सरदार, गंगाधर बाळकृष्ण : (२ ऑक्टोबर १९०८-१ डिसेंबर १९८८). मराठी साहित्यिक आणि समाजमनस्क विचारवंत. जन्म ठाणे जिल्ह्यातील जव्हार या गावचा. शिक्षण जव्हार, मुंबई व पुणे येथे एम्. ए. पर्यंत. १९४१ मध्ये पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविदयालयात मराठीचे व्याख्याते म्हणून नेमणूक. तेथूनच १९६८ मध्ये मराठीचे प्रपाठक म्हणून सेवानिवृत्त.
सरदार जेथे जन्मले त्या जव्हारमध्ये आदिवासी बहुसंख्येने असल्यामुळे त्यांचे जीवन, दु:खे आणि समस्या ह्यांचा अनुभव सरदारांना जवळून घेता आला. घरातल्या समतावादी वातावरणामुळे सामाजिक भेदाभेदांपलीकडे जाऊन माणूस पाहण्याची दृष्टी लाभली. शालेय जीवनातच स्वामी रामतीर्थ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद ह्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. सावरकरांच्या विचारांनीही ते काही काळ प्रभावित झालेले होते. परंतु नंतर ते गांधीवादाकडे वळले.१९३० सालच्या मिठाच्या सत्यागहात सहभागी होऊन त्यांनी तुरूंगवासही भोगला. तथापि देशातील बदलत्या परिस्थितीत गांधीवादाचे अपुरेपण जाणवून ते साम्यवादी तत्त्वज्ञानाकडे ओढले गेले आणि साम्यवादी भूमिकेतून ते सामाजिक प्रश्नांचा आणि धर्माचा विचार करू लागले. मात्र साम्यवादाच्या ते आहारी गेले नाहीत. त्याचप्रमाणे सकिय राजकारणापासून दूर राहून वैचारिक पातळीवरून लेखन-भाषणांद्वारा सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात स्वत:ला गुंतवून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने सरदारांनी लिहिलेल्या ग्रंथांत महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (१९४१), न्या. रानडेप्रणीत सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा (१९७३), आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार (१९७५), महात्मा फुले : विचार आणि कार्य (१९८१) अशा काही ग्रंथांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे प्रबोधनातील पाऊलखुणा (१९७८), नव्या युगाची स्पंदने (१९८४), नव्या उर्मी, नवी क्षितिजे (१९८७), परंपरा आणि परिवर्तन (१९८८) ह्या त्यांच्या स्फुट लेखांच्या संपादित संग्रहांतूनही त्यांचे प्रबोधनविषयक विचार स्पष्ट होतात.
रानडे-चिपळूणकरांच्या पूर्वी ज्यांनी अत्यंत अवघड परिस्थितीत, अत्यंत निष्ठेने महाराष्ट्राला चेतनादायी ठरेल असे काम केले पण ज्यांची उपेक्षा झाली त्या अव्वल इंग्रजीच्या काळातल्या भाऊ महाजन, लोकहितवादी, विष्णुबोवा बह्मचारी, म. जोतीराव फुले, विष्णुशास्त्री पंडित ह्यांच्या कार्याचे विवेचन सरदारांनी केले. तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या कार्यामागे न्या. रानडे ह्यांचे तात्त्विक अधिष्ठान काय होते आणि ह्या प्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान काय, हे सरदारांनी प्रतिपादिले आहे. आगरकरांच्या समाजचिंतनाचा परामर्श घेऊन धर्म, सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक प्रश्न ह्यांसंबंधीचे आगरकरांचे विचार तर त्यांनी सांगितलेच परंतु उपेक्षितांबद्दल आगरकरांच्या मनात असलेली करूणा त्यांच्या लेखनातून कशी प्रकट झालेली आहे, हेही त्यांनी दाखवून दिले. महात्मा जोतीराव फुले ह्यांच्या जीवननिष्ठेचा शोध घेऊन त्यांच्या विचारांचा सामाजिक आशय त्यांनी विशद केला. जोतीरावांचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक इ. विषयांवरील विचार त्यांच्या एकाच मूलगाही, सर्वंकष सामाजिक दृष्टीतून कसे स्फुरलेले आहेत, हेही दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
त्यांच्या स्फुट लेखांतून भारतीय राष्ट्रवाद आणि ऐहिक निष्ठा, नव्या महाराष्ट्र राज्याचे भवितव्य, संस्कृतिसंवर्धन आणि ज्ञानोपासना ह्यांतील अनुबंध, समाजप्रबोधन आणि धर्मजीवन, व्यक्ती आणि सामाजिक संस्था ह्यांच्यातील अनुबंध, संकुचित धर्मविचारामुळे प्रबोधनाला पडणाऱ्या मर्यादा असे अनेक विषय त्यांनी विवेचिले आहेत. त्याचप्रमाणे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, म. जोतीराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर ह्या थोर समाजसुधारकांच्या कार्याचाही परिचय त्यांनी करून दिला आहे.
त्यांच्या काही लेखांतून दलित साहित्याचे समालोचनही त्यांनी केले आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करून जनमानसात नवीन जाणिवा रूजवणाऱ्या दलित साहित्यिकांचा विद्रोह सरदारांना स्वागतार्ह वाटतो. भविष्यकाळात खृया अर्थाने भारतीय समाज एकात्म बनला, तर दलित वाङ्मयाच्या स्वतंत्र अस्तित्वाचे प्रयोजन उरणार नाही मात्र जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत त्या साहित्याला वेगळे दालन आणि व्यासपीठ आवश्यक असेल, असेही त्यांनी प्रतिपादिले आहे.
समाजाचे निकोप परिवर्तन व्हावयाचे असेल, तर सांस्कृतिक विषमता आणि आर्थिक दु:स्थिती नाहीशी व्हायलाच हवी, अशी त्यांची धारणा होती. तसेच जातिसंघटना विसर्जित झाल्या पाहिजेत, असे त्यांचे आगही प्रतिपादन होते.
संतांच्या सामाजिक कामगिरीचा परामर्शही त्यांनी घेतला. संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रूती (१९५०) हा त्यांचा एक ख्यातनाम ग्रंथ. संतांनी मराठी संस्कृतीच्या विकासात काय योगदान दिले, ह्याचा विचार ह्या ग्रंथात त्यांनी विधायक आणि सामाजिक दृष्टी ठेवून केला आहे. संतांच्या विचारांमुळे सामाजिक प्रगतीत अडसर निर्माण झाला, हा काही अभ्यासकांचा दृष्टिकोण त्यांनी स्वीकारला नाही. ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा (१९७१) ह्या त्यांच्या ग्रंथात सरदारांनी ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान आणि कार्य ह्यांचे विवेचन तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ मनात ठेवून केले आहे. सर्वसामान्य लोक संसारातच राहणारे असतात, ह्याचे भान राखून संसार हा परमार्थप्राप्तीच्या आड येत नाही हे ज्ञानदेवांनी सांगितले, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. तुकारामदर्शन (१९६८), रामदासदर्शन (१९७२) आणि एकनाथदर्शन (१९७८) हे त्यांनी संपादिलेले ग्रंथही निर्देशनीय आहेत.
अर्वाचीन मराठी गदयाची पूर्वपीठिका (१९३७) हा सरदारांचा पहिला गंथ.१८८५ ते १९२० या कालखंडात मराठी गदयाचा जो विकास झाला, त्याची पार्श्वभूमी अव्वल इंगजीच्या काळातील मराठी गदय लेखकांनी कशी तयार करून ठेवली होती, हे त्यांनी दाखविले आहे. त्यासाठी १८०० ते १८७४ ह्या कालखंडातील विविध गंथांचा परामर्श त्यांनी घेतला आहे.
सरदारांच्या सामाजिक चिंतनाचा प्रभाव त्यांच्या साहित्यदृष्टीवरही अपरिहार्यपणे पडलेला आहे. व्यक्ती आणि समाज ह्यांचा अतूट संबंध असल्यामुळे साहित्याचे सामाजिक दायित्व मानावेच लागेल, अशी त्यांची धारणा आहे. साहित्यविषयक शुद्ध कलावादी भूमिका त्यांना मान्य नाही.
सरदारांच्या संपादित गंथांत महाराष्ट्र जीवन : परंपरा, प्रगती आणि समस्या (दोन खंड,१९६०) आणि संक्रमणकालाचे आव्हान (१९६६) हे दोन विशेष उल्लेखनीय आहेत. परंपरा, प्रगती आणि समस्या ह्या तीन दृष्टिकोणांतून महाराष्ट्र जीवनाची चिकित्सा करणारे विविध व्यासंगी व्यक्तींचे लेख महाराष्ट्र जीवनच्या पहिल्या खंडात अंतर्भूत आहेत, तर दुसऱ्या खंडात साहित्य व कला यांतील उपविषय आलेले आहेत. क्रमण काळाचे आव्हान ह्या गंथातहीअन्न,अर्थविकास,नियोजन,राजकीय प्रश्न, नेतृत्व, शिक्षणक्षेत्र, ऐहिक निष्ठा, ज्ञाननिष्ठा व समाजपरिवर्तन इ. क्षेत्रांतील आव्हानांविषयी निरनिराळ्या अभ्यासक-विचारवंतांनी लिहिलेले लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
१९७८ साली मुंबई येथे झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.१९८० मध्ये बार्शी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. नासिक आणि जळगाव येथे भरलेल्या अन्याय निर्मूलन परिषदांचे ते अध्यक्ष होते. तसेच मनोर (ता. पालघर) येथे जंगल बचाव आदिवासी परिषदेचेही ते अध्यक्ष होते. १९८४ साली सामाजिक न्याय पुरस्कार (माहुली) त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), भारत इतिहास संशोधक मंडळ (पुणे) ह्यांसारख्या विविध संस्थांवरही त्यांनी काम केले.
पुणे येथे ते निधन पावले.
संदर्भ : इनामदार, हेमंत विष्णू, गंगाधर बाळकृष्ण सरदार : व्यक्ती आणि कार्य, मुंबई,1998.
कुलकर्णी, अ. र.