संथाळ दांपत्यसंथाळ : पूर्व भारतातील एक प्रमुख आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे झारखंड, बिहार, ओरिसा आणि प. बंगाल राज्यांत असून आसाम, मिझोराम वत्रिपुरा येथेही ती काही प्रमाणात आढळते.या शिवाय बांगलादेश (लोक.६५,०००) वनेपाळ ( लोक.१०,०००)येथे त्यांची वस्ती आढळते. लोकसंख्येच्या दृष्टीने ही भारतातील तिसऱ्या कमांकाची मोठी जमात असून तिची लोकसंख्या ५३,८०,००० होती (२०००).

संथाळांच्या साहित्यात त्यांचा संथाळ, सांथाळ, संताळ, सावंतार, सावंताळ इ. नावांनी उल्लेख केल्याचे आढळते. त्यांच्या उत्पत्तीविषयीही अनेक दंतकथा प्रचलित आहेत. रामायणात संथाळांच्या पूर्वजांनी राम-लक्ष्मणांना सहकार्य केल्याचा उल्लेख मिळतो. त्यांच्या मूलस्थाना-विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि त्यांची वस्ती प्रथम गंगेच्या खोऱ्यात झाली व नंतर त्यांनी झारखंड राज्यातील छोटा नागपूर ( पालामाऊ,  हजारीबाग,धनबाद, रांची, पूर्व व पश्र्चिम सिंगभूम हे जिल्हे असलेला प्रदेश) या पठारी-जंगली प्रदेशात स्थलांतर केले असे दिसते. इंग्रजांनी जंगल-  तोड सुरू केल्यानंतर ते ईशान्येकडे सरकले. दमिन-इ-कोह हे त्यांचे मुख्य केंद्र बनले. इंग्रजांनी जंगलतोडीत त्यांचा चांगला उपयोग करून घेतला. संथाळांकडे बृयापैकी जमीनजुमला होता पण एकोणिसाव्या शतकारंभी व्यापारी व महाजन सावकार यांनी संथाळांची पिळवणूक करून कर्जफेडीच्या पोटी त्यांच्या जमिनी बळकावल्या आणि त्यांना गुलाम बनविले. परिणामत: संथाळांनी १८५४ मध्ये बंड केले आणि सावकारी नष्ट करावी व जमिनीवरील कर कमी करावा, अशा मागण्या केल्या. इंग्रजांनी त्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा त्यांनी सशस्त्र उठाव करून तिरकमठयाच्या साह्याने अनेक इंग्रजांना मारले. अखेर इंग्रजांच्या लष्कराने हा उठाव मोडला आणि त्यांची दुर्दशा केली परंतु त्यांच्या उद्रेकाचा परिणाम म्हणून पुढे भूदासपद्धती बंद करून स्वतंत्र संथाळ परगणा निर्माण करण्यात आला. प्रत्येक खेडयात मांझी ( पाटील ) अधिकारी नेमून त्यास पोलिसी अधिकार देण्यात आले. याच सुमारास आसाम-बंगालमध्ये चहाचे मळे सुरू झाले. त्यावेळी मळेवाल्यांनी मजूर म्हणून संथाळांची मोठया प्रमाणावर भरती केली. संथाळांचा प्रमुख व्यवसाय शेती असून ते शिकार, मच्छीमारी, गुरे पाळणे इ. उदयोगही करीत. पुढे त्यांनी खाणीतूनकाम करण्यास सुरूवात केली. आसनसोलजवळच्या किंवा जमशेटपूरमधील कोळशाच्या खाणीतून ते प्रामुख्याने काम करतात. दगडी कोळसा फोडण्यात संथाळांनी प्रावीण्य मिळविलेले दिसून येते.

मध्यम उंची, बांधेसूद शरीरयष्टी, कृष्णवर्ण, काळे राठ केस, रूंद चपटे नाक, वाटोळा चेहरा व जाडे ओठ, ही त्यांची काही खास शारीरिक वैशिष्टये होत.त्यांची खेडी जंगलाच्या अंतर्भागात असून ते झोपडयांतून राहतात. प्रत्येक झोपडीत कुलदेवता व पितर यांकरिता स्वतंत्र जागा असते. शिवाय गोठा, कोंबडी-कबुतरे यांची खुराडी आणि डुकरांसाठी आडोसा असतो. प्रत्येक खेड्यात शालवृक्षाखाली प्रमुख देवतेचे स्थान असून या परिसरास जाहेर्थान म्हणतात. गामप्रमुखाच्या घरासमोर मांझी स्थान नावाची जागा असते. तिथे गामसंस्थापकांचा आत्मा वास करतो, अशी त्यांची धारणा आहे. संथाळांचे मुख्य अन्न भात व कडधान्यांचे कालवण होय. याशिवाय ते मांस, मासे, कंदमुळे व फळे खातात. भातापासून ते हांडिया नावाची दारू करतात. मोहाच्या फुलांपासून बनविलेली दारूही असते. त्यांच्या प्रत्येक समारंभात मदयपानास प्राधान्य आहे. ते पान-तंबाखू खातात व बिडीही ओढतात.

संथाळ युवतीसंथाळांची जमात देशवाली व खरवार किंवा सफा-होर अशा दोन समूहांत विभागलेली आहे. खरवार हे सुधारणावादी असून राम-कांडो देवतेचे अनुयायी होत. त्यांच्यात हासदक, मुरम, किस्कू, हेंबोम, सोदेन, तुडू, बेस्रा, कोरे इ. गणचिन्हे असलेल्या बारा कुळी किंवा पारी असून सु. दोनशे उपकुळी आहेत. त्यांना खूत म्हणतात. संथाळांची कुटुंबपद्धती पितृसत्ताक असून एकाच कुळीतील विवाह निषिद्ध मानतात. बेस्रा व कोरे या कुळी कमी दर्जाच्या मानतात. संथाळांचे कुटुंब मर्यादित म्हणजे नवरा, बायको व मुले असे सामान्यत: असते. क्वचित संयुक्त कुटुंब आढळते. त्यांच्यात पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. साधारणत: नवव्या-दहाव्या वर्षी मुलीचे व बाराव्या-तेराव्या वर्षी मुलाचे लग्न करतात. वधूमूल्य ( देज ) देण्याची पद्धत विशेषत्वाने असून रीतिरिवाजानुसार वधूमूल्य वधूच्या विशिष्ट नातेवाईकांत वाटले जाते. विवाहाला बापला म्हणतात. किरीन बहू, टुंकी दिप्ली, संग, घरदीजांवय, किरीनजांवय, इतुत, वीर बोलोक असे विवाहाचे सात प्रकार आहेत. यांपैकी किरीन बहू, टुंकी दिप्ली हे सर्वसाधारण विवाहप्रकार असून, संग बापला हा विधुराचा विधवा वा घटस्फोटित स्त्रीबरोबरचा विवाह होय. यात वधूमूल्य निम्मे देतात कारण अशी स्त्री मृत्यूनंतर आपल्या पहिल्या नवऱ्याला जाऊन मिळते, अशी समजूत आहे. एखादयास एकमेव मुलगी असेल, तर तो घरजावई पसंत करतो. त्याला घरदीजांवय बापला म्हणतात. किरीनजांवय हा प्रकार फारसा रूढ नाही. त्यात एखादी मुलगी विवाहापूर्वी गरोदर राहिली आणि संबंधित तरूण काही कारणांनी तिच्याशी विवाह करण्यास नकार देत असेल, तर त्याने मुलीला नवरा विकत घेऊन दयावा लागतो. अशा व्यवहाराचा खर्च पंचायत ठरविते. संथाळांत सेवाविवाहाची प्रथा असून भावी सासऱ्याच्या घरी जाव-यास सेवाचाकरी करावी लागते. त्यास घरोरी म्हणतात. अपहरण विवाहाची प्रथा पूर्वी होती. विदयमान परिस्थितीत हे अपहरण कृतक प्रतीकात्मक रीतीने करण्यात येते. त्याला इतुत बाप्ला म्हणतात. यात प्रियकर आपल्या आवडत्या मुलीच्या कपाळावर भर बाजारात किंवा जत्रेत कुंकू किंवा शेंदूर लावतो व पळून जातो. पुढे वधूवर-पक्षांत वाटाघाटी होऊन दोघांचे लग्न होते. प्रियकराच्या घरात घुसून तिथेच ठाण मांडणारी वधू बाहेर जात नाही, या प्रकारास हठागमनकिंवा घरघुशी विवाह म्हणतात. सिंदूरदान हा लग्नातील प्रमुख विधी असून नवरा मुलगा वधूच्या कपाळी कुंकू वा शेंदूर लावतो. त्यावेळी समस्त परिवार ‘हरिबोल’ अशी घोषणा देतो.


यानंतर ते पतिपत्नी होतात आणि दिवसभराचा उपवास सोडतात. नंतर माराङ्बुरू देवाला व पितरांना दारू अर्पण करतात. यावेळी वरपिता वधूमूल्य देतो. दुसऱ्या दिवशी वधू सासरी जाते. तिथे मेजवानी व मदयपान होते. तत्पूर्वी वधूवर ‘ आम्ही एकमेकांना मदत करू व जे काय असेल ते वाटून खाऊ ’ अशी शपथ सर्वांसमोर घेतात. पुरोहित विवाह लावतो. संथाळांत एकपत्नीत्व रूढ असून स्त्रीचा दर्जा उच्च आहे. ती पुरूषांबरोबरच शेती, मोलमजुरी व इतर कामे करते. पत्नीचा व्यभिचार, वंध्यता व बेबनाव, या कारणांकरिता पुरूषाला आणि नवरा पोसत नाही म्हणून पत्नीला घटस्फोट मिळतो. घटस्फोट हा सार्वजनिक विधी असून पतिपत्नींना सर्वांसमक्ष सूर्याकडे तोंड करून डाव्या पायावर उभे राहावे लागते. त्यानंतर ती दोघे सिन-बोंगा देवाचे नाव घेऊन हातातील शालवृक्षाच्या तीन पानांचे तुकडे करतात व नंतर पाण्याने भरलेले भांडे लोटतात. जर सर्व पानांचे तुकडे झाले नाहीत आणि भांडयातील सर्व पाणी सांडले गेले नाही, तर त्या जोडप्याने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय पंचायत देते. घटस्फोट झाल्यास नवऱ्यास वधूमूल्य परत दयावे लागते. थोरल्या भावाच्या विधवेशी आणि पत्नीच्या बहिणीशी विवाह करण्याची रूढी आहे.

जमातीत जन्मविधी ( जनम चटियर ), समाजाचे सदस्यत्व मिळविण्याचा ( काको चटियर ), विवाहविधी व अंत्यविधी हे चार महत्त्वाचे विधी मानले जातात. मुलगा जन्मल्यास पाचवीला आणि मुलगी असल्यास तिसऱ्या दिवशी जन्मविधी साजरा करतात. त्या दिवशी पुजारी, मांझी व पंचायतीचे सदस्य आणि गावकरी नवजात अपत्याच्या घरी जमतात. नाभिक सर्वांची हजामत करतो. यावेळी जावळ काढणे व नाव ठेवणे हा कार्यकम विधिपूर्वक होतो. शेवटी कडूलिंबांची पाने घातलेली तांदळाची पेज सर्वांना प्यायला देतात. या विधीने घर व गाव यांचे जननाशौच संपते. काको चटियर या विधीने मुलाला सामाजिक दर्जा पाप्त होतो. हा विधी स्त्रियांना लागू नाही मात्र पुरूषाला हा विधी केल्याशिवाय विवाहास प्रतिबंध आहे. साधारणत: बाराव्या वर्षापर्यंत केव्हातरी हा विधी उरकतात. याप्रसंगी नृत्यगायनादी कार्यकम होतो आणि सार्वजनिक मदयपान असते. त्यानंतर गावकरी मुलाला सदस्यत्व बहाल केल्याचे जाहीर करतात.

ग्रामपंचायती मार्फत गावातील सर्व व्यवहार चालतात. तिचे मांझी परणिक ( उपपाटील ), नायके किंवा आतो नायके ( पुरोहित ), कुडामनायके ( भगत ), जोग मांझी, जोग परणिक व गोडेत ( निरोप देण्याचे काम करणारा) असे सात अधिकारी असतात. गाम वसण्याच्या वेळी त्यांची निवड होते व ती वंशपरंपरागत चालते. गावाचे रक्षण व देखरेख करणे, हे त्यांचे प्रमुख काम होय. याशिवाय खेडयातील तंटे-बखेडे तसेच दोन खेडयामधील वादगस्त पश्र्न पंचायतीमार्फत निकालात काढतात.

ठाकूर हा संथाळांचा सर्वश्रेष्ठ देव असून तो पाऊस पाडतो व धान्य निर्मिती करतो तसेच तो आकाशात असून त्याची अवज्ञा झाल्यास तो कोपतो, अशी समजूत आहे. संथाळ अनेक बोंगांना भजतात. त्यांचे वास्तव्य डोंगर, दरी, नदी, तळे अशा नैसर्गिक स्थळी असते. ते दुष्ट आत्मे आहेत. ते रोगराई आणतात. त्यांना संतुष्ट करण्यासाठी कोंबडी-बकरी बळी देतात. माराङ्बुरू, मेरेको, जहर एरा, गोसाय एरा, परगणा बोंगा, मेंझी बोंगा हे मुख्य बोंगा होत. यांपैकी काही बोंगांचे वास्तव्य शालवृक्षांच्या बनात असते. याशिवाय राक्षस, वेताळ किंवा भुतेखेते यांनाही ते मानतात. जादू-टोण्यावर यांचा विश्वास असून विशेषत्वाने जमातीतील स्त्रिया यांत पुढाकार घेतात.जादूटोणा व बोंगायांपासून संरक्षण मिळावे, म्हणून ते जान व ओझा नामक गुरूंची मदत घेतात. ओझा हा वनस्पतींची माहिती असणारा वैदय असून तो आजार बरे करतो आणि मंत्रतंत्रांव्दारे लोकांना उपाय सुचवितो. संथाळ लोक इरोक सीम, हरियर सीम, इरी गुंडळी नाडवाई, जंथर, सोहराय, माघसीम,बाहाछटा,पोरोब,जत्रापोरोब व पोटा परब हे पमुख सण साजरे करतात. पहिल्या सात सणांच्या वेळी बोंगांची पूजा महत्त्वाची असून ते सण कृषिविषयक नांगरणी, पेरणी, खुरपणी, कापणी वगैरेंशी संबद्ध आहेत. त्यांपैकी जंथर हा सण धुमधडाक्याने पाच दिवस साजरा करतात. त्यावेळी पदरी पडलेले भात देवाला अर्पण करतात. पौष महिन्यातील सोहराय हा सण अमावास्येला पितरांची पूजा करून शिकारीला प्रस्थान ठेवण्याचा असतो. माघ सीम हा मुख्यत्वे सामाजिक सण असून त्या दिवशी म्हणजे माघ महिन्यात पंचायतींचे सर्व सभासद, अधिकारी व इतर संबंधित लोक आपापले राजीनामे समाजापुढे ठेवतात. त्यानंतर मांझी सर्व गावकृयांची सभा बोल-वितो. मद्यपान होऊन सर्वजण फेरनियुक्तीचा निर्णय घेतात. बहुतेक सर्वसण जाहेर्थान जागेत साजरे होतात.सर्व सणांत जेवण, नृत्य, गायन व अखेरीस मदयपान ठरलेले असते. अनेक देवतांना बकरी, कोंबडा यांचे बळी देतात.

संथाळी अंत्यविधीत प्रेताला तेल लावतात. प्रेताचे दहन नदीकाठी करतात . ज्येष्ठ मुलगा अग्नी देतो. अग्नी शमल्यानंतर कवटीचा काही भाग व मानेजवळील दोन हाडे घेऊन ती एका मडक्यात ठेवतात. पुढे धान्य घरी आल्यानंतर अस्थी नदीत विसर्जित करतात. त्याला जानबाहा म्हणतात. यावेळी पितरांच्या नावांनी कापड, दातवणाच्या काडया, पितळेची थाळी इ. रोजच्या वापरातील वस्तू ठेवतात. यामुळे मृतात्मा पितरांत सामील होतो, अशी समजूत आहे. यावेळी बलिदान होते व सर्वांना भोजन देतात. प्रदेशपरत्वे या अंत्यविधीत काही फरक आढळतात.

एकोणिसाव्या शतकात संथाळांचा मजुरीच्या निमित्ताने नागरी वस्तीशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांनी हळूहळू हिंदूंचे देव, रीतिरिवाज, पोशाख यांचे अनुकरण करण्यास सुरूवात केली. पुढे खरवार चळवळीमुळे ते हिंदू धर्माच्या अधिक जवळ आले. ही सामाजिक व राजकीय स्वरूपाची चळवळ असूनती भागत नावाच्या एका संथाळाने रामकांडो या नावाखाली श्रीरामाची उपासना करण्यासाठी १८७१ साली सुरू केली आणि रामाच्या उपासकांनी मदय-मांस वर्ज्य करावे, असा प्रचार केला. शिवाय नियमित स्नान, सांजवात आणि सायंप्रार्थना यांवर या चळवळीने भर दिला. पुढे रामकांडोचे अनेक उपासक झाले. त्यांनी रामासह अन्य हिंदू देवदेवतांची उपासना करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संथाळ मोठया प्रमाणावर शाकाहारी बनले आणि संथाळांची नवी पिढी शिक्षणाकडेही आकर्षित झाली. आत्मोन्नती हा या चळवळीचा मुख्य भाग होता. संथाळांच्या प्रदेशात रूग्णालये, दवाखाने यांबरोबरच प्राथमिक, माध्यमिक विदयालये व महाविदयालये निघाली आहेत. त्यांना आपल्या प्रदेशांतील उपृयांना बाहेर काढून स्वायत्तता हवी होती. स्वातंत्र्योत्तर काळात या चळ-वळीने स्वायत्त amज्याची मागणी केली आहे. अलीकडे सामाजिक, सांस्कृ-तिक, राजकीय इ. क्षेत्रांत संथाळांनी प्रगती केली असून लोकसभा ( बिहार, प. बंगाल, ओरिसा ), विधानसभांतही त्यांनी प्रतिनिधित्व मिळविले आहे.


संथाळी भाषा ही ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील असून मुंडा हे उपभाषाकुल आहे. यांतील उत्तर मुंडा वा खेरवारी या उपशाखेमध्ये संथाळी हा मुख्य बोली-समूह आहे. या भाषेत सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे काव्य, कथा, चरित्रे इ. साहित्य उपलब्ध आहे [→ संथाळी भाषा]. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी संथाळ प्रदेशात धार्मिक प्रसाराबरोबर शैक्षणिक कार्यही सुरू केले. त्यांनी त्यांच्या बोलीभाषेसाठी स्वतंत्र लिपी तयार केली आणि शाळा काढल्या. मिशनऱ्यांच्या प्रयत्नांमुळे संथाळी भाषेचे पहिले व्याकरण १८५२ मध्ये प्रसिद्घ झाले.एका मिशनने संथाळी भाषेत पेरा हर नावाचे एक नियतकालिक पुढे सुरू केले. ते अद्यापि चालू आहे. याशिवाय संथाळांचे वाङ्‌मय देवनागरी लिपीतही आढळते. 

संदर्भ : 1. Bag, Dhanapati, In The Midst of Santals, Calcutta, 1987.

            2.   Biswas, P. C. Santals of The Santal Parganas, Delhi, 1956.

            3.   Mitra, Parimal Chandra, Santhali : The Base of World Languages, Calcutta, 1988.

            4. Orans, Martin, The Santal, Detroit, 1965.

            5.  Singh, L. B. Santal Youths, New Delhi, 1988.

देशपांडे, सु. र.