शेफील्ड : इंग्लंडच्या उत्तरमध्य भागातील साउथ यॉर्कशर या महानगरीय क्षेत्रातील काउंटी बरो आणि एक प्रगत औदयोगिक नगर. लोकसंख्या ५,१३,००० (२००३). मँचेस्टरपासून पूर्वेस ६४ किमी. अंतरावर पेनीन या निसर्गरम्य डोंगराळ प्रदेशात हे वसले आहे. जवळच डॉन नदीला तिच्या शीफ, पोर्टर, रिव्हेलिन व लॉक्स्ली या चार उपनदया येऊन मिळतात. अँग्लो-सॅक्सन काळात याला नगराचा दर्जा मिळाला. मध्ययुगीन काळापासून येथे लोणारी कोळशाबरोबर लोहखनिजाचे उत्पादन होत असे. चौदाव्या शतकापासून उत्तम प्रतीच्या कात्र्या, सुऱ्या इ. उत्पादनांसाठी हे प्रसिद्ध आहे. कटलरी उत्पादकांचे नियामक मंडळ म्हणून काम पाहणाऱ्या ‘ कटलर्स कंपनी ’ची १६२४ मध्ये येथे स्थापना करण्यात आली. औदयोगिक क्रांतीच्या काळात शेफील्डचा विकास वेगाने झाला. हेन्री बेसिमर याने शोधून काढलेल्या बेसिमर पद्धतीचा पहिला पोलाद-कारखाना १८५९ मध्ये येथे उभारण्यात आला. येथेच १९१४ मध्ये अगंज पोलाद (स्टेनलेस स्टील) निर्मितीच्या प्रक्रियेचा शोध लागला. चांदीचे पट्ट, विद्युत् विलेपनयुक्त वस्तू , हत्यारे, सर्व प्रकारची पोलाद-उत्पादने, तोफखाना व रेल्वेसाठीचे साहित्य, चांदीच्या मुलाम्याची भांडी, चहाची भांडी, मेवामिठाई, अन्न प्रक्रिया, कापड, कागद, सायकली, रंग, रसायने इ. निर्मिती उदयोगधंदे शहरात चालतात. शहरात आकर्षक सार्वजनिक इमारती, आधुनिक व्यापारी व औदयोगिक संकुले, सुंदर उद्याने व इतर प्रेक्षणीय स्थळे आढळतात. शहरातील वेधशाळा, शहर संगहालय, मॅपीन कलावीथी, गेव्हज कलावीथी, पॅरिश चर्च (बारावे शतक), नगरभवन (१८९७), शेफील्ड विदयापीठ (स्था. १९०५), शेफील्ड तंत्रनिकेतन इ. उल्लेखनीय आहेत. १९७४ मध्ये साउथ यॉर्कशर या महानगरीय काउंटीचा शेफील्ड हा एक भाग बनला.
चौधरी, वसंत