सत्यनारायण शास्त्री, मधुनापंतुलु : (५ मार्च १९२० – ). तेलुगू कवी. पल्लीपालेम येथे एका विव्दान बाह्मण घराण्यात जन्म. प्रारंभी संस्कृत व तेलुगू नाटके, महाकाव्ये व व्याकरण यांचा अभ्यास केल्यावर, पुढे ते मद्रास विदयापीठाची ‘ विद्वान ’ परीक्षा उत्तीर्ण झाले (१९४०). १९३८ मध्ये पल्लीपालेम येथे त्यांनी ‘ आंध्र कुटिरम ’ ही साहित्य संस्था स्थापन केली व तिच्या विद्यमाने आंधी हे वाङ्‌मयीन मासिक सुरू केले आणि जवळजवळ दहा वर्षे त्याचा उच्च दर्जा सांभाळून ते चालविले. १९४०ते ४४ या काळात पीठापुरम् येथे सूर्यरायांधानिघंटु या बृहत् तेलुगू कोशात पंडित या नात्याने त्यांनी काम केले. १९४६ मध्ये त्यांनी राजमुंद्री येथे ‘ वीरेशलिंगम थीइस्टिक हायस्कूल’ मध्ये ज्येष्ठ तेलुगू पंडित (अध्यापक) म्हणून तीस वर्षे काम केले व तेथून १९७७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

त्यांची ‘ तोरणम् ’ ही पहिली भावकविता १९३८ मध्ये प्रसिद्घ झाली. तेव्हापासून त्यांनी विविध वाङ्‌मय प्रकारांमध्ये विपुल लिखाण केले. त्यांच्या षड्दर्शन संग्रहम् (१९४२) या प्रबंधातून प्राचीन भारतीय विदयांचा व्यासंग दिसून येतो. आंध्र रचयितलु (१९५०) या चरित्रगंथात चिन्मयसुरीपासून ते तुम्मल सीताराम मूर्तींपर्यंत शंभर लेखकांची चरित्रपर हृद्य व्यक्तिचित्रणे आहेत. त्यांतील पूर्वगहविरहित वस्तुनिष्ठ दृष्टिकोन लक्षणीय आहे. रत्न पांचालिका (१९४३), रत्नावलि (१९४७) व स्वप्नवासवदत्ता (१९५६) ह्या संस्कृत नाटकांची त्यांनी तेलुगू भाषांतरे केली. सूर्य सप्तति (१९४३), धन्वंतरी चरित्र (१९४५), श्री खंडमु (१९६८), चैत्ररधमु (१९७६), सदाशिव पंचासिका (१९७७) हे त्यांचे काही उल्लेखनीय काव्यगंथ होत. मात्र आंध्र पुराणम् (१९५४) हा त्यांचा सर्वश्रेष्ठ काव्यगंथ होय. प्राचीन आंध्रचा छंदोबद्घ इतिहास त्यात वर्णिला असून, मोठमोठी शहरे उभारणाऱ्या, विस्तीर्ण साम्राज्ये स्थापणाऱ्या राजकर्त्यांची तसेच आंध्रची वास्तुकला, संगीत, साहित्य यांचा समृद्घ विकास घडवून आणणाऱ्या महनीय व्यक्तींची गुणगानपर वर्णने त्यात आहेत. या त्यांच्या महाकाव्याला १९६८ मध्ये आंध्र प्रदेश साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. ते कट्टर परंपरावादी असून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले आहे. उदात्त, धीरगंभीर वृत्ती, मोहक काव्यात्मता व मार्मिक निरीक्षण ही त्यांच्या लिखाणाची काही वैशिष्ट्ये होत. त्यांच्या इतर लघू व दीर्घ काव्यांमध्ये प्रतिमांचा विलास आढळतो. बोधीवृक्षमु (१९५१) या त्यांच्या कादंबरीत अहिंसा तत्त्वाचा गौरव केला आहे, तर चरित्र धन्यलु (१९५५) व कल्याणतारा (१९५६) या कादंबृयांमध्ये निस्वार्थी सेवा व असीम त्याग यांची महती वर्णिली आहे. तेलुगू साहित्यातील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल आंध्र प्रदेश शासनाने १९७५ मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या पहिल्या जागतिक परिषदेत त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी त्यांनी तेलुगू लो रामायणलु ही पुस्तिका लिहिली (१९७५). ह्याच वर्षी राजमुंद्री येथे त्यांना ‘ साहितिसमाट ’ व ‘ आंध्र कल्हण ’ ही मानाभिधाने बहाल करण्यात आली. आधुनिक तेलुगू काव्यात गतवैभवाचा धांडोळा व परंपरेची नव्या जाणिवांशी सांगड घालण्याची वृत्ती, ही लक्षणीय वैशिष्ट्ये रूजविण्याचे श्रेय त्यांच्या कवितेला दिले जाते.

इनामदार, श्री. दे.