संवेदना तंत्र : प्रत्येक प्राण्याची शरीरक्रियावैज्ञानिक क्रियाशीलता आणि वर्तन परिसरातील बदलांशी अनुरूप असणे अत्यावश्यक असते. यासाठी परिसराचे यथायोग्य ज्ञान सतत मिळविणारे संवेदना तंत्र विकसित झालेले असते. बहुकोशिकीय (अनेक पेशींनी बनलेल्या) प्राण्यांच्या शरीरातील विविध भागांच्या कार्यात सुसूत्रता आणणे हे एक प्राथमिक स्वरूपाचे कार्यही या तंत्राकडून होत असते. संवेदना तंत्र हा प्रेरक तंत्राप्रमाणे ⇨ तंत्रिका तंत्रा चा (मज्जासंस्थेचा) एक विभाग असून हे विभाजन केवळ कार्यप्रणालीच्या वर्णनासाठी केलेले आहे. शरीररचनात्मक दृष्टया या दोन्ही तंत्रांचे स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही [→ प्रेरक तंत्र].
संवेदनाग्राही : संवेदनांचे ग्रहण करण्यासाठी तंत्रिका कोशिकांपासून (मज्जापेशींपासून) निघणाऱ्या अभिवाही (संदेश किंवा आवेग तंत्रिका केंद्राकडे पाठविणाऱ्या) तंतूंचा विशेष पद्धतीने विकास होऊन त्यांच्या टोकांशी संवेदनाग्राहींची निर्मिती झालेली आढळते. परिसरातील आणि शरीराच्या आतील भागातील (अंतस्थ परिसरातील) ज्या बदलांमुळे या ग्राहींचे उत्तेजन होऊ शकेल अशा संवेदनाजनक घटकांचे स्थूलमानाने खालीलप्रमाणे वर्ग करता येतील :
(१) यांत्रिकी घटक : स्पर्श, दाब, कंपन, गुदगुल्या, शरीराची व त्यातील विविध अवयवांची परस्परांच्या संदर्भातील स्थिती, समतोल, रक्ताचा दाब (२) तापमान : उष्ण व शीत वस्तूंचा स्पर्श, प्रारित उष्णता (३) रासायनिक संवेदन : चव आणि गंध, रक्तातील ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, ग्लुकोज इ. घटकांचे प्रमाण (४) विद्युत् चुंबकीय तरंगांचे संवेदन : अशा तरंगांच्या संपूर्ण वर्णपटापैकी फक्त दृश्य भागाचे (तरंगलांबी ३९०-७८० नॅनोमीटर नॅनोमीटर; म्हणजे मीटरचा एक अब्जांश भाग) संवेदन मानवी डोळ्यांनी होऊ शकते; (५) वेदना : कोणत्याही प्रकारच्या हानिकारक घटकांमुळे [उदा., टोचणे, जोराचा दाब, रसायनांशी संपर्क, किरणोत्सर्ग (अतिभेदक कण व किरणांचा परिणाम), अतिशीत वा अतिउष्ण परिसर] ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहात) होणारे बदल वेदनेच्या स्वरूपात संवेदित होतात.
संवेदनाग्राहींचे शरीरातील वितरण : शरीररचनेतील वितरणाच्या वैशिष्टयनुसार संवेदनाग्राहींचे दोन मुख्य वर्ग आहेत.
विशेष संवेदनाग्राही इंद्रियांमधील ग्राही : यात श्रवणेंद्रिये, शरीराचा समतोल जाणणारा अंत:कर्णाचा भाग (श्रोतृकुहर), डोळ्यांची पटले, नाकाच्या आतील घ्राणेंद्रिये आणि जिभेच्या पृष्ठभागावरील तसेच नजीकच्या घशाच्या भागातील चव ओळखणाऱ्या स्वादकलिका यांचा समावेश होतो. ही सर्व इंद्रिये शरीराच्या शिरोभागी विशिष्ट क्षेत्रांमध्येच सीमित असून त्यांच्या तंत्रिका थेट मेंदूकडे जातात [→ कान; जीभ; डोळा; नाक]. विशेष संवेदनांच्या सूक्ष्म बोधनामधून मेंदूची संबंधित क्षेत्रे अतिशय विकसित झाली आहेत. त्यातूनच मानवी संस्कृतीमधील अनेक कलांचा आविष्कार झालेला आढळतो. उदा., चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, पाककला, सुगंधी द्रव्यांची जाणकारी इत्यादी.
शरीरभर पसरलेले सर्वसाधारण संवेदनाग्राही : या ग्राहींचे विभाजन त्यांच्या वितरणानुसार चार वर्गांमध्ये केले जाते.
बाह्य (त्वचेमधील) संवेदक : यांत स्पर्श, हलका दाब, तापमान व वेदना यांच्या ग्राहींचा समावेश होतो. तंत्रिकांची सूक्ष्म टोके वेदनेचे संवेदन ग्रहण करतात. इतर प्रकारांच्या संवेदनासाठी सु. दहा प्रकारचे विशेष ग्राही विकसित झालेले आढळतात.
खोल (त्वचेखालील) संवेदक : स्नायूंचे पृष्ठभाग, प्रावरणी (त्वचे- खालील आणि स्नायू , मज्जा व रक्तवाहिन्या यांच्या दरम्यानचे संयोजी अवकाशोतकाचे स्तर), हाडांचे पृष्ठभाग यांसारख्या अधिक खोलीवर असलेल्या ऊतकांमधील हे संवेदक कंपने, जोराचा दाब, मुक्या मारामुळे होणारी वेदना यांसारख्या संवेदना ग्रहण करू शकतात.
अंतर्गत संवेदनाग्राही : स्नायूंच्या आतील तर्कू, कंडरांमधील गॉल्जी उपकरणे, सांधे, तळपाय यांसारख्या ठिकाणी असलेले हे ग्राही स्नायूंच्या तंतूंची लांबी, त्यांतील ताणाची शक्ती यांसारख्या माहितीच्या ग्रहणातून शरीरातील अवयवांची एकमेकांच्या संदर्भातील स्थिती व संपूर्ण शरीराची गुरूत्वाकर्षणाच्या संदर्भातील स्थिती यांचे आकलन होण्यास मदत करतात.
अंत:स्थित/अंतस्त्यांमधील ग्राही : उदा., जठर, आतडी इत्यादींमधील हे ग्राही मुख्यत: आकुंचनजन्य वेदना (मुरडा), वायूचा दाब वाढल्याने अंतस्त्य फुगणे, रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने ऊतक हानी होऊन जाणवणारी वेदना यांसारख्या संवेदनांचे ग्रहण करतात.
संवेदनांचे वहन : संवेदनेचे ग्रहण करणाऱ्या प्रत्येक ग्राहीच्या रचनेत विजेचा सूक्ष्म भार असलेले पटल असते. संवेदनेमुळे या पटलातील भाराचे रूपांतर त्याला जोडलेल्या तंत्रिकेत, संदेश निर्माण करण्यात होते. हा संदेश इतर कोणत्याही तंत्रिका तंतूमधील संदेशाप्रमाणे विजेच्या भारातील कमी-अधिक होण्याच्या क्रियेसारखाच असतो. त्याचा अर्थ लावण्याची क्रिया (कोणत्या प्रकारची संवेदना होत आहे हे समजणे) हा संदेश अखेरीस मेंदूच्या कोणत्या क्षेत्रात पोहोचतो यावरच अवलंबून असते.
संवेदनाग्राहीत निर्माण होणारा विजेच्या भारातील बदल सतत त्याच प्रमाणात होत राहतो असे नाही. अनेक प्रकारच्या ग्राहींमध्ये प्रारंभीच्या उत्तेजनानंतर ग्राही उत्तेजनशून्य होतात. त्यामुळे संवेदना जाणवत राहत नाही; उदा., हलका स्पर्श, तापमानातील सौम्य बदल, सुसह्य वेदना. याउलट अधिक तीव्र संवेदना आणि शरीराच्या स्थानाची माहिती देऊन स्नायूंच्या ताणाचे नियमन करणाऱ्या वर उल्लेखिलेल्या अंतर्गत संवेदनाग्राहींमधील विद्युत् दाब अबाधितपणे सतत चालू राहतो.
तंत्रिका तंतूचा व्यास ०.५ ते २०.० मायक्रॉंन (मायक्रोमीटर म्हणजे मीटरचा दशलक्षांश भाग) असतो व त्यातून जाणारे संदेश (आवेग) ०.५ ते १२०.० मीटर प्रतिसेकंद वेगाने प्रवास करतात. विविध प्रकारच्या संवेदनांच्या वहनात व त्यांच्या तंतूमध्ये फरक आढळतो. सर्वसाधारणपणे मायेलिनाचे आवरण नसलेले, लहान आकारमानाचे (०.५ ते २.० मायक्रॉंन) व मंदगतीचे (०.५ ते २.० मी./सेकंद) तंतू ‘ सी ’ (C) या प्रकारचे म्हणून ओळखले जातात. त्यांचा उपयोग तापमान, ढोबळ संवेदन (नक्की कोणत्या ठिकाणी स्पर्श किंवा दाब होत आहे याचे सूक्ष्म आकलन न होऊ शकणारे), खाजणे, गुदगुल्या, ठणकणारी ढोबळ वेदना यांच्यासाठी होत असतो. तरल संवेदन, तीव्र टोचणारी वेदना, स्नायू व कंडरांमधील अंतर्गत संवेदन यांसारख्या इतर कार्यांसाठी अधिक जाडीचे, मायेलिन आवरणाने युक्त, शीघ गतीचे ए (A) तंतू आवश्यक असतात.
संवेदनावाहक तंतूचा मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील प्रवास : मेरूरज्जूला प्रत्येक तंत्रिका दोन मुळांनी जोडलेली असते. त्यांतील पाठीकडच्या मुळातून (पश्चमूल) संवेदनावाहक तंतू मेरूरज्जूत प्रवेश करतात. याच मुळात त्यांच्या तंत्रिका कोशिकांचा मुख्य भाग (केंद्रकादि कोशि- कांगे असलेला) असतो. ग्राहीपासून निघणारा तंतू , पश्चमूलातील कोशिका व रज्जूत प्रवेश करणारा तंतू मिळून संवदेनामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण होतो. मेरूरज्जूपासून मेंदूतील सर्वांत वरच्या भागातील म्हणजे प्रमस्तिष्कामधील संवेदना क्षेत्रात पोहोचेपर्यंत आणखी दोन टप्पे (दोन तंत्रिका कोशिका व त्यांचे तंतू) बहुसंख्य संदेशांना पार पाडावे लागतात. हे टप्पे बदलण्याची स्थाने – म्हणजेच पुढील कोशिकेशी अनुबंधक संधी (जेथे तंत्रिका आवेग एका चेताकोशाकडून दुसऱ्या चेताकोशाकडे जातो त्या जागा) निर- निराळ्या प्रकारच्या मार्गांसाठी एकाच पातळीवर असतातच, असे नाही. सर्व मार्गांमधील दुसऱ्या टप्प्यातील तंतू स्वत:च्या बाजूकडून विरूद्ध बाजूकडे [डावी → उजवी, उजवी → डावी] वळतात. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात आणि अखेरीस प्रमस्तिष्कात संवेदनेची नोंद विरूद्ध बाजूच्या क्षेत्रात घेतली
जाते. मेरूरज्जूत प्रवेश करणाऱ्या संवेदना तंतूंचे प्रामुख्याने दोन गट पडतात. पहिला गट पृष्ठीय स्तंभ प्रणाली आणि दुसरा गट अग्रपार्श्व-किंवा पार्श्व – प्रणाली या नावाने ओळखला जातो (आ. १ अधिक माहितीसाठी मराठी विश्वकोशातील ‘ तंत्रिका तंत्र ’ या नोंदीतील आकृत्या पाहाव्यात, खंड ७, पृष्ठ क्र. ८४-१११).
पृष्ठीय स्तंभ प्रणाली : मायेलिन आवरणयुक्त जाड व शीघवाहक तंतू ; मुख्यत: यांत्रिकी संवेदनांनी उत्तेजित होणाऱ्या गाहींपासून त्यांचा प्रारंभ होतो. स्पर्शाचे तरल संवेदन, अचूक स्थाननिर्देश, त्याच्या कमी-जास्त तीव्रतेची जाण (कमी-अधिक दाबाची जाण), कंपनसंवेदन, अवयवांच्या स्थितीची व हालचालींची अचूक संवेदना यांसारखी महत्त्वाची कार्ये करणारे हे तंतू मेरूरज्जूत प्रवेश करताच मेंदूच्या दिशेने वळून थेट लंबमज्जे-पर्यंत पोहोचतात. रज्जूच्या पाठीमागील बाजूस त्यांचा स्तंभ असून त्यात विविध पातळ्यांवरून प्रवेश करणारे तंतू समांतर आणि क्रमाक्रमाने (सर्वांत प्रथम येणारे आतल्या बाजूस व नंतर येणारे त्यांच्या बाहेरच्या अंगास) रचलेले आढळतात. मेंदूच्या सर्वांत वरच्या भागात शरीराच्या विविध भागांसाठी स्वतंत्र क्षेत्रे विकसित होण्यासाठी ही रचना उपयोगी ठरलेली आहे.
लंबमज्जेत पृष्ठीय स्तंभ केंद्रक नावाचा तंत्रिका कोशिकांचा समूह असतो. तेथे दुसरा टप्पा सुरू होतो. तंतुपट्टिका (अंतर्गत आवेग मेरूरज्जू-कडून थॅलॅमसाकडे प्रेषित करणारे तंत्रिका तंतूंचे समूह) या नावाचे हे समूह लंबमज्जा ओलांडून दुसऱ्या बाजूस जातात व पुढे मस्तिष्कस्तंभात वर जाऊन थॅलॅमसामध्ये पोहोचतात. या मार्गात त्यांना चेहरा व डोक्याचा मानेपासून वरचा भाग यांच्या संवेदना आणणारे ट्रायजेमिनल या पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेचे तंतू येऊन मिळतात. थॅलॅमसापासून तिसरा टप्पा सुरू होऊन त्याचे तंतू प्रमस्तिष्काच्या सर्वांत वरच्या पातळीवर संवेलकात (शारीरीय सीतांदरम्यानच्या संवलित कटकात म्हणजे वळीमध्ये) जाऊन पोहोचतात.
या प्रणालीमधील काही तंतूच्या शाखा पृष्ठीय स्तंभातून वर न जाता प्रवेश केलेल्या पातळीवरच मेरूरज्जूच्या गाभ्यातील कोशिकांपाशी अनुबंधक संधी करून दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ करतात. त्यांच्या क्रियाशीलतेमुळे रज्जूच्या पातळीवरील प्रतिक्षेपी क्रिया घडून येतात. दुसऱ्या टप्प्यातील काही तंतू परत पृष्ठीय स्तंभात प्रवेश करतात, तर काही स्वतंत्रपणे वर मानेपर्यंत किंवा निमस्तिष्कापर्यंत पोहोचतात, परंतु बहुसंख्य तंतू खाली दिलेल्या पार्श्वप्रणालीत प्रवेश करतात.
अग्रपार्श्वप्रणाली : यातील तंतू कमी जाडीचे, मंद गतीचे मायेलिन आवरणयुक्त असून विविध प्रकारच्या संवेदनांचे वहन करण्याची क्षमता त्यांच्यात आढळते. वेदना, तापमान, ढोबळ स्पर्श व दाब, खाज, गुदगुल्या, लैंगिक उत्तेजनाच्या संवेदना यांचा त्यात समावेश होतो. रज्जूच्या गाभ्यातील कोशिकायुक्त करडे ऊतक अशा संवेदनांचा स्वीकार करते. या ऊतकाच्या पाठीकडील भागातील पश्चशृंग क्षेत्रातील कोशिकांपासून दुसरा टप्पा सुरू होतो. तेथून निघणारे तंतू थोडे पुढे येऊन रज्जूच्या मध्यास ओलांडून दुसऱ्या बाजूस जातात. तेथे वरच्या दिशेस वळून त्यांचा प्रवास पश्च शुभ स्तंभांत सुरू होतो. काहीशी विस्कळीत रचना असलेल्या या स्तंभातील तंतू थॅलॅमस, मस्तिष्क स्तंभ व मध्यमस्तिष्क अशा विविध पातळ्यांपर्यंत पोहोचतात. थॅलॅमसापासून प्रमस्तिष्काकडे जाणारा तिसरा टप्पा सुरू होतो. तसेच मेंदूच्या तळाशी असलेल्या विविध क्षेत्रांशी या प्रणालीतील तिसऱ्या टप्प्याचे तंतू संपर्क साधतात.
या प्रणालीमध्ये वेदनांच्या संदेशांसाठी (बोथट आणि तीक्ष्ण असे दोन प्रकार) दोन स्वतंत्र तंतूचे समूह आढळतात. संदिग्ध जळजळणारी वेदना मंद गतीच्या तंतूमधून मस्तिष्क स्तंभ आणि आसपासच्या क्षेत्रांपर्यंत पोहोचते. उलट तीक्ष्ण टोचणारी किंवा कापणारी वेदना जलद गतीच्या, उत्कांतिप्रक्रियेत नव्याने निर्माण झालेल्या नव-मेरूरज्जू थॅलॅमसीय मार्गाने जाते. प्रमस्तिष्कापर्यंत पोहोचणाऱ्या या वेदनेची स्थाननिश्चिती सहज होऊ शकते. तापमानाच्या संवेदनाचे मार्ग सर्वसाधारणपणे वेदना मार्गासारखेच असतात.
संवेदनांची प्रमस्तिष्कातील प्रक्रिया स्थाने : (आ.२). प्रमस्तिष्काच्या प्रत्येक गोलार्धात साधारणपणे मध्यावर दोन कानांना जोडणाऱ्या, आडव्या रेषेतून जाणाऱ्या आणि मेंदूचे पुढचा भाग व मागचा भाग असे विभाजन करणाऱ्या प्रतलावर एक आडवी सीता (घळ) असते. तिच्या पुढील भागात प्रेरक क्षेत्रे व पाठीमागील भागात संवेदनाग्राहक व प्रक्रियाकारी क्षेत्रे असतात. आडव्या सीतेला लागून असलेल्या संवे-लकात संवेदना क्षेत्र क्र. १ असते. त्यात थॅलॅमसापासून येणारे तिसऱ्या टप्प्याचे तंतू आपले संदेश पोहोच वितात. या क्षेत्राच्या आडव्या विस्तारात-आडव्या सीतेला समांतर विस्तारात-शरीराच्या सर्व भागांचे प्रतिनिधित्व करणारी लहानलहान क्षेत्रे ओळीने विकसित झालेली दिसतात. पायाकडील भागाचे क्षेत्र शरीराच्या मध्याकडील पृष्ठभागावर असून तोंडाकडील भागांची क्षेत्रे आडवी सीता संपून मेंदूचा शंख-खंड जेथे सुरू होतो त्याच्या जवळ असतात. याच भागाच्या जवळ संवेदना क्षेत्र क्र. २ असते. त्यातही सर्व भागातील संवेदना पोहोचत असल्या, तरी तेथील क्षेत्रीय विभाजन तितकेसे काटेकोर दिसत नाही. सर्वसाधारण संवेदनाग्राही प्रणालीतून आलेले सर्व संदेश (विशेषत: क्र. २ अ व २ ब प्रकारचे) प्रमस्तिष्कातील या दोन संवेदनाक्षेत्रांमध्ये ग्रहण केले जातात. त्यामुळे कोणत्या प्रकारची संवेदना आहे व ती शरीराच्या कोणत्या भागातून आली आहे याची स्पष्ट जाणीव होते. संवेदना क्षेत्र क्र. २ मध्ये मस्तिष्कस्तंभ, शरीराच्या दुसऱ्या (डाव्या, उजव्या) बाजूच्या संवदेना आणि प्रमस्तिष्कातील इतर क्षेत्रांकडून (श्रवण, दृष्टी इ.) संदेश येतात. त्यामुळे हे क्षेत्र सर्व संवेदनांचे संकलन करून अधिक पूर्णपणे अर्थनिर्णयन करण्यास मदत करते.
संवेदना क्षेत्र क्र. १ ला लागूनच पाठीमागे सर्वसाधारण संवेदनांचे सहक्षेत्र (साहचर्य क्षेत्र) पसरलेले आढळते. या क्षेत्रात क्षेत्र क्र. १, थॅलॅमसाचे सर्व भाग, श्रवणादि सर्व विशेष संवेदनांची क्षेत्रे यांच्याकडून माहिती येते व साठविली जाते. त्यामुळे एखादया वस्तूच्या स्पर्श-दाब-तापमान या संवेदनांतून आणि त्याच्या पूर्वानुभवावरून ती वस्तू कोणती आहे ते न पाहता (किंवा न ऐेकता, न हुंगता) लक्षात येते उदा., अंधारात घरातील वस्तू चाचपून ओळखणे. रूप किंवा आकार संश्लेषण या नावाने ओळखला जाणारा या क्षेत्राच्या कार्याचा हा महत्त्वाचा भाग साध्या किंवा जटिल सर्व वस्तूंच्या अभिज्ञानासाठी (ओळखण्यासाठी) उपयोगी पडतो. अपघाताने किंवा आजाराने हे क्षेत्र नीट काम करेनासे झाल्यास नित्याच्या व्यवहारात अडचण येते. बाह्य वस्तूचे नव्हे तर स्वत:च्या एका बाजूच्या अवयवांचे भान न राहिल्याने त्यांचा वापर कमी होऊ लागतो.
प्रमस्तिष्कातील इतर संवेदक क्षेत्रांची रचना साधारणपणे अशीच असते. शंख-खंडातील श्रवणक्षेत्र, पश्चकपालखंडातील दृष्टिक्षेत्र (दृक्क्षेत्र), आडव्या मध्यसीतेच्या आतील बाजूस असलेले स्वाद क्षेत्र आणि प्रमस्तिष्काच्या तळाशी असलेले गंधक्षेत्र यांना त्यांच्या समीप असलेली सहक्षेत्रे अभिज्ञानासाठी साहाय्य करतात. सर्व संवेदनाक्षेत्रांपासून प्रमस्तिष्काच्या पुढच्या भागातील प्रेरक क्षेत्रांकडे जाणारे तंतू स्नायूंच्या आवश्यक अशा हालचाली घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरतात.
खालच्या पातळीवरील संवेदन प्रक्रिया : प्रमस्तिष्कातील ऊतके उत्कांतीच्या दृष्टीने सर्वांत नवीन व प्रगत आहेत. त्यांच्या निर्मितीपूर्वी थॅलॅमस व इतर केंद्रे संवेदनांचे विश्लेषण करीत. अजूनही ही क्षमता अंशत: टिकून आहे. प्रमस्तिष्काचा भाग काढून टाकलेल्या प्राण्यांमध्ये वेदना आणि तापमान यांचे संवेदन जाणण्याची व त्यांच्या तीव्रतांच्या चढ-उतारांना प्रतिसाद देण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होत नाही. वेदनेची गुणवत्ता (प्रकार) व तिचे नक्की स्थान यांच्या आकलनात मात्र बाधा येते.
मस्तिष्क स्तंभाच्या क्षेत्रातील जालिकाकार प्रणाली मेंदूतील सर्वच केंद्रांना उत्तेजित करू शकते. तीव्र वेदना या प्रणालीला कार्यान्वित करून असे उत्तेजन निर्माण करू शकते. उदा., तीव्र वेदनेमुळे झोप लागणे अशक्य होते. स्वायत्त तंत्रिका तंत्रातील बदलांमुळे रक्तदाब व हृदयाचे स्पंदन वाढते, घाम फुटतो.
पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक संवेदनांचे तंतू मेरूरज्जूच्या गाभ्यातील कोशिकांपाशी संपतात व स्थानिक पातळीवरील प्रतिक्षेपी क्रिया घडवून आणतात. याच पातळीवर काही प्रमाणात वेदना सहन करण्याची क्षमता निर्माण करणारी यंत्रणा आता प्रकाशात आली आहे. एन्सेफॅलिन यंत्रणा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रणालीच्या नियंत्रक कोशिका मेंदूच्या मस्तिष्क नालीभोवती मस्तिष्क स्तंभांच्या क्षेत्रातील (तिसऱ्या व चौथ्या मस्तिष्क विवराजवळील क्षेत्रातील) ऊतकांत आढळतात. त्यांच्यापासून निघणारे तंतू आपले संदेश मेरूरज्जूच्या गाभ्यात पोहोचवितात व त्यामुळे तेथे एन्सेफॅलिन द्रव्ये निर्माण होतात. या द्रव्यांमध्ये वेदनांच्या संवेदना रोखण्याची क्षमता असते.
पाहा : गंध; जीभ; डोळा; तंत्रिका तंत्र; तहान; त्वचा; नाक; प्रेरक तंत्र; भूक; मेंदू; रूचि; श्रवणक्रिया; स्पर्शज्ञान; स्वाद.
संदर्भ : 1. Barr, M. L. Human Nervous System, 1993.
2. Eccles, J. C. Evolution of the Brain: Creating of the Self, London, 1989.
3. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1996.
4. Kandel, E. R. and others, Principles of Neural Science, 1993.
5. Siegel, G. and others, Eds., Basic Neurochemistry: Molecular, Cellular and Medical Aspects, 1994.
6. Warwick, R. Williams, P., Eds., Gray’s Anatomy, London, 1989.
7. Wild, G. C. Benzel, E. C. Essentials of Neurochemistry, 1994.
8. Yusef, H. K. Understanding the Brain and its Development: A Chemical Approach, 1992.
श्रोत्री, दि. शं.