शेरपा : नेपाळमधील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे एव्हरेस्ट व लोत्से या हिमालयाच्या अतिउंच पर्वतरांगांत असून इतरत्रही विशेषत: भारतातील दार्जिलिंग जिल्ह्यात (प. बंगाल) ती आढळते. ‘ पूर्वेकडील रहिवासी ’ या अर्थाच्या शर-पा या मूळ तिबेटी शब्दांपासून शेरपा हा शब्द बनलेला आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय सोपान-शेती व पशुपालन असून काही शेरपा गिर्यारोहकांना मार्गदर्शन व मदत करतात. काही शेरपा गिर्यारोहकांच्या एव्हरेस्ट मोहिमेत सामील झाले. ⇨ शेरपा तेनसिंग हा एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट सर करणारा पहिला शेरपा होय. गहू, बटाटे, बार्ली इ. पिके शेरपा काढतात. याक व गायी यांचे कळप ही त्यांची मोठी संपत्ती असून दही, ताक व लोणी यांचा व्यापार ते करतात. त्याचप्रमाणे लोकरीच्या विणकामाचा धंदा मोठा असून तिबेटात अशा वस्त्रांना विशेष मागणी आहे. शेरपा ही त्यांची मातृभाषा तिबेटी-ब्रह्मी भाषासमूहातील असून १९८१ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये १४,१९५ व्यक्ती शेरपा भाषिक होत्या.

शेरपा दांपत्य

शेरपांच्या अठरा कुळी असून कुळीला ‘ रू ’ म्हणतात. त्यांत पुन्हा पोटकुळी आहेत. प्रत्येक कुळ अंतर्विवाही गट असतो. या कुळींबाहेरच्या शेरपांना खंबा म्हणतात. त्यांतही पुन्हा खड्यू व खमेंड्यू असे दोन पोटभेद आहेत. प्रत्येक कुळीचे कुलदैवत वेगळे असून सर्व दैवतांचा अंतर्भाव ‘ झिद्‌ग ’ म्हणजे भूतदेवता या वर्गांत केला जातो. त्यांच्यांत आते-मामे-मावस भावंडांत लग्नसंबंध होत नाहीत. सामान्यतः विसाव्या वर्षांनंतर विवाह ठरतात. त्यामुळे मुलेमुली स्वतःच लग्न ठरवितात. लग्न ठरल्यानंतर डेम-चंग नावाचा वाङ्‌निश्चयविधी होतो. त्यानंतर लामांकडून शुभ दिवस काढून लग्नविधी होतो. त्यास ग्येन-कुटोप म्हणतात. हा विधी यथावकाश म्हणजे कधीकधी दोनतीन वर्षांनी संपन्न होतो तोवर वाङ्‌निश्चय झालेल्या जोडप्यास एकदोन मुलेही झालेली असतात पण समाजाची त्यास मान्यता असते. लग्नात वधूमूल्य व भेटवस्तू देतात. ते पूर्णतः स्त्रीधन म्हणून वधूला मिळते. त्यांच्यांत घरजावयाची प्रथा आहे. तसेच बहुपतिकत्वही आढळते मात्र लग्न ठरविताना हे निश्चित करावे लागते. पतिपत्नींची सहमती असेल, तर घटस्फोट चटकन मिळतो तसे नसेल तर दंडाची भरपाई करावी लागते. त्याला ‘ फारेजाल’ म्हणतात. शेरपा स्त्रीला स्वातंत्र्य व मानाचे स्थान असते. व्यभिचार हे पाप मानले जाते पण दंड व मद्य देऊन त्याचे क्षालन होते. अनौरस मुलांना समाजात सामावून घेतात व त्यांना संपत्तीत वाटा मिळतो.

शेरपांची पंचायत सभा जमातीमधील तंटेबखेडे मिटविते. पेम्बू या प्रतिनिधीव्दारे शासकीय कर भरला जातो. बहुसंख्य शेरपा महायान बौद्ध पंथाचे अनुयायी असून लामा हा त्यांचा मुख्य धार्मिक गुरू आहे. भुता-खेतांवर त्यांचा विश्वास असून त्यांच्या कोपामुळे रोगराई, दुष्काळ इ. संकटे उद्‌भवतात, अशी त्यांची समजूत आहे. त्यांचे निवारण करण्यासाठी विशिष्ट दैवतांची (त्यांना श्रिंडी म्हणतात) ते आराधना करतात. त्यांच्यांत त्सिरिम, दुमजे, येर-चंग, मणि-रिम्डू हे सण प्रसिद्ध असून सर्वांत मोठा दुमजे हा सण आठ दिवस चालतो. त्सिरिम हा कृषिव्यवसायाशी निगडित विधी आहे. येर-चंग हा पशुपालनाशी निगडित आहे. मणि-रिम्डू हा सण दुमजेप्रमाणेच असून तो बौद्ध मठात भिक्षूंच्या सहकार्याने करतात. याप्रसंगी काहींच्या अंगात देवतांचा संचार होतो, अशी समजूत आहे.

शेरपांत मृत व्यक्तीला पांढऱ्या वस्त्रात गुंडाळतात. नंतर लामा येऊन प्रार्थना म्हणतो व मृताच्या डोक्यावरील थोडे केस उपटतो. तेथून मृताचा आत्मा बाहेर पडतो, अशी त्यांची समजूत आहे. पुढे तीन दिवस प्रेत बसवून ठेवतात. तिसऱ्या दिवशी त्याचे दहन करतात. लहान मुलांना पुरतात. कधीकधी लामांच्या सल्ल्यानुसार मृत प्रौढासही पुरतात. सातव्या अथवा अकराव्या दिवशी नपूर नावाचा विधी करतात. त्या दिवशी मृताची प्रतीकात्मक आकृती करून तीवर त्याचे कपडे ठेवतात व लामा मंत्राचे पठण करतो. त्यानंतर मृतात्म्यास नैवेद्य अर्पण करून त्याचा आत्मा स्वर्गात जावो, अशी प्रार्थना लामा करतो. नंतर सर्व उपस्थितांना जेवण देण्यात येते.

संदर्भ : 1. Furer-Haimendorf, Christoph Von, The Sherpas of Nepal, London, 1974.

             2. Furer-Haimendorf, Christoph Von, The Sherpas Transformed: Social Change in Buddhist Society of Nepal, New Delhi, 1984.

             3. Risley, H. H. The Tribes and Castes of Bengal, Calcutta, 1981.

देशपांडे, सु. र.