समूहन प्रतिक्रिया : एखादया द्रवात न विरघळलेल्या स्थितीत तरंगत असलेले कणरूप पदार्थ किंवा कोशिका (पेशी) किंवा सूक्ष्मजंतू एकत्र गोळा होऊन एकमेकांना चिकटून राहण्याच्या क्रियेला समूहन प्रतिक्रिया म्हणतात. स्वतंत्रपणे संचार करणाऱ्या या सूक्ष्म कणांना एकत्र बद्ध करणारे जैवरासायनिक रेणू ‘समूहक’ या नावाने ओळखले जातात. त्यांची क्रिया विशिष्ट कणांपुरती (विशिष्ट प्रकारच्या कोशिका अथवा सूक्ष्मजीवांपुरती) मर्यादित असते आणि त्यांचे द्रवातील अस्तित्व निष्किय जनक द्रव्यांच्या स्वरूपात असते. समूहनाला योग्य वा आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यावर ते सकिय होतात.

समूहन होणाऱ्या कणांच्या पृष्ठभागावरील रेणू ⇨ प्रतिजन म्हणून कार्य करतात. द्रवात असलेले समूहकांचे रेणू या प्रतिजनांशी ⇨ प्रतिपिंड या नात्याने बद्ध होतात. प्रत्येक प्रतिपिंडाला एकाहून अधिक बंधनक्षम स्थाने असल्यामुळे तो एकाच वेळी दोन किंवा अधिक कोशिकांच्या पृष्ठभागाशी जोडला जाऊन त्यांना जवळ आणतो. अशा अनेक कोशिकांच्या एकत्र येऊन कायम स्वरूपात जोडले जाण्याच्या क्रियेतून समूह तयार होतात. हे समूह कोशिकांना निष्किय करतात. समूहन झालेल्या या निष्किय कोशिकांना भक्षिकोशिका सहज गिळंकृत करतात. अशा रीतीने समूहन प्रतिक्रिया सूक्ष्मजंतूंपासून संरक्षण करण्यात महत्त्वाची पायरी ठरते. यामुळे संक्रमण पसरू शकत नाही.

समूहन प्रतिक्रियेचा अभ्यास जंतुसंक्रमणाच्या निदानात महत्त्वाचा ठरू शकतो. संक्रमणानंतर थोड्याच दिवसांत त्या विशिष्ट जंतूंविरूद्ध प्रतिपिंडाची निर्मिती सुरू होते. हे प्रतिपिंड (समूहक) रक्तजलात उपस्थित असल्याची खात्री समूहनाच्या चाचणीने करता येते. उदा., विषमज्वरासाठी केलेली विडाल चाचणी संक्रमणानंतर एक आठवडयाच्या आत होकारात्मक निष्कर्ष देते. [ → रोगनिदान].

निरोगी अवस्थेत रक्तातील तांबड्या कोशिकांचे समूहनास प्रवृत्त करणारे समूहक रक्तजलात असू शकतात. त्यांच्यामुळे न जुळणाऱ्या गटाचे रक्त व्यक्तीला दिल्यास (उदा., A गटाच्या व्यक्तीला B किंवा AB गटाचे रक्त दिल्यास) रक्तदात्याच्या कोशिकांचे समूहन होऊन अनिष्ट प्रतिक्रिया ओढवते. हे टाळण्यासाठी रक्तगट निश्चिती करणे आणि दोन रक्तांची परस्पर-क्रिया (आंतरक्रिया) प्रत्यक्ष पाहणे या दोन्ही चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमध्ये समूहन प्रतिक्रियेचे प्रत्यक्ष दर्शन सूक्ष्मदर्शकाखाली होत असते. [ → रक्तधान].

समूहन प्रतिक्रियेत प्रतिपिंडाशिवाय (समूहकांशिवाय) इतर घटकही महत्त्वाचे ठरू शकतात. उदा., रोगप्रतिकारक्षमता यंत्रणेत पूरक पदार्थ हा घटक सूक्ष्मजंतूंच्या पृष्ठभागाचे परिवर्तन घडवून त्यांना अधिक समूहन-क्षम करतो. दीर्घकाळ व असमाधानकारक रीत्या साठविलेल्या रक्तातील कोशिकांचे आपोआप समूहन होऊन रक्तकोशिकांच्या चळती (एकावर एक ठेवलेल्या नाण्यांसारख्या) दिसू लागतात. काही व्यक्तींमध्ये ‘शीत समूहक’ नावाचे स्वयंसमूहक असतात. अशा व्यक्तींचा अतिशीत वातावरणाशी संपर्क असल्यास हे समूहक कार्यरत होऊन रक्तवाहिन्यांमध्ये तांबडया कोशिकांचे समूहन होऊन प्रतिक्रिया सदृश परिस्थिती निर्माण होते.

पहा : रोगनिदान रोगप्रतिकारक्षमता.

श्रोत्री, दि. शं.