संविदाकल्प : (क्वासी कॉन्ट्रॅक्ट). कराराच्या विधय वर्गात (कॅटिगरीज) न मोडणारी एक सर्वसाधारण न्यायशास्त्रातील दायित्वासाठी वापरलेली संज्ञा. तीत सांविधिक बंधन असते परंतु दोन्ही पक्षांच्या संमतीवर ती विसंबून नसते. तिचे स्वरूप वरवर पाहता करारसदृश दिसते. थोडक्यात, संविदाकल्प ही कायदयाने संमत (मान्य) केलेली मनुष्यकृती होय. ती त्यांना दुसऱ्यावर उपकार करण्यास उद्युक्त करते, उभयतांना कुठलाही करारनामा प्रतिबंध करीत नाही, याविषयी भारतीय संविदा अधिनियम, १८७२ मध्ये एक विशेष प्रकरण आहे. त्यात ‘ करारामुळे निर्माण होणाऱ्या नात्यांसदृश नाती ’ असा स्वतंत्र भाग आहे. इथे प्रत्यक्ष करार नसूनसुद्धा करार असल्याप्रमाणे नाती उद्भवतात. हे करार नाहीत, कारण यांमध्ये कराराच्या एखादया लक्षणाचा अभाव आहे. उदा., संमती, करार करण्याची क्षमता, प्रतिफल इ. गैरवाजवी आणि अन्याय्य लाभ टाळण्यासाठी या नात्यांना विशेष महत्त्व आहे.

एखादयाने दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन अनुचित आणि अन्याय्य लाभ मिळविला, तर तो परत करायला भाग पाडले पाहिजे. या नात्यांमधली जबाबदारी या न्याय्य – तत्त्वांवर आधारित आहे आणि कायदयाने लादली आहे. ती चुकविली, तर करार केला असल्याप्रमाणेच नुकसानभरपाई दयावी लागते.

१८७२ च्या अधिनियमात दिलेली पाच नाती : (१) करार करण्यास अक्षम व्यक्तीस किंवा तिच्यावर अवलंबून असलेल्याला, जो गरजेच्या आवश्यकता पुरवितो त्याला, खर्चाची प्रतिपूर्ती करून मिळते अक्षम व्यक्तीबरोबर ठरलेली रक्कम मिळत नाही. खरोखरीच गरज आहे का ? ते त्या अक्षम व्यक्तींच्या जीवनमानानुसार ठरविले जाते. आवश्यक गोष्टींची उदाहरणे : कपडे, शिक्षणाचा खर्च, दैनंदिन गरजा, औषधोपचाराचा खर्च, मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर उपाय करण्याचा खर्च इत्यादी. (२) स्वत:चे हित जपण्यासाठी एखादयास रक्कम अदा करावी लागली-जी रक्कम देण्याचे दायित्व दुसऱ्याचे आहे-तर ती रक्कम दुसऱ्याने भरून दिली पाहिजे. उदा., मालकाने शेतजमिनीचा सारा न भरल्यामुळे होणारी जमिनीची विकी थोपविण्यासाठी जमिनीच्या भाडेकरूने साऱ्याची रक्कम भरली, तर ती मालकाकडून वसूल करता येते. (३) एखादयाने दुसऱ्यासाठी चुकीने काही केले किंवा एखादी वस्तू पुरविली आणि ती मोफत पुरविण्याचा हेतू नसेल, तर त्याला दुसऱ्याकडून ती वस्तू परत किंवा तिची भरपाई मिळाली पाहिजे. उदा., एका विकेत्याने चुकून पुरविलेली वस्तू दुसऱ्याने वापरली, तर त्याची किंमत दिली पाहिजे. अनेकदा करार होण्यापूर्वी बोलणी चालू असताना माल पुरविला किंवा करार होईल या अपेक्षेने काम सुरू केले परंतु करार झाला नाही तर याच तत्त्वामुळे केलेल्या पुरवठयाचा किंवा कामाचा मोबदला मागता येतो. तसेच करारामध्ये ठरविलेल्या कामाव्यतिरिक्त काम केले आणि ते काम स्वीकारले, तर त्याचा मोबदला मागता येतो. (४) ज्याला दुसऱ्याची वस्तू सापडते त्याच्यावर उपनिहितीची (बेली) जबाबदारी असते. त्याने स्वत:ची वस्तू असल्याप्रमाणे तिची काळजी घेतली पाहिजे, मालक शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मालक सापडल्यावर ती सुपूर्द केली पाहिजे. (५) एखादयाने दुसऱ्यास चुकीने किंवा धाकाखाली रक्कम दिली किंवा वस्तू पुरविली, तर दुसऱ्याने ती परत केली पाहिजे. याच तत्त्वानुसार चुकीने वसूल केलेला कर परत मागता येतो. उदा., एका व्यक्तीला देय धनादेश बँकेने त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीस अदा केला, तर बँक धनादेशाची रक्कम परत मागू शकते.

पहा : संविदा कायदे.

संदर्भ : Bhadabhade, Nilima, Ed., Pollock and Mulla’s Contract and Specific Relief Acts (12th Edition), Delhi, 2001.

भडभडे, नीलिमा