संगणक आलेखिकी : (कॉम्प्युटर गाफिक्स). संगणक आणि मानव यांच्यातील परस्परसंवाद आकडे व अक्षरे या माध्यमांऐवजी आलेख व चित्रे यांच्या माध्यमांतून साधण्याची सुविधा संगणक आलेखिकी प्रणाली उपलब्ध करून देते. आधुनिक संगणकावर काम करताना दर्शक पडद्यावर संगणकाकडून मिळणारे प्रदान, मोजके अपवाद वगळता, संगणक आलेखिकीव्दारेच दृश्यीकृत (दृश्यरूप) केले जाते. भौतिकी, गणित, अभियांत्रिकी, वास्तुकला, जीवशास्त्र, नैसर्गिक दृश्ये व घटना अशा विविध क्षेत्रांतील कार्ये त्या त्या क्षेत्रामधील संगणकीय प्रतिकृती वापरून केली जातात. त्या प्रतिकृतींवरून वास्तव किंवा काल्पनिक चित्रे दृश्यीकृत करण्यासाठीसुद्धा संगणक आलेखिकीचा उपयोग होतो. अशा प्रकारे दृश्यीकृत झालेली चित्रे या अर्थीसुद्धा संगणक आलेखिकी या शब्दसमूहाचा प्रयोग होतो. ही चित्रे आकृत्या किंवा छायाचित्रे यासारखी स्थिरचित्रे असू शकतात किंवा चलच्च्त्रिपटही असू शकतात. द्विमितीय आणि त्रिमितीय चित्रांच्या आकलनाची मानवी प्रक्रिया अतिशय विकसित व प्रगल्भ आहे. संगणकाशी व्यवहार करताना आलेखिकीचा उपयोग केल्याने या आकलन शक्तीचा उत्तम प्रकारे उपयोग करणे शक्य होते.
पडद्यावर किंवा मुद्रित कागदावर आलेख उमटविण्यासाठी संगणक आलेखिकी प्रणालीचा वापर सर्वप्रथम केला गेला. आज मात्र मानवसंगणक संवादाचे ते एक प्रमुख माध्यम बनले आहे. वैयक्तिक संगण-कांच्या उद्यानंतर या प्रणाली वापरण्यास अधिकाधिक सुलभ व कमी खर्चिक होत गेल्याने आलेखिकीविना संगणकच दुर्मिळ झाला आहे. वापरकर्त्यांनी दिलेल्या आदानावर प्रक्रिया करून आधुनिक संगणक दर्शक पडद्यावर त्वरित प्रदान देत असल्याने या आलेखिकी प्रणाली परस्परक्रियाशील (इंटरॲक्टिव्ह) या प्रकारात बसतात. यांचा उपयोग करून निर्माण केलेल्या मनोरंजक संगणक खेळांमुळे या प्रणाली बालकांसह सर्वांपर्यंत पोहोचल्या आहेत.
आद्य आलेखिकी प्रणाली ‘व्हेक्टर’ प्रकारच्या होत्या. त्यात पडद्यावर दिसणारे अक्षरमजकुरासह संपूर्ण चित्र रेषारेषांनी बनविले जाई. दर्शक पडद्यावर चित्र उमटविणारी कण (इलेक्ट्रॉन) शलाका या सर्व रेषा सेकंदाला पंचविसांहून अधिक वेळा पडद्यावर ओढत असे. रेखाचित्रांसाठी हे तंत्र पर्याप्त असले तरी चित्रांमध्ये रंगाच्या छटा भरण्यासारख्या कृती करणे त्यात फार कठीण जाई. अलीकडील सर्व आलेखिकी प्रणाली ‘रास्टर’ प्रकारच्या असून त्यातील चित्र सूक्ष्म बिंदुबिंदूंनी बनविले जाते. पडद्यावर संख्येने एकूण १२ लाखांहून अधिक असलेले हे बिंदू शेकडो आडव्या ओळींमध्ये बसविलेले असतात. प्रत्येक बिंदूचा रंग व उजळपणा यांचे मूल्य संगणक गणित करून काढतो व अशा रीतीने संपूर्ण चित्राचा चित्रबिंदू नकाशा (पिक्सेल मॅप) बनवितो. एकेका आडव्या ओळीतील चित्रबिंदू उमटवीत जाणारी कण शलाका सर्व पडदा प्रतिसेकंद पंचविसाहून अधिक वेळा पादाक्रांत करते.
आलेखिकी प्रणालीच्या साहाय्याने चित्रनिर्मिती करताना वापरकर्ता रिकाम्या पडद्यापासून सुरूवात करून एकेक वस्तू त्यात भरू शकतो. सुरूवातीला किंवा मधील कोणत्याही टप्प्यावर बाहेरून आयात केलेली वस्तू चित्रात सामील करण्याची सुविधाही त्याला मिळते. ती वापरून संगणकात पूर्वी भरलेली छायाचित्रे, आधी काढलेल्या चित्रातील वस्तू अशा गोष्टी तो आपल्या चित्रात समाविष्ट करू शकतो. चित्रातील वस्तूंचे गुणधर्म बदलणे, एखादी वस्तू किंवा तिचा भाग वगळणे अशा क्रियाही तो करू शकतो. तयार झालेले चित्र तो तबकड्यांवर साठवू शकतो, मुद्रकावर छापू शकतो किंवा जालकाव्दारे दुसऱ्या संगणकाकडे पाठवू शकतो. आलेखिकी-व्दारे निर्मिलेली चित्रे प्रत्यक्षात एखादया उपयोजनातील माहितीचे दृश्यीकरण असते. वापरकर्त्याचे कार्य त्या उपयोजनाशी संबंधित असते. आलेखिकी हे त्या उपयोजनाशी परस्परक्रिया करण्यासाठी वापरलेले एक माध्यम असते.
चित्र संस्करण किंवा प्रतिमा संस्करण हेही एक आलेखिकीशी संबंधित असे क्षेत्र आहे. याव्दारे चित्र अधिक स्पष्ट करणे, त्यातील गोंगाट (क्षोभ, गोंधळ) काढणे अशा प्रकारच्या क्रिया केल्या जातात. चित्राचे पृथक्करण करून त्यातील वेगवेगळ्या वस्तू शोधण्याचे कार्यही केले जाते. अशा वस्तूंचा उपयोग आलेखिकीमध्ये करता येतो. याउलट आलेखिकी प्रणालीही काही प्रकियांमध्ये चित्र संस्करणाचा वापर करू शकतात.
संगणक आलेखिकी स्थिरचित्रांप्रमाणेच चलच्च्त्रिांवरही कार्य करू शकते. यासाठी चलच्च्त्रिे ही स्थिरचित्रांची मालिका असल्याचे मानून प्रत्येक स्थिरचित्रावर कार्य केले जाते. या पद्धतीने १९९० च्या दशकात संगणक आलेखिकीचा वापर करून संपूर्ण चित्रपट बनविण्यात यश मिळाले. पूर्वी कधीही वापरले न गेलेले खास दृश्य परिणाम या चित्रपटात वापरले गेले होते.
आलेखिकी प्रणालीची रचना : आ. १ मध्ये दर्शविलेला तीन घटकांनी बनलेला संगणक आलेखिकी प्रणालीचा मानीव आराखडा बहुतेक सर्व आधुनिक परस्परक्रियाशील आलेखिकी प्रणालींचे यथार्थ वर्णन करू शकतो. उपयोजन सॉफ्टवेअर हा त्यातील मध्यवर्ती घटक आहे. पडद्यावर दाखविण्याच्या निरनिराळ्या वस्तू निर्माण करणे, त्यात बदल व सुधारणा करणे इ. कार्ये तो पार पाडतो. या सर्व वस्तूंचे गुणधर्म, आकार, त्यांचे चित्रातील स्थान यांची सर्व माहिती रचनाबद्घ पद्धतीने संगणकात साठविली जाते. उपयोजनातील अशी सर्व वस्तूंची माहिती संरचना संगहित करण्याचे व त्या संगहातून हवी ती माहिती मिळविण्याचे कार्यही उपयोजन सॉफ्टवेअर करते. अनेक उपयोजनांच्या बाबतीत ही माहिती संरचना एक स्थिर किंवा गतिशील प्रतिकृतीच असते. स्पष्टीकरणासाठी म्हणून एखादया यंत्राच्या संगणकसाधित अभिकल्पनाकडे (आराखडा तयार करण्याकडे) पाहू या. त्या यंत्रातील चक्रे, दांड्या, पट्टे, पृष्ठभाग इ. भाग या यंत्रातील वस्तू आहेत. या वस्तूंचे आकार, आकारमान, रंग, पृष्ठ-भागाचा पोत, तसेच त्यांचे परस्परसापेक्ष स्थान व कोन अशा प्रकारची सर्व माहिती रचनाबद्ध रीतीने मांडलेली असते. वरील उदाहरणात यंत्राची प्रतिकृती त्या माहिती संरचनेच्या स्वरूपात निर्मिली जाते. उपयोजन सॉफ्टवेअर या प्रतिकृतीची निर्मिती करते त्यात बदल, दुरूस्त्या व सुधारणा करून तिला अद्ययावत ठेवते व अशा रीतीने उपयोजनाचे संपूर्ण चित्र त्याला अनुरूप अशा माहिती संरचनेमध्ये मांडते.
आराखड्यातील तिसरा घटक आलेखिकी प्रक्रियक, वापरकर्त्याला उपयोजन सॉफ्टवेअरशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून देतो. माऊस, कळफलक अशा उपकरणांवरून वापरकर्त्याने आदान केलेली माहिती व आदेश हा प्रक्रियक उपयोजन सॉफ्टवेअरकडे त्याला ग्राह्य अशा स्वरूपात सुपूर्त करतो. उपयोजन सॉफ्टवेअरने निर्मिलेली प्रतिकृती प्रत्यक्ष दर्शक पडद्यावर दर्शविण्याचे, तसेच कागदावर तिचे मुद्रण करण्याचे कार्यही आलेखिकी प्रक्रियक करतो. त्यासाठी प्रतिकृतीचा कोणता भाग प्रत्यक्ष पडद्यावर दिसणार आहे, ते त्याला ठरवावे लागते. द्विमितीय चित्रात त्यासाठी एक दृश्य खिडकी कल्पिली जाते व तीमधून दिसणारा पलीकडील दृश्याचा भाग ठेवून उरलेल्या चित्राची छाटणी केली जाते. त्रिमितीय चित्रांमध्येसुद्धा एक दृश्य खिडकी कल्पून त्या खिडकीच्या अलीकडे एका दर्शन बिंदूवर प्रेक्षक असल्याचे मानले जाते. त्या दर्शन बिंदूचे खिडकीपासूनचे अंतर व दिशा यावरून त्या खिडकीमधून एकूण प्रतिकृतीचे कोणते व किती घनफळ दिसेल व ते कसे दिसेल ते ठरविले जाते. यावरून ते त्रिमितीय चित्र द्विमितीय स्वरूपात दर्शविता येते. अशा प्रकारे छाटणी करून प्रत्यक्ष दर्शवावयाच्या चित्राचे वर्णन आलेखिकी प्रक्रियकाला मिळाल्यावर तो त्याचे रूपांतर दर्शक पडद्यास अनुरूप अशा चित्रबिंदू नकाशात करून ते चित्र पडद्यावरील सुसंगत अशा खिडकीमध्ये उमटवितो.
चित्राचे व त्यातील वस्तूंचे जे वर्णन उपयोजन सॉफ्टवेअर आलेखिकी प्रक्रियकाला पुरविते ते उच्च्स्तरीय व भूमितीय स्वरूपाचे असते. उदा., पडद्यावर रेष उमटवावयाची असेल तर उपयोजन सॉफ्टवेअर त्या रेषेच्या दोन्ही टोकांचे सहनिर्देशक सांगेल. त्यावरून त्या रेषेतील प्रत्येक बिंदूचे सहनिर्देशक काढून त्यांचा चित्रबिंदू नकाशा तयार करण्याचे काम आलेखिकी प्रक्रियक करतो. हे सहनिर्देशक मूळ उपयोजनांमध्ये त्या त्या उपयोजन विश्वाशी सुसंगत असतात. उदा., उपयोजन जर यंत्राशी संबंधित असेल तर ते मूल्य मिलिमीटरमध्ये, भौगोलिक नकाशांसाठी किलोमीटर-मध्ये, अणुशास्त्राशी संबंधित असल्यास अँगस्ट्रॉम एककामध्ये, तर खगोलशास्त्राशी संबंधित असेल तर प्रकाशवर्षामध्ये असेल. त्यांचे रूपांतर चित्रबिंदूशी सुसंगत सहनिर्देशकात करण्याचे कार्यही आलेखिकीचा प्रक्रियक करतो.
मानीव आराखड्याचे वर्णन केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. एखादया ज्ञानक्षेत्रातील प्रणालीची सॉफ्टवेअर प्रतिकृती तयार करून तिचे दृश्य माध्यमात प्रस्तुतीकरण करण्यापर्यंत मधे येणारे टप्पे दर्शविणे हा त्यामागील उद्देश आहे. आराखड्यातील तीन घटकांमधील सीमारेषा आधुनिक आलेखिकी प्रणालीमध्ये अस्पष्ट झाल्या आहेत. सॉफ्टवेअर निर्मात्यांना आता आलेखिकीची कार्ये करणारे इंटरफेस (आदान-प्रदान करण्याची सुविधा देणारी मध्यस्थ प्रणाली) थेट उपयोजन सॉफ्टवेअर- मध्येच उपलब्ध असतात. हे इंटरफेस विविध उच्च्स्तरीय संगणकीय भाषांसाठी उपलब्ध असून निरनिराळ्या संगणकांबरोबर व परिचालन प्रणालीं बरोबर ते कार्य करू शकतात.विविध उच्च्स्तरीय आलेखिकी कृती करण्याची सुविधा देऊन हे इंटरफेस सॉफ्टवेअर निर्मात्यांना, भूमितीय तपशिलात न जाता, इच्छित आलेखिकी कृती पार पाडण्याचे स्वातंत्र्य देतात. उपयोजनातील वस्तूंचे आकार व गुणधर्म गुंतागुंतीचे असू शकतात. त्यांचे पृथक्करण रेषा, वर्तुळ, वकरेषा, वकपृष्ठे, वृत्तचिती अशा सुटसुटीत भूमितीय वस्तूंमध्ये करून, नंतर संगणकातील हार्डवेअरचा वापर करून सर्व वस्तू पडद्यावर दर्शविण्यापर्यंतची सर्व कार्ये उपयोजन सॉफ्टवेअर इंटरफेसव्दारे पार पाडली जातात.
भूमितीय अंगे : आलेखिकी सॉफ्टवेअरने निर्माण केलेल्या विविध आकाराच्या वस्तूंचे पृथक्करण सुगम अशा प्राथमिक भूमितीय आकारांमध्ये करता येते. प्राथमिक आकारांचे नेमके वर्णन मध्यबिंदू , शिरोबिंदू , व्यास अशा चलांव्दारे करता येते. या प्रत्येक आकाराचे विशिष्ट गुणधर्मही ठरविता येतात. उदा., त्याच्या रेषांची जाडी व शैली, त्यामध्ये भरावयाचा रंग व त्याच्या छटा. चित्रामध्ये काही मजकूर भरावयाचा असल्यास त्यातील अक्षरांची आकारमाने, शैली, रंग या गोष्टींचा निर्देशही करता येतो. उपयोजन सॉफ्टवेअरने एखादा उच्च्स्तरीय आकार काढण्याचा आदेश दिल्यानंतर गुंतागुंतीच्या आकाराची अनेक प्राथमिक आकारांमध्ये फोड करून मग प्रत्येक आकार व त्याचे गुणधर्म यांचा तपशील काढला जातो व मग त्याचा चित्रबिंदू नकाशा बनविला जातो.
सर्व चित्र तयार झाल्यानंतर त्यामध्ये इच्छित बदल करण्यासाठी भूमितीय परिवर्तने करावी लागतात. हे बदल चित्रात काही दुरूस्त्या, सुधारणा करण्यासाठी केले जातात किंवा प्रेक्षकाचा दर्शनबिंदू बदलल्यामुळेही ते आवश्यक ठरतात. एखादया वस्तूचा आकार लहान-मोठा करणे, तिचे चित्रातील स्थान बदलणे, वस्तू एखादया बिंदूभोवती किंवा अक्षाभोवती फिरविणे अशा प्राथमिक परिवर्तनांनी मिळून हे बदल घडविता येतात. खिडकीमध्ये बसविण्यासाठी चित्रांची छाटणी करणे, संपूर्ण चित्र खिडकी-मध्ये वर-खाली किंवा उजवीकडे-डावीकडे सरकविणे अशा कृतीही करता येतात.
त्रिमितीय चित्रे पडद्यावर दर्शविणे हे तुलनेने अधिक गुंतागुंतीचे क्षेत्र आहे. एकतर तिसरी मिती असल्याने चित्रातील वस्तू अधिक गुंतागुंतीच्या बनतात. शिवाय पडदा किंवा छपाईचा कागद हा द्विमिती असल्याने त्रिमितीचे द्विमितीत रूपांतर करावे लागते. त्यासाठी एका दर्शन प्रतलाची कल्पना केली जाते व त्रिमिती (किंवा त्रिमितिदर्शन) विश्वाचे प्रक्षेपण द्विमिती प्रतलावर घेतले जाते. यासाठी दोन प्रकारची प्रक्षेपणे वापरतात : समांतर आणि ⇨ यथादर्शन. आ. २ मध्ये हे दोन्ही प्रकार स्पष्ट केले आहेत. समांतर प्रक्षेपणामध्ये वस्तूवरून येणारे प्रकाशकिरण एकमेकांना समांतर असल्याचे मानले जाते. त्यामुळे वस्तू आहे त्या आकारातच दर्शन प्रतलावर तयार होते. यामध्ये दर्शनबिंदू अनंत अंतरावर असल्याचे समजता येते. यथादर्शन प्रक्षेपणामध्ये दर्शनबिंदू परिमित अंतरावर असतो. तो प्रक्षेपणाचा मध्य धरून व वस्तूवरून येणारे सर्व प्रकाशकिरण या दर्शनबिंदूमधून जातात असे मानून त्याप्रमाणे दर्शन प्रतलावर तिची प्रतिमा बनविली जाते. त्यामुळे वस्तू दर्शन प्रतलापासून जितकी दूर तितकी तिची प्रतिमा छोटी दिसते. तसेच दर्शनबिंदू दर्शन प्रतलाच्या जवळ सरकविल्यास प्रत्येक वस्तूची खिडकीतील प्रतिमा तुलनेने छोटी होते व दृश्य खिडकीमध्ये पलीकडील चित्राचे अधिक घनफळ मावते. आकृतीमध्ये उदाहरणादाखल समांतर व यथादर्शन प्रक्षेपणांची योजना वापरून बनलेली एका घराची प्रक्षेपणे दाखविली आहेत. यथादर्शन प्रक्षेपणाची योजना वापरून तयार झालेल्या चित्रात त्रिमितीय परिणाम अधिक चांगला साधला जातो. त्यामुळे ते चित्र अधिक वास्तव दिसते. ज्या चित्रामध्ये नेमक्या मोजमापाची आवश्यकता असते तिथे समांतर प्रक्षेपण उपयोगी पडते. उदा., इमारतींच्या बांधकामाचे नकाशे.
त्रिमितीय चित्रे अधिक वास्तवदर्शी बनविण्यासाठी इतरही अनेक गुंतागुंतीच्या कृती आलेखिकी प्रणालीव्दारे केल्या जातात. चित्रातील एखादा बिंदू एखादया वस्तूच्या आत आहे की बाहेर ते ठरविणे ही एक अशी गुंतागुंतीची कृती आहे. घनफळ काढणे, वस्तूचा मध्य ठरविणे, वस्तूवरील ताण, तापमान अशा गोष्टी ठरविणे, वस्तू एकमेकींत गुंतल्या असतील तर त्यांचे योग्य दृश्यीकरण करणे अशा अनेक कामांसाठी या कृती कराव्या लागतात. वस्तू व तीवर पडणारा प्रकाश यांच्यातील परस्पर-क्रिया ही वास्तवदर्शी चित्रनिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. प्रकाशाचा उगम बिंदू , त्याचे वस्तूपासूनचे अंतर, वस्तूच्या पृष्ठभागाचे प्रकाश परिवर्तन व वकीभवन यांचे गुणधर्म, परावर्तित प्रकाश दुसऱ्या वस्तूवर पडण्याची क्रिया, वस्तूंभोवतीचे वातावरण स्वच्छ आहे की धुके, धूळ यांनी युक्त आहे ते विचारात घेणे, वस्तूंच्या सावल्या, अशा कित्येक बाबी ध्यानात घेऊन एकंदरीत चित्राची प्रकाशीय समीकरणे तयार करून ती सोडवावी लागतात. त्यानंतरच वास्तवदर्शी त्रिमितीय चित्रे दर्शकावर साकारणे शक्य होते.
दडलेले पृष्ठभाग कोणते व त्यांची व्याप्ती किती व कशी आहे हे ठरविण्याची क्रिया ही एक क्लिष्ट संगणन क्रिया आहे. चित्रात दाखवावयाच्या वस्तूंची पारदर्शकता लक्षात घेऊन दडलेले पृष्ठभाग पूर्णपणे वगळायचे की कमी स्पष्ट दाखवावयाचे हे ठरवावे लागते. त्रिमितिदर्शन घडविण्यासाठी त्रिमितीय (स्टीरिओ) दृश्यांची योजना केली जाते. यासाठी दोन डोळ्यांना किंचित निराळ्या यथादर्शनाची दृश्ये दाखविली जातात. मानवी प्रेक्षकाला समोरचे दृश्य स्वतंत्र रीत्या डाव्या व उजव्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल्यावर जितका फरक दिसेल तितकाच फरक या दृश्यांत ठेवला जातो. यासाठी आलेखिकी प्रणालीला, दोन डोळ्यांशी सुसंगत असे दोन दर्शनबिंदू कल्पून, दर्शन प्रतलावर दोन चित्रे तयार करावी लागतात. ही दोन दृश्ये एकत्रितपणे पाहण्यासाठी खास चष्म्याचा वापर करावा लागतो.
ढग, डोंगर, समुद्रकिनारा अशा नैसर्गिक गोष्टी यूक्लिडीय भूमितीऐवजी अपूर्णमित (फ्रॅक्टल) भूमिती वापरून अधिक वास्तवदर्शी बनविता येतात. अपूर्णमित भूमितीय रचना एखादया साध्या, सोप्या आकाराचे अनेक वेळा पुनरावर्तन करून तयार करता येतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मापप्रमाणात स्वयंसदृशता असते. आ. ३ मध्ये एका साध्या त्रिकोणाची पुनरावर्तने करून गुंतागुंतीचा आकार बनविण्याची प्रक्रिया दाखविली आहे. अशा आकारांची मिती बहुधा अपूर्णांकात असते. या आकारांचे वर्णन समीकरणांऐवजी सुयोग्य रीतीमध्ये केले जात असल्याने संगणन क्रियेला ते सहज साध्य असते. त्यामुळे संगणक आलेखिकीमध्ये नैसर्गिक आकार दर्शविण्यासाठी अपूर्णमित भूमितीचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.
वरील सर्व भूमितीय कृतींच्या तपशिलात न जाता अनेक उच्च्स्तरीय व प्रगत कृती करण्याच्या सुविधा आधुनिक संगणकांमधील उपयोजन सॉफ्टवेअरला उपलब्ध असलेल्या आलेखिकी कार्यक्रमण इंटरफेसव्दारे पुरविल्या जातात. त्यांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत : (१) दोन चित्रांचे मिश्रण करणे. (२) पारदर्शक वस्तूंचे दृश्यीकरण करणे. (३) रेषा व वक यांतील कंगोरे काढून टाकणारी अँटिॲलायझिंग पद्धती वापरणे. (४) चलच्च्त्रिे व सचेतनीकरणामधील हिसके व गचके काढण्यासाठी दोन चित्रस्मृतींचा वापर करणे. (५) रंगांतील बदल सफाईदारपणे करणे. (६) वस्तूंच्या पृष्ठभागाचा विशिष्ट पोत दाखविणे. (७) वस्तूंच्या पृष्ठभागांच्या गुणधर्मानुसार त्यांच्या रंगांच्या नेमक्या छटा ठरविणे. (८) उपलब्ध बिंदूंमधून जाणारा वक ठरविणे व काढणे. (९) चित्रातील विशिष्ट चित्र-बिंदूंचे अवगुंठन करण्यासाठी कोरीव फर्मा तयार करणे. (१०) त्रिमितीय चित्रातील परिवर्तने पडद्यावर प्रत्यक्षात आणणे.
दर्शक प्रक्रियक : उपयोजन सॉफ्टवेअरकडून आलेखिकी आदेश घेऊन त्याप्रमाणे पडद्यावर किंवा कागदावर त्याचे दृश्यीकरण करणारी प्रणाली प्रत्यक्ष संगणकात विविध प्रकारांनी साकारता येते. त्यांपैकी सामान्यपणे वापरात असलेला एक प्रकार आ. ४ मध्ये दाखविला आहे.यामध्ये एक स्वतंत्र दर्शक प्रक्रियक वापरलेला असून आलेखिकीचे दृश्यीकरण करणाऱ्या विविध क्रिया स्वतंत्रपणे पार पाडून तो संगणकाच्या केंद्रीय प्रक्रियकाचा भार हलका करतो. केंद्रीय प्रक्रियक उपयोजन सॉफ्टवेअर चालवितो व उपयोजनातील वस्तूंचे भूमितीय वस्तूत रूपांतर करून त्याच्याशी सुसंगत भूमितीय आदेश तो दर्शक प्रक्रियकाला देतो. दर्शक प्रक्रियक भूमितीय आकारांचे चित्रबिंदू नकाशात परिवर्तन करण्यासाठी लागणारा कार्यक्रम राबवितो. तो कार्यक्रम व त्याला आवश्यक ती सर्व माहिती स्वत:च्या वेगळ्या स्मृतीत ठेवतो. प्रत्यक्ष चित्रबिंदू नकाशा एका चित्रस्मृतीमध्ये भरला जातो. चलच्च्त्रिांसाठी कधीकधी दोन चित्रस्मृतींची योजना केलेली असते. चलच्च्त्रि हे स्थिरचित्रांची मालिका असल्याने एक स्थिरचित्र एका चित्रस्मृतीमधून प्रत्यक्ष पडद्यावर दाखविले जात असताना मालिकेतील पुढील चित्र दुसऱ्या चित्रस्मृतीत भरण्याचे काम केले जाते. आलटून-पालटून दोन चित्रस्मृती वापरल्याने चलच्च्त्रि दाखविण्याची क्रिया सफाईदारपणे करता येते.
चित्रस्मृतीमधून चित्रबिंदूंचे रंगमूल्य क्रमश: वाचून त्यानुसार योग्य ते रंग पडद्यावर उमटविण्यासाठी दर्शक हार्डवेअरचे नियंत्रण करण्याचे कार्य व्हिडिओ नियंत्रक करतो. काही व्हिडिओ नियंत्रक चित्रातील देखावा जवळ वा लांब नेणे, उजवीकडे वा डावीकडे सरकविणे, चित्र फिरविणे अशी कार्येही करू शकतात. काही व्हिडिओ नियंत्रकांमध्ये व्हिडिओ मिश्रणाची सोयही उपलब्ध असते. चित्रस्मृतीतील चित्र आणि एखादया बाह्य प्रणाली-कडून येणारे चित्र अशा दोन चित्रांचे मिश्रण व्हिडिओ मिश्रण तंत्राच्या साहाय्याने करता येते. याचे एक उदाहरण म्हणजे दूरचित्रवाणीवरून दिले जाणारे हवामान वृत्त. त्यातील नकाशा संगणकाकडून चित्रस्मृतीद्वारा येतो तर बातम्या सांगणाऱ्या व्यक्तीचे चित्र कॅमेऱ्याकडून येते. या दोहोंचे मिश्रण व्हिडिओ नियंत्रक करतो. [→ व्हिडिओ].
केंद्रीय प्रक्रियक व दर्शक प्रक्रियक यांच्यातील कार्य विभागणी हा एक तडजोडीचा विषय आहे. काही प्रगत दर्शक प्रक्रियक चित्रांची छाटणी, चित्र सरकविणे, चित्रातील वस्तू हलविणे अशा उच्च्स्तरीय क्रिया करू शकतात. तर दुसऱ्या टोकाला काही प्रणालींमध्ये दर्शक प्रक्रियकच नसतो व सर्व संगणन क्रिया केंद्रीय प्रक्रियकच करतो. कधीकधी तर चित्रस्मृतीही मुख्य स्मृतीचाच एक भाग असते. काही प्रणालींमध्ये दर्शक प्रक्रियकाऐवजी एक आलेखिकी गतिवर्धक हार्डवेअर असते. बहुतेक प्रणालींमधील चित्रस्मृतीमध्ये चित्रबिंदूंच्या रंगांचे प्रत्यक्ष मूल्य न दर्शविता एका रंगतक्त्यातील रंगकमांक दर्शविलेला असतो. तक्त्यातील त्या रंगकमांकासमोर प्रत्यक्ष रंगमूल्य भरलेले असते. त्यामुळे खऱ्या रंगांऐवजी दर्शनी रंग भरले जातात. या योजनेतून दोन उद्देश साध्य होऊ शकतात. एक तर एकच चित्र निरनिराळ्या रंगांमध्ये दाखविणे सुलभ होते. दुसरे म्हणजे २२४ इतकी रंगमूल्ये वापरणे शक्य असले तरी त्यांतील सर्व रंग दाखविणे अव्यवहार्य असल्याने एखादया लहान संचाचा उपयोग योग्य ठरतो. दर्शनी रंग वापरण्याच्या तंत्रामुळे रंगपटातील काही निवडक रंगांचा संच बनवून तेवढेच रंग दाखविणे शक्य होते. दर्शनी रंगांचे उदाहरण म्हणून पुन्हा दूरचित्रवाणीवरील हवामान वृत्ताकडे पाहता येईल. उपगहाने घेतलेल्या प्रत्यक्ष छायाचित्रात जमीन व पाणी यांचे रंग चित्र घेताना वापरलेल्या कॅमेऱ्यावर अवलंबून असतात. मात्र वृत्तामध्ये त्यांचे परिवर्तन निळे पाणी व मातकट जमीन अशा दर्शनी रंगांत करून चित्र अधिक स्पष्ट करता येते.
आदान-प्रदान उपकरणे : वैयक्तिक संगणकावरील बहुतेक सर्व उपयोजने आलेखिकीचा वापर करीत असल्याने कळफलक व माऊस ही दोन आदान-प्रदान उपकरणे आलेखिकी प्रणालींमध्ये वापरली जातात. तसेच चित्रे प्रदान करण्यासाठी ऋण किरण नलिका, द्रव स्फटिक, आयनद्रायू असे विविध प्रकारचे व्हिडिओदर्शक, तसेच विविध प्रकारची मुद्रणयंत्रे ही उपकरणे वापरली जातात. आलेखिकी प्रणालींमध्ये अनेकदा अतिस्पष्ट चित्रे दर्शविण्यासाठी चित्रबिंदू संख्या जास्त असलेले दर्शक वापरले जातात. उदा., १९२० X १२०० असा पिक्सेल साचा असलेले दर्शक.
रंगीत मुद्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या मुद्रण यंत्रात लाल, हिरवा व निळा या रंगांऐवजी निळसर (सायन), किरमिजी (मॅजेण्टा) व पिवळा ही तीन रंगद्रव्ये वापरली जातात. शिवाय काळे रंगद्रव्यही वापरले जाते. मुद्रणयंत्रे रंगद्रव्यांचे मुद्रणबिंदू कागदावर उमटवितात. बिंदू आहे की नाही अशा दोनच पातळ्या यात शक्य असतात. त्यामुळे निरनिराळ्या रंगछटा दर्शविण्यासाठी अर्धछटा तंत्र वापरले जाते. मूळ अर्धछटा तंत्रात चित्रबिंदूंची रंगछटा जितकी गडद तितका मुद्रणबिंदूंचा आकार मोठा केला जातो. प्रतिरूप मुद्रणयंत्रांत हे तंत्र वापरले जाते. संगणकाला जोडले जाणारे बहुतेक मुद्रक मुद्रणबिंदूंचा आकार लहान-मोठा करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मुद्रणबिंदूंचा मिळून एक चित्रबिंदू बनविला जातो आणि चित्रबिंदूंच्या रंगांच्या गडदपणाच्या प्रमाणात, त्यातील मुद्रण-बिंदूंची संख्या कमी-जास्त करून चित्रबिंदूचा गडदपणा कमी-जास्त करण्याचा परिणाम साधला जातो. उदा., ३ X ३ मुद्रणबिंदूंचा मिळून एक चित्रबिंदू बनविला तर त्यात गडदपणाच्या १० पातळ्या दाखविता येतात. अलीकडे संगणकाला जोडता येतील अशी प्रतिरूप मुद्रणयंत्रेही बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत.
काही आलेखिकी उपयोजनांमध्ये अनेक पटींनी जादा चित्रबिंदू व खूप मोठे दृश्यक्षेत्र वापरण्याची गरज असते. त्यामुळे चित्रातील छोटे तपशिलही स्पष्टपणे दर्शविता येतात. यासाठी टाइलयुक्त दर्शक वापरले जातात. उदा., १०२४ × ७६८ इतके चित्रबिंदू असलेले नऊ दर्शक ३ × ३ अशा रचनेत बसविले, तर ते मिळून ३०७२ × २३०४ चित्रबिंदू असलेला एक मोठा टाइलयुक्त दर्शक म्हणून वापरता येतील. अशा प्रणालींमध्ये एकच उच्च्गती संगणक सर्व दर्शकांवर मिळून एक चित्र दाखवू शकेल किंवा वृंद संगणन रचनेत कार्य करणारे नऊ संगणक पत्येकी एका दर्शकावर चित्राचा योग्य तो नवमांश भाग दाखवू शकतील. टाइलयुक्त दर्शकामधील प्रत्येक दर्शक ऋण किरण नलिका किंवा द्रव स्फटिक प्रकारचा असू शकतो किंवा अनेक प्रक्षेपक मिळून एका मोठया पडद्यावर असे टाइलयुक्त चित्र निर्माण करू शकतात. आधुनिक आलेखिकी कार्यक्रमण इंटरफेसांमध्ये टाइलयुक्त दर्शकांवर चित्रे दाखविण्यासाठी थेट आदेश देण्याच्या सुविधा उपलब्ध असतात.
कळफलक व माऊस यांखेरीज इतरही अनेक आदान उपकरणे आलेखिकीसाठी वापरली जातात. स्पर्शपटल (टच स्क्रीन) प्रकारचे उपकरण दर्शक व कळफलक असे दुहेरी कार्य करते. दर्शकावरील चित्रातील उचित ठिकाणी बोटाने स्पर्श केल्यावर हे उपकरण स्पर्श केलेल्या जागेचे सहनिर्देशक संगणकाकडे पाठविते. त्यावरून संगणकाला योग्य तो आदेश प्राप्त होतो. आलेखिकी टॅबलेट या उपकरणात एक सपाट पृष्ठभाग असून त्यावर एक सुई फिरविता येते. सुई असलेल्या बिंदूचे अक्ष, त्याची पृष्ठभागाशी समीपता, त्यावरील बटनांची स्थिती अशी माहिती संगणकाकडे प्रतिसेकंद ३० ते ६० वेळा पाठविली जाते. टॅबलेटच्या पृष्ठभागावर मुद्रित चित्र किंवा आलेख बसविल्यास त्यावरून सुई फिरवून ती चित्रे किंवा आलेख संगणकात भरता येतात.
विविध आदान-प्रदान उपकरणांचा वापर करणे सुलभ व्हावे म्हणून काही आलेखिकी सॉफ्टवेअरमध्ये आभासी उपकरणांची योजना केलेली असते. यामुळे सॉफ्टवेअरमध्ये विविध उपकरणे चालविणाऱ्या कार्यकमांचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता नसते व ते सॉफ्टवेअर उपकरणनिरपेक्ष बनते. प्रत्यक्ष त्या उपकरणांचे चालक सॉफ्टवेअर आभासी उपकरणांना दिलेल्या आदेशांचे प्रत्यक्ष उपकरणाला अनुरूप आदेशांमध्ये रूपांतर करण्याचे कार्य करते.
आलेखिकी प्रणालींची उपयोजने : संगणक आलेखिकीचा उपयोग विज्ञान, अभियांत्रिकी, वैदयकशास्त्र, कला, मनोरंजन, जाहिराती अशा विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. किंबहुना आलेखिकीचा वापर न करणारे संगणक उपयोजन विरळाच आहे. काही उपयोजनांची माहिती पुढे दिली आहे :
(१) आधुनिक संगणकांमध्ये मानव व संगणक यांमधील सुसं-वादाचे आलेखिकी हे एक प्रमुख साधन आहे. आधुनिक संगणक एका वेळी अनेक उपयोजने उघडून सुरू करण्याची सुविधा वापरकर्त्याला देतात. त्यांपैकी ज्या उपयोजनावर वापरकर्ता कोणत्याही वेळी प्रत्यक्ष काम करीत असेल ते सर्वांत वर ठेवून पडद्यावरील त्या उपयोजनाची खिडकी पूर्ण उघडली जाते, बाकी सर्व खिडक्या पार्श्वभूमीवर ठेवल्या जातात. तसेच माऊसव्दारे नियंत्रित केले जाणारे सरकचिन्ह एखादया चिन्हाकृतीवर किंवा मेनूवरील इच्छित कलमावर आणून संगणकाला आदेश देता येतात. संगणकावर काम करताना केली जाणारी ही सर्व मूलभूत कार्ये आलेखिकी प्रणालीच्या साहाय्याने केली जातात.
(२) प्रकाशन व्यवसायात संगणक आलेखिकीला सर्वांत प्रमुख साधनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता सर्व पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रे आलेखिकीचा वापर करूनच जुळविली जातात. कागदावर छापावयाचा मजकूर, रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे, आलेख, चौकटी या सर्वांची मांडणी करणे, मजकुरात विविध अक्षरशैली वापरणे, बहुभाषिक मजकूर तयार करणे, छायाचित्रात खास दृश्य परिणाम साधणे या सर्व गोष्टी संगणक आलेखिकीमुळे सहज साध्य झाल्या आहेत.
(३) विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य या सर्व क्षेत्रांत आलेखांचा वापर मोठया प्रमाणावर केला जातो. स्तंभालेख, दंडालेख, चकती आलेख असे अनेक प्रकारचे आलेख संगणकात उपलब्ध असलेल्या माहितीवरून थेट तयार करण्याचे काम आलेखिकी प्रणालीव्दारे केले जाते.
(४) वैदयकक्षेत्रात रूग्णाच्या शरीरातील अंतर्गत भागांचे चित्रण करून त्याचा वापर रोगनिदानासाठी केला जातो. विशेषत: संगणक प्रतिमादर्शन, चुंबकीय अनुस्पंदन चित्रण, श्राव्यातीत चित्रण अशा त्रिमितीय चित्रणांच्या उपयोजनांमध्ये संगणकीय आलेखिकी महत्त्वाची भूमिका पार पाडते. [→ वैदयकीय प्रतिमादर्शन].
(५) कला आणि वाणिज्य या क्षेत्रांमध्ये कलात्मक व परिणामकारक सादरीकरणासाठी संगणक आलेखिकीचा वापर होतो. छायाचित्रे, सचेतनीकरण, चलच्च्त्रिण अशा माध्यमांचा वापर व त्यांचे एकत्रीकरण आलेखिकीव्दारे केले जाते. याचे विशेष रूप जाहिरात क्षेत्रात दिसते. निर्जीव वस्तूंची सजीवांप्रमाणे हालचाल दर्शविणे, कृष्णधवल चित्रातील विशिष्ट वस्तू रंगीत दर्शविणे, वस्तूंचे आकार मनोरंजक पद्धतीने बदलणे असे अनेक विशेष परिणाम आलेखिकीच्या साहाय्याने साधता येतात. सचेतनीकरण चित्रपट व व्यंगचित्रपट तयार करण्यामध्ये संगणक आलेखिकी वापरल्याने सर्जनशील निर्मात्याला आपल्या कल्पना सादर करण्यासाठी एक सक्षम साधन मिळाले आहे. चलच्च्त्रिपटांच्या क्षेत्रामध्ये डायनोसॉरसारखे निर्वंश झालेले प्राणी सध्याच्या युगात अवतरलेले दाखविणे, जुने कृष्णधवल चित्रपट रंगीत करणे अशा पूर्वी असाध्य समजल्या जाणाऱ्या कृती संगणक आलेखिकीच्या साहाय्याने करता येतात. संगणकीय खेळांमध्ये आलेखिकी, सचेतनीकरण, ध्वनी, संगीत यांचा वापर करून ते खेळ आकर्षक बनविता येतात.
(६) संगणक आलेखिकीचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उपयोग अनेकविध आहे. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
(अ) यंत्रबांधणी, बांधकाम क्षेत्र, इलेक्ट्रॉनीय मंडले, संदेशवहन व संगणकांची जालके अशा अनेक क्षेत्रांत द्विमितीय आरेखनाचे महत्त्व मोठे आहे. काही आरेखनांमध्ये सर्व परिमाणे अचूक व प्रमाणात दाखवावी लागतात. या सर्व क्षेत्रांत संगणकसाधित अभिकल्पन व ड्नाफ्टिंग अत्यंत फलदायी ठरते. संगणकनिर्मित आरेखन दर्शकाच्या पडद्यावर दाखविता येते. तसेच फिल्मवर उमटविता येते. प्लॉटरवर काढता येते. संगणकावर अभिकल्पन केलेल्या भागांचे आरेखन थेट उत्पादनयंत्राकडे पाठवून त्यायोगे स्वयंचलित रीत्या संगणकसाधित उत्पादनही करणे प्रगत प्रणालींमध्ये शक्य होते. त्यावरून स्वयंचलित रीत्या सर्व सुट्या भागांचा डेटाबेस तयार करणे, सर्व सामगींची यादी तयार करणे अशी कार्ये करता येतात. अलीकडे यातील अनेक गोष्टी थेट त्रिमितीय दृश्यांव्दारे केल्या जात असल्या तरी द्विमितीय आरेखनाचे महत्त्व अजूनही टिकून आहे.
(आ) ⇨ सदृशीकरण म्हणजे एखादया प्रणालीची चल प्रतिकृती बनविण्याचे शास्त्र असून हे संगणक आलेखिकीचे एक प्रगत व महत्त्वाचे उपयोजन आहे. एकूण चित्राचा पडद्यावर दाखवावयाचा भाग व त्याचा तपशील ठरवून आणि त्यातील सर्व वस्तूंच्या परस्परक्रियांचे विश्लेषण करून त्यांचे चलच्च्त्रि तयार करण्यासाठी आलेखिकीमध्ये गतिशास्त्राचा (गतिकी आणि शुद्घ गतिकी) वापर केला जातो. या पद्धतीने धावण्यासाठी वापरावयाच्या पादत्राणांपासून ते विमानांपर्यंत विविध प्रणालींचे सदृशीकरण करता येते. बोईंग-७७७ या प्रगत विमानाचे संपूर्ण अभिकल्पन संगणक-साधित व कागदरहित अशा पद्धतीने केले गेले आहे. अत्यंत सक्षम असे आलेखिकी व गणितीय सॉफ्टवेअर वापरल्याने विमानाच्या प्रत्येक भागाचे संगणकावर सदृशीकरण करणे शक्य झाले. विमानोड्डाणाच्या चाचण्यांचेही सदृशीकरण केले गेल्याने विमानाची पहिली बांधणी होण्यापूर्वीच त्याची विविध संभाव्य परिस्थितींमध्ये उड्डाण करण्याची क्षमता अजमावता आली. विमाने व मोटारगाड्यांचे संगणकसाधित उत्पादन करण्यासाठी आधुनिक कारखान्यांत यंत्रमानवांचा[→ रोबॉट] उपयोग केला जातो. या यंत्रमानवांच्या सर्व हालचालींचे सदृशीकरण उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षात येण्यापूर्वीच संगणक आलेखिकीच्या साहाय्याने दर्शकावर पाहता येते. अभियंत्यांनी उत्पादन प्रक्रियेचा असा पूर्ण अभ्यास करून पडताळणी केल्यावर तिची अंमलबजावणी होते.
(इ) वैज्ञानिक दृश्यीकरण सॉफ्टवेअर विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये वापरले जाते. सदृशीकरण, सचेतनीकरण व आलेखिकी या साधनांव्दारे कित्येक शास्त्रीय परिणामांचे दृश्यीकरण करता येऊन गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या सर्व विज्ञानशाखांमधील अनेक जटिल क्रियांचा अभ्यास करता येतो. या शास्त्रांच्या अभ्यासांतर्गत महासंगणक प्रचंड माहितीची निर्मिती करतो. केवळ आकड्यांचा अभ्यास करून अशा माहितीचे आकलन व अर्थबोध होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. या माहितीचे आलेखिकीमध्ये विविध प्रकारे प्रतिरूपण करून त्याचे मोठया किंवा छोट्या दर्शक पडद्यावर विविधरंगी दृश्यीकरण केल्याने त्यातील आकृतिबंध दृग्गोचर होतात व त्या माहितीमधून अर्थबोध होऊ शकतो. रासायनिक क्रिया, औषधांचे किंवा डीएनएचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक ॲसिडचे) रेणू , हवामानशास्त्र, खगोलविज्ञान अशा कित्येक विज्ञानशाखां-मधील क्लिष्ट प्रक्रिया व घटना यांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक दृश्यीकरणाचा अतिशय परिणामकारक वापर केला जातो. वैज्ञानिक प्रणालींच्या प्रतिकृती बनविण्यासाठीदेखील वैज्ञानिक दृश्यीकरण वापरले जाते. अशी एखादी प्रतिकृती तयार करून विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांच्या वर्तणुकीची निरीक्षणे व भाकिते केली जातात व नंतर प्रत्यक्ष प्रणालींच्या वर्तणुकीशी ताडून आवश्यक झाल्यास प्रतिकृतीमध्ये सुधारणा केली जाते.
(७) आभासी वास्तव हे संगणक उपयोजनाचे महत्त्वाचे नवीन क्षेत्र आहे. या प्रणालींमध्ये एखादया त्रिमितीय विश्वाची सॉफ्टवेअर प्रतिकृती तयार करून व मानवास त्या विश्वात वावरण्यासाठी लागणारी साधने वापरून सत्य किंवा काल्पनिक विश्वाचा आभास मानवी ज्ञानेंद्रियांसमोर निर्माण केला जातो. दृष्टी हे सर्वांत प्रगत ज्ञानेंद्रिय असल्याने हा आभास दृष्टीसमोर निर्माण करताना गुंतागुंतीच्या संगणक आलेखिकी प्रणालींना अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. आभासी विश्वात वावरण्यासाठी वापरकर्त्याला डोक्यावर एक असे दर्शक उपकरण चढवावे लागते की, ज्याचे दोन छोटे दर्शक पटल दोन डोळ्यांसमोर येतील. यामधून आभासी विश्वाची (त्रिमितीय) प्रतिमा निर्माण होते व प्रत्यक्ष विश्वातील वस्तू दृष्टीपासून लपविल्या जातात. या उपकरणातील एक संवेदक प्रेक्षकाच्या मानेची व बुबळांची हालचाल नोंदवून संगणकाकडे पाठवितो व त्यावरून गणित करून, प्रेक्षक ज्या दिशेने पाहत असेल त्या बाजूचे दृश्य दर्शक पटलावर दाखविण्याची व्यवस्था संगणक करतो. वापरकर्त्याच्या कानामध्ये बस-विलेल्या कर्णश्रवणीवरून योग्य आवाजही ऐकू येतात. काही प्रणालींमध्ये हातांवर खास मोजे चढवून हाताची व बोटांची हालचाल टिपून संगणकाकडे पाठविली जाते. त्यावरून वापरकर्त्याचे हात आभासी विश्वात कोणत्या स्थानी आहेत व त्यांच्या हालचालींमुळे त्या विश्वातील कोणत्या वस्तूंवर परिणाम होईल ते संगणक ठरवू शकतो. या मोज्याची प्रतिमाही दर्शक पटलावर दिसते. या सर्वांमुळे आभासी प्रणालींव्दारे वापरकर्त्यापुढे संगणकाने निर्माण केलेल्या विश्वात वावरत असल्याचा आभास निर्माण करता येतो. व्हिडिओ खेळ, अभियांत्रिकी, बांधकाम व शिल्पशास्त्र, विमानोड्डाणाचे प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये आभासी वास्तव प्रणालीचा वापर अत्यंत लाभदायी ठरला आहे.
(८) वर दिलेल्या उपयोजनांखेरीज अनेकविध क्षेत्रांत संगणक आलेखिकीचा वापर केला जातो. त्याची काही उदाहरणे म्हणजे प्रक्रिया नियंत्रण, नकाशे तयार करणे, लोकसंख्याशास्त्र, महासागरविज्ञान, समोच्च् रेषा नकाशे, सैनिकी प्रशिक्षण, शिक्षण क्षेत्र ही होत.
संगणक आलेखिकीमध्ये सर्व प्रकारची दृश्यीकरणे दर्शक पटलावर जास्तीत जास्त सत्यदर्शी भासावीत अशी प्रस्तुती करण्यासाठी संगणकाला मोठया संख्येने सत् संख्यांची गणिते करावी लागतात. अशा गणितांची संख्या व चित्रस्मृतीशी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतींची संख्या यांवरून आलेखिकीसाठी संगणकाची किती शक्ती आवश्यक आहे ते ठरते. एका बाजूला भौतिकी-सारख्या क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रणालींच्या प्रतिकृती तर दुसऱ्या बाजूला वास्तव जगातील मानव व इतर प्राणी, वृक्ष, पाण्याच्या लाटा अशा नैसर्गिक प्रणालींच्या जास्तीत जास्त सत्यदर्शी प्रतिकृती या दोन्ही क्षेत्रांतील उपयोजनांमध्ये सध्याच्या आलेखिकी प्रणाली शीघ गतीने प्रगती करीत आहेत. दाखवावयाच्या दृश्याचे नेमके भौतिकीय व प्रकाशीय गुणधर्म शोधून त्यांचे प्रेक्षकाच्या आकलनाच्या दृष्टीतून सत्यदर्शी प्रस्तुतीकरण करणे हे अजूनही संगणक आलेखिकीपुढील एक संशोधनाचे आव्हान क्षेत्र आहे. या सर्व कार्यांसाठी महासंगणक व खास आलेखिकी हार्डवेअर यांचा वापर करून अधिकाधिक शक्तिशाली प्रणाली उपलब्ध केल्या जात असल्या तरी संगणनशक्तीची मागणी सतत वाढती आहे.
पहा : त्रिमितिदर्शन; यथादर्शन वैदयकीय प्रतिमादर्शन; व्हिडिओ; संगणक; संगणक कार्यक्रमण; सदृशीकरण.
संदर्भ : 1. Asthana, R. G. S. Sinha, N. K. Computer Graphics for Scientists and Engineers, New Delhi, 1988.
2. Eberly, David H. 3D Game Engine Design: A Practical Approach toReal-Time Computer Graphics, 2000.
3. Foley, James D. Dam, Andries Van Feiner, Steven K. Hughes, John F. Computer Graphics :Principles and Practice, 2001.
4. Heam, D. Baker, M. P. Computer Graphics, १९९४.
5. Kumar, Arvind, Chaos, Fractals and Self-Organization, New Delhi, 1996.
6. Watt, Alan Watt,Allan, 3D Computer Graphics, 1999.
७. देशमुख, चिंतामणी (संदर्भ क. ५ चे मराठी रूपांतर) कोलाहल, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन, नवी दिल्ली, २००१.
आपटे, आल्हाद गो.