संदेशवहन, सैनिकी : लष्करातील व्यक्ती अथवा विभाग यांमधील घटनांचा संदेश देणारी चिन्हांकित सर्वसाधारण प्रणाली. मानवी व्यवहाराचे संदेशवहन हे एक मूलभूत अंग आहे. नागरी क्षेत्रात संदेश- वहनाची साधने आणि तंत्रे यांना महत्त्व आहेच तथापि सैनिकी क्षेत्रात त्यांस अनन्यसाधारण महत्त्व आहे. संदेशवहनाचे स्वरूप, उद्दिष्टे, तंत्रे, साधने इत्यादींत होत गेलेल्या वैकासिक प्रगतीला मोठाच इतिहास आहे. या ऐतिहासिक विकासकमाशी सैनिकी संदेशवहनाचा इतिहास व विकास समांतर आहे.

संदेशवहनाच्या सर्व तंत्रांचा, साधनांचा उपयोग सैनिकी संदेशवहना- मध्ये करण्यात आल्याचे दिसून येते. सैनिकी संदेशवहनामध्ये वर उल्लेखि-लेल्या तंत्रांचा वापर एकाच ठिकाणी कायम राहणाऱ्या अथवा टेलिफोन किंवा फायबर ऑप्टिकच्या तारांनी जोडल्या गेलेल्या मुख्य कार्यालय व त्याच्या उपकार्याल यादरम्यान संपर्क ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल पण शत्रूशी लढणाऱ्या तिन्ही दलांच्या तुकड्या, ज्यांची सतत हालचाल चालू असते, त्यांच्याशी रेडिओव्दाराच संपर्क साधणे शक्य होईल. भूदलामध्ये रेडिओ, रडार, दूरध्वनी, दूरचित्रवाणी व दूरमुद्रक अशी जी यंत्रणा वापरात असते, त्यांपैकी रेडिओ हा सर्वांत जास्त वापरला जातो पण तो सर्वांत असुरक्षित असतो कारण शत्रू त्यात बाधा आणू शकतो, त्यावरील संभाषण ऐकू शकतो व संदेश पाठविणाऱ्या रेडिओचे स्थान शोधू शकतो. गुप्ततेसाठी गूढ संकेत वापरून रेडिओ संदेश पाठवावे लागतात.

भूदलातील रेडिओच्या उपयोगात सर्व स्तरांवर निरोप्यांचा भरपूर वापर होतो. तसेच दृक् व श्राव्य संकेतही वापरले जातात. तोंडी दिलेले हुकूम, हाताच्या खुणा, हातात झेंडे धरून पाठविलेले सांकेतिक संदेश, जमिनीवर कापडाच्या पट्ट्या अंथरून दिलेले संदेश, रंगीत दिवे, रंगीत दारूकामाव्दारे केलेल्या खुणा, धूर सोडणारे हातगोळे व तोफांचे गोळे यांसारखे डोळ्यांनी दिसणारे संकेत त्याचप्रमाणे कर्णे, रणशिंगे, शिट्टी व तोफांचे आवाज यांसारखे ऐकू येणारे संकेत, यांचा संदेशवहनासाठी भूदलात वापर करतात.

वायुदलातही रेडिओव्दारे विमान व विमानतळ यांच्या दरम्यान सर्व तृहेच्या उपयुक्त माहितीची देवाण-घेवाण चालू असते. आकाशात उडणाऱ्या विमानांदरम्यानचे, विशेषत: लढाऊ विमानांदरम्यानचे, रेडिओ संभाषण यशस्वी कामगिरीसाठी फार महत्त्वाचे असते. रेडिओ-तंत्राचा वापर विमानाचे स्थान व उडण्याची दिशा निश्र्चित करण्यासाठीही केला जातो. रडारच्या साहाय्याने शत्रूच्या विमानांची व क्षेपणास्त्रांची चाहूल तर लागतेच शिवाय खराब हवेत धावपट्टीवर अथवा विमानवाहक नौकांवर विमान उतरविण्यास मदत होते. लढाऊ विमानांना शत्रूच्या ठाण्यांवर अचूक हल्ल करण्यासाठी रडार मार्गदर्शन करते. मोठे प्रकाशझोत, धावपट्टीवरील दिवे व वाऱ्याची दिशा दाखविणारे कापडी ‘ मोजे ’ अथवा पिशव्या, तसेच धुराच्या बत्त्या धावपट्टीवर उतरणाऱ्या अथवा उड्डाण करणाऱ्या विमानचालकांना योग्य ते दृक्-संकेत देतात.

नौदलातही प्रामुख्याने रेडिओचा वापर होतो. रडारमुळे शत्रूच्या व इतर जहाजांचे स्थान समजू शकते. पाणबुड्या व पाणसुरूंग यांचे स्थान सोनार तंत्राच्या प्रतिध्वनीवर आधारित यंत्राने ठरविता येते. त्याशिवाय दिवे, ⇨ सेमॅफोर चे झेंडे, जहाजावरील झेंडे यांच्या व्दारे समुद्रावरील जहाजांदरम्यान संदेश दिले जातात. किनारपट्टीवरील दीपस्तंभ व खडकांवरील दिवे, जहाजांना किनारा जवळ असल्याची सूचना देऊन त्यांना आपले स्थान निश्र्चित करण्यासाठी मदत करतात. त्याशिवाय घंटा, कर्णे, शिट्ट्या इ. श्राव्य उपकरणांचा वापर नौदलात संदेशवहनासाठी केला जातो.

संकेत व त्यांच्या पद्धती : एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पाठविण्यासाठी सरळ संवाद अथवा लेखी संपर्क साधणे शक्य नसेल किंवा गुप्ततेच्या दृष्टीने अयोग्य असेल, तर संकेतांचा वापर करतात. त्यांचे तीन मुख्य प्रकार म्हणजे विद्युत्, दृक् व श्राव्य संकेत. त्यांसाठी विविध प्रकारची यंत्रे व उपकरणे वापरात आहेत. ठिपके (डॉट्स) व प्रास (डॅशेस) यांवर आधारलेल्या मॉर्स सांकेतिक लिपीप्रमाणेच ‘ सेमॅफोर ’ ही दृक्-प्रणाली हातातील झेंडयांनी संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरात आहे.

सैनिकी संदेशवहनाचे व्यवस्थापन : भूदल, नौदल व वायुदल यांचे शत्रूशी प्रत्यक्षात लढणारे विभाग आपली जागा बदलत असल्यामुळे, रेडिओव्दारे त्यांच्याशी संपर्क साधला जातो. तथापि या तीनही सैनिकी दलांची कार्यालये, तसेच बराच काळ खंदकांतून बचावाचे युद्ध करणारे भूदलाचे विभाग, हे एकाच ठिकाणी राहून आपले कार्य करतात. त्यांना दूरध्वनी, दूरमुद्रक यांसारखे तारायंत्रीय संदेशवहन उपयुक्त ठरते. ही सर्व यंत्रणा वापरण्याची मुख्य जबाबदारी प्रत्येक दलातील संदेशवहनविभागाकडे सोपविलेली असते. उदा., भारतीय भूदलातील कोअर ऑफ सिग्नल. जमिनीवर लढणाऱ्या सैन्यासाठी संदेशवहनाची यंत्रणा वापरण्याची, त्यांची देखभाल करण्याची व त्यासाठी मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याची जबाबदारी मुख्यत्वेकरून या विभागावर असते.

आधुनिक इलेक्ट्रॉनीय यंत्रे व उपकरणे आणि पारंपरिक तारायंत्रे, या सर्वांना यांत्रिक दृष्टया सुस्थितीत व कार्यक्षम राखण्यासाठी स्थायी व लढाऊ तुकडयांबरोबर जाणाऱ्या देखभाल-दुरूस्ती, कर्मशाला (रिपेअर वर्कशॉप) कार्यरत असतात. भारतात ही सर्व जबाबदारी कोअर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स व मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागावर सोपविलेली असते.

भूदलातील पायदळाच्या बटालियनमध्ये दृक्-श्राव्य संकेतांखेरीज रेडिओ व दूरध्वनीव्दारा सेक्शन, प्लॅटून, कंपनी व बटालियनचे मुख्य कार्यालय यांच्या दरम्यान संदेशवहन होते. हे काम करणारे जवान त्या त्या बटालियनचे खास प्रशिक्षित चालक असतात. इतर रेजिमेंटमध्ये ह्याच तृहेने सर्व पातळ्यांवर हे काम केले जाते. ब्रिगेड, डिव्हिजन, कोअर, कमांड व सेनामुख्यालय यांच्या कार्यालयांमध्ये आणि नौदल व वायुदल यांच्या तत्सम कार्यालयां-मध्ये रेडिओ तसेच दूरध्वनी आदी तारायंत्रे व संगणकाचा वापर करून सर्व पातळ्यांवर व दूरवर संदेशवहन केले जाते. यासाठी शक्तिशाली रेडिओ वापरतात. आधुनिक संदेशवहन यंत्रणेमध्ये संदेशवहनाचे जाळे देशाच्या सरहद्दीलगतच्या प्रदेशात पसरवून स्वयंचलित उपकरणाव्दारे व्यापक व झटपट संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात येते.

सैनिकी संदेशवहनाचे महत्त्व : संदेशवहनाची सुस्पष्ट लक्षणे आणि मीमांसा यांकडे विसाव्या शतकापर्यंत फारसे कुणी गांभीर्याने पाहिले नाही मात्र विज्ञानातील संशोधन व तंत्रविदयेतील प्रगती यांबरोबर जनसंचरणाच्या माध्यमाला चालना मिळाली. सैनिकी संदेशवहनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात सतत संशोधन होत असते. सैनिकी वापरातील इलेक्ट्रॉनीय तंत्रज्ञान सतत विकसित करण्याचे प्रयत्न अखंडपणे चालू असतात. सैनिकी संदेश अधिक गतीने, अधिक गुप्तपणे व अधिक दूरवर शत्रूचे अडथळे टाळून कसे पाठविता येतील, यासाठी हे प्रयत्न करण्यात येतात. शत्रूपक्षदेखील अशी यंत्रणा खंडित अथवा नष्ट कशी करता येईल, यावर संशोधन करतच असतो. आधुनिक काळात इलेक्ट्रॉनीय संदेशवहनाचे युद्ध जिंकल्यानंतरच शत्रूवर विजय मिळण्याची शक्यता अधिक असते. प्रत्यक्ष युद्ध चालू असो वा नसो, इलेक्ट्रॉनीय युद्ध मात्र सदैव चालूच असते. राष्ट्राची संरक्षणक्षमता ही सैनिकी संदेशवहनाच्या एकूण कार्यक्षमतेवर निर्भर असते. आधुनिक युद्ध-प्रणाली अधिकाधिक तंत्रज्ञानाभिमुख झालेली असून तीत अधिशासन, नियंत्रण, संदेशवहन व गुप्तवार्तासंकलन (सी आय-कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन व इंटेलिजन्स) यांचे महत्त्व वाढत चाललेले आहे. अतिसंहारक अशा आण्विक, जैविक व रासायनिक शस्त्रांचा वापर होण्याची संभाव्यता पाहता, राष्ट्राची सुरक्षितता व भवितव्य कार्यक्षम व अदययावत सैनिकी संदेशवहनांवर अवलंबून राहील.

पहा : गुप्तवार्ता रडार (रडार युद्घशास्त्र).

संदर्भ : Bittner, John R. Fundamentals of Communication, Englewood Cliffs. (N. J.), 1988.

पेंडसे, के. शं.