सट्टा : (स्पेक्युलेशन). बाजारातील होणारे चढ-उतार, अन्य व्यवहार यांतून अंदाज बांधून किंवा तर्क करून अवाजवी फायदा अल्पावधीत मिळावा, अशा अपेक्षेने पैसे गुंतविण्याचा केलेला व्यवहार. या व्यवहारात फायदा होण्याची त्याचप्रमाणे तोटा होण्याची शक्यता असते. तोटा किंवा नुकसान होण्याचा धोका पतकरून पैसे एखादया व्यवहारात गुंतविणे, असा सामान्यपणे याचा अर्थ होतो. ऐतिहासिक दृष्टया सट्टा किंवा सट्टेबाजी ही संकल्पना अठराव्या शतकात सर्वत्र प्रसृत झाली. ती प्रथम मुख्यत्वे घोड्यांच्या शर्यतीत आढळून आली. त्यानंतर क्रिकेट, सॉकर व अन्य खेळांमध्येही ती प्रविष्ट झाल्याचे दाखले मिळतात. ग्रेट ब्रिटनमध्ये त्यासाठी एक सैन्यतुकडी नेमलेली होती आणि सट्ट्यांसाठी रोख रक्कम स्वीकारणारी दुकाने होती. ती इ. स. १८५३ मध्ये कायदयाने बंद करण्यात आली, तरीसुद्धा अवैध सट्टेबाजी चालू होती, त्याकरिता १९०६ मध्ये ‘ स्ट्रिट बेटिंग ॲक्ट ’ संमत करण्यात आला. पुढे आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी ब्रिटिशांकित देशांत तो विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रद्द करण्यात आला. त्यामुळे इंग्लंडनेही तो १९६१ मध्ये रद्द केला. त्यामुळे लॅडबोक्स, विल्यम हिल्स, कोरल्स, मक्का या मोठया कंपन्यांनी सट्टा व्यापार हाती घेतला पण बुकींचेच त्यावर वर्चस्व होते. मात्र इतर देशांत त्यावर बंदी घालण्यात आली. काही देशांत, विशेषत: द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, बेल्जियम यांत सट्ट्यास मर्यादित स्वातंत्र्य होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत त्यावर पूर्णत: बंदी होती. फक्त नेव्हाडा राज्यात तो चालू होता. विसाव्या शतकाअखेर पॅरी म्यूच्युअल पद्धतीनुसार रक्कम परस्परांत वाटली जाऊ लागली आणि सार्वजनिक लॉटरीला विश्र्वव्यापक स्वरूप प्राप्त झाले. त्यातून शासनाला उत्पन्न मिळू लागले तथापि सट्टा व्यवहार हा अवैधच मानला गेला मात्र पौर्वात्य देशांत क्रिकेट, सॉकर, घोडयांच्या शर्यती यांसारख्या खेळांवर तो अनधिकृत रीत्या चालूच असून एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या सुविधेमुळे सट्टेबाजीवर कसे नियंत्रण आणावयाचे, हा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. ‘ सट्टा खेळणे ’ यावर अनेक देशांमध्ये कायदयाने बंदी आहे आणि ती कृती निंदय मानली जाते परंतु व्यापक सामाजिक आणि मानसिक आयाम लक्षात घेता, सट्टा या कृतीचेही शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण देता येते. गेल्या सु. अर्धशतकात सट्टा या क्रियेचे अनेक अंगांनी विश्लेषण करण्यात आले आहे आणि तत्संबंधी विपुल लेखनहीझाले आहे. आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, सामाजिक व्यवहार या सर्वांशी सट्टा ही प्रक्रिया संबंधित असते. शेअरबाजारात या प्रकारे केलेल्या व्यवहारांना उद्देशून हा शब्द सध्या रूढ झाला असला, तरी हा व्यवहार शेअरबाजारापुरता मर्यादित नाही. यासदृश अनेक व्यवहार प्रत्यक्षात होताना दिसतात. सोने, चांदी यांसारखे मौल्यवान धातू कापूस, हळद, डाळी यांसारख्या नित्योपयोगी वस्तूंच्या बाजारभावांतील फरकावर ‘सट्टा’ खेळला जातो.

सट्टा ही क्रिया कशी जन्म घेते, हे एका उदाहरणाने स्पष्ट होईल. एखादा दुकानदार घाऊक बाजारातून वस्तू खरेदी करतो. खरेदी किंमतीवर तो काही वाढीव रक्कम आकारून ती वस्तू काही काळाने विकतो. विकीतून झालेली प्राप्ती आणि मूळ वस्तूच्या खरेदीसाठी दिलेली रक्कम, यांतील फरक हा त्याचा ढोबळ नफा होय. वस्तू खरेदीच्या बाजारातील व विकीच्या बाजारातील परिस्थितीचे पूर्ण ज्ञान, किंमतीबाबतचा अचूक अंदाज आणि या सर्व व्यवहारातील धोका-जोखीमविरहित परिस्थिती असे येथे आढळते. यांतील नफ्याचा दरही बहुतांशी सामान्य राहतो. रोखे, समभाग, ऋणपत्रे यांमध्ये जर गुंतवणूक केली व ती थोडाफार नफा घेऊन विकली, तर तोही व्यवहार वरील प्रकारचा झाला असे म्हणता येईल. समभाग, जमीनजुमला किंवा एखादया वस्तूचे भाव भविष्यात भरमसाठ वाढतील आणि त्यांतून भरपूर भांडवली नफा मिळेल, या अंदाजाने जर एखादयाने गुंतवणूक केली, तर त्याला सट्टारूपी व्यवहार म्हणता येईल. किंमतीतील फार मोठया चढ-उतारांचा फायदा घेण्याच्या उद्देशाने जो मोठया रकमांची खेळी खेळतो, त्याला ‘ सट्टेबाज ’ म्हणता येईल व त्याच्या कृतीला ‘ सट्टा ’ किंवा ‘ सट्टेबाजी ’ असे म्हणता येईल. हा व्यवहार एखादया वस्तूच्या बाबतीत असू शकेल. सोन्याच्या बाबतीत असे व्यवहार केले जातात, किंवा परकीय चलनाच्या बाबतीतही असे व्यवहार सर्वत्र घडत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, तसेच तांबे, ॲल्युमिनियम अशा धातूंच्या बाबतीतही सट्टा खेळला जातो.

सट्टा व्यवहारात अपेक्षांचे काही गणित असते. एखादया वस्तूचा उपयोग, त्या वस्तूची मागणी, मागणीचे हंगामी स्वरूप, मागणीतील अनपेक्षित बदल या सर्वांबाबत जो अचूक अंदाज घेईल व खेळी खेळेल, त्याचाच सट्टा यशस्वी होईल. त्यामुळे सट्टा स्वरूपाचे व्यवहार करणे, हे अंधारात उडी घेण्यासारखे धोकादायक काम असेल, तरी त्या सर्व व्यवहारांत काही शास्त्रशुद्ध घटनाक्रम नक्कीच असतो आणि ते बिनचूकपणे ओळखणारा यशस्वी होतो, हे विसरून चालणार नाही. याबाबत जो जास्त धोका पतकरून व्यवहार करतो, त्याला अधिक धनलाभाचीही शक्यता असते. सट्टा व्यवहारात धोका जास्त पण प्रचंड फायदयाची शक्यता जास्त, असे साररूपाने सांगता येईल.

बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत असताना सरकारचे धोरण, करविषयक धोरण, वस्तूचे भांडवली मूल्य वाढण्याची अगर घटण्याची शक्यता इ. घटकही प्रभावी ठरतात. सट्टा स्वरूपाची खेळी खेळून मोठा नफा मिळविणे एकवेळ सोपे पण जर सरकारी धोरणाने किंवा करविषयक तरतूदींनी असा सर्व नफा काढून घेतला, तर या साहसास काही अर्थच उरणार नाही. यामुळेच मिळविलेला मोठा नफा लपवून कर चुकविणे व काळा पैसा तयार होणे, अशा घटना घडतात, किंवा पैशाचा दुरूपयोग करून करव्यवस्थाच वेठीला धरण्याचे धनदांडगे राजकारण करण्याच्या घटना घडतात. सट्ट्याचे व्यवहार टीकेला आणि आक्षेपांना कारणीभूत ठरतात ते या कारणांसाठी. बाजारात स्वाभाविक अशी अनिश्र्चितता असते. त्यामुळे सट्टा स्वरूपाचे व्यवहार करणे, अगदी साहजिकच आहे पण त्यामुळे बाजाराची कोंडी होणे, वस्तूंची कृत्रिम टंचाई होणे, काळा पैसा (बेहिशेबी पैसा) तयार होणे, मक्तेदाऱ्या निर्माण होणे, अनिश्र्चिततेचा नवा अध्याय सुरू होणे, यांमुळे बाजाराच्या स्थैर्यासच सुरूंग लागतो.

बाजारातील संभाव्य बदलांचे अपुरे ज्ञान, हेही सट्टा व्यवहारास कारणी-भूत ठरते. उदा., आगामी हंगामात अन्नधान्यांच्या किंमतींची पातळी काय असेल, याचा अंदाज येण्यासाठी पिकांखालील क्षेत्र, हवामान, पर्जन्यमान, खतांची उपलब्धता, अर्थसाहाय्य (सब्सिडी), सरकारी धोरण अशा कितीतरी घटकांचा एकत्रित अंदाज घ्यावा लागतो आणि या अनेक घटकांबाबत पुरेशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे सट्टेबाजांच्या कृतीला उत्तेजन मिळते.


सट्टा-व्यवहारात काही सकारात्मक गोष्टीही घडतात. वाढीव किंमतींच्या आवर्तात जर बाजार सापडला, तर सट्टेबाज त्या किंमतींचा फायदा घेण्यासाठी वस्तूंचा पुरवठा बाजारात करतात आणि किंमतवाढीचा झंझावात थोपविला जातो. याउलट, कोसळणाऱ्या किंमतींचा फायदा सट्टेबाज घेतात. वस्तू खरेदी करतात आणि किंमतीची पडझड थांबवितात. अशा वस्तू नंतर वाढीव किंमतींना विकून सट्टेबाज पैसे कमवितात. थोडक्यात म्हणजे, बाजारातील पराकोटीचा चढ-उतार नरम करण्याचे काम सट्टेबाज काही प्रमाणात करतात.

सट्टेबाजीतील अंदाज, अपेक्षा, अनिश्र्चितता व जोखीम यांचे अवास्तव प्रमाण कमी करून सावध जोखमीचे व्यवहार करण्यासाठी त्याच प्रकारातील वायदयाचे सौदे (फ्यूचर) आणि कयविकयाधिकार (ऑप्शन) व्यवहारही केले जातात. समभागाचा निर्देशांक आजपासून तीन महिन्यांनी किती असेल, याचा अंदाज घेऊन तीन महिन्यांच्या काळातील व्याजाचा विचार करून किंमतींच्या मर्यादेत एखादा समभागाचा बाजारभाव आला, तर तो समभाग विकण्याचा (अथवा खरेदी करण्याचा) करार केला जातो. सट्टेबाजीतील नशिबाचा आणि अंदाजित व्यवहाराचा भाग कमी होऊन त्याला एक शास्त्रशुद्ध स्वरूप येते. कयविकयाधिकार व्यवहारात विकी किंवा खरेदीचे बंधन नसते पण पर्याय खुला असतो. अशा सर्व व्यवहारांमुळे वित्तीय बाजारात लवचिकता आणि रोखता राहते आणि गुंतवणूकदारांना व्यवहारांसाठी मोठया निवडीस वाव राहतो. गुंतवणूकदारांनी आपली गरज, आपली मानसिकता, जोखीम पतकरण्याची तयारी असे विविध आयाम ध्यानात घ्यावेत, असे यातून सूचित होते. सट्टेबाजीतील गुंतवणूक व सर्वसाधारण गुंतवणूक यांतील सीमारेषा पुसट आहे.

सट्टास्वरूपी व्यवहारांचे विविध पैलू स्पष्ट करून त्यांचे प्रतिमान मांडणारे व स्थैर्य आणि बाजाराचे ज्ञान यांच्या विविध अवस्थांमध्ये त्याचे विश्लेषण करणारे विपुल लेखन विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले आहे. सट्टे-बाजीच्या कारणासाठी रोख पैशाची मागणी व व्याजदर यांचा परस्परविरोधी संबंध मांडणारा सिद्धांत ⇨ जॉन मेनार्ड केन्स यांनी जनरल थिअरी या प्रसिद्ध पुस्तकात १९३६ साली प्रथम मांडला. त्यानंतर काल्डोर (१९३९), मार्कोवित्झ (१९५२) आणि टोबिन (१९५८) यांनी या घटनेच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण सिद्धांत मांडले आहेत. जागतिक भांडवल बाजारातील एकजिनसीकरण आणि समन्वय हे घडून येत असताना सट्टा व्यवहारांच्या अभ्यासास पुष्कळच महत्त्व प्राप्त झाले आहे.

दास्ताने, संतोष

कायद्यामध्ये ‘ सट्टा ’ या संज्ञेची व्याख्या केलेली नाही मात्र या व्यवहारात असलेला धोका लक्षात घेता त्यासदृश असणारे काही व्यवहार कायद्याने नियंत्रित केले जातात. त्यावर संपूर्ण बंदी घालणे कायदयाला व्यावहारिक दृष्टया शक्य नसते. घोडयांच्या शर्यतीमध्ये घोडयावर पैसे लावणे, पत्त्यांचा व अन्य प्रकारे जुगार खेळणे, मटका खेळणे, किंवा शेअरबाजारात धोका पतकरून चढत्या भावाने शेअर खरेदी करणे, या सर्व व्यवहारांत थोडया वेळात केलेल्या गुंतवणुकीच्या अनेक पटींनी परताव्याची अपेक्षा केलेली असते. त्याचबरोबर मूळ मुद्दलही गमाविण्याची जोखीम पतकरलेली असते. फायदयासाठी खूप मोठा धोका पतकरणे हीच या व्यवहारातील मूलभूत प्रेरणा असते. सामान्यजनांचे हित लक्षात घेऊन कायदयाने हे व्यवहार काही प्रमाणात नियंत्रित केले जातात. पब्लिक गॅम्ब्लिंग ॲक्ट १८६७ व सर्व राज्यांमध्ये त्यामध्ये केलेल्या सुधारणांनुसार सार्वजनिक ठिकाणी जुगारास बंदी आहे. खाजगी लॉटरीवर नियंत्रण असते मात्र शासन स्वत: लॉटरी चालवू शकते. शेअरबाजारातील व्यवहारांवर ‘ सिक्युअरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ’ ची (सेबी) देखरेख व नियंत्रण असते. मात्र ‘सट्टा ’ हा अर्थव्यवहार संपूर्णपणे बंद करणे शक्य नाही.

पहा : वायदेबाजार शेअरबाजार.

जोशी, वैजयंती

संदर्भ : O’ Hara, John, A Mug’s Game : A History of Gaming and Betting in Australia, Kensington, 1988.