सर्वप्राणवाद : ( पॅन-व्हायटॅलिझम ).प्राणतत्त्ववाद( व्हायटॅलिझम) ही उपपत्ती मूलत: सजीवांविषयीची आहे. म्हणजे सजीवांमध्ये जी जिवंतपणाची लक्षणे दिसतात, ती केवळ शारीरिक वा भौतिक नसून शरीराव्यतिरिक्त असलेल्या कोणत्यातरी चेतनतत्त्वामुळे आहेत, असे प्राणतत्त्ववाद सांगतो. आधुनिक काळात ⇨ हान्स ड्रीश (१८६७-१९४१) यांच्याप्रमाणे ⇨ आंरी बेर्गसाँ (१८५९-१९४१) यांनी प्राणतत्त्ववादाचा पुरस्कार केला. पैकी बेर्गसाँने प्राणतत्त्ववादाचे सामान्यीकरण केले व सर्व वस्तुजाताला लागू पडणाऱ्या सत्ताशास्त्रीय उपपत्तीचे रूप तिला दिले. या व्यापक उपपत्तीला विश्वप्राणवाद किंवा सर्वप्राणवाद ( पॅन-व्हायटॅलिझम ) असे नाव देता येईल. आंरी बेर्गसाँने अशी मांडणी केली, की चैतन्याचा एक प्रवाह सर्व भौतिक पदार्थांमधून आरपार जातो, तोच सजीवांची उत्पत्ती करतो आणि त्यांच्यातील उत्क्रांतीची प्रक्रिया ठरवतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुनरूत्पादनाच्या माध्यमातून हा प्रवाह वहात असतो. या चेतनेच्या प्रवाहाला ( ए करन्ट ऑफ कॉन्शस्नेस् ) त्यांनी प्राणप्रेरणा ( Elan vital ) असे नाव दिले. जीवांच्या जातींमध्ये वैविध्य येण्यामागे व नवीन जाती निर्माण होण्यामागेही ही प्राणप्रेरणाच आहे. जीवनाच्या इतिहासात होणारे नवसृजन आणि घडणाऱ्या नैमित्तिक/अपघाती घटना या साऱ्यांमध्ये एक अनियतत्त्व ( इनडिटरमिनेशन ) काम करत असते. भौतिक शक्तींमध्ये नियतत्त्व असते. या नियतत्त्वावर अनियतत्त्वाचे कलम करण्याचे काम ही प्राणप्रेरणा करते. या उलट या प्राणप्रेरणेला मर्यादा घालण्याचे काम भौतिकशक्ती करत असते. मात्र जडतत्त्व आणि चित्तत्त्व ही स्वतंत्र तत्त्वे नसून ती नित्य सहभावी तसेच परस्परावलंबी आहेत. जडतत्त्व पाण्यासारखे असेल, तर चित्तत्व पाण्याच्या वाफेसारखे आहे. बेर्गसाँच्या सर्वप्राणवादाचा असा थोडक्यात आशय सांगता येईल.
पहा : प्राणतत्त्ववाद.
संदर्भ : Bergson, Henri Trans. Mitchell, Arthur, Creative Evolution, New York, 1911.
गोखले, प्रदीप