नरकुल: (नल गु. नली क. हुळुगिळु इं. कॉमन रीड ग्रास लॅ. फ्रॅग्माइटिस रॉक्सबर्घाय, फ्रॅग्माइटिस कार्का कुल-ग्रॅमिनी). हे सामान्य, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, जपान, अफगाणिस्तान, सिंध, श्रीलंका, ब्रह्मदेश, आग्नेय आशिया व भारत (महाराष्ट्र, तमिळनाडू, प. बंगाल व हिमालयाची उतरण) इ. प्रदेशांत ओलसर जागी आढळते. याचे जाडजूड मूलक्षोड (जमिनीतील खोड) जमिनीत आडवे वाढते त्यापासून वायवी (हवेतील), उंच, पेरेदार, पोकळ व बाहेरून गुळगुळीत असणारे खोड (संधिक्षोड) सु. ६ मी. पर्यंत उंच वाढते त्याच्या कांड्यांवर पर्णतलांचे (पानांच्या तळांचे) आवरण असते. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनी कुलात (तृण कुलात) व ⇨ ग्रॅमिनीलीझ गणात (तृण गणात) वर्णिल्याप्रमाणे असतात. पाने साधी, अरुंद (६२ X ४ सेंमी.) पण कांड्यांपेक्षा लांब, चिवट, गुळगुळीत व अखंड असतात. फुले एकदाच हिवाळ्यात येतात. फुलोरा (परिमंजिरी) सु. ६० सेंमी. लांब व भुरकट असून सरळ उभा वाढतो. कणिशके केसाळ, प्रशूकहीन लघुतुषे दोन, कधी तीन केसरदले बहुधा तीन, किंजले दोन व आखूड [→ फूल]. कृत्स्नफळ (शुष्क, एकबीजी फळ) आयत. खोडापासून बासऱ्या, नळ्या, खुर्च्या, लेखण्या, परड्या व चटया तयार करतात कागदनिर्मितीसाठी खोड वापरतात खोड व फुलोऱ्याचे दांडे यांपासून मिळणाऱ्या धाग्यांचे दोर बनवितात. फुलोरा वाळल्यावर त्याच्या झाडण्या बनवितात कोवळी झाडे गुरांना खाऊ घालतात. ‘सामान्य बोरू’ (फ्रॅग्माइटिस कॉम्पूनिस) ही जाती बागेत शोभेकरिता कुंपणाच्या कडेने लावतात. काहींच्या मते ही जाती वरील जातींपेक्षा औषधी गुणांच्या दृष्टीने वेगळी नाही. ही जाती पूर्व आशियात आणि काश्मीर व गढवाल येथे आढळते. ती संधिवातावर वापरतात तसेच खोड व मुळे वांतिरोधक (ओकारी थांबविणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी) व ज्वरहर (तापनाशक) असून ती मधुमेहावर देतात. हाड मोडल्यास मुळांचा उपयोग करतात. हे गवत लावल्यास जमिनीची धूप थांबते.
पहा : गवते.
ठोंबरे, म. वा. परांडेकर, शं. आ.