सत्य : सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. या विश्वाच्या मुळाशी असलेले तत्त्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केले जाते, त्यावेळी सत्य हे रिॲलिटी (सदवस्तू , वास्तव) या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते. सत्य हे एक नीतिमूल्य म्हणून येते, तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा, सत्यवादित्व (टथफुलनेस) असा असतो. ज्ञानमीमांसा व तर्कशास्त्र या प्रांतांत सत्य आणि असत्य हे जाणिवेचे किंवा विधानाचे गुणधर्म असतात. कोणत्याही वास्तवाची आपल्याला होणारी जाणीव, त्या वास्तवाबरहुकूम असेल, तसेच आपल्याला झालेल्या अन्य जाणिवांशी सुसंवादी असेल, तर ती जाणीव सत्य आहे, यथार्थ आहे, प्रमाणभूत आहे असे आपण मानतो. तसेच ती जाणीव ज्या विधानातून व्यक्त केली जाते, ते विधानही सत्य / यथार्थ / प्रमाणभूत ठरवितो. याउलट एखादी जाणीव वास्तवाबरहुकूम नसल्यास किंवा अन्य प्रस्थापित जाणिवांनी तिला बाध येत असल्यास, ती जाणीव तसेच ती जाणीव व्यक्त करणारे विधान आपण असत्य / अयथार्थ / अप्रमाण ठरवितो. एखादी जाणीव किंवा विधान सत्य आहे म्हणजे नेमके काय, ती किंवा ते सत्य आहे, हे ठरविण्याचे निकष कोणते, या प्रश्नांची चर्चा तत्त्वज्ञानाच्या ज्ञानमीमांसा (एपिस्टेमॉलॉजी) या शाखेत केली जाते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत हे प्रश्न प्रमाणशास्त्राच्या कक्षेत येतात. येथे आपण प्रथम पाश्र्चात्त्य ज्ञानमीमांसेतील सत्यविषयक उपपत्तींचा आढावा घेणार असून त्यानंतर भारतीय प्रमाणशास्त्रातील प्रामाण्यविषयक ठळक मतांची नोंद घेणार आहोत.

ज्ञानाची सत्यता कशी पारखायची यासंबंधी तत्त्वज्ञात अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. साधारणपणे हा प्रश्न प्रथम प्रत्यक्षज्ञानाच्या संदर्भात निर्माण झाला असावा, असे तत्त्वज्ञानाच्या इतिहासावरून वाटते. वाळवंटात दिसणारे मृगजळ हे सत्य नाही, ते आभास आहे किंवा कावीळ झालेल्या माणसाला साऱ्या वस्तू पिवळ्या दिसतात, पण वस्तुत: त्या पिवळ्या नसतात, असे सर्वसामान्य व्यवहारात म्हटले जाते. इंद्रियांना प्रतीत होणाऱ्या या गोष्टी इंद्रियदोष किंवा इतर व्यत्यय यांमुळे खोटया प्रतीत होतात परंतु मी ज्या टेबलावर कागद ठेवून लिहीत आहे, ते टेबल खरे आहे (त्याचे मला होणारे ज्ञान सत्य आहे) हे तरी कसे ठरविले जाते, असल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी तत्त्वज्ञांना बरेच खोलात उतरावे लागते.

सत्यतेचा अर्थ व निकष यांविषयी पूर्वीपासून जे सिद्धांत रचले गेले आहेत, त्यांत दोन महत्त्वाचे सिद्धांत आहेत. (१) सत्यविषयक सुसंवाद सिद्धांत (कोहिरन्स थिअरी ऑफ ट्रूथ) व (२) सत्यविषयक अन्वय सिद्धांत (कॉरस्पॉडन्स थिअरी ऑफ ट्रूथ). सुसंवाद सिद्धांतानुसार असे मानले जाते की, जेव्हा एखादे विधान सत्य असते, तेव्हा ते एकटेच सत्य नसते, तर इतरही सत्य विधाने असतात, ज्यांच्याशी ते सुसंवादी असते. किंबहुना अशा परस्परसंवादी विधानांची एक प्रणालीच असते व त्या प्रणालीचा भाग असल्यामुळेच प्रस्तुत विधान सत्य असते. गणितीय व तार्किक संरचनांमधील विधानांचे सत्यत्व हे असे परस्पर संवादावर आधारलेले असते. त्यातील विधानांची वास्तवाशी सांगड बसलीच पाहिजे असे नाही. विज्ञानाच्या क्षेत्रातसुद्धा एखादा नवीन सिद्धांत सत्य म्हणून स्वीकारताना आजवरच्या प्रस्थापित सिद्धांतांशी तो सुसंवादी आहे, की नाही ते पाहिले जाते.

सत्यासंबंधीचा हा सिद्धांत बुद्धीवादी तत्त्वज्ञ लायप्निब्निट्झ, स्पिनोझा, हेगेल, ब्रॅडली यांच्या लेखनात आढळतो. या सिद्धांतावर अशी टीका केली जाते की, गणितासारख्या शास्त्रात विधानांचा एकमेकांशी सुसंवादीपणा हाच त्यांच्या सत्यतेचा आधार असला, तरी व्यवहारात तसेच भौतिक विज्ञानात तसे घडत नाही. व्यवहारात विधान सत्य ठरविण्यासाठी ते वास्तवाशी ताडून पाहणे गरजेचे असते. तसेच भौतिक विज्ञानातील विधानांची सत्यताही परस्पर संवादावर अवलंबून नसून अनुभव व प्रयोग यांच्या साहाय्याने ती वस्तुस्थितीशी ताडून पाहिली जाते. ही टीका आपल्याला सत्यविषयक अन्वय सिद्धांताकडे घेऊन जाते.

अन्वयसिद्धांताप्रमाणे एखादया समजुतीचे सत्यत्त्व तिच्या वस्तुस्थितीशी असलेल्या अन्वयावर अवलंबून आहे. ॲरिस्टॉटलचे पुढील विधान म्हणजे अन्वयसिद्धांताची सोपी सुटसुटीत मांडणी आहे. ‘‘ जे आहे त्याबद्दल ते नाही असे म्हणणे आणि जे नाही, त्याबद्दल ते आहे असे म्हणणे असत्य होय, तर जे आहे त्याबद्दल ते आहे असे म्हणणे आणि जे नाही त्याबद्दल ते नाही असे म्हणणे सत्य होय ’’.

आधुनिक काळात त्याची मांडणी जॉर्ज एडवर्ड मुर, बर्ट्रंड रसेल इत्यादींनी केली. जी. ई. मुरच्या मांडणीनुसार एखादी समजूत सत्य आहे, असे म्हणणे म्हणजे विश्र्वात एखादे वास्तव असे आहे की, ज्याच्याशी त्या समजुतीचा अन्वय आहे आणि एखादे विधान असत्य आहे, असे म्हणणे म्हणजे विश्र्वात असे कोणतेही वास्तव नाही की, ज्याच्याशी त्या समजुतीचा अन्वय आहे. रसेलनेही हा सिद्धांत विविध तपशिलांसह मांडला व त्या अनुषंगाने आपला तार्किक अनुवादाचा सिद्धांत विकसित केला. अन्वय सिद्धांताबाबत अनेक प्रश्नही उपस्थित झाले. उदा., होकारात्मक सत्य विधानाचा भावात्मक वस्तुस्थितीशी अन्वय होतो, तसा नकारात्मक सत्य विधानाचा अभावात्मक वस्तुस्थितीशी होतो का ? समजूत किंवा विधान हे सत्य असल्यास वास्तवाशी अन्वय पावते, पण खुद्द समजूत किंवा विधान हेच एक वास्तव असते की, त्याचे स्थान वास्तव जगाच्या बाहेर असते.

वर उल्लेखिलेले दोन सिद्धांत (सुसंवाद सिद्धांत व अन्वय सिद्धांत) हे सामान्यत: सत्यनिर्णयाचे मुख्य सिद्धांत मानले जातात. पण आधुनिक पाश्र्चात्त्य तत्त्वज्ञानात आणखी काही नवे सिद्धांत पुढे आले आहेत. त्यांतील एक फलप्रामाण्यवादी सिद्धांत होय. हे पेन चांगले आहे, या विधानाचे सत्यत्व केवळ त्या पेनाकडे पाहून समजणार नाही, तर ते पेन चालवून पहायला हवे, त्या पेनने लिहून पहायला हवे. नैतिक विधानांच्या बाबतीतही हेच आढळून येते. चोरी केल्यामुळे शिक्षा होते म्हणून चोरी करू नये, हे विधान स्वीकारण्यातून अपेक्षित कार्य सिद्ध होऊ शकेल. सारी सत्ये ही व्यवहारातील फलांनी, उपयुक्ततेने सिद्ध होतात. हा सिद्धांत मुख्यत: चार्ल्स मॅडर्स पर्स, विल्यम्स जेम्स, जॉन ड्युई यांच्या लेखनात आढळतो. सॅम्युअल अलेक्झांडर तर सत्य हे बदलते, नाहीसे होते किंवा असत्यदेखील बनते असे मानतो. त्याच्या मते सत्य म्हणजे सामाजिक मनाने जे मानले जाते ते आणि असत्य मनाने जे मानले जाते ते या काळचे त्या काळात राहत नाही. या सिद्धांतावर टीका करताना कार्नापने असे म्हटले आहे, की सत्य हे त्रिकाळाबाधित असते. फलप्रामाण्यवादी ज्याविषयी बोलतात, ते सत्य नसून मान्यता (कन्फर्मेशन) आहे. अमुक एक विधान आज सत्य आहे, असे कोणी बोलत नाही. ते आज मान्य होईल असे बोलू शकतो. सत्य आणि मान्यता यांची गल्ल्त करता येणार नाही.


स्ट्रॉसनने थोडा निराळा सिद्धांत मांडला आहे. त्याच्या मते एखादे विधान सत्य आहे असे आपण म्हणतो, तेव्हा भाषादृष्टया पाहिले तर तो क्रियापर उद्‌गार (परफॉर्मेटिव्ह अटरन्स) असतो. मी वचन देतो यासारखा क्रियापर उद्‌गार काढणे म्हणजे ज्याप्रमाणे विधान करणे नसून वचन देण्याची विशिष्ट क्रिया करणे असते. त्याप्रमाणे एखादे विधान सत्य आहे, असे म्हणणे म्हणजे, त्या विधानाविषयी विधान करणे नसून त्या विधानाशी सहमती दर्शविण्याची क्रिया करणे. स्ट्रॉसनच्या या सिद्धांतावर अशी टीका करण्यात आली आहे की, मी स्वीकारतो, मी मान्य करतो असे म्हणणे आणि हे सत्य आहे असे म्हणणे यात फरक आहे. पहिल्या प्रकारच्या वाक्यात व्यक्तिनिष्ठता आहे, तशी हे सत्य आहे यात नाही.

सत्यनिर्णयाचा एक महत्त्वाचा सिद्धांत अल्फेड टार्स्की याने १९३१ साली मांडला. त्याला सत्यविषयक अर्थमीमांसीय सिद्धांत (सेमँटिक थिअरी ऑफ ट्रूथ) म्हणतात. टार्स्कीचे मत असे, की जेव्हा आपण अमुक एक विधान सत्य आहे असे म्हणतो, तेव्हा आपण ते विधान ज्या भाषेत आहे, त्याच भाषेत बोलत नसून त्यापेक्षा वरच्या स्तरावरील भाषेत म्हणजे पराभाषेत विधान करीत असतो. उदा., हा घोडा काळा आहे, हे विधान विशिष्ट घोडयाविषयी असून ते भाषा एक मध्ये केले आहे. उलट हा घोडा काळा आहे, हे सत्य आहे हे भाषा एक मधील विधानासंबंधीचे विधान असून ते भाषा दोन मध्ये आहे. भाषा एक ही वस्तुपर भाषा (ऑब्जेक्ट लँग्वेज) असेल, तर भाषा दोन ही विषयक भाषा म्हणजे पराभाषा (मेटॅ लँग्वेज) आहे. या फरकामुळे तत्त्वज्ञानातील अनेक घोटाळे टाळता येतात, असा टार्क्सीचा दावा होता. एखादया कीटवासीने म्हणावे की, सर्व कीटवासी खोटारडे आहेत किंवा पुढे जाऊन एखादयाने असे विधान करावे की, मी आता करीत असलेले विधान खोटे आहे. यातून जी असत्यभाषकाची विरोधसमस्या (लायर्स पॅरॅडॉक्स) निर्माण होते. यात मुख्य गफलत हीच असते की, विधान आणि त्याचे सत्यत्व (किंवा असत्यत्व) एकाच भाषेतली वास्तवे आहेत असे यात समजले जाते.

भारतीय दर्शनांमध्ये सत्य या संकल्पनेचा विचार प्रमाण आणि प्रामाण्य या संकल्पनांच्या संदर्भात झालेला दिसतो. नैयायिकांनी यथार्थ अनुभव म्हणजे प्रमा आणि त्या प्रमेचे करण (साधन) म्हणजे प्रमाण, अशी व्याख्या केली. यथार्थ म्हणजे विषयाबरहुकूम म्हणजे खुद्द विषयामध्ये विशष्य आणि विशेषण जसे असतील. त्याबरहुकूम अनुभव असेल, तर तो यथार्थ म्हणजे सत्य. हा विचार अन्वय सिद्धांताशी जुळणारा आहे. बौद्धांनीही (विशेषत: धर्मकीर्तीने) अविसंवादि – ज्ञान (म्हणजे विषयाशी विसंगत नसलेले ज्ञान) ते प्रमाण अशी व्याख्या केली आहे. याअलट पूर्वमीमांसकांनी पूर्वी न कळलेल्या विषयांचे व अन्य प्रमाणांनी खोटे न ठरविलेले ज्ञान म्हणजे प्रमाण, अशी व्याख्या केली. या व्याख्येतील दुसरा भाग सुसंवाद सिद्धांताशी जुळणारा आहे. या यथार्थ ज्ञानाचे सत्यत्व किंवा प्रमाणाचे प्रामाण्य कसे ठरते, हाही प्रश्न भारतीय दर्शनांमध्ये विचारला गेला. ज्या साधनाने (प्रमाणाने) ज्ञान होते त्याच साधनाने त्याचे प्रामाण्य ठरते की, त्यासाठी वेगळ्या साधनाचा आश्रय घ्यावा लागतो. पूर्वमीमांस-कांच्या मते प्रमाणाचे प्रामाण्य खुद्द त्या प्रमाणाने म्हणजे स्वत:च ठरते. अन्य साधनांनी त्या ज्ञानाचे प्रामाण्य शाबीत करण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही. याउलट नैयायिकांच्या मते ज्ञानाचे प्रामाण्य हे त्या ज्ञानापासून निर्माण होणारी प्रवृत्ती सफल होते की, निष्फल याच्या आधारे म्हणजेच अन्य मार्गाने ठरवावे लागते. यावरून पूर्वमीमांसक स्वत: प्रामाण्यवादी तर नैयायिक परत: प्रामाण्यवादी म्हटले जातात. प्रामाण्यवादाची सविस्तर चर्चा बौद्ध व जैन दर्शनांतही आढळते.

संदर्भ : 1. Christian, William, A Meaning and Truth in Religion, Princeton, 1964.

    2. Russell, Bertrand, An Inquiry into Meaning and Truth, London, 1940.

    3. White, Alan, Truth, London, 1971.    

गोखले, प्रदीप