संधिप्रकाश : सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर असणारा प्रकाश. सकाळी काळोख व सूर्योदय यांमधील किंवा संध्याकाळी सूर्यास्त व काळोख यांमधील कालात दिसणाऱ्या संधिप्रकाशाची कारणे व त्यांचे कालावधी सारखेच असल्याने एका संधिप्रकाशाचे स्वरूप समजले म्हणजे दुसऱ्या संधिप्रकाशाचे स्वरूपही कळून येते.

वातावरणामुळे संधिप्रकाश निर्माण होतो. वातावरण नसते तर सूर्योदयाच्या वेळेस एकदम उजेड आणि सूर्यास्तानंतर एकदम अंधार झाला असता. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पृथ्वीच्या पृष्ठाजवळून जाणारे सूर्यकिरण तिच्या वक्रपृष्ठाने अडविले जातात, परंतु उंच वातावरणातून जाणाऱ्या सूर्यकिरणांचे वातावरणातील धूळ, पाणी, हिम इत्यादींच्या कणांमुळे व हवेच्या रेणूंमुळे प्रकीर्णन होऊन ते पृथ्वीच्या पृष्ठाकडे विखुरले जातात. हाच संधि-प्रकाश होय. अक्षांश, रेखांश, उंची, वातावरणाची जाडी व त्यांतील कणांचे प्रमाण, सूर्याचा क्षितिजाखाली जाण्याचा वेग व सूर्याचे कलन, ऋतू , स्थानिक परिस्थिती (हवामान, झाडे, टेकडया इ.) यांवर संधिप्रकाशाचा काल व तीव्रता या गोष्टी अवलंबून असतात.

विषुववृत्तावर सूर्यकिरण लंब असतात. त्यामुळे सूर्य क्षितिजाखाली जाण्यास कमी वेळ लागतो. तेथे सु. एक तास संधिप्रकाश असतो. विषुव-वृत्तापासून धुवांकडे जाताना सूर्यकिरण तिरपे होत जातात. त्यामुळे सूर्य क्षितिजाखाली जाण्यास लागणारा वेळ वाढत जातो. ५० अक्षांशापुढील प्रदेशात उन्हाळ्याच्या मध्यास रात्रभर संधिप्रकाश असतो. त्यालाच ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रकाश’ म्हणतात.

संधिप्रकाशाच्या तीन अवस्था मानल्या जातात. (१) सूर्याचा मध्य क्षितिजाखाली ०° ते ६° असेपर्यंतच्या कालातील संधिप्रकाशाला ‘नागरी संधिप्रकाश’ म्हणतात. या कालात आकाश निरभ असल्यास उघडयावरील नेहमीची कामे कृत्रिम प्रकाशावाचूनही करता येतात. (२) सूर्याचा मध्य क्षितिजाखाली ६° ते १२° असेपर्यंतच्या कालातील संधिप्रकाशाला ‘नाविक संधिप्रकाश’ म्हणतात. या काळात तेजस्वी तारे व क्षितिज दिसू शकतात. (३) सूर्याचा मध्य क्षितिजाखाली १२° ते १८° असेपर्यंतच्या कालातील संधिप्रकाशाला ‘खगोलीय संधिप्रकाश’ म्हणतात. यानंतर आकाशात सूर्याच्या प्रकाशनाचा काही मागमूस राहत नाही व पूर्ण अंधार होतो. अशा प्रकारे व्याख्या केल्यामुळे नाविक पंचांगातील तक्त्यांवरून कोठल्याही अक्षांशा-वरील व कोणत्याही दिवसाकरिता संधिप्रकाशाच्या तीन अवस्थांचे काल, सुरूवात व शेवट अचूकपणे काढता येतात.

पहा : दिवस वातावरणीय प्रकाशकी.                                                                                                                

ठाकूर, अ. ना.