सहानुभूति : ( सिम्पथी ). सहानुभूती ( सह + अनुभूती ). दुसऱ्याच्या भावनिक अनुभवात सहभागी होण्याची प्रवृत्ती किंवा वर्तनप्रक्रिया. उदा., दुसऱ्याच्या सुखाने सुखावणे, दु:खाने द्रवणे इत्यादी. ⇨विल्यम मॅक्डूगल ह्या मानसशास्त्रज्ञाच्या मते सहानुभूती ही एक निसर्गदत्त, स्वाभाविक वर्तनप्रक्रिया आहे. समूहात राहणाऱ्या प्राणिजातीमध्ये ती प्रकर्षाने आढळून येते. उदा., हरिणांच्या कळपामध्ये एखादे हरिण भेदरून सैरावैरा धावताना पाहताच त्या कळपातील इतर सर्व हरिणे घाबरून चौफेर उधळतात. कोल्हेकुई हे अशाच वर्तनप्रकाराचे उदाहरण होय. मानवजातीमध्येही भूकंप, महापूर इ. प्रसंगी घबराट उत्पन्न होते आणि मोठमोठे जनसमूह हवालदिल, चिंतागस्त होतात. येथे त्यांच्या भावनांचे नकळत वितरण व संक्रमण होत असते. प्राणिजातींच्या स्वास्थ्य-संरक्षणासाठी निसर्गाची ही योजना आहे. एका प्राण्याच्या सहजप्रवृत्त वर्तनाच्या निरीक्षणाने वा संवेदनाने दुसऱ्या प्राण्यातही त्याच सहजप्रवृत्तीचे उद्दीपन व्हावे व दोघांमध्ये समान भावनिक अनुभव व समान कृतिप्रेरणा उत्पन्न व्हाव्यात, हे ह्या निसर्गयंत्रणेचे सामान्य स्वरूप होय.
अक्रियाशील ( पॅसिव्ह ) आणि क्रियाशील ( ॲक्टिव्ह ) असे सहानुभूतीचे दोन प्रकार आहेत. भूकंप, महापूर अशा आपत्तींच्या प्रसंगी माणसांमध्ये निर्माण होणारी घबराट आणि चिंता, हवालदिल होणारे जनसमूह ह्यांच्या मनात निर्माण होणारी सहानुभूती वा सह + अनुभूती ही अक्रियाशील ह्या प्रकारात मोडते. कारण अशा प्रसंगी माणसे परस्परांविषयी दयाबुद्धी दाखवीत नाहीत, तर त्यांच्या भावनांचे नकळतच वितरण व संक्रमण होऊन ही सह + अनुभूती निर्माण होत असते. पण दुसऱ्याच्या संकटप्रसंगी आपण जेव्हा मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा ती क्रियाशील सहानुभूती असते. तिच्या मागे आदर, प्रेम, कनवाळूपणा अशा भावना असतात. एखादा माणूस सहानुभूतिशून्य आहे, असे जेव्हा व्यवहारात आपण म्हणतो तेव्हा त्याच्यापाशी ही क्रियाशील सहानुभूती नाही, असेच आपल्याला म्हणायचे असते. क्रियाशील सहानुभूती ही फक्त विकसित मानवजातीतच आढळते कारण ती एक संपादित प्रवृत्ती आहे नैसर्गिक नव्हे. तसेच सहानुभूतीचा हा मानव-विशिष्ट क्रियाशील प्रकार माणसांच्या सामाजिक वर्तनाच्या संदर्भातच दिसून येतो.
क्रियाशील सहानुभूती ही समूहप्रवृत्तींशी निगडित असते. ज्या व्यक्तींमध्ये समूहप्रवृत्ती प्रभावी असते, अशा व्यक्तीला आपले सुखही वाटून घ्यावेसे वाटते. उलट ज्या व्यक्तीत समूहप्रवृत्ती क्षीण असते, अशा व्यक्तींमध्ये क्रियाशील सहानुभूती फारशी आढळत नाही.
सामाजिक जीवनाच्या स्थैर्यासाठी आणि एकात्मतेसाठी क्रियाशील सहानुभूती उपयुक्त ठरते. तिच्यामुळे समाजातील व्यक्तींमधील आंतर-क्रियात्मक सामाजिक संबंध प्रेमाचे आणि आत्मीयतेचे होतात.
क्रियाशील सहानुभूती फक्त आपले कुटुंब, आपली जात, आपला धर्म, आपले राष्ट्र ह्यांच्यापुरतीच जेव्हा ठेवली जाते, तेव्हा त्या-त्या वर्तुळाबाहेरील व्यक्तींविषयी असहिष्णुता किंवा उदासीनता निर्माण होते. म्हणून ह्या सहानुभूतीचे क्षेत्र जेवढे विशाल होत जाईल, तेवढे ते मानवजातीच्या कल्याणाचे ठरेल.
हरोलीकर, ल. ब.