समुद्रशोक : (हिं. समदरसोख, समंदरका फल गु. समुद्रशोष क. समुद्रबळ्ळी, सोगे सं. हस्तिवल्ली, द्रढदारू, वृद्धदारूक, समुद्रशोष इं. एलेफंट कीपर लॅ. अर्जीरिया स्पेसिओजा कुल कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी ).

फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] शुष्क-प्रदेशाव्यतिरिक्त या मोठया वेलीचा प्रसार भारतात सर्वत्र असून मूळची बंगालमधील असावी, जावामध्येही आढळते. हिच्या अर्जीरिया ह्या शास्त्रीय प्रजातीत एकूण ९० जाती असून भारतात ४० जाती आढळतात. खोड बळकट, मोठे व त्यावर पांढरट लव असते. पाने मोठी, तळाशी हृदयाकृती, अंडाकृती, १२-२५ सेंमी. रूंद, वर गुळगुळीत परंतु खाली फार लवदार असतात. मोठी, फिकट जांभळी, सच्छद (तळाशी उपांगे असलेली) फुले ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वल्ल्रीत [→ पुष्पबंध] येतात. पुष्पमुकुट नाळक्यासारखा असून बाहेर लवदार पण आत लवहीन असतो. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी कुलात (किंवा हरिणपदी कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. मृदू फळ लहान, कठीण, गोलसर पण शुष्क व टोकदार असते. बिया बहुधा चार असतात. बागेत शोभेकरिता मांडवावर चढवितात. कोवळ्या पानांची भाजी करतात. मूळची बंगालमधील वेल असे काहींचे मत आहे. मुळे आरोग्यप्रस्थापक, पौष्टिक, शक्तिवर्धक, संधिवात व तंत्रिका तंत्राच्या विकारांवर गुणकारी असतात. पाने दाहनाशक असून जखमेवर पोटीस व त्वचा विकारांवर बाहेरून लावण्यास चांगली. गळवांवर पाने ऊन करून बांधल्यास ती पिकून फुटण्यास मदत होते. बी वीर्यस्तंभक असते.

जमदाडे, ज. वि.