संघिते : गाळाच्या खडकांत गोलाकार वा गंथिरूप आकाराचे पुंज आढळतात आणि ते अवक्षेपणाने साक्याच्या गाळरूपात साचलेले असतात. त्यांना संघिते म्हणतात. संघिते सामान्यत: गोलाकार किंवा लंबगोल असून काही चापट होऊन बिंबाभ ( तबकडीसारखी ) झालेली असतात. पुष्कळदा ही डंबेलाच्या आकाराची असतात. यावरून दोन संघितांची केंद्रे एकत्रित रीतीने वाढल्याचे सूचित होते. त्यांचे आकारमान काही सेंमी. ते 3 मी. पर्यंत असू शकते. ती ज्या आधारद्रव्यात परिवेष्टित असतात, त्यांच्यापासून ती खनिज संघटन, रंग, कठिनता व वातावरणक्रियेसंबंधीची गुणवैशिष्टये याबाबतींत वेगळी ओळखता येतात. काही संघिते व त्यांचे आधारद्रव्य यांत सुस्पष्ट सीमारेषा असतात. इतरांच्या बाबतीत या सीमा श्रेणीयुक्त असतात. म्हणजे त्या आधारद्रव्यात सावकाश मिसळून गेलेल्या दिसतात. बहुतेक संघिते मुख्यत: कॅल्शियम कार्बोनेटाची बनलेली असतात. त्यांच्यात गाळवट, मृत्तिका किंवा जैव द्रव्य विविध प्रमाणांत अधिमिश्रित झालेले असते. मृत्तिकेची व लोहाश्माची संघिते कमी प्रमाणात आढळतात. ती जगातील अनेक भागांतील कार्बॉनिफेरस (सु. ३५ ते ३१कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील दगडी कोळशाच्या थरांचे वैशिष्टय आहेत. ती आयर्न कार्बोनेटी खनिजे व आयर्न सिलिकेटी खनिजे यांची मिश्रणे असतात. कोल बॉल्स (कोळसा कंदुक)ही चूर्णीय (कॅल्शियमी) संघिते असून ती दगडी कोळशाच्या थरांत किंवा या थरांच्या लगेच वर आढळतात. त्यांच्यात मूळच्या वनस्पतिज जैव द्रव्याचे प्रमाण उच्च असू शकते आणि त्यात न दाबल्या गेलेल्या स्थितीतील वनस्पति-जीवाश्म (शिळारूप अवशेष) पुष्कळदा आश्चर्यकारक रीतीने उत्कृष्ट स्थितीत टिकून राहिलेले आढळतात.
लगतच्या खडकांपेक्षा वेगळ्या असलेल्या मध्यवर्ती कणाभोवती आजूबाजूच्या खडकांतून झिरपत येणाऱ्या पाण्याव्दारे सिलिका, कॅल्साइट किंवा लोह संयुग अवक्षेपित होऊन (साक्याच्या रूपात साचून) संघिते बनतात. अशा अवक्षेपणाबरोबर असलेल्या विद्रावाने कणाभोवतीच्या पोकळ्या भरल्या जातात व शिवाय मूळच्या द्रव्याचे प्रतिष्ठापनही होते. खडक सर्व दिशांत एकसारखा पारगम्य असल्यास गोलाकार, दोन दिशांत एकसारखा व तिसऱ्या दिशेत निराळ्या प्रकारे खडक पारगम्य असल्यास बिंबाभ आणि खडक अतिशय अनियमित पारगम्य असल्यास अतिशय ओबडधोबड संघित तयार होते. अशा रीतीने गाळाच्या खडकातील कोणत्या तरी एका घटकाचे एकत्रीकरण होऊन संघिते तयार होतात. यामुळे ती ज्या खडकात आढळतात त्या खडकातील एखादया गौण घटकाच्या रासायनिक संघटना- प्रमाणे संघितांचे रासायनिक संघटन असू शकते. उदा., चुनखडकात किंवा चॉकमध्ये असलेली संघिते चर्ट व फ्लिंट यांची असतात, मृत्तिकांमध्ये ती चूर्णीय वा लोहाच्या सल्फाइडाची असतात. ⇨ पायसासारख्या द्रव्याचे घनीभवन होताना तो शुद्ध असल्यास अरीय (चाकाच्या अऱ्यासारखी) संरचना असलेली आणि त्याच्याबरोबर इतर द्रव्ये असल्यास संकेंद्री (कांदयाच्या पाकळ्यांसारखी) संरचना असलेली संघिते तयार होतात. अंदुके ही अशी संघिते असावीत. [→ अंदुकाश्म].
पहा : गाळाचे खडक.
ठाकूर, अ. ना.