समस्थितिकरण : रासायनिक उदयोगधंदयातून कित्येक वेळा एकामध्ये दुसरा पदार्थ किंवा दुसरे पदार्थ मिसळून मिश्रणे तयार करण्यात येतात. या मिश्रणातील घटकांची रासायनिक किया होणार नसते, परंतु हे दोन किंवा अधिक घटक एकत्र करून ठेवून सावकाश तसेच वापरावयाचे असतात उदा., तेलाचे रंग, छपाईची शाई, फिनेल, बूटपॉलिश इत्यादी. द्रवामध्ये घन पदार्थ एकजीव न होता तरंगत राहतो किंवा खाली बसतो. अशा वेळी पुष्कळ वेळा त्याचे यांत्रिक शक्तीच्या साहाय्याने एकत्रीकरण करून त्या पदार्थांची एक प्रावस्था निर्मिण्यात येते. अशा तऱ्हेच्या प्रकियेला समस्थितिकरण असे म्हणतात. ही समस्थितिकरणाची प्रक्रिया विशेषकरून पातळ रंग व व्हार्निश ( रोगणे ) तयार करणाऱ्या कारखान्यांत औषधी लेह, मलमे, सौंदर्यप्रसाधने, जंतुनाशके, छपाईची शाई, कीम व खाण्याचे पदार्थ तयार करणाऱ्या धंदयांत नेहमी अंमलात आणावी लागते. पुष्कळ वेळेस रासा-यनिक किया सुलभ, सर्वव्यापी व लवकर व्हावी म्हणून तात्पुरते समस्थितिकरण करावे लागते. या प्रकियेनंतर ठरल्याप्रमाणे नवा पदार्थ तयार होतो.
काही वेळेला एकाच माध्यमात निरनिराळ्या आकारमानांचे घन पदार्थ असू शकतात. त्यांना एका आकारमानात आणण्याचे कामही काही वेळेला यांत्रिक शक्तीच्या साहाय्याने करण्यात येते. अशा तऱ्हेच्या समस्थिती-करणाकरिता भरड दलित्र, मध्यम दलित्र आणि सूक्ष्म दलित्र या प्रकारची यंत्रसामगी वापरण्यात येते.
भरड दलित्रामध्ये पुढील महत्त्वाच्या यंत्रांचा समावेश होतो : (१) ब्लेक दलित्र, (२) डॉज जबडा दलित्र, (३) जिरेटरी दलित्र, (४) सॅम्पसन दलित्र.
मध्यम दलित्रांमध्ये (१) दलन रूळ, (२) तबकडी दलित्र, (३) दलन गिरणी, (४) शंक्वाकार दलित्र, (५) दलन यंत्र, (६) हातोडा आघात दलित्र, (७) एका रूळाचे दलित्र, (८) खीळ ( पिन ) गिरणी, (९) अंत्यसरक गिरणी, (१०) विशिष्ट प्रावस्था विच्छेदक या यंत्रांचा समावेश होतो.
सूक्ष्म दलित्र समस्थितिकरण करण्याच्या दृष्टीने सर्वांत जास्त उपयोगी दलित्र आहे. यांमध्ये (१) वर्हस्टोन, (२) रूळ दलित्र,(३) रेमॉड गिरणी, (४) गिफिन गिरणी, (५) केंद्रोत्सारी गोलिका दळणी, (६) कडे लाटणे गिरणी, (७) गोलिका दळणी, (८) नलिका गिरणी, (९) हार्डिज दळणी येतात.
या सर्व प्रकारच्या यंत्रसामगींमध्ये उद्देश एकच आहे की, सर्व तऱ्हेच्या कणांचे आकारमान सारखे व्हावे व सर्व माध्यम एकजिनसी व्हावे. यांपैकी काही महत्त्वाच्या यंत्रांचे वर्णन पुढे केले आहे.
दलन रूळात बहुधा दोन किंवा तीन रूळ एकमेकांशेजारी फार वेगाने फिरू शकतात. कधी ते एकावर एक असतात. त्यांची त्रिज्या १·३ मी.पर्यंत असते. एक रूळ यंत्राच्या साहाय्याने फिरवितात व दुसरा घन पदार्थाच्या घर्षणामुळे फिरतो. बंदुकीची दारू तयार करताना किंवा अशाच तऱ्हेने घासले जाणारे पदार्थ बारीक करण्याकरिता दलन रूळ वापरतात.
ज्यावेळी द्रव व दुसरे द्रव किंवा घन पदार्थ अगदी एकजीव करावयाचे असतात त्या वेळी घूर्णी मिश्रक वापरतात. विशेषत: अस्फाल्ट आणि नॅप्था हे एकत्र मिश्रण एकजीव वा एकजिनसी करण्याकरिता घूर्णी परिक्षेपक नावाच्या यंत्राचा वापर करतात.
यांशिवाय वायू व द्रव पदार्थ यांचे एकजीव मिश्रण होण्याकरिता घूर्णी वायुशोषक नावाचे यंत्र जास्त उपयोगी पडते. कमी दाबाच्या वातपंपाने प्रवेश-द्वारांतून वायू टाकीत प्रवेश करतो. या टाकीमध्ये एक घूर्णक असतो. त्यामधून द्रव बाहेर पडून वायूबरोबर एकजीव मिश्रण तयार करण्यास तो मदत करतो. हायड्नोजनीकरण, ऑक्सिडीकरण वगैरे औदयोगिक प्रकियांमधून यांचा वापर फार मोठय प्रमाणावर होतो.
ज्यावेळी अत्यंत बारीक असे घन कण व द्रव पदार्थ एकत्र करून जवळजवळ एकरूप करावयाचे असतात, त्यावेळी कलिल दलन गिरणी या यांत्रिक रचनेचा उपयोग करण्यात येतो. घन पदार्थ व द्रव पदार्थ यांचे साधे जाडेभरडे मिश्रण तयार करण्यात येऊन ते कलिल दलन गिरणीमध्ये टाकण्यात येते. घूर्णक म्हणजे फिरणारा एक खूप जाडसा आस व त्याला असणारे खाचे यांमुळे कणांचा बारीकपणा वाढण्यास मदत होते. या तऱ्हेच्या कलिल दलन गिरण्यांचा रेझिने, मेणे, रंग, एनॅमल, तेले, खादयपदार्थ, क्रिम तयार करणे सॉसेस, व्हॅट रंग बनविणे वगैरेंमध्ये फार उपयोग करण्यात येतो.
काही वेळेला निराळ्या तऱ्हेचे यंत्र समस्थितिकारक म्हणून वापरण्यात येते. पंपाच्या साहाय्याने कमी-जास्त दाबाने झडपांच्या साहाय्याने घन व द्रव पदार्थांचे मिश्रण एकत्र केले जाते. यंत्राच्या झडपा अकीक या खनिजाच्या केलेल्या असतात. आजकाल यांकरिता कोम निकेल पोलाद वापरण्यात येते.
पहा : आकारमान-लघुकरण एकक प्रक्रिया व एकक क्रिया कलिल.
दीक्षित, व. चिं.