संपूर्णानंद संस्कृत विश्वविदयालय : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील संस्कृत व पाली या भाषा आणि प्राचीन धर्मशास्त्रे यांच्या अध्ययन-अध्यापनासाठी बनारस येथे १९५८ साली स्थापन झालेले विदयापीठ. प्रारंभी बनारसमधील शासकीय संस्कृत महाविदयालयाचे रूपांतर वाराणसेय संस्कृत विश्र्वविदयालयात करण्यात आले. १४ डिसेंबर १९७४ पासून त्याचे संपूर्णानंद संस्कृत विश्र्वविदयालय असे नामांतर झाले. विदयापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून अंशतः ते निवासीही आढळते. भारतातील सु. १,९९८ महाविदयालये विदयापीठाला संलग्न असून फक्त दोनच महाविदयालये विदयापीठक्षेत्रात आहेत. विदयापीठात संस्कृत, पाली व इतर प्राकृत भाषांच्या विदयाशाखांव्यतिरिक्त ज्यातिष, प्राचीन व्याकरण, नव्य व्याकरण, प्राचीन राज्यशास्त्र- अर्थशास्त्र, पुराणेतिहास, साहित्य, ललित कला, संगीत, षड्दर्शने, तंत्र आगम, तुलनात्मक धर्मदर्शन, वेदान्त, बौद्ध व जैन दर्शने, पाली व थेरवाद, प्राकृत व जैन आगम, आधुनिक भाषा व भाषाविज्ञान, गंथालयशास्त्र, सामाजिक विज्ञान, शिक्षणशास्त्र, विज्ञान इ. विषय शिकविले जातात. प्रथमा, पूर्व मध्यमा, उत्तर मध्यमा यांसारखे छोटे अभ्यासक्रम असून त्यांत उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्रिका प्राप्त होते. शास्त्री, आचार्य, शिक्षाशास्त्री ह्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा असून विदयावारिधि आणि वाचस्पती या पदव्या संशोधनाव्दारे प्रबंध सादर केलेल्या विदयार्थ्यांना दिल्या जातात. याशिवाय आयुर्वेदाचार्य या पदवीसाठी पाच वर्षांचा अभ्यासक्रमही आहे.
विदयापीठाचे शैक्षणिक सत्र जुलै ते एप्रिल असे आहे. शास्त्री व आचार्य या पदवी परीक्षांसाठी अनेक छात्रवृत्त्या असून स्वतंत्र संशोधनासाठी, विशेषतः वाचस्पती या पदव्युत्तर पदवीसाठी, भरीव आर्थिक साहाय्य विदयापीठ देते. बहिःस्थ परीक्षांचीही सोय विदयापीठात आहे. विदयापीठाच्या गंथालयात १,५०,००० पोथ्या व जुनी हस्तलिखिते असून १,१२,२२१ इतर पुस्तके आहेत. परदेशांतूनही अनेक विदयार्थी येतात. १९९८ मध्ये एकूण विदयार्थिसंख्या ३५,००० होती. कुलगुरू व कुलसचिव ही सवेतन पदे विदयापीठात आहेत.
देशपांडे, सु. र.