सरकारी बांधकामे : (पब्लिक वर्क्स). सरकारने स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या जबाबदारीवर जनतेकरिता मोठमोठी बांधकामे अथवा अभियांत्रिकीय प्रकल्प पार पाडणे. अंतर्गत सुधारणा अथवा सरकारी (सार्वजनिक) बांधकामे ही संकल्पना अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये रूढ झाली आहे. सरकारी अधःसंरचना (पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर)ही संज्ञा सार्वजनिक बांधकामे व प्रकल्प यांमध्ये घालावयाचे अधःसंरचनात्मक भांडवल यासाठी वापरली जाते. अंतर्गत सुधारणा म्हणजे काही अत्यावश्यक बांधकाम प्रकल्प, ज्यांच्यामुळे देशाला आर्थिक सुधारणा पार पाडणे शक्य होते. विमानतळ, कालवे, धरणे व बंधारे, नलवाहिका, लोहमार्ग, रेल्वेवाघिणी, रस्ते, बोगदे, कृत्रिम बंदरे या सर्वांची उभारणी करणे, अशी याची उदाहरणे देता येतील.

सरकारी बांधकामे ही व्यापक संज्ञा असून तीमध्ये खाणी, शाळा, रूग्णालये, जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच मलजलशोधन संयंत्र इत्यादींचा समावेश होतो. नगरपालिकीय अधःसंरचना यासाठीही सरकारी बांधकामे या संकल्पनेचा वापर करतात. मोठमोठया शहरांमध्ये आढळून येणाऱ्या नागरी अधःसंरचनेला अवस्थापन हीही संज्ञा वापरली जाते.

काही उदाहरणांबाबत अंतर्गत सुधारणांची कार्यवाही ही बेकारी दूर करण्याकरिता वापरली जाते, असे प्रतिपादन केले जाते. अंतर्गत सुधारणा कार्यकमांचे विरोधक असा पवित्रा घेतात की, अशा प्रकारचे प्रकल्प सार्वजनिक क्षेत्राऐवजी खाजगी क्षेत्रांनी पूर्ण करावयास हवेत. तथापि खाजगी क्षेत्रात जे उदयोजक कार्य करतात, ते नुकसानीची जबाबदारी स्वतःकडेच घेतात आणि त्यामुळे तोटयात येणारे प्रकल्प स्वीकारण्याची त्यांची मानसिकताच नसते. राजकीय दृष्टिकोनातून पाहता, खाजगी क्षेत्रातील उदयोगांना तोटयातून बाहेर काढण्याकरिता सरकारला सार्वजनिक निधीचा वापर करणे रास्त वाटत नाही आणि याउलट याला पर्याय म्हणून तोटयात चालणारे प्रकल्प सरकारला स्वतःच चालविणे भाग पडते. परिणामी, अमेरिकेसारख्या देशात, जवळजवळ सर्व महत्त्वाची सरकारी अवस्थापनांची कामे उदा., खंडगामी लोहमार्ग प्रकल्प, टेनेसी खोरे प्राधिकरण, आंतरराज्यीय राजमार्ग व्यवस्था, कोकण रेल्वे वगैरे संघीय गुंतवणुकीद्वाराच पार पाडली गेली आहेत त्यांमध्ये खाजगी क्षेत्रातील उदयोजकांना पोट-कंत्राटदार म्हणूनच स्थान देण्यात आले. मोठमोठाली सरकारी बांधकामे ही अंतर्गत सरहद्दी वा सीमाक्षेत्रे खुली करण्यासाठी (उदा., एरी कालवा, ट्रान्ससायबीरियन रेल्वे) बांधण्यात आली.

अमेरिकेच्या इतिहासात, अमेरिकेतील बेकारी कमी करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेतील क्रयशक्ती वाढविण्याकरिता राजमार्ग बांधणे आणि सार्वजनिक इमारती उभारणे, यांसाठी पब्लिक वर्क्स ॲडमिनिस्ट्रेशन (सरकारी बांधकाम प्रशासकीय संस्था) ही संस्था स्थापण्यात आली. फँक्लिन रूझवेल्ट या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ‘न्यू डील’ कार्यक्रमांतर्गत ती अंतर्भूत होती. राष्ट्रीय औदयोगिक पुनःसुधारित कायदयानुसार (१९३३) रूझवेल्टनी या एजन्सीची स्थापना आपला अंतर्गत सचिव हॅरोल्ड एल्. आइक्स याच्या नेतृत्वाखाली केली. या एजन्सीच्या कार्यकालातच, राष्ट्राच्या एकूण नव्या शैक्षणिक इमारतींचे ७०% बांधकाम, ६५% नवी न्यायालये, नगर प्रासाद, मलजलशोधन संयंत्रे यांचे बांधकाम, सार्वजनिक आरोग्य सुविधा यांची नवी यंत्रणा ३५% आणि नवे रस्ते, पूल, भुयारे इत्यादींचे २०% बांधकाम करण्यात आले. राष्ट्र जेव्हा युद्धकालीन अर्थव्यवस्थेच्या महाजालात शिरले (१९३९), तेव्हा सरकारी बांधकाम प्रशासन कोलमडून पडले व अस्तंगत झाले.

सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये खर्चाचा अतिरेक तसेच मागणीची न्यूनता या दोन बाबींचा प्रत्यही अनुभव येत असतो. याची प्रमुख कारणे म्हणजे आशावादाचा पूर्वगह (ऑप्टिमिझम बायस) आणि डावपेचात्मक मिथ्यास्थापन (स्ट्रॅटिजिक मिसरिप्रेझेंटशन) ही होत. या दोन दोषांचे वा चुकांचे निवारण करण्याकरिता संदर्भीय वर्गानुमान (रेफरन्स क्लास फोअर कास्टिंग) या तंत्राचा विकास करण्यात आला असून अधिक अचूक व्यय व मागणी अनुमानांचा व अंदाजांचा वापर करावा लागला आहे.

गद्रे, वि. रा.