सलगम : ( इं. टर्निप लॅ. बॅसिका रॅपा कुल-कुसीफेरी ). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨कोबी, ⇨ नवलकोल, ⇨ फुलकोबी इत्यादींच्या बॅसिका या प्रजातीतील एक उपयुक्त वनस्पती. या प्रजातीत एकूण १५० जाती असून भारतात ११ जाती व काही प्रकार आढळतात. सलगमच्या मांसल मुळांकरिता प्राचीन काळापासून ( सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून ) आजपावेतो ही जाती लागवडीत आहे. ही द्विवर्षायू ( दोन वर्षे जगणारी ) व कणखर असून तिचा कोवळा पाला भाजीकरिता वापरतात. स्वीडिश टर्निप ( बॅसिका कँपेस्ट्रिस प्रकार नॅपोबॅसिका इं. रूटबेग ) ही सलगमची दुसरी जाती असून दोन्ही जातींत सहज ओळखण्याइतके फरक आहेत. सलगमचे ( खरे टर्निप ) मूलस्थान समशीतोष्ण यूरोप असावे असे मानतात बहुधा ते मध्य व पूर्व आशिया ( भूमध्यसामुद्रिक प्रदेश ) असावे असेही मत आढळते. त्याची लागवड मोठया प्रमाणावर उत्तरेकडील समशीतोष्ण देशांत आहे. सलगम मेक्सिकोत १५८६ मध्ये, व्हर्जिनियात १६१० मध्ये आणि न्यू इंग्लंडमध्ये १६२८ मध्ये आणले गेले. रंग व आकार यांत विविधता दर्शविणारे याचे प्रकार अनेक असून थंड हवेत त्यांची वाढ चांगली होते. अमेरिकेपेक्षा हल्ली यूरोपात त्यांचा वापर अधिक आहे. पालेभाजी, वैरण आणि खते यांकरिता त्यांच्या पाल्याचा उपयोग करतात. भारतात पंजाब व उत्तर प्रदेशात याची लागवड आहे इतरत्र हे बागेत लावतात.
सलगमच्या रोपाची वाढ होत असताना पहिल्या खोडाच्या लांबीत फारशी वाढ होत नाही. मुळाच्या टोकावर एक गर्द हिरव्या रंगाच्या केसाळ व मुळ्यासारख्या पानांचा झुबका बनतो. ती पाने पातळ व बारीक देठाची असतात त्यांवर खोळीसारखा भाग असतो. दुसऱ्या वर्षी या झुबक्यातून लहान पण मजबूत सरळ खोड तयार होते. त्यावर अनेक फांदया व वीणाकृती, गुळगुळीत, निळसर पाने येतात. नंतर खोडाच्या व फांद्यांच्या टोकावर लहान गर्द पिवळ्या व मोहरीसारख्या फुलांचे झुबके येतात शेवटी गुळगुळीत, लांबट ( मोहरीच्या शेंगाप्रमाणे ) सार्षप प्रकारची शुष्क व अनेक बीजी फळे येतात [⟶फळ]. पहिल्या वर्षाच्या शेवटी पहिले मूळ व त्यावरच्या रोपाचा काही भाग ( अधराक्ष ) यांची एकत्र वाढ होऊन ‘गड्डा ’ बनतो व त्यालाच ‘ मांसलमूळ ’ म्हणण्याचा प्रघात पडला आहे. हा बनत असताना त्यात असलेला ⇨ ऊतककर ( नवीन कोशिका व त्यांचे समूह बनविणारा भाग ) मध्यभागी मुख्यत: नरम कोशिकांचा ( पेशींचा ) बनलेला ⇨ प्रकाष्ठ मृदूतक ( मांसल गाभा ) निर्माण करतो [असंगत संरचना ⟶ शारीर, वनस्पतींचे]. या वनस्पतींतील फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कुसीफेरी कुलात अथवा मोहरी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
सलगमच्या अनेक प्रकारांत पुढील फरक गड्ड्यामध्ये आढळतात : (१) रूंदीच्या ( व्यासाच्या ) तिप्पट किंवा अधिक पट मुळाची लांबी असलेला (२) रूंदीच्या दुप्पट लांब किंवा मूळ व गड्डा तर्कूच्या आकाराचा (३) वाटोळे मूळ असलेला गोल गड्डा (४) लांबीपेक्षा अधिक व्यासाचे मूळ असलेला काहीसा सपाट गड्डा आणि (५) वरील प्रकारांतील मध्यम स्वरूप असलेला. गड्ड्याच्या वरच्या भागातील गाभ्याच्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगावरूनही भेद करतात तसेच गड्डयाच्या जमिनीवरील भागाच्या रंगावरून काही प्रकार ओळखतात. यांपैकी पिवळ्या मगजाचे प्रकार अधिक मोठे, मंदपणे वाढणारे व पोषणमूल्य अधिक असलेले आढळतात हिमतुषारांचा परिणामही त्यांच्यावर फार होत नाही. गड्डयाचा विस्तार कमी आणि पाला भरपूर असे प्रकारही असून त्यांचा स्वयंपाकात उपयोग होतो. ‘ सेव्हन टॉप’ हा त्यांतील एक प्रकार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत विपुल पिकवितात.
लागवड : याला जमीन मध्यम प्रकारची व निचऱ्याची लागते. सलगमला मशागत, खतपाणी इतर बागायती पिकांप्रमाणे, तर हवामान थंड लागते. म्हणून भारतात त्याची लागवड बहुधा हिवाळी हंगामात पण क्वचित पावसाळी हंगामातही करतात. लागण उत्तर भारतात जुलै ते सप्टेंबर, दक्षिण भारतात जुलै ते डिसेंबर आणि महाराष्ट्रांत सप्टेंबर ते फेबुवारी महिन्यांत करतात. हेक्टरमध्ये ३ किगॅ. बी दोन ओळींत ४० सेंमी. अंतर ठेवून पेरतात. पेरणी सपाट वाफ्यावर किंवा सरी वरंब्यावर करतात. योग्य वेळी ओळींतील दोन रोपांत १०-१५ सेंमी. अंतर राहील अशी विरळणी करतात. वरखत प्रतिहेक्टर ५० किगॅ. नायट्रोजन, ५० किगॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि ९० किगॅ. पोटॅश देणे चांगले. बी पेरल्यापासून ४५ दिवसांत सलगमचे नवलकोलच्या गड्डयासारखे गड्डे जमिनीवर तयार होतात. ते जून होण्यापूर्वी भाजीसाठी अगर वैरणीसाठी काढून घेतात. एका हेक्टरमधून स्वतंत्र पिकापासून याचे १७,००० किगॅ. पर्यंत उत्पन्न मिळते.
दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया वगैरे भागांत नोव्हेंबर ते फेबुवारीपर्यंत, पण अर्जेंटिनामध्ये वर्षातील कोणत्याही वेळी सलगम लावतात. भारतात सलगमचे पांढरे आणि तांबडे देशी प्रकार आहेत. एक देशी सुधारलेला प्रकार परदेशी प्रकाराप्रमाणेच रूचकर असतो. परपल टॉप, गोल्डन बॉल आणि व्हाइट ग्लोब हे परदेशी प्रकार उत्तम समजले जातात.
रूटबेग ( स्वीडिश टर्निप ) : (बॅसिका कँपेस्ट्रिस प्रकार नॅपोबॅसिका ). याची पहिली पाने निळसर व नंतरची गुळगुळीत, मांसल व निळसर असून त्यांचा देठ व मध्यशीर जाड व मांसल असतात. गड्डयाच्या टोकास मानेसारखा भाग व त्यावर पानांच्या देठाचे वण ( किण ) दिसतात त्यातील मगज अधिक घट्ट व पोषक असून हिवाळ्यात अधिक टिकून राहतो. या जातीतील पांढऱ्या मगजाच्या गड्डयावर खरबरीत हिरवी साल असून त्याचा आकार अनियमित असतो पिवळ्या मगजाच्या गड्डयावर हिरवी, जांभळी किंवा गर्द तपकिरी ( बाँझसारखी ) रंगाची गुळगुळीत साल असून फुले मोठी, लालसर किंवा फिकट पिवळी किंवा फिकट नारिंगी असतात. यांची मोठी लागवड कॅनडा, ग्रेट ब्रिटन आणि उत्तर यूरोपात आहे. उत्तरेकडील हवामानात दोन्ही जाती पाळीव जनावरांना खाण्याकरिता वापरतात परंतु अमेरिकेत फक्त भाजीकरिता उपयोगात आहेत. भारतात सलगम कढीत घालतात. त्याचे लोणचे करतात. पाल्याचा उपयोग भाजीकरिता करतात गड्डयाची भाजी किंवा कोशिंबीर करतात.
रासायनिक संघटन : ( गड्ड्यात )प्रतिशतपाणी ९१.१ प्रथिन ०.५ मेद ०.२ कार्बोहायड्रेटे ७.६ खनिजे ०.६ कॅल्शियम ०.०३ फॉस्फरस ०.०४ यांशिवाय प्रती १०० गॅममध्ये लोह ०.४ मिग्रॅ. अ जीवनसत्त्व लेशमात्र ब१ जीवनसत्त्व ४० आंतरराष्ट्रीय एकके क जीवनसत्त्व ४३ मिग्रॅ. हे घटक असतात.
पहा : कुसीफेरी वैरण.
संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.
2. C.S.I.R. The Welth of India, Raw Materials, Vol. New Delhi, 1948.
3. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.
क्षीरसागर, व. ग. परांडेकर, शं. आ. पाटील, ह. चिं.