निर्जलीकरण : एखादा पदार्थ कोणत्याही द्रवाने ओला केला असून त्यातील तो द्रव काढून टाकण्याची क्रिया केली, तर त्या क्रियेस निर्द्रलीकरण म्हणतात. निर्जलीकरण हा निर्द्रवीकरणाचाच एक भाग म्हणता येईल. तथापि ही संज्ञा निरनिराळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या अर्थांनी वापरली जाते.

रसायनशास्त्र : रसायनिक संयुगांतून वा पदार्थांतून पाणी व पाण्याचे घटक काढून टाकण्याच्या क्रियेस निर्जलीकरण असे म्हणतात. एका वा अनेक रेणूंतून पाण्याचे घटक सामान्यातः काढून टाकले जातात. उदा., अल्कोहॉलाचे निर्जलीकरण केल्यास अल्कोहॉलाच्या प्रत्येक रेणूतून पाण्याचे घटक अलग होतात व एथिलीन बनते.

उदासिनीकरण, ⇨ एस्टरीकरण इ. रसायनिक विक्रिया निर्जलीकरण पद्धतीच्या होत.

औद्योगिक : काही प्रकारचे पदार्थ सुकवून टिकविता येतात; हे फार प्राचीन काळापासून माहीत होते. यासाठी पूर्वी सूर्यप्रकाशाचा उपयोग करीत असत परंतु तीच क्रिया कृत्रिम वा यांत्रिक उपायांनी जलद केल्यास तिला निर्जलीकरण असे म्हणतात. निर्जलीकृत पदार्थातील जलांशाचे प्रमाण कमी झाल्याने त्यावर वाढणाऱ्या वा जगणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा नाश होतो. तसेच त्याचे वजन व आकार घटतो. त्यामुळे त्याच्या साठवणीस व वाहतुकीस कमी जागा लागते. अशा पदार्थांत परत पाणी घातल्यास मूळच्यासारखे पदार्थ मिळतात. पदार्थांच्या स्वरूपानुसार निर्जलीकरणाची उपकरणे व पद्धती निरनिराळ्या असतात. तसेच मूळ पदार्थाची चव व रंग तसाच राहू शकेल असे निर्जलीकृत पदार्थ करणारी सुधारित उपकरणे उपलब्ध आहेत. फळांच्या रसांचे निर्जलीकरण करण्यासाठी निर्वाताचा वापर करतात. मात्र निर्जलीकरणाने मालाची प्रत सुधारणे शक्य होत नाही. कधीकधी निर्जलीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या उच्च तापमानामुळे निर्जलीकृत पदार्थाच्या स्वाद, रंग इ. गुणधर्मात फरक होण्याची शक्यता असते, म्हणून या वेळी निर्वाताचा वापर करावा लागतो. विविध पद्धतींनी निर्जलीकृत केलेल्या पदार्थांसाठी विशिष्ट प्रकारची आवेष्टने वापरणे आवश्यक असते. झटपट (इन्स्टंट) कॉफी, झटपट चहा, दूध भुकटी, अंड्याची भुकटी, कांद्याची भुकटी इ. पदार्थांसाठी तसेच वाटाणे व इतर भाज्यांसाठी निर्जलीकरणाची प्रक्रिया वापरण्यात येते.

शारीरिक : कोशिकांचे (पेशींचे) कार्य, शारीरिक तापमानाचे नियंत्रण, शरीरातील अनावश्यक घटकांचे मूत्रातून उत्सर्जन (बाहेर टाकणे) व रक्ताभिसरण ही कार्ये व्यवस्थित चालण्यास लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण शरीरातून ज्या वेळी कमी होते त्याला शारीरिक निर्जलीकरण असे म्हणतात. सामान्यतः उलटी व अतिसार आणि क्वचित जठरांत्रदाह (गॅस्ट्रोएंटेरिटिस) ह्या रोगांत जास्त प्रमाणात पाण्याचे उत्सर्जन होऊन निर्जलीकरण अवस्था प्राप्त होते. जास्त प्रमाणात पाण्याचे उत्सर्जन झाल्यास लहान मुलांना बेशुद्धावस्था य़ेते व क्वचित मृत्यूही ओढवतो. शारीरिक निर्जलीकरण होऊ नये म्हणून पुढील उपाय योजतात : (१) उलटी-प्रतिबंधक व अतिसार-

रोधक औषध घ्यावीत, (२) अंतःक्षेपणाने लवण विद्राव (सलाइन) देणे, (३) मोठ्या आतड्यात जलद शोषण होईल अशा द्रवाचे बस्तीने (एनिम्याने) अंतःक्षेपण करणे.

शरीरातील पाण्याच्या समतोलाला फार महत्त्व आहे. सर्वसाधारण माणसाच्या शरीरातील पाण्यापैकी सु. ७०% पाणी कोशिकांच्या अंतर्भागात व सु. ३०% पाणी बाह्य भागात असते. पाण्याच्या समतोलात जर फार मोठा बदल झाला, तर त्याचा ⇨ तर्षण समतोलावर प्रथम परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील द्रवांच्या प्रवाहास व वहनास अडथळा निर्माण होऊन सोडियम, पोटॅशियम इ. आयनांच्या (विद्युत् भारीत अणू वा रेणू यांच्या) संहतीत (प्रमाणात) फरक होतो व रक्ताचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] बदलते.

सामान्यतः पाणी जठरांत्र मार्गाने शरीरात प्रवेश करते. मानवाला लागणाऱ्या पाण्यापैकी निम्मे पाण्याच्याच स्वरूपात वा इतर द्रव पदार्थांबरोबर (उदा., दूध), तर निम्मे घन पदार्थांमार्फत तो घेतो. हे पाणी शरीरात सु. दोन आठवडे राहते. जेव्हा शरीर निरोगी असते त्या वेळी मलमूत्रावाटे सु. ६०% (पैकी ९४% मूत्रावाटे) आणि श्वसन, घाम इत्यादींमार्गे सु. ४०% पाणी बाहेर पडते. जरी पाणी घेण्याचे थांबविले, तरी एकूण वजनाच्या सु. २% इतके पाणी प्रतिदिनी कमी होत जाते.

मिठारी, भू. चिं.