संयुक्त राष्ट्रे औदयोगिक विकास संघटना : (युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन). विकसनशील व अर्धविकसित राष्ट्रांना औदयोगिक धोरणांविषयी सल्ल देणारी यूनोची एक उपशाखा-संस्था युनिडो या नावाने परिचित आहे. यूनोच्या आमसभेने १९६६ मध्ये तिची (युनिडो) स्थापना केली. यूनोच्या विशेष साहाय्यभूत संस्थेत तिचे रूपांतर १९८५ मध्ये करण्यात आले.
उद्दिष्टे : अर्धविकसित व विकसनशील राष्ट्रे यांना आजच्या जागतिक परिमाणांच्या संदर्भात दारिद्रय आणि टोकाची अवस्था यांविरूद्घ चालू असलेल्या संघर्षात युनिडो साहाय्य करते. उत्पादक रोजगार, स्पर्धाशील अर्थव्यवस्था तसेच अनुकूल परिस्थिती यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने युनिडो ज्ञान, कौशल्ये, माहिती व तंत्रज्ञान यांचा अधिकाधिक प्रसार करीत असते. उत्पादकता आणि आर्थिक वृद्घी यांची अधिकाधिक वाढ होण्याकरिता युनिडो दारिद्रय नाहीसे करण्याचे लक्ष्य बाळगून आहे.
कार्ये : विश्वमंचावर काम करण्याच्या उद्देशाने, युनिडो ही संघटना औदयोगिक घडामोडींशी संबंधित अशा ज्ञानाची निर्मिती व त्याचा प्रसार करीत असते आणि याचा उपयोग ती सरकारी व खाजगी क्षेत्रांतील निर्णय प्रायोजक, मुलकी क्षेत्रातील संघटना आणि समाजातील निर्णय अधिकारी या घटकांना एका मंचावर आणून त्यांच्या माहितीसाठी कार्य करीत असते. यायोगे सहकार्याला प्रोत्साहन, संवादाचे साधन तसेच भागीदारीची निर्मिती करणे शक्य होते. तांत्रिक सहकार्यक्षेत्राचा विचार केल्यास, सदस्य-राष्ट्रांच्या औदयोगिक विकास प्रयत्नांत सहभागी होण्याच्या दृष्टीने युनिडो कार्यक्रमांची आखणी व कार्यवाही पार पाडते. कार्यक्रमांच्या विकासासाठी युनिडो विशिष्ट उद्देशानुसारी विशेष आधार सादर करते. युनिडो परस्पर-पूरक आणि आधारभूत अशी पुढीलप्रमाणे दोन महत्त्वाची कार्ये पार पाडते. एका बाजूने युनिडोला तांत्रिक सहकार्याबाबत मिळणारा अनुभव हा निर्णय अधिकाऱ्यांना लाभदायक ठरतो तर दुसऱ्या बाजूने युनिडोचे विश्लेषणात्मक कार्य तांत्रिक सहकार्याचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या अगमानांकित प्रकल्पाला लाभणार आहे, ते स्पष्ट करते.
संघटना : युनिडोची १७१ सदस्य-राष्ट्रे आहेत. तिचे प्रधान कार्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे असून विविध सदस्य-राष्ट्रांत २८ विभागीय कार्यालये, १३ गुंतवणूक व तंत्रज्ञान प्रोत्साहन कार्यालये तसेच विशिष्ट कार्याला वाहून घेतलेली काही कार्यालये आहेत.
युनिडोचे सचिवालय प्रमुख महानिदेशक आणि तीन विभागांचे व्यवस्थापकीय संचालक यांचे मिळून बनलेले असते. कार्यक्रम विकास व तांत्रिक सहकार्य हा पहिला विभाग कार्यक्रम समन्वय व प्रत्यक्ष कार्यवाही हा दुसरा विभाग आणि प्रशासन हा तिसरा विभाग. २००४ मध्ये युनिडोच्या प्रधान कार्यालयात ६४६ माणसे काम करीत होती.
युनिडोचा सामान्य प्रशासन विभाग धोरण व अर्थसंकल्प निर्धारित करण्याकरिता दोन वर्षांतून एकदा भरतो. या विभागाद्वारा औदयोगिक विकास मंडळाची निवडणूक होते. या मंडळाची ५३ सदस्य-राष्ट्रे असून त्यांची निवड सामान्य प्रशासन विभागामार्फत होते. सामान्य प्रशासन विभाग कार्यक्रम व अर्थसंकल्प समितीची निवड करतो. या समितीवर २७ राष्ट्रांचे सदस्य असतात.
अर्थकारण : युनिडोचा एकूण वित्तप्रबंध (वित्तीय साधनसामगी), नियमित अर्थसंकल्प, कार्यकारी अर्थसंकल्प आणि तांत्रिक सहकार्य कार्य-कमांसाठीचा वित्तप्रबंध या तिन्हींमधून होत असतो. २००२-२००३ या वर्षासाठी समग अर्थसंकल्प ३,४९३ लक्ष (म्हणजे ३४.९३ कोटी) अमेरिकी डॉलर एवढा होता. एकूण अर्थसंकल्पाच्या ७.६% एवढा प्रशासकीय खर्च होतो.
युनिडोची खालील प्रकाशने आहेत :
युनिडोस्कोप सामाजिक इंटरनेट वृत्तपत्र, युनिडो वार्षिकी, इंडस्ट्री फॉर ग्रोथ इंटू द न्यू मिलेनियम, आफ्रिकन इंडस्ट्री : द चॅलेंज ऑफ गोइंग ग्लोबल, गाइडलाइन्स फॉर प्रोजेक्ट इव्हॅल्यूएशन, गाइड टू प्रॅक्टिकल प्रोजेक्ट, अप्रेझल-सोशल बेनिफिट-कॉस्ट ॲनॅलिसिस इन डेव्हलपिंग इंडस्ट्रीज, मॅन्युअल ऑन टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर निगोशिएशन्स, काँपिटिशन अँड द वर्ल्ड इकॉनॉमी, द इंटरनॅशनल इअरबुक ऑफ इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक्स २००५, वर्ल्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट रिपोर्ट २००५, रिफॉर्मिंग द यूएन्सिस्टम-युनिडोज नीड-ड्रिव्हन मॉडेल.
संदर्भ : Murphy, Craig N. International Organisation and Industrial Charge, New York, 1994.
गद्रे, वि. रा.