संमुखनति : भूकवचातील अनेक खडक (उदा., गाळाचे खडक) थरांचे बनलेले असतात. पर्वतनिर्मितीसारख्या परिस्थितीत खडकांचे थर आडव्या दिशेत दाबले जाऊन त्यांना घडया पडतात. पन्हाळासारखा अवतल (खोलगट) आकार असलेल्या घडीला संमुखनती (अधोवली) म्हणतात. हिच्या दोन बाहूंच्या (बाजूंच्या) ⇨ नती (तिरकेपणा) परस्परविरूद्ध पण एकाच दिशेकडे म्हणजे संमुखनतीच्या अक्षाकडे असते. म्हणून हिला संमुखनती म्हणतात. ⇨ विमुखनती हिच्या उलट असते. खडकांचे थर दाबले जाऊन संमुखनती व विमुखनती एकाआड एक बनलेल्या आढळतात. यामुळे तरंगांसारखी नागमोडी घडी बनते. सममित संमुख-नतीत तिच्या बाहूंवरील खडकांचे थर खालील दिशेत समान कोन करून कललेले असतात. असममित संमुखनतीत बाहूंवरील खडकांच्या थरांचे कलण्याचे कोन समान नसतात. संमुखनती उलटलेली वा आडवी झालेली असू शकते. अतिशय घट्टपणे दाबल्या गेलेल्या संमुखनतीमध्ये तिचे बाहू जवळजवळ समांतर झालेले असू शकतात. संमुखनती सर्वांत जुन्या खडकांच्या थरांच्या दिशेत बहिर्गोल आणि सर्वांत नवीन खडकांच्या थरांच्या दिशेत अंतर्गोल असते. यामुळे संमुखनती असलेल्या प्रदेशात प्रवास करताना तिच्या अक्षाकडे जाताना उत्तरोत्तर अधिक नवे थर आढळतात. संमुखनती सूक्ष्म ते पर्वताएवढया असतात.
पहा : घडया, खडकांतील विमुखनति.
ठाकूर, अ. ना.