शेरिडन, रिचर्ड ब्रिंझली : (३० ऑक्टोबर १७५१ – ७ जुलै १८१६). प्रसिद्ध अँग्लो-आयरिश नाटककार, वक्ता आणि नाट्यगृह-व्यवस्थापक. डब्लिन (आयर्लंड) येथे जन्म. हॅरो विदयालयात शिक्षण. लंडन सोडून बाथ शहरात तो स्थायिक झाला. तेथेच एलिझाबेथ लिनली नावाच्या तरूणीच्या तो प्रेमात पडला. त्याच वेळी त्याचा भाऊ चार्ल्स आणि मित्र हॉलहेड हेही तिच्यावर फिदा झाले होते परंतु मेजर मॅथ्यू या अत्यागही व्यक्तीमुळे ती हैराण झाली असता रिचर्डने तिला मदत केली आणि मॅथ्यूचा अडथळा दूर करून पुढे त्याने तिच्याशी लग्न केले (१७७३). उपजीविकेसाठी तो नाट्यक्षेत्राकडे वळला. द रायव्ह्ल्स ही त्याची पहिली सुखात्मिका. तिचा पहिला प्रयोग (१७७५) यशस्वी झाला नाही पण सुधारून सादर केलेला दुसरा प्रयोग चांगलाच गाजला. त्याच वर्षी त्याने सेंट पॅट्रिक्स डे (किंवा द स्किमिंग लेफ्टनंट) हा फार्स आणि द ड्यूएना हे संगीत नाटक सादर केले. त्या काळचा प्रसिद्ध नट ⇨ डेव्हिड गॅरिक याच्या ड्रूरी लेन या नाट्यगृहाचे समभाग त्याने विकत घेतले आणि त्या नाट्यगृहाचा तो व्यवस्थापक झाला. पुढे त्याने नाट्यगृहाचे पूर्ण अधिकार खरेदी केले. अठराव्या शतकातील इंग्रजी सुखात्मिकांत झालेल्या भावविवशतेच्या अतिरेकाविरूद्ध गोल्डस्मिथबरोबरच त्यानेदेखील आवाज उठविला पण गोल्डस्मिथची शैली निखळ विनोदी एलिझाबेदन परंपरेकडे वळणारी, तर शेरिडनची शैली संभाषणचातुर्य व उपरोध यांतून आचारविनोदिनीशी (कॉमेडी ऑफ मॅनर्स) नाते सांगणारी. सौम्य आणि सभ्यपणे लोकांच्या कृत्रिम वर्तनाची कशी टवाळी करावी, हे तंत्र शेरिडनने चांगलेच आत्मसात केले होते. द रायव्ह्ल्स मधील मिसेस मॅलप्रॉप हे पात्र त्याने अजरामर केले आहे. जुन्याच कथानकातून उत्कृष्ट नाट्य निर्माण करण्यात तो वाकबगार होता. द ड्यूएना मध्ये त्याने हे दाखवून दिलेले आहे. द ड्यूएना चे ७५ प्रयोग झाले. हा त्या काळचा एक उच्चंकच होता. द स्कूल फॉर स्कँडल (१७७७) या नाटकामुळे शेरिडनला लोक आधुनिक काँगीव्ह म्हणू लागले. [→ काँगीव्ह, विल्यम]. बकिंगहॅमच्या द रिहर्सल वरून स्फूर्ती घेऊन त्याने द किटिक हे नाटक लिहिले. त्यात तत्कालीन नाट्यतंत्राचे भरपूर विडंबन केलेले आहे. एका जर्मन नाटकावर आधारलेली पिझारो (१७९९) ही गद्य शोकात्मिकाही त्याने लिहिली.त्यानंतर त्याने नाट्यक्षेत्र सोडले व स्टॅफर्ड येथून १७८० मध्ये तो ब्रिटिश संसदेवर निवडून गेला. शेरिडन महत्त्वाकांक्षी होता पण अनिर्बंध जीवनामुळे तो राजकारणात आपले स्थान टिकवू शकला नाही. ड्रूरी लेन नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी त्याने मोठी रक्कम उभारली पण १८०९ मध्ये ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शेरिडनचे शेवटचे दिवस हलाखीत आणि कर्जबाजारीपणात गेले.
लंडन येथे आजारीपणात त्याचे निधन झाले.
पहा : इंग्रजी साहित्य.
संदर्भ : 1. Gibbs, Lewis, Sheridan: His Life and His Theatre, Kennikat, 1970.
2. Price, Cecil, Ed. The Letters of Richard Brinsley Sheridan, 3 Vols. 1966.
कळमकर, यशवंत शं.