रह हे मासिक १८७८ मध्ये काढले होते. देशसेवेच्या दृष्टिकोणातून इतिहास, बखरी आदी जुन्या ग्रंथपत्रांचा जीर्णोद्धार करणे हे ह्या मासिकाचे उद्दिष्ट होते. अकरा वर्षानी काव्येतिहाससंग्रह मासिकाचे प्रकाशन थांबले पण मासिकाने दाखवून दिले, की इतिहास- लेखनास आवश्यक अशी साधने- समकालीन कागदपत्रे, कैफियती, नाणी, कोरीव लेख, जुने स्थापत्य, जुनी भांडी, चित्रे इ. – महाराष्ट्रात विखुरलेली आहेत.ती उजेडात आणण्याचा खटाटोप अभ्यासकांनी केला पाहिजे. पाश्चात्य संशोधकांनी समकालीन कागदपत्रांच्या शोधा करता घेतलेल्या परिश्रमांची वि. का. राजवाडे यांच्यावर विशेष छाप पडली. जुन्या कागदपत्रांचा त्यांना ध्यास लागला. कागदपत्रे नाहीत तर इतिहासलेखन शक्य नाही. अशा आशयाचे उद्गार फ्रेंच कवी आणि मुत्सद्दी लामातींन ह्याने काढले आहेत. त्यांचा त्यांनी सर्वार्थाने स्वीकार केला. विश्वसनीय अस्सल इतिहाससाधने शोधून काढून आणि त्यांचे संपादन करून ती प्रसिद्ध करण्याच्या कार्याला त्यांनी आपले आयुष्यच वाहुन घेतले. त्यांच्या सुदैवाने पेशव्यांनी उत्तरेस पाठविलेल्या येरंडे व कानिटकर या अधिकाऱ्यांचे दप्तर त्यांच्या वाई येथील मित्रांच्या मध्यस्थीने त्यांच्या हाती लागले. राजवाड्यांनी सर्व दप्तर वाचून काढले. त्यातील १७५० – ६१ या अकरा वर्षातील हिंदुस्थानातील हालचाली देणाऱ्या ३०४ पत्रांचा एक भाग १८९८ मध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने, पहिला खंड म्हणून प्रसिद्ध केला. त्यात पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या झालेल्या पराभवाची मीमांसा, महाराष्ट्र धर्म, बाळाजी बाजीराव, सदाशिवभाऊ तसेच मल्हारराव होळकर, जयाप्पा व दत्ताजी शिंदे इत्यादिकांच्या हालचाली, प्रवासाचे मार्ग व मुक्काम, ग्रँट डफच्या चुका इत्यादीविषयक विवेचक प्रस्तावनाही आहे. राजवाडे निर्धन होते पण तीव्र बुद्धिमत्ता, अफाट वाचन, अलोकिक प्रतिमा, ज्ञानाची एकनिष्ठ उपासना आणि अचाट परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी सर्व अडचणींवर मात केली. जुनी राजघराणी, संस्थानिक, सेनापती, इनामदार, देखमुख- देशपांडे- यांच्या वाड्यांचे उंबरठे झिजविले. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील किल्ले, देवळे- रावळे, मशिदी, मठ, घाट, गुंफा त्यांनी पाय़ी प्रवास करून नजरेखाली घातल्या. कधी प्रेमाने, कधी रागाने तर कधी मित्रांच्या मध्यस्थीने मालकास समजावून त्यांनी कागदपत्रे, पोथ्या, बाडे मिळविली. मोडी लिपीतील जुनी पत्रे वाचणे, तारखांचा, स्थळांचा व व्यक्तींचा मेळ बसविणे, घटनांचा क्रम लावणे ही कामे सतत अभ्यासाने त्यांना साधत गेली. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे एकूण बावीस खंड त्यांनी आपल्या हयातील प्रसिद्ध केले. १९२२ मध्ये राधामाधवविलासचापू हे जयराम पिंड्येविरचित शहाजीचे संस्कृत काव्यमय चरित्र, १९२४ मध्ये महिकावतीची ऊर्फ माहीमची बखर हे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. यांशिवाय केसरी, इतिहास आणि ऐतिहासिक, सरस्वती मंदिर, ग्रंथमाला, चित्रमयजगत्यांसारख्या नियतकालिकांतून त्यांचे संशोधनात्मक लेख प्रसिद्ध होत राहिले. ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ आणि ‘महाराष्ट्राचा वसाहतकाल’ या त्यांच्या दोन लेखमाला अनेक कारणांनी गाजल्या. राजवाडे ह्यांना फार्सी व कानडी येत नसल्याने त्यांच्या संशोधनात सहज हाती आलेले कागद त्यांना सोडावे लागले. त्यांपैकी अगदी थोडे आजवर हाती आले आहेत.
राजवाड्यांनी सर्व मराठेशाहीचा इतिहास लिहून काढला नाही पण इतिहासाच्या साधनांचे २२ खंड प्रसिद्ध करताना त्यांनी काही खंडांना प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने मराठी इतिहासातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांचे विवेचन केले आहे. मराठ्यांचे ध्येय काय असावे, पानिपतावर त्यांचा पराभव का झाला, महाराष्ट्राचा वसाहतकाल, मराठे कोण, इ. विषयांची मार्मिक चर्चा त्यांनी केली आहे. त्यांच्या प्रस्तावना म्हणजे विद्धत्ताप्रचुर प्रबंधच आहेत. राजवाड्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतिहासाच्या अभ्यासाला नवी कलाटणी दिली. हे इतिहासाचे क्षेत्र किती विस्तृत आहे. सर्वागीण इतिहास म्हणजे काय, किती गोष्टींचा त्यात अंतर्भाव होतो हे प्रस्तावनांत त्यांनी सांगितले आहे. केवळ राजकीय वृत्तांतास राजवाडे इतिहास मानीत नसत. धर्म, समाज, विचार, चालीरीती, वाङ्मय, कला, अर्थव्यवस्था, व्यापारसंवर्धन इ. साऱ्या मानवी जीवनाच्या अंगवर्णनांचा इतिहास समावेश होतो हा त्यांचा आग्रह. त्यांचा हा इतिहासविषयक दृष्टीकोण आता मान्यता पावला आहे.
राजवाड्यांचे समकालीन इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे मराठेशाहीच्या इतिहासक्षेत्रात काम करीत होते. खरे मिरजेच्या शाळेत संस्कृत शिक्षक होते. मिरजेच्या पटवर्धनांचे दप्तर तपासण्याची परवानगी त्यांनी म्हत्प्रसाने मिळविली. पटवर्धन घराणे पेशव्यांचे निकटवर्ती व विश्वासू सरदार. १७६० – १८०३ या कालात पुणे, हैदराबाद आणि कर्नाटक या भागांमधील त्यांच्या प्रतिनिधींनी पाठविलेली पत्रे अगदी बोलकी आहेत. खऱ्यांनी १८९७ पासून १९२४ पर्यत सु. पाचशे पृष्ठांचा एक खंड. असे ऐतिहासिक लेखसंग्रहाचे बारा खंड प्रसिद्ध केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चिरंजीवांनी आणखी तीन खंडाची भर घालून वडिलांचे कार्य पूर्ण केले ( १९२६ , १९३०, १९४८).
राजवाडे हे महान संशोधक आणि इतिहासकार होते हे नि:संशय, पण त्यांच्या लेखनात ते कधी कधी विलक्षण लोकरुचिविरूद्ध प्रमेये मांडीत. खऱ्यांनी असे केल्याचे दिसत नाही. त्यांची प्रमेये पल्लेदार नसतील पण साधार असत. प्रत्येक खंडात जी कागदपत्रे त्यांनी छापली, त्यांच्या आधारावर आपल्या प्रस्तावना त्यांनी लिहिल्या आहेत. या प्रस्तावना एकत्र करून एका खंडात प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे पानिपतोत्तर मराठेशाहीचा – प्राधान्यत: दक्षिण विभागाचा – सुसंबद्ध इतिहास वाचावयास मिळतो. त्यांशिवाय खऱ्यांचे ऐतिहासिक लिखाण म्हणजे आधिकारयोग अथवा नानास राज्याविकार मिळाल्याचा इतिहास ( १९०८ ), इचलकरंजी संस्थानचा इतिहास ( १९१३ ), मालोजी व शहाजी ( १९२० ), मराठी राज्याचा उत्तरार्ध ( खंड पहिला, १९२७ ).
राजवाडे यांचे समकालीन तिसरे संशोधक म्हणजे रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस ( १८७० – १९२६ ). त्यांनी महाराष्ट्र कोकिल काढले ( १८८७ ). ते काही वर्षे चालले. १८९६ साली पारसनिसांनी मराठी इतिहासाच्या अभ्यासाला वाहिलेले भारतवर्ष नावाचे मासिक हरि नारायण आपटे यांच्या साहाय्याने प्रसिद्ध करावयास सुरूवात केली. हे मासिक दोन वर्षे चालले पण त्यात पारसनिसांनी अनेक अस्सल कागदपत्रे छापली आणि मराठेशाहीच्या इतिहासातील काही घटनांची चर्चा केली. १९०८ साली त्यांनी इतिहाससंग्रह हे मासिक सुऱू केले. नाना फडणीस यांच्या कारकीर्दीतील सरकारी पत्रव्यवहार त्यांच्या इनामाच्या गावी – मेणवली येथे – नेण्यात आला होता. पारसनीस यांनी पुरूषोत्तम मावजी शेट यांच्या आर्थिक साहाय्याने त्यातील काही निवडक पत्रव्यवहार मिळविला. तसेच साताऱ्याच्या राजघराण्यातील कागदपत्रे, सनदा, चित्रे इ. त्यांनी मिळविली. ही कगदपत्रे व काही संकलने इतिहाससंग्रह मासिकात आणि नंतर स्वतंत्र ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली. ग्वाल्हेर संस्थानविषयक ६०८ पत्रे निवडून ती त्यांनी ग्वाल्हेर दरबाराकरिता गोपनीय म्हणून पाच खंडांत प्रसिद्ध केली. जदुनाथ सरकारांच्या आग्रहावरून ग्वाल्हेर दरबाराने १९३७ साली ही सर्व एक खंडात छापून प्रसिद्ध केली.
बारभाईच्या कारस्थानापासून ( १७७४ ) ते महादजी शिंदे यांच्या मृत्यूपर्यत ( १७९४ ) झालेल्या घटना समजून घेण्यास पूर्वीच्या सातारा इतिहास संशोधक मंडळाचे याच विषयावरील दोन साधन खंड आणि आ. भा. फाळके व अनंत वामन वाकणकर यांचे शिंदेशाही इतिहासाची साधने ( ४ खंड. १९२९ – १९३५ ) हेही महत्त्वाचे साधन होत.
पारसनिसांना इतिहास विषयाची आवड होती. न्यायमूर्ती रानडे यांच्या कृपेने त्यांना पुण्याच्या पेशवे दप्तरात प्रवेश मिळाला. त्यांनी चिटणीसी विभाग आणि रोजकीर्दी तपासल्या. त्यातून बऱ्याच नकला करून घेतल्या. शाहू छत्रपती आणि पेशवे यांच्या रोजकीर्दीतील निवडक उतारे घेऊन १५ खंड त्यांनी उभे केले त्यांच्या संपादनात महत्त्वाचा वाटा उचलला. यात केवळ राजकारणावर दृष्टी ठेवण्यात आलेली नाही. राज्यव्यवस्था, न्यायदान, अर्थव्यवस्था, व्यापार, दान – धर्म इ. अनेक अराजकीय बाबींचा या उताऱ्यांत समावेश आहे. मराठी राज्यातील राजकीय घटनांचा अर्थ, आर्थिक – सामाजिक इ. विषयांची चर्चा करणारा ‘इंट्रोडक्शन टू द पेशवाज डायरीज’ ( १९०० ) हा निबंध रानडे यांनी हे रोजकीर्दीतील उतारे वाचून तयार केला व मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या सभेत वाचला. तशाच प्रकारचा एक निबंध न्या. तेलंग यांनीही वाचला व तो प्रकाशितही झाला. ( १८९२ ). तो बखरवाड्मय व थोडेसे कागदपत्र यांवर आधारित आहे. उच्च सिक्षणाच्या अभावी पारसनीस यांचे बुद्धिचातुर्य जुनी दप्तरे, जुनी चित्रे, सतराव्या – अठराव्या शतकांत प्रसिद्ध झालेले हिदुस्थानविषयक इंग्रजी ग्रंथ यांची जमवाजमव करण्यापलीकडे जाऊ शकले नाही. पूना इन बाय्गॉन – डेज ( १९२१ ), महाबळेश्वर ( १९१६ ) अशी काही स्थळवर्णात्मक इंग्रजी पुस्तके आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येचे नबाब, बायजाबाई शिंदे ह्यांची चरित्रे ( १८९४ , १८९९ , १९०२ ), मराठ्यांचे पराक्रम – बुंदेलखंड प्रकरण ( १८९५ ), महापुरूष ब्रह्मेद्रस्वामी धावडशीकर ( चरित्र व पत्रव्यवहार ) ( १९०० ) इ. काही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले. तंजावरचे राजघराणे ( १९१२ ) यांसारखी त्यांनी इतिहाससंग्रहात प्रकाशित केलेली काही प्रकरणे पुस्तकरूपाने पुन्हा प्रकाशित केली.
पेशवे दप्तरातील वेच्यांचे १५ खंड मराठेशाहीचा आर्थिक, सामाजिक इ. इतिहास लिहिण्यास फार उपयुक्त आहेत. दीक्षित- पटवर्धन यांच्या हिशेबाच्या वह्या भारत इतिहास संशोधक मंडळाकडे आल्या. त्यांचा प्रथम वामन गोविंद काळे यांनी अभ्यास करून आपले निष्कर्ष मंडळापुढे निबंधरूपाने मांडले. त्याचप्रमाणे तुळशीबागवाले, कल्याणचे सुभेदार बिवलकर, खाजगीवाले, वैद्य, चिपळूणकर यांची दप्तरे तपासून त्यांतील निवडक उतारे ना. गो. चापेकर ( १९६९ – १९६८ ) यांनी आपल्या पेशवाईच्या सावलीत ( १९३७ ) या ग्रंथात प्रसिद्ध केल आहेत. त्यांच्या दीर्घ प्रस्तावनेत अनेक विषयांची चर्चा त्यांनी केली आहे. राज्यविभाग, सरकारी नोकरांचे तनखे, कारकुनी, जकात. जमीनमहसूल, पट्ट्या, करवसुली, हुंड्या, चलन, सावकारी व्यवहार, वाहने, टपाल, गुन्हे, दानधर्म, अनुष्ठाने, व्रते, ज्योतिष, ब्राह्मणभोजने इ. विषयांचा यात समावेश आहे. समाजजीवनाला आर्थिक व्यवहार वळण लावतात म्हणून आर्थिक इतिहासाला अलीकडे फार महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजवाडे, खरे, साने, पारसनीस यांच्या कामगिरीमुळे मराठ्यांच्या इतिहासाबाबत कुतूहल वाढत चालले. इतिहाससंशोधनाचे कार्य एकट्यादुकट्या व्यक्तीच्या बाहेर असून संस्थेच्या तर्फे ते व्हावे, या विचाराला चालना मिळाली. त्याचा परिपाक म्हणजे १९१० मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची ( भा. इ. सं.) स्थापना करण्यात आली व अनेक संशोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्यास उपयुक्त असे एक केंद्र तयार झाले. पहिल्या पाच – सहा वर्षात राजवाडे यांनी मंडळाच्या कामात मोठ्या हिरिरीने भाग घेऊन दोनशेवर निबंध वाचले. पण त्यानंतर मंडळावर राजवाड्यांनी गैरमर्जी झाली आणि त्यांनी मंडळ सोडले. पण साने, मेंहेंदळे, दत्तो वामन पोतदार, औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी व काही इतर संस्थानिक, न. चिं. केळकर, मालोजीराव राजे नाईक – निंबाळकर यांनी मंडळाची जोपासना केली. स. ग. जोशी, शं. ना. जोशी, कृ. वा. पुरंदरे, द. वि. आपटे, द. वा. पोतदार, दि. वि. काळे, चिं. ग. कर्वे, विशेषत: ग. ह. खरे यांनी अनेक ठिकाणी जाऊन कागदपत्रे, कैफियती, बखरी, पोथ्या, नाणी, ताम्रपट, जुनी चित्रे, संदर्भग्रंथ मंडळाकरता मिळविले. त्यांचा अभ्यास करून मंडळाच्या पाक्षिक वा वार्षिक सभांपुढे निबंध वाचले. ते पुढे मंडळाच्या विविध प्रकाशनांत छापले गेले. मंडळाची इतिवृत्ते, संमेलनवृत्ते, त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला, पुरस्कृत ग्रंथमाला इत्यादींची संख्या दोनशेपर्यत जाते.
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांचे बरेच लेखन स्फुट स्वरूपाचे आहे पण त्याची संख्या आणि आवाका मोठा. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार ( १९२२ ), मराठी इतिहास व इतिहाससंशोधन ( १९३५ ), टिळकांचे सांगाती ( १९७५ ) ही त्यांची विशेष उल्लेखनीय पुस्तके. भा. इ. सं. च्या एका त्रैमासिक अंकात ( अंक ३ – १९८०) त्यांच्या २४७ लेखांची सूची दिली आहे. त्यांच्या लेखांतून त्यांच्या तल्लख बुध्दीची, अमर्याद वाचनाची व सूक्ष्म अवलोकनाची कल्पना येते. या मंडळात अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे आणखी एक इतिहास – संशोधक म्हणजे ⇨ गणेश हरी खरे ( १९०१ – ) हे होत. भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या शिवचरित्रसाहित्याचे पाच खंड त्यांनी संपादिले तसेच ऐतिहासिक फार्सी साहित्याचे सहा खंड सिद्ध केले ( १९३४ , १९३७, १९३९, १९४९, १९६१, १९६९ ). श्रीक्षेत्र आळंदी ( १९३१ ), मंडळांतील नाणी ( १९३३ ), श्रीविठ्ठल आणि पंढरपूर ( १९३८ ), मूर्तिविज्ञान ( १९३९ ), पंढरपूरचा विठोबा ( १९४७ ), हिंगणे दप्तर ( २ खंड १९४५, १९४७ ), शिव –चरित्र- वृत्त – संग्रहाचे खंड २ आणि ३ ( १९३९, १९४१ ), दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने ( ३ खंड, १९३०, १९३४, १९४९ ), संशोधकाचा मित्र ( भाग १, १९५१ ), महाराष्ट्राची चार दैवते ( १९५८ ), स्वराज्यातील तीन दुर्ग ( १९६७ ), मराठी इतिहासाची विस्तृत शकावली ( १९७७ ), दोन मराठी व एक इंग्रजी लेखसंग्रह इ. खरे ह्यांनी लिहिलेले – संपादिलेले काही उल्लेखनीय ग्रंथ होत. त्यांचे पाचशेहून अधिक इंग्रजी, मराठी व क्वचित कानडी लेख प्रकाशित आहेत.
या दोघांशिवाय मंडळाच्या संशोधनकार्यात सहभागी होणाऱ्या संशोधकांत न. चिं. केळकर, शं. ना. जोशी, चिं. वि. वैद्य, दत्तोपंत आपटे, वि. सी. चितळे, वा. सी. बेंद्रे, चिं. ग. कर्वे. य. नय केळकर आदींचा समावेश होतो.
न. चिं. केळकर ह्यांचा मराठे व इंग्रज ( मराठेशाहीचे शतसांवत्सरिक वाड्मयश्राद्ध ( १९१८ ) हा मराठेशाहीच्या अस्ताचे अर्थपणे विवेचन करणारा ग्रंथ खूप लोकप्रिय झाला. ह्या ग्रंथावरील दत्तो वामन पोतदार ह्यांची टीका मराठे व इंग्रज ( १९२२ ) ह्या नावाने प्रसिद्ध आहे. आयर्लदचा इतिहास ( १९०९ ), इतिहासविहार … ( इतिहासविषयक लेख, १९२६ ) आणि फ्रेंच राज्यक्रांति ( १९३७ ) हे त्यांचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ होत. भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही ऐतिहासिक साधनग्रंथांचे संपादन उदा., शिवकालीन – पत्र- सार – संग्रह –खंड– ३, ( १९३७ ), शंकर नारायण जोशी ह्यांनी केलेले आहे. शिवाजी आणि चंद्रराव मोरे ( १९२४ ), गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या … ( १९२५ ), मध्ययुगीन भारत अथवा हिंदु राज्यांचा उद्भव, उत्कर्ष आणि उच्छेद ( ३ भाग १९२०, १९२३, १९२६ ) हे ⇨ चिं. वि. वैद्यांचे निर्देशनीय ग्रंथ. वैद्यांचे ऐतिहासिक निबंधही पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहेत ( १९३१ ). भारत इतिहास संशोधक मंडळाच्या चंद्रचूड दप्तर – कला १ ली ह्या ग्रंथांचे संपादन दत्तात्रय विष्णू आपटे ह्यांनी केले.तसेच मराठ्यांच्या इतिहासाचे साहित्य ( १९२४ ) ह्या ग्रंथाच्या सिद्धीसाठी रियासतकार ⇨ गो. स. सरदेसाई ह्यांना त्यांनी साहाय्य केले होते. वि. सी. चितळे ह्यांनी पेठे दप्तराचे संपादन केले ( भाग – १, १९४८ भाग – २ , १९५० ). वा. सी. बेंद्रे ह्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत साधनचिकित्सा ( १९२८ ), … गोवळकोंड्याची कुत्बशाही ( १९३४ ), छत्रपति संभाजी महाराज ( १९६० ), मालोजी राजे व शहाजी महाराज ( १९६७ ), श्रीछत्रपती शिवाजी महाराज( १९७२ ) हे विशेष उल्लेखनीय होत. चिं. ग. कर्वे ह्यांनी मानवी संस्तीचा इतिहास ( १९३१ ) लिहिला न. चिं. केळकरांचे चिरंजीव यशवंत न. केळकर ह्यांचा विशेष बोलबाला शाहिरी वाड्मयाचे संशोधक म्हणून मुख्यत: झाला. त्याचे ३ खंड त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. वसईची मोहीम ( १७३७ – १७३९ ) ( १९३६ ), मूतावर भ्रमण ( १९४० ), ऐतिहासिक शब्दकोश ( २ भाग, १९६२ ) हे त्यांचे काही इतिहासविषयक ग्रंथ होत ⇨ त्र्यंबक शंकर शेजवलकर ( १८९५ – १९६३ ) ह्यांनी निजाम – पेशवे संबंध ( १९५९ ), पानिपत … ( १९६१ ), कोकणच्या इतिहासाची पार्श्वभूमि ( १९६१ ), श्रीशिवछत्रपति : संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने ( १९६४ ), ह्यांसारखे महत्तवपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यांचे निवडक लेख १९७७ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यापूर्वीही त्यांच्या लेखसंग्रहाचे दोन भाग प्रसिद्ध झाले होते ( १९४० १९५९ ). रायगडची जीवनकथा ( १९६२ ) हा शां. वि. आवळसकरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय.
खाजगी व्यक्ती आणि सार्वजनिक संस्था यांचे संशोधनकार्य चालू राहिलले.तरीपण जनमानसात एक भावना कायम घर करून वसली, की जोपर्यत मराठी राज्यकर्त्याचा दप्तरखाना संशोधकांना खुला नाही, तोपर्यत मराठी इतिहासाचे संशोधन अपुरे राहणार, पेशव्यांचे राज्य खालसा झाल्यानंतर ( १८१८ ) त्यांचे दप्तर, रोजकीर्दी, हुकम, परराज्यातील वकिलांना पाठविलेल्या पत्रांचे तर्जुमे, त्यांची उत्तरे, पथके, पागा तसेच फौजांचा व किल्ल्यांचा खर्च यांसंबंधी सर्व कागदपत्रे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात आली.त्यानंतर इनाम कमिशनपुढे इनामदार, सरदार, संस्थानिक यांनी सादर केलेल्या सनदा, कैफियती वगैरे कागदपत्रांची त्यांत भर पडली. शिवाय गावांचे महालांचे जमीनमहसूल, कर, पट्ट्या यांच्या हिशोबांची कागदपत्रे जिल्हा महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ही सर्व कागदपत्रे पुण्यात निरनिराळ्या वाड्यांतून प्रवास करून १८९० पासून एका भक्कम दगडी इमारतीत ठेवण्यात आली आहेत. कचेरीचे नाव आहे, ‘एलीअनेशन ऑफिस आणि पेशवा दप्तर’. हे दप्तर संशोधकांना पहावयास मिळावे असे ठराव भारतीय ऐतिहासिक अभिलेखागार समितीने १९२० पासून मंजूर केले. जदुनाथ सरकार यांच्या सल्लयाने १९२९ साली मुंबई सरकारने रियासतकार सरदेसाई यांची पेशवे दप्तरातून ऐतिहासिक कागदपत्रे निवडण्याच्या व प्रकाशित करण्याच्या कामावर नेमणूक केली. सरदेसाई हे मुख्यत: ‘रियासतकार’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुसलमानी व मराठी रियासतींवर लिहिले. ह्या रियासतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील घटना आतापर्यत राजवाडे, खरे, साने इत्यादींना उजेडात आणलेल्या बखरी – कागदपत्रांवर आधारलेल्या आहेत. किंबहुना या सर्व कागदपत्रांना सरदेसाई यांनी बोलके केले. सरदेसाई यांची पेशवे दप्तरच्या कामावर नेमणूक होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची मराठे शाहीच्या इतिहासाशी अत्यंत जवळून असलेली ओळख हे होय. सरदेसाई यांनी आपले मदतनीस म्हणून कृ. पां. कुलकर्णी कृ. वा. पुरंदरे, य. न. केळकर, मा. वि. गुजर, वि. गो. दिघे ह्यांसारख्या संशोधकांची निवड केली. अनेक रूमालाची तपासणी झाली. यातील चिटणीशी विभागातील रूमालांत पेशव्यांचा राजकीय पत्रव्यवहार उपलब्ध झाला. त्यातील निवडक कागदपत्रे बाजूला करून त्याच्या नकला करण्यात आल्या. तारखा लावून, विषयवार विभागणी करून ती छापण्यात आली. पण एवढ्याने पेशवे दप्तरातील चिटणीशी आणि हिशेबी कागदपत्रांचे संशोधन पूर्ण झाले असे नाही. आपल्या मदतनीसांच्या साह्याने आणि लोगन, जॅक्सन यांच्या अहवालांच्या आधारे या दप्तराच्या मराठी – इंग्रजी मार्गदर्शिकाही सरदेसाई यांनी तयार केल्या. त्यांत निरनिराळ्या विभागांचे सामान्य स्वरूप दाखवून त्यात कोणत्या प्रकारचे कागद मिळतात याचे विवेचन केले आहे. या कामातून पंचेचाळीस मराठी व दोन फार्सी कागदपत्रांचे खंड प्रकाशित झाले.
या पेशवे दप्तरातील नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या कागदपत्रांमुळे पहिले बाजीराव पेशवे आणि निजामाचा संघर्ष, दाभाडे सेनापतीचा पाडाव. उत्तर हिंदचे राजकारण, वसईची मोहिम, नानासाहेब पेशवे, रामराजा प्रकरण, कर्नाटकातील मोहिमा, पानिपत, माधवराव पेशवे यांची कारकीर्द, बारभाईचे राजकारण, नागपूरकर भोसले इ. प्रकरणांची नव्याने मांडणी करणे आवश्यक झाले. भा. इ. शं. मंडळाप्रमाणे पेशवेदप्तर संशोधनकचेरी हे एक इतिहाससंशोधनाचे केंद्र बनले व त्यांतून वि. गो. दिघे. मा. वि. गुजर यांसारखे काही संशोधक नव्याने तयार झाले.
पेशवेदप्तराचे संशोधन पूर्ण झाल्यावर या कचेरीत पुणे दरबारी असलेल्या ब्रिटिश वकीलांच्या, गव्हर्नर जनरल व इतरांशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या फायलींचा अभ्यास सुरू झाला. पहिला कायम वकील मॅलेट १७८६ मध्ये पुण्यात दाखल झाला होता. शेवटच्या वकीलाने -एल्फिन्स्टनने – १८१८ च्या सुरूवातीस पेशव्यांचे राज्य खालसा केले. १७८६ – १८१८ या बत्तीस वर्षातील इंग्रज वकीलांचा पत्रव्यवहार वाचताना पेशवाईच्या शेवटच्या काळातील राजकारणाचा जवळून अभ्यास करावयास मिळतो.
मराठी इतिहास –साधने प्रसिद्ध होत असताना संशोधकांनी इतर भाषांतील साधनांकडे दुर्लक्ष केल नाही. सतराव्या- अठराव्या शतकांतील मुसलमानी रियासतीत पत्रव्यवहार व तवारीखा लिहिण्याचे काम फार्सी भाषेत चाले. फार्सी साधनांचा शोध सुरू झाला. एलियट आणि डाउसन यांनी १८६७ – ७७ या दशकात हिंदी इतिहासकारांनी सांगितलेला हिंदुस्थानचा इतिहास हिस्टरी ऑफ इंडिया अँज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टॉरिअन्स या मालेच्या ८ खंडात प्रसिद्ध केला होता. पैकी सातव्या आणि आठव्या खंडांत प्रसिद्ध झालेल्या फार्सी तवारीखांच्या फार्सी भाषेतील नकला मिळवून त्यांचा बारकाईने अभ्यास सुरू झाला. अबदुल हमीद लाहोरीचा बादशाहनामा, इनायतखानाचा शाहजहाननामा, मिर्झा मुहम्मदखानाचा आलमगीरनामा, खाफी – खानाचा मुन्तखब – उल्लुबाब, इरादतखानाची तारीख, मुहम्मद बिन कासीमचा इब्रुतनामा, भीमसेनाचा नुस्खा – इ- दिलकुश अशा किती तरी फार्शी ग्रंथांची भाषांतरे झाली.
अशा रीतीने गेल्या शंभर वर्षात ऐतिहासिक साधनांचा शोध सुरू झाल्यापासून आजतागायत काव्येतिहाससंग्रहाने प्रसिद्ध केलेली सु. ६, ३०० पृष्ठे, वासुदेवशास्त्री खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहाची सु. ७०० पृष्ठे, राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांची ५ ते ७ हजार पृष्ठे, सरदेसाई यांनी संपादिलेल्या पेशवे दप्तरातील निवडक कागदपत्रांची सु. ८,००० पृष्ठे आणि भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या साधनांची मिळून पन्नास हजार पृष्ठे भरतील इतकी मराठेशाही इतिहासाची साधनसंपत्ती निर्माण झाली आहे. या साधनांचा अभ्यास करून मराठेशाहीचा समग्र इतिहास लिहिणे आता एकट्या दुकट्या संशोधकाच्या आवाक्यातील काम राहिले नाही.
मराठेशाहीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बरीच चरित्रे मराठीत लिहिली गेली आहेत. चिंतामण विनयक वैद्य ( मराठा- स्वराज्य- संस्थापक श्रीशिवाजी महाराज, १९३२ ), कृ. अ. केळूसकर ( क्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र, १९०७ ), सर यदुनाथ सरकारकृत शिवाजी व शिवकाल ( अनु. वि. स. वाकसकर, १९३० ), विजय देशमुख ( शककर्ते शिवराय, २ खंड, १९८२ ), ब. मो. पुरंदरे, ( राजा शिवछत्रपति, १९६५ ) ही त्यांतील काही होत. कमल गोखले ह्यांचे संभाजीचरित्रही मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांत ( म. १९७१, इं. १९७८ ) प्रसिद्ध आहे. ह्यांखेरीज ताराबाई ( हरिश्चंद्र नारायण नवलकर – १८९८ रंगूबाई जाधव – १९४६ ), थोरले बाजीराव पेशवे ( ना. के. बेहेरे – १९३० गो. स. सरदेसाई – १९४२ म. श्री. दीक्षित – १९७८ ), नानासाहेब पेशवे ( गो. स. सरदेसाई – १९२६ , १९४४ चिं. ग. गोगटे – १९०८ ), नाना फडणवीस ( वासुदेवशास्त्री खरे – १८९२ घनुर्धारी – १८९३ ), महादजी शिंदे ( वा. रं. शिरवळकर वि. त्रिं. मोडक – १८९३ बा. रा. मावळकर – १९३७ ), थोरले माधवराव पेशवे ( धनुर्धारी – १८९७ स. अ. सहस्त्रबुद्धे – १९३८ , द. वा. पोतदार – १९४५ ), सखाराम बापू ( य. गो. कानेटकर ), अहिल्याबाई होळकर ( ग. चिं. देव – १८९५ धनुर्धारी – १८९५ ‘पुरूषोत्तम’ – १९१३ वा. दा. गोखले – १९४९ ), ह्यांसारख्या मराठेशाहीतील विविध ऐतिहासिक व्यक्तीची चरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत.
मराठेशाहीला शासनपद्धती या विषयावर मंडळातील शं. ना. जोशी यांनी लिहिलेला अर्वाचीन महाराष्ट्रेतिहासकालातील राज्यकारभाराचा अभ्यास माग १ ला १६०० ते १६८० ( १९५९) हा ग्रंथही उल्लेखनीय आहे.
मराठ्यांच्या युद्धनीतीचे विवेचन करणारे ग्रंथही लिहिले गेले. ग्वाल्हेरच्या फैजेतील कॅप्टन गणेश वासुदेव मोडक यांनी
लिहिलेला प्रतापगडचे युद्ध ( १९२७ ), बडोद्याचे सेनापती जनरल नानासाहेब शिंदे यांनी लिहिलेला मराठ्यांच्या प्रसिद्ध लढाया ( १९२२ ) हे असे काही ग्रंथ होत. द. ब. पारसनीस यांनी लिहिलेला मराठ्यांचे आरमार ( १९०४ ) हा ग्रंथही उल्लेखनीय आहे.
कागदपत्रांचे युग आले, तेव्हा महाराष्ट्रातील संस्थानेसुद्धा जागी झाली. बहुतेक संस्थांनांनी इंग्रज सरकारास पेश करण्याकरता आपले इतिहास इंग्रजीतून प्रसिद्ध केले होते. संशोधकांच्या साहाय्याने सावंतवाडी, बावडा, औंध, इचलकरंजी, कोल्हापुर, धार, देवास, इंदूर यांनी आपले इतिहास या विसाव्या शतकात लिहून घेतले. कुलाबकर आंग्र्यांचा इतिहास दामोदर गोपाळ ढबू यांनी लिहून काढला ( १९३९ ). यादव माधव काळ्यांनी नागपूरकर भोसल्यांची बखर प्रसिद्ध केली ( आवृ. २ री १९३६ ). शेजवलकरांनी त्यांच्याबाबतची कागदपत्रे प्रसिद्ध केली. मराठ्यांच्या इतर सत्तांशी आलेल्या संबंधांबाबतही ग्रंथलेखन झाले. उदा., मराठे व इंग्रज ….. ( १९१८ – न. चिं. केळकर ), निजाम – पेशवे संबंध ( १९५९ – त्र्यं. शं. शेजवलकर ), मोगल आणि मराठे ( १९६३ – सेतुमाधवराव पगडी ), पोर्तुगेज – मराठे संबंध ( १९६७ – पां. स. पिसुर्लेकर ) इत्यादी.
मराठेशाहीतील व्यापक समाजजीवनाची आर्थिक व्यवहारांची, धार्मिक कर्मकांडांची, सणांची, कपड्यांची, खेळांची, भांडी-दागिन्यांची, घरे, किल्ले, देवळे, पाटबंधारे, तलाव ह्यांच्या बांधणीची माहिती देणारे प्रमाणभूत ग्रंथ मराठीत फारसे नाहीत. किल्ले पुरंदर ( १९४०, कृ. वा. पुरंदरे ), मोर संस्थान ऐतिहासिक – स्थळ – दर्शन, सिंहगड, शनिवारवाडा, स्वराज्यातील तीन दुर्ग ( अनुक्रमे १९४५, १९४८, १९४९, १९६७- ग. ह. खरे ), रायगडची जीवनकथा ( १९६२, शां. वि. आवळसकर ) असे काही ग्रंथ उल्लेखनीय होत.
महाराष्ट्राचा मध्ययुगीन काळ म्हणजे बहामनी आणि त्यांतून फुटलेल्या शाह्यांचा काळ. बा. प्र. मोडक ह्यांनी बुसातीने सलातीन आणि अन्य काही फार्सी ग्रंथांच्या आधारे …विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा इतिहास ( १८८६ ) लिहिला. बुर्हान – इ – मासिर ह्या फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराचे मराठी रूपांतर अहमदनगरची निजामशाही भ. ग. कुंट्यांनी केले आहे. ( १९६२ ). बुसातीने सलातीन ह्या ग्रंथांचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस ह्यांनी केले होते. ते वा. सी. बेद्रे ह्यांनी संपादिले आहे ( विजापूरची आदिलशाही, १९६८ ). अशी काही उदाहरणे असली, तरी महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळाचा महाराष्ट्रात व्हावा तसा अभ्यास झालेला नाही. याचे एक कारण फार्सींचे सामान्यत: अज्ञान आणि दुसरे समकालीन साधनांचा अभाव.
पाश्चात्य विद्येचे वारे वाहू लागताच महाराष्ट्रातील विद्वान मंडळी प्राचीन इतिहासाच्या साधनांकडे वळली. काही प्राचीन शिलालेख वाचून त्यांचा अर्थ लावणारे पहिले चिकित्सक पंडित म्हणजे आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर. या पंडिताने एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकातून लेख लिहिले. भाऊ दाजी लाड यांनाही ताम्रपट, शिलालेख वाचण्याचा, जुनी नाणी, पोथ्या जमा करण्याचा नाद होता. त्यांनी जमा केलेल्या अवशेषांचा संग्रह मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने जतन करून ठेवला आहे.
महाराष्ट्रात प्राचीन अवशेषांकरिता उत्खनकार्य केलेल्या विद्वानांत सहा-सात विद्धानांची नावे प्रामुख्याने येतात, ती म्हणजे डॉ. सांकलिया, म. ना. देशपांडे, मो. गं. दीक्षित, शां. भा. देव, म. के. ढवळीकर, अ. प्र. जामखेडकर, म. श्री. माटे इत्यादी. या उत्खननाने महाराष्ट्राचा इतिहास अश्मयुगापर्यत पोहोचतो पण हा काळ अंधुक आहे. वेदकालापासून आपण ठसठशीत पायावर उभे राहू शकतो. श्रुतिस्मृतिपुराणे व ताम्रशिलाशासने यांचा अभ्यास करून महाराष्ट्राचा सांसकृतिक इतिहास लिहिणारे पंडित म्हणजे महामहोपाध्यायपांडुरंग वामन काणे, रा. गो. भांडवलकर, देवदत्त भांडारकर, फ्लीट, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इ. होत. यातील काही अंश इंग्रजीत आहे.
काणे यांनी हिंदु धर्मशास्त्राचा इतिहास पाच खंडांत इंग्रजीत लिहून काढला. हा इतिहास सांगताना हिंदु धर्माच्या पुनर्रचनेच्या मार्गदर्शक तत्वांचा वेधही काणे ह्यांनी घेतला आहे. यशवंत आवाजी भट ह्यांनी ह्या ग्रंथाचा सारांशरूपाने दोन खंडात केलेला मराठी अनुवाद महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळानो प्रसिद्ध केला आहे ( १९६७ १९७० ).
महाराष्ट्राच्या सास्कृतिक इतिहासाच्या संदर्भात शं. दा. पेंडसेकृत महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ( १९३१ ) व इरावती कर्वे ह्यांचे मराठी लोकांची संस्कृती ( १९५१ ) ही दोन पुस्तके उल्लेखनीय होत. ‘महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ज्ञानेश्वरादि साधुसंतांचा जितका जिव्हाळ्याचा संबंध आहे, तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त जिव्हाळ्याचा संबंध श्रुतिस्मृतीचा आहे’ अशी भूमिका हा ग्रंथ लिहिताना पेंडसे ह्यांनी घेतलेली असून श्रुति-स्मृती-सूत्रकालीन माहितीची ह्या ग्रंथात अंतर्भूत केलेली आहे. मराठी माणसांच्या संसकृतीच्या काही अंगांचे विवरण करणे, हा इरावतीबाईच्या पुस्तकाचा मुख्य हेतू असला, तरी त्या विवरणाच्या ओघात महाराष्ट्राच्यासांसकृतिक इतिहासाबाबतमहत्त्वाचे उल्लेखयेऊन जातात. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर काम करून श्री. व्यं. केतकर ह्यांनी प्राचीन महाराष्ट्रा शातवाहन पर्व ( १९३५ ) हा ग्रंथ लिहिला. कलाचुरि नृपति आणि त्यांचा काल ( १९५६ ), वाकाटक नृपति आणि त्यांचा काल ( १९५७ ), शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख ( १९७४ ), सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप ह्यांचा इतिहास आणि कोरीव लेख ( १९७९ ) हे महामहोपाध्याय वा. वि. मिराशी ह्यांचे ग्रंथही महत्तवपूर्ण होत. पु. ग. सहस्त्रबुद्धे ह्यांनी इ. स. पू. २३५ ते इ. स. १९४७ पर्यतचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास महाराष्ट्र संस्कृति ( १९७९ ) ह्या आपल्या ग्रंथात सांगितला आहे.
महाराष्ट्राच्या प्राचीन मध्ययुगीन इतिहासाला उपयोगी पडतील अशा उल्लेखनीय ग्रंथांपैकी काही असे : ग. ह. खरेकृत दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने ( ३ खंड, १९३० , १९३४, १९४९ ) मो. गं. दीक्षितसंपादित- विवेचित महाराष्ट्रातील काही प्राचीन ताम्रपट व शिलालेख ( १९४७ ), शं. गो. तुळपुळेलिखित प्राचीन मराठी कोरीव लेख ( १९६३ ), शां. भा. देवांचे महाराष्ट्र : एक पुरातत्वीय समालोचन ( १९६८ ) इत्यादी.
अर्वाचीन कालखंडातील सामाजिक- राजकीय इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने फुले, रानडे, गोखले, टिळक, गांधी, आंबेडकर इत्यादींची मराठीत लिहिली गेलेली चरित्रे उपयुक्त आहेत. उदा., न. चिं. केळकरकृत टिळकचरित्र ( ३ खंड, १९२३, १९२८, १९२८ ), न. र. फाटक ह्यानी लिहिलेले गोपाळ कृष्ण गोखले ह्यांचे चरित्र – आदर्श भारत सेवक ( १९६७ ). धनंजय कीर ह्यांनी लिहिलेले जोतिबा फुले ह्यांचे चरित्र – महात्मा जोतिराव फुले ( १९६८ ).
शं. दा. जावडेकर ह्यांनी लिहिलेला आधुनिक भारत ( १९३८ ) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. पेशवाईच्या अस्तापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यत हिंदुस्थानात- विशेषत: महाराष्ट्रात – ज्या वैचारिक चळवळी झाल्या, त्यांचे विश्लेषण जावडेकरांनी ह्या ग्रंथात केलेले असल्यामुळे तो निव्वळ राजकीय इतिहासाचे निरूपण करणारा ग्रंथ राहिलेला नाही. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सांगणाऱ्या निर्देशनीय ग्रंथांपैकी इंग्रजांनी हिंदुस्थान कसा सोडला? ( रा. गो. भिडे, १९४८ ), भारतीय स्वातंत्र्यसंग्राम ( वसंत नगरकर, १९८१ ) , छोडो भारत ( श्रीपाद केळकर, १९८३ ) आणि सत्तांतर ( गोविंद तळवळकर २ खंड, १९८३ ) हे काही होत.
मराठी भाषेत हिंदुस्थानच्या पलीकडील देशांविषयी एक ओळही ब्रिटिश अमलापूर्वीच्या मराठी वाङ्मयात सापडत नाही, म्हणून म. म. पोतदारांनी खेद व्यक्त केला होता. अलीकडे मध्य आशियातील अठऱाव्या शतकातील अनेक घडामोडींच्या बातम्या देणारे व पेशव्यांकडे आलेले काही फार्सी अखबार मराठी रूपांतरासह ग. ह. खरे यांनी प्रकाशित केले आहेत. तत्पूर्वी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी राष्ट्रकथामाला काढून भारताबाहेरील राष्ट्रांवर ग्रंथ तयार करवून प्रसिद्ध केले. इराण ( १८९३, शंकर विष्णु पुराणिक ), कार्थेज्( १८९३, नागेश आबाजी काथवटे ), तुर्कस्थान ( १८९३, रावजी भ. पावगी ), जर्मनी ( १८९४ , हरि सदाशिव बेलवलकर ), रोम ( १८९६ , विनायक कोंडदेव ओक ), फ्रान्सचा जुना इतिहास ( १८९३, कृ. अ. केळुसकर ) अशी काही पुस्तके या मालेत प्रसिद्ध झाली. विजापूरकरांनी चालविलेल्या ग्रंथमालेनेही फ्रीमनकृत युरोपचे संक्षिप्त इतिवृत्त ( वि. गो. विजापूरकर ), जपान ( १९०५, ग. मो. गोरे), जगातील क्रांतिकारक लढाया ( १९०७ , ज. स. करंदीकर, सर एडवर्ड क्रीसीकृत एका पुस्तकाच्या आधारे ) असे काही ग्रंथ प्रसिद्ध केले. पहिले महायुद्ध झाले तेव्हा आधुनिक जर्मनीची उत्क्रांती ( १९१५ , ना. कृ. आगाशे ), जर्मन साम्राज्याची पुन:स्थापना ( १९२८, वि. ग. आपटे ) हे ग्रंथ तयार झाले. न. चिं. केळकरांचा आयर्लदचा इतिहास ( १९०९ ) व वि. गो. दिघेकृत फ्रेंच राज्यक्रांती ( १९८१ ) हे ग्रंथही उल्लेखनीय होत.
भारताबाहेरील महान व्यक्तींची चरित्रेही मराठीत झालेली असून त्यांतूनही ऐतिहासिक माहिती मिळते. उदा., जॉर्ज वॉशिंग्टन, १८९२, मो. वि. वाळकेकर ), रॉबर्ट क्लाइव्ह ( १८७३, वि. ना. भागवत ), मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन ( २ भाग, १९११ १९१२, कृ. ब. गोडबोले ), एडमंड बर्क ( ना. गो. चापेकर ), जोसेफ मॅझिनी ( १९०७, वि. दा. सावरकर ), लेनिन ( एस्. जी. पाटकर ). लीओ टॉलस्टॉय ( १९७८, सुमती देवस्थळे ).
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने प्रकाशित केलेल्या इतिहास – विषयक ग्रंथांत मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष ( न्या. म. गो. रानडे लिखित राइज ऑफ द मराठा पॉवर ह्या ग्रंथाचा न. र. फाटक ह्यांनी केलेला अनुवाद ), महाराष्ट्रातील दप्तरखाने ( वि. गो. खोबरेकर ) ह्यांचा समावेश होतो. साहित्य संसकृति मंडळाने इतिहासविषयक ग्रंथांना अनुदानही दिले. उदा., स. मा. गर्गे ह्यांनी लिहिलेला करवीर रियासत ( १९६८ ) हा ग्रंथ. १९३४ साली विदर्भ संशोधन मंडळाची स्थापना झाली. १९८४ पर्यत मंडळाने २६ वार्षिके प्रसिद्ध केली. त्यांतूनही इतिहासविषयक लेख प्रसिद्ध झाले. १९६१ पासून विदर्भ संशोधन मंडळाला वार्षिकांच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे अनुदान मिळत आहे.
दिघे, वि. गो.
शास्त्रीय साहित्य : पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजी राज्य महाराष्ट्रात सुरू झाले. त्यानंतर इंग्रजांनी स्वत:बरोबर आणलेल्या विज्ञानाचा प्रभावही महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र दिसू लागला. तेव्हा भारतातील इंग्रजी अधिसत्ता आणि सर्वत्र विज्ञानाचा प्रभाव हे दोन्ही एकदमच सुरू झाले, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे साहजिकच विज्ञानवाङ्मय हे केवळ इंग्रजीतूनच लिहिले जावे, असा जणू संकेत मानला गेला. त्यातच इंग्रजांनी भारतावर मिळविलेल्या वर्चस्वामुळे इंग्रजांचे गुण व वैज्ञानिक नैपुण्य हे पाहून मराठी माणसाच्या मनात एक तर्हेची न्यूनगंडाची भावना घर करून बसली आणि साहजिकच मराठीतून विज्ञानवाङ्मयाची निर्मिती करणे जणू शक्यच नाही असे लोकांना वाटू लागले.
याचा परिणाम असा झाला, की पेशवाई गेल्यानंतर पहिल्या सु. ५० वर्षात वैज्ञानिक विषयावर फारच कमी पुस्तके मराठीतून लिहिली गेली. ह्यात काही अनुवादही होते. ज्या लेखकांनी असे मराठी लेखन वा भाषांतर त्या काळात केले, त्यांच्या स्वभाषाप्रेमाचे कौतुकच केले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचा नामनिर्देशही केला पाहिजे.
वैज्ञानिक पुस्तकांत हरि केशव पाठारे यांचे सिद्धपदार्थविज्ञानशास्त्र – विषयक संवाद ( १८३३ ) गोविंद गंगाधर फडके यांचे यंत्रशास्त्राची मूळे ( १८५३ ), केरो लक्ष्मण छत्रे यांचे पदार्थविज्ञानज्ञास्त्रांतील किती एक विषयांवर व्याख्याने ९ १८५२ ), भाऊशास्त्री थेऊरकर यांनी टॉमस डिककृत अटमॉस्फीअर अँड इट्स फिनॉमेनाच्या आधारे लिहिलेलेवाय्यावरण आणि त्यांतील चमत्कार ( १८५७ ), सखाराम रामचंद्र दीक्षित यांचे शास्त्रीय ज्ञानदर्शन ( डॉ. ब्रूअरकृत गाइड टू सायंटिफिक नॉलेजचे भाषांतर, १८५६ ),कृष्णशास्त्री भाटवडेकर यांचे वर्तमानवाहक विद्युद्यंत्र याचे संक्षिप्त वर्णन ( १८५९ ), आकाशसौंदर्य ( चार्ल्स एफ्. ब्लंटकृत ब्यूटी ऑफ द हेवन्सचे भाषांतर, १८६१ ), कृष्णशास्त्री गोडबोले यांचे ज्योति:शास्त्र ( १८६२ ) आणि बाळाजी नारायण फडके ह्यांनी तयार केलेल्या ‘क्रोनॉमीटरची’ माहिती देणारे कालमापकयंत्रपरिभाषा ( १८७१ ) इ. मोजक्या पुस्तकांचा समावेश होतो.
१८७० – १९०० : पेशवाईच्या अस्तानंतरच्या सु. ५० वर्षाच्या कालावधीत आंग्लशिक्षित मराठी माणसे तयार होत गेली आणि इंग्रजीतून लिहिलेल्या उत्तमोत्तम वैज्ञानिक ग्रंथांशी त्यांची जवळीकही वाढली. अशा वैज्ञानिक इंग्रजी ग्रंथांचा मराठीत अनुवाद करायचे आकर्षणही निर्माण झाले. त्यामुळे १८७५ नंतरच्या पाव शतकात अनुवादित वैज्ञानिक पुस्तकांची भर मराठीच्या ग्रंथभांडारात पडत गेली. अशा अनुवादकांत बाळाजी प्रभाकर मोडक ( १८४७ – १९०६ ), हे प्रमुख होत. ग्यानोकृत पदार्थविज्ञानशास्त्राची मूलतत्वे ( १८९६ ), बालबोध यंत्रस्थितिशास्त्र ( १८९७ ), ऊष्णताशास्त्राची मूलतत्वे ( १८९१ ) ही त्यांची काही उल्लेखनीय आधारित- अनुदानित पुस्तके होत. त्याचप्रमाणे गो. रा. तांबे यांचा मेणबत्तीचा रासायनिक वृत्तांत ( १८९४ ) हादेखील फॅराडेच्या केमिकल हिस्टरी ऑफ अ कँडल या पुस्तकाचा अनुवाद होय.
शंकर बाळकृष्ण दीक्षित ( १८५३ – १८९८ ) यांचा ज्योतिविलास आणि भारतीय ज्योति:शास्त्र ( १८९६ ) हे ज्योतिर्विज्ञानातील दोन बहुमोल ग्रंथ ह्या काळात लिहिले गेले, तसेच वैद्यकशास्त्रात, अनेक भागांचा मिळून शं. दा. पदे ( मृ. १९०९ ) यांनी लिहिलेला वनौषधि – गुणादर्श ( ६ भाग ), हाही याच कालखंडात प्रसिद्ध झाला. ह्या कालखंडातील बरेचसे शास्त्रीय लेखन अनुवादित असले. तरी विषयांची मौलिकता, विविधता या दृष्टीने विज्ञानवाङ्मयाचा हा कालखंड महत्तवपूर्ण ठरतो. सिद्धपदार्थशास्त्र ( १८७८ ) ह्या नावाचे एक त्रैमासिकही ह्या कालखंडात नारायण व्यंकाजी खोत हे संपादित असत. भौतिकी, ज्योतिषशास्त्र, भूविज्ञान, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, ह्यांवरील लेखन त्यात येई. शास्त्र व कला ( १८९९ ) हे शिवराम गोविंद फाळकेसंपादित मासिकही उल्लेखनीय आहे.
१९०१ – १९५० : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने वैज्ञानिक परिभाषेचे छोटे कोश ह्या कालखंडात तयार केले. यशवंत रामकृष्ण दाते ह्यांनी चिं. ग. कर्वे ह्यांच्या साहाय्याने शास्त्रीय – परिभाषा कोश ( १९४८ ) तयार केला. गणेश रंगो भिडे ह्यांनी तयार केलेल्या बालकोशाच्या पहिल्या भागात ( १९४२ ) जगाच्या उत्पत्तीपासून मनुष्याच्या उत्पत्तीपर्यतच्या शास्त्रीय विषयांचा परामर्श घेण्यात आला होता. गो. रा. परांजपे ह्यांनी भौतिकीचा पारिभाषिक शब्दसंग्रह तयार केला ( १९३९ ), तर शं. आ. परांडेकर ह्यांनी वनस्पतिशास्त्राचा ( १९४२ ). विविध वैज्ञानिक विषयांवरील ग्रंथही लिहिले गेले. शंकर दाजी पदे ( त्रिदोषाविचार – २ भाग, १९०२ १९०३) माधव मैराळ सुरतकर ( प्राचीन यंत्रकलासाहित्य , १९०८ ) ग. पां. काळोखे ( अग्निमांद्य – १९११, रोगजंतू, १९१२ , फिरंगरोग व पूयप्रमेह, १९१४, स्त्रियांचे आरोग्य व शिशुपालन, १९२२ ), वेंकटेश बापूजी केतकर ( ग्रहगणित १९१४ ), शिकंदरलाल आतार ( नव्य – विज्ञान अथवा आधुनिक शास्त्रीय जगत्– १९१९ ), कृष्णशास्त्री फडके ( सार्थ सुश्रुतसंहिता – २ भाग, १९२१ १९२४ ) बाळकृष्ण श्रीधर कोलटकर [ सृष्टीशास्त्र ( भूगोल – खगोल ) १९२५ ], गोविंद सदाशिव आपटे ( सर्वानंदलाघव करणग्रंथ – १९३६ ), भारद्वाज ( आइन्स्टाइनप्रणीत सापेक्षदर्शन – १९३६ ), भास्कर धोंडो कर्वे ( आनुवंशिकता – १९४४ ), य. व. पटवर्धन [ चंद्र ( शास्त्रीय ) १९४५ ], अमरप्रकाश गोखले ( परमाणूंच्या युगात – १९४६ ), ना. वा. कोगेकर ( सूर्यावरील डाग – १९४८ ) आणि क. वा. केळकर ( दगडी कोळसा – १९४८ ) हे असे ग्रंथ लिहिणाऱ्यांपैकी काही होत.
परंतु या कालखंडातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मराठीतील वज्ञानिक नियतकालिकांच्या लक्षणीय प्रमाणावर प्रारंभ ही होय. या नियतकालिकांत शेतकी आणि शेतकरी हे नियतकालिक १९१० मध्ये पुण्यात सुरू झाले आणि ते कृषिविज्ञानाला वाहिलेले आहे. त्यानंतर १९१९ मध्ये मराठीत दुसरे नियतकालिक उद्यम याचा प्रारंभ नागपूरमध्ये झाला. हे नियतकालिक मुख्येत्वेकरून विविध उद्योगधंद्यांची हिती सामान्य मराठी वाचकांना देण्यासाठी निघालेले असले, तरी त्यात रसायनशास्त्र, अभियांत्रिकी ह्यांसारख्या विषयांवरही लेख दिले जाऊ लागले. त्यानंतर सष्टिज्ञानाचा उल्लेख आवश्यक आहे. त्यांचा प्रारंभ १९२८ मध्ये झाला. या मासिकातील लेख वैज्ञानिक संशोधनाची माहिती सामान्य जनांना पोहोचावी अशा पद्धतीने लिहिलेले असतात. विशेष म्हणजे या तीनही नियतकालिकांनी आजतागायत आपले कार्य चालू ठेविलेले आहे. ह्या कालखंडातील अन्य नियतकालिकांत नाविन्य ( १९३१ , व्यापार, उद्योगधंदे ह्यांप्रमाणेच रसायनशास्त्र अभियांत्रिकी इ. भौतिक शास्त्रांना वाहिलेले ). शास्त्रीय जगत्( १९३९, उद्योगधंदे, व्यापार, शेतकी व आधुनिक शास्त्रे ह्यांच्यासाठी ), आयुर्वेदपत्रिका ( १९४७ ) ह्यांसारख्या नियतकालिकांचा समावेश होतो.
१९५० नंतर : अमेरिकेने उडविलेले अणुबाँब आणि रशियाने सोडलेला स्पुटनिक यांमुळे सर्वत्र अणुयुग आणि अंतराळयुग यांचा प्रारंभ झाला आणि सर्वच पाश्चात्य भाषांतून वैज्ञानिक लेखन विपुल लिहिले जाऊ लागले. त्याचे पडसाद मराठीतही उठले. अणुबाँबच्या अणुऊर्जेचे रहस्य व अंतराळयुगातील चंद्रावरील स्वारीचे शास्त्रीय गुपित जाणून घेण्याची जिज्ञासा सामान्य वाचकांच्या मनात जागृत झाली. या जिज्ञासेची तृप्ती करण्यासाठी झालेल्या वैज्ञानिक लेखनामुळे मराठीतील वैज्ञानिक वाङ्मय हळुहळु समृद्ध होऊ लागले. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात शालान्त परीक्षेपर्यत मराठीतून विज्ञान शिकविण्यास उत्तेजन मिळू लागले. त्याचा परिणाम म्हणजे केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने विज्ञान परिभाषेचा कोश तयार करण्याचे कार्य हाती घेतले. शिवाय पुणे विद्यापीठानेही असाच परिभाषेचा कोश तयार केला. १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाची स्थापना झाली आणि त्या मंडळानेही या कार्याला हातभार लावला…
विश्वकोशाच्या प्रारंभ हे या साहित्य संस्कृति मंडळाचे सर्वात बहुमोल कार्य होय. डॉ. केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानंतर नवीन, अद्ययावत ज्ञानकोशाची आवश्यकता होती, ती या श्वकोशातून पुरी होण्याची संधी प्राप्त झाली. साहित्य संस्कृति मंडळाने काही वैज्ञानिक विषयांवर उत्तम पुस्तकेही प्रकाशित केली. उदा., रेडिओ दुरूस्ती (१९६६ ) – श्री. वि. सोवनी अणुयुग ( १९६९ ) – संपा. डॉ. वि. त्र्यं. आठवले वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा ( १९६९ ) – गो. रा. परांजपे. १९६९ मध्ये महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाची स्थापना झाली आणि त्या मंडळाने महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांचे मराठीतून लेखन करवून घेतले. त्यामुळे पदवी परीक्षेपर्यतच्या अभ्यासक्रमाची वैज्ञानिक विषयांवरील पाठ्यपुस्तके मराठीतून उपलब्ध होऊ लागली. उदा., इंधने, भट्ट्या व उतपमापके ( १९७३ ) – य. वि. देशमुख स्फटिकविज्ञान ( १९७६ ) मालती वर्तक स्थुणा : शास्त्र व तंत्र ( १९८० ) – माधव पाटणकर.
या सर्व प्रयत्नांतून या कालखंडातील वैज्ञानिक वाङ्मयाची निर्मिती विविध विषयांत होत गेली. अशा विषयांत भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, स्थापत्यशास्त्र, गणितशास्त्र, कृषिशास्त्र, आहार आणि आरोग्यशास्त्र, वनस्पतिशास्त्र, गृहविज्ञान, अभियांत्रिकी आणि इतर अनेक शास्त्रांचा अंतर्भाव होतो. या वाढीला हातभार लावण्याचे कार्य मुंबई येथील ( युसीस ) या अमेरिकन संस्थेने फारच चांगल्या तर्हेने केले. उत्तम अमेरिकन वैज्ञानिक ग्रंथांचे अनुवाद मराठीतून करण्यासाठी त्यांनी प्रकाशकांना व चांगल्या लेखकांना प्रोत्साहन दिले. या उत्तेजनामुळे सामान्यपणे मराठीतून एरव्ही प्रसिद्ध झाली नसती, अशी तांत्रिक विषयांवरील पुस्तके मराठीतून निघू शकली. युसिससाठी अमेरिकन वैज्ञानिक ग्रंथांचे अनुवाद करणाऱ्यांत चिं. श्री. कर्वे, ना. वा. कोगेकर, प. म. बर्वे ह्यांचा समावेश होतो. त्यांनी अनुवादिलेली काही पुस्तके अशी : चिं. श्री. कर्वे ( मानवाचे भवितव्य, १९५८ तारका, मानव आणि अणू, १९६४ सूर्य : जन्म आणि मृत्यू, १९६६ विराट विश्वाची निर्मिती, १९६६ ) ना. वा. कोगेकर ( आपल्या ग्रहमालेतील नवग्रह, १९६६ सर्व विज्ञान परिचय, दोन भाग, १९६८ ) प. म. बर्वे ( अवकाशयात्रा, १९६४ एक ग्रह, नाव त्याचे पृथ्वी, १९६६ ).
त्याचप्रमाणे या कालखंडात मराठी वृत्तपत्रे व नियतकालिके यांनी वैज्ञानिक लेखांना विशेष, प्रसिद्धी देऊन जनतेत एक प्रकारची विज्ञानजागृती सुरू केली. त्यांच्या सहकार्यामुळे सामान्य माणसांच्या दैनंदिन वाचनात विज्ञानलेखांना प्रवेश मिळाला. प्रारंभी हे कार्य रविवाराचा केसरी, सह्याद्रि आणि किर्लोस्कर मासिकाने सुरू केले. त्यामुळे काही चांगली लेखक मंडळी वैज्ञानिक लेखन वारंवार करू लागली आणि तीच पुढे प्रथितयश वैज्ञानिक लेखक म्हणून प्रसिद्ध झाली. याच लेखकांनी पुढे बहुसंख्येने मराठीतील वैज्ञानिक ग्रंथनिर्मिती करून मराठी वाङ्मयात बहुमोल भर घातली.
महाराष्ट्र शासनानेही नामवंत मराठी ग्रंथांना वार्षिक राज्यपुरस्कार देण्याची पद्धत सुरू करून उत्तम लेखकांचा गौरव करण्याची प्रथा सुरू केली. त्यात वैज्ञानिक लेखनाचाही अंतर्भाव असल्यामुळे ही प्रथा मराठीतील वैज्ञानिक लेखनाला प्रोत्साहक ठरली. नागपूर विद्यापीठाने डॉ. रघुवीर ह्यांच्या पारिभाषिक संज्ञांचा उपयोग करून भौतिकी, गणित इ. विषयांतील पाठ्यपुस्तके प्रसिद्ध केली. उदा., माध्यमिक – यामरैखिकी ( १९५१ ) हा एन्. एस. क्षीरसागरकृत इंग्रजी ग्रंथाचा य. वि. ठोसरकृत अनुवाद.
अशा सर्व प्रयत्नांतून आतापर्यत मराठी विज्ञान वाड्मय १९५० पूर्वीच्या मानाने चांगले समृद्ध झाले. त्यातच आता विज्ञानकथांचा प्रारंभ झाला आहे. विज्ञान व वैज्ञानिक साहित्य ह्यांबद्दलचे आकर्षण ह्या कथांतून वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इयूल्स व्हेर्न यांच्या वैज्ञानिक कादंबऱ्यांचे रूपांतर व अनुवाद करून भा. रा. भागवत यांनी ह्या संदर्भात मोलाची भर घातली आहे. त्याशिवाय त्यांच्या जोडीला इतरही लेखक मंडळींनी मर्यादित परंतु चांगले रंजक विज्ञान वाङ्मय लिहिले आहे. किर्लोस्कर मासिकाने डॉ. जयंत नारळीकरांसारख्या उत्तम संशोधकाच्या विज्ञानकथा छापून या वाड्मयाला प्रोत्साहन दिले. याच कथा आता यक्षाचे देणे या पुस्तकात एतत्रित प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत.
विज्ञान-वाङ्मयाची विविधता आता निरनिराळ्या दिशेने वाढू लागली आहे. विविध तांत्रिक विषयांवरील पुस्तके आता प्रसिद्ध होत आहेत. या उपक्रमाला पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशनानेही काही हातभार लावला आहे. तेव्हा आताचे मराठी विज्ञान वाङ्मय तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही वाढत आहे. आजतागायत दोन ते अडीच हजार छोटी पुस्तके उपलब्ध असावीत, असा अंदाज आहे. परंतु याच काळात इंग्रजीतून प्रसिद्ध होणाऱ्या वैज्ञानिक ग्रंथाचा आकडा लक्षांत घेतला, तर मराठीतील विज्ञान-वाङ्मय अजून बाल्यावस्थेतच आहे, असे म्हणावे लागते.
आधुनिक विज्ञाने आणि तंत्रविद्या ह्यांतील शाखोपशाखांतील अनेक विषयांवरील नोंदी मराठी विश्वकोशात अकारविल्हे अंतर्भूत केलेल्या आहेत. वैज्ञानिक भाषा आणि परिभाषा ह्या दृष्टीने मराठी विज्ञानवेत्त्यांनी केलेले हे विश्वकोशीय लेखन मराठीतील शास्त्रीय वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानवा लागेल. मराठी विश्वकोशाचा अठरावा खंड हा परिभाषासंग्रह असून त्यात अनेक वैज्ञानिक संज्ञांचे मराठी पर्याय दिलेले आहेत.
शेतकरी ( १९६५ ), मराठी विज्ञान परिषद पत्रिका ( १९६८), विज्ञानयुग ( १९६८ ), बळिराजा ( १९७० ) ह्यांसारख्या नियतकालिकांनीही महत्त्वाचे कार्य केले आहे.
कर्वे , चिं. श्री.
यापुढील भाग मराठी साहित्य (अर्वाचीन-५) मध्ये पहा.