सरनाईक, शंकरराव : (सु. १८९०-१९७२). मराठी रंगभूमीवरील थोर मराठी गायक-अभिनेते. जन्म कोल्हापूरचा. ‘महाराष्ट्र कोकिळ’ म्हणून विख्यात. त्यांचे शालेय शिक्षण लिहिण्यावाचण्याइतपतच झालेले होते तथापि अत्यंत सुरेल आवाजाचे वरदान त्यांना लाभले होते. कोल्हापूर संस्थानचे दरबार गायक उस्ताद अल्लदियाखाँ यांची तालीम त्यांना मिळाली. अखंड आठ वर्षे अल्लदियाखाँ यांनी शंकररावांच्या गायकीवर संस्कार केले. त्यामुळे त्यांना लाभलेल्या आवाजाच्या नैसर्गिक देणगीला शास्त्रीय संगीताच्या जाणकारीची उत्तम बैठक प्राप्त झाली त्यांचे गाणे अनेक प्रकारे समृद्ध झाले.

शंकरराव मराठी रंगभूमीवर उदयाला आले, ते त्या रंगभूमीच्या एका वैभवशाली काळाच्या पार्श्वभूमीवर. किर्लोस्कर, शाहूनगरवासी, स्वदेश हितचिंतक, ललित कलादर्श इ. नाटकमंडळींमुळे, तसेच बालगंधर्व, केशवराव भोसले यांसारख्या थोर गायकनटांमुळे त्या काळी मराठी रंगभूमीला समृद्धी प्राप्त झाली होती.

शंकररावांचा शरीरबांधा निसर्गतःच सुबक व घाटदार होता. चेहराही भावपूर्ण होता. त्यामुळे त्यांचा रंगभूमीवरील प्रवेश सहजसुलभ झाला. गायनाची, स्वरविलासाची त्यांची एक स्वतंत्र, विलोभनीय शैली होती. अनेक स्त्रीभूमिका त्यांना मिळाल्या आणि त्या त्यांनी प्रभावीपणे सादर केल्या.

रंगभूमीवरील त्यांच्या गानकौशल्याची कीर्ती इंदूर संस्थानचे राजे तुकोजीराव होळकर यांच्या कानी गेली. त्यांनी शंकररावांना आपल्या दरबारचे गायक म्हणून नेमणूक देऊन त्यांचा गौरव केला. इतकेच नव्हे, तर त्यांच्यासाठी आपल्या युवराजांच्या नावाने ‘यशवंत संगीत मंडळी’ काढली. पुढे १९१५ च्या सुमारास त्यांनी ह्या नाटक मंडळीची मालकी शंकररावांना दिली. ह्याच नाटक मंडळीच्या रंगमंचावरून शंकररावांनी प्रकट केलेल्या असामान्य गानकौशल्यावर खूश होऊन लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘महाराष्ट्र कोकिळ’ ही पदवी बहाल केली आणि त्याच पदवीने ते आयुष्यभर ओळखले गेले.

‘यशवंत संगीत मंडळी’तर्फे त्यांनी सौभद्र,मानापमान,संशयकल्लेळ यांसारखी गाजलेली नाटके सादर केली. गणपतराव बोडस, केशवराव दाते ह्यांच्यासारखे श्रेष्ठ नट त्यांच्या नाटक मंडळीला लाभले. सत्याग्रही,चलती दुनिया यांसारखी नवी नाटकेही त्यांनी सादर केली. त्यांच्या नाटक मंडळीत साठ-सत्तर कर्मचारी होते. सवाई गंधर्व, मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांच्यासारखे कलावंत तसेच सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी स. अ. शुक्ल अशा सर्वांना सामावून घेऊन त्यांनी ही नाटक मंडळी दीर्घकाळ चालवली. चित्रपटांच्या आगमनानंतर रंगभूमीला उतरती कळा आली. काळाची पावले ओळखून शंकररावांनी १९३३ साली आपली ‘यशवंत संगीत मंडळी’ बंद केली तथापि आपले कलावंत आणि कर्मचारी यांना सहा महिन्यांचे वेतन बोनस म्हणून देऊन, तसेच सर्व देणी देऊन त्यांनी सर्व व्यवहार पूर्ण केले. कोरडया व्यावसायिक दृष्टिकोणापेक्षा भावनिक अगत्याला त्यांच्या जीवनात मोठे स्थान होते. म्हणूनच त्यांची नाटक मंडळी बंद होऊन अनेक वर्षे झाली, तरी कर्मचारी व कलावंत ह्यांच्याशी त्यांचे असलेले ऋणानुबंध अखेरपर्यंत अतूटच राहिले. त्यांचा बळीराम नावाचा नोकर त्यांना आजन्म सोडून गेला नाही.

शंकररावांचे घराणे वारकरी संप्रदायाचे होते. त्यांचे वडील बंधू तुळारामबुवा हे त्यांच्या काळातले प्रसिद्घ भजनी. दुसरे वडील बंधू श्रीपतराव हे विठ्ठलभक्त आणि वारकरी. त्यांनी त्यांच्या अखेरच्या काळात शंकररावांना आपल्या पीठावर बसवून हरिभजनात जीवन व्यतीत करण्यास सांगितले. १९३४ ते १९६८ या दीर्घ कालखंडात त्या पीठावर बसून प्रत्येक सोमवारी ते विठ्ठलाचे भजन सादर करीत. ते ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक रसिक येत असत. विनोबा भावे, यशवंतरावजी चव्हाण अशा थोर व्यक्तींनीही त्यांचे हे भजन ऐकले होते.

शंकररावांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये. मराठी नाटक आणि चित्रपट ह्या क्षेत्रांत आपल्या उत्तम अभिनयाने संस्मरणीय ठसा उमटवून गेलेले अरूण सरनाईक हे शंकररावांचे सुपुत्र होत. ते उत्तम गायकही होते. त्यांचे कर्तृत्व ऐन भरात असताना १९८४ मध्ये आपल्या बायकोमुलासह त्यांना अपघाती मरण आले.

अल्पशा आजाराने शंकररावांचे निधन झाले.

जाधव, श्यामकांत