संघनन : ( संद्रवण ). द्रव किंवा घन पदार्थांच्या बाष्पाचे पृष्ठभागावर विक्षेपण होणे (साचणे) म्हणजे संघनन होय. यामध्ये सामान्यत: पृष्ठभागाचे तापमान संलग्न वायूपेक्षा अधिक थंड असते. पदार्थाच्या बाष्पाने निर्माण केलेला दाब पृष्ठभागाच्या तापमानाला पदार्थाच्या द्रव किंवा घन प्रावस्थेच्या दाबापेक्षा अधिक असतो त्यावेळेसच बाष्पाचे पृष्ठभागावर संघनन होते. बाष्पाचे संघनन होताना त्याची सुप्त उष्णता बाहेर पडते. ही उष्णता बाहेर निघून गेली नाही तर पृष्ठभागाचे तापमान वाढते. ही वाढ आजूबाजूच्या बाष्पाच्या तापमानाइतकी होते.

संघनन प्रक्रिया दोन मार्गांनी होते. बाष्पामध्ये किंवा पृष्ठभागावर अपद्रव्ये (अशुद्धी) नसल्यास संघननामुळे पृष्ठभागावर सलग द्रवरूप पटल बनते. तथापि, त्यामध्ये वसाम्ले किंवा मर्कॅप्टने यांसारखी अपद्रव्ये असल्यास बाष्पाचे सूक्ष्मबिंदुरूपात संघनन होते. सूक्ष्मबिंदूच्या आकारमानातील वाढ पृष्ठभागावरून सूक्ष्मबिंदू वाहून जाईल एवढे वजन होईपर्यंत होत राहते.हवेमध्ये मुक्त अतिसूक्ष्म कण म्हणजे ⇨वायुकलिल असल्यास संघनन होण्याकरिता जलबाष्पाने हवा अतिसंपृक्त असावी लागते. वातावरणात वायुकलिलांचा विपुल पुरवठा असतो. अशा कणांवर जलबाष्पाचे संघनन होऊ शकते. म्हणून या कणांना संघनन केंद्रके म्हणतात. यांपैकी काही केंद्रके आर्द्रताशोषक असून हवेची सापेक्ष आर्द्रता १०० टक्क्यांपेक्षा कमी असताना या केंद्रकांवर संघनन होण्यास सुरूवात होते परंतु इतर केंद्रकांच्या बाबतीत संघनन सुरू होण्यापूर्वी अतिसंपृक्ततेची आवश्यकता असते.ज्या तापमानास हवा जलबाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. हवेचे तापमान दवबिंदूपर्यंत कमी करण्यात आले असेल किंवा पुरेसे जलबाष्प हवा संपृक्त करण्यासाठी मिसळलेले असेल, अशा वेळेस वातावरणातील हवेची सापेक्ष आर्द्रता वाढलेली असते. दवबिंदूपेक्षा हवा अधिक थंड झाल्यास जलबाष्पाचे संघनन होऊन दव, धुके आणि ढग तयार होतात मात्र पाऊस पडण्याकरिता इतर भौतिकीय प्रकियांचीही गरज असते.

सूर्यवंशी, वि. ल.