सरनाईक, पिराजीराव : (२८ जुलै १९०९-३० डिसेंबर १९९२). थोर मराठी शाहीर. जन्म म्हालसवाडे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) ह्या खेडयात एका गरीब कुटुंबात. त्यांना औपचारिक शिक्षण फारसे लाभले नाही पण त्यांच्या अंगी अव्वल दर्जाची शाहिरी कला होती. छ. शाहू महाराजांच्या निकटच्या वर्तुळात शीघ्र कवी म्हणून गाजलेले शाहीर-कवी लहरी हैदर यांना गुरूस्थानी मानून पिराजीरावांनी आयुष्यभर शाहिरीची साधना केली.
साधी, सोपी पण अंतःकरणाला भिडणारी कवने त्यांनी समाजापुढे सादर केली. नादयुक्त शब्दकळा, श्रोत्यांना चेतविणारा आवेश व त्याला अनुरूप अशी देहबोली ही त्यांच्या शाहिरीची काही ठळक वैशिष्टये होत. व्यासपीठावर येताच ते ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी आरोळी देऊन श्रोत्यांच्या भावना उत्तेजित करीत. शूरवीरांचे पोवाडे रचून व आपल्या पहाडी आवाजात गाऊन त्यांनी श्रोत्यांमध्ये स्फूरण निर्माण केले. त्यांच्या गायकीला डफाच्या कडकडाटाची व तुणतुण्याच्या नादाची पार्श्वभूमी दाखल असलेली साथ वातावरणात अधिकच चैतन्य व जोश निर्माण करीत असे. त्यांची कवने जशी स्फूर्तिदायक तशीच समाज प्रबोधनपर होती. स्वातंत्र्यलढयात अनेक शाहिरांनी आपली स्फूर्तिदायक कवने गाऊन ह्या संगामाला फार मोठे बळ मिळवून दिले, अशा शाहिरांत पिराजीरावांचाही सहभाग होता. पुढे विख्यात कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासात ते आले. त्यातून त्यांचे कवित्व आणि सादरीकरण अधिकच प्रगल्भ होत गेले.
सामाजिक परिवर्तनासाठी विविध विषय निवडून त्यांनी आपल्या सहज-सुलभ रचनांमधून लोकांचे प्रबोधन केले. त्यांची वाणी लाघवी होती. त्यांच्या कवनांतला आशय ती सहज श्रोत्यांपर्यंत पोहोचवीत असे. तुणतुणे, हार्मोनियम, टाळ आणि ढोलकी यांच्या चढत्या मेळातून जी लय निर्माण होई, तीवर स्वार होऊन आपल्या पहाडी आवाजाने ते श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात नेऊन सोडत.
त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले. आचार्य अत्रे यांनी त्यांना आपल्या मराठा दैनिकाच्या कार्यालयात निमंत्रित करून त्यांचा बहुमान केला. कोल्हापूर नगरपालिकेने खास मानपत्र देऊन त्यांना गौरविले (१९८६). १८ मे १९९० रोजी त्यांना मुंबईत ‘शाहीर अमर शेख पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुढे ‘ग. दि. मा. पुरस्कार’ आणि ‘राजर्षी शाहू पुरस्कार’हेही त्यांना मिळाले. त्यांच्या शाहिरी कवनांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहेत.
अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
जाधव, श्यामकांत