समविसंगति तापरेषा : वातावरणविज्ञानीय कार्यालयात दररोज हवामान घटकांच्या विसंगतीचे नकाशे तयार केले जातात. हवामान घटकाचे एखादया दिवसाचे मूल्य आणि त्या घटकाचे सरासरी मूल्य यांचा फरक म्हणजे त्या घटकाची त्या दिवसाची विसंगती होय. उदा., दाब-विसंगती, कमाल/किमान तापमान विसंगती इत्यादी. अशा नकाशावर प्रत्येक वेधशाळेची विसंगती त्या ठिकाणाजवळ नोंदली जाते. विसंगती प्राप्त करून घेण्यासाठी त्या घटकाची सरासरी मूल्ये (सु. ३० वर्षांच्या निरीक्षणावर आधारित) आवश्यक असतात. ही सरासरी मूल्ये बहुधा प्रकाशित केलेली असतात. ती प्रकाशनांतून घ्यावी लागतात. जर एखादया दिवसाच्या कमाल तापमानाच्या विसंगतीचा नकाशा तयार करावयाचा असेल, तर प्रत्येक वेधशाळेची कमाल तापमान विसंगती आधी प्राप्त करून घ्यावी लागते. नंतर ह्या विसंगतीची नोंद नकाशावर प्रत्येक ठिकाणाजवळ केली जाते. ह्या नकाशावर विसंगतीचे ठराविक मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेस त्या मूल्याची समविसंगती रेषा असे संबोधिले जाते. नकाशावर निरनिराळ्या मूल्यांच्या समविसंगती कमाल तापरेषा काढल्या जातात. विसंगतीचे विश्लेषण केलेल्या अशा नकाशांवरून विसंगती कोणत्या भागावर सर्वांत जास्त वा कमी आहे हे चटकन कळून येते. आधीच्या अशा विश्लेषण केलेल्या नकाशांशी चालू नकाशाची तुलना केली म्हणजे विसंगतीत बदल कसा होत आहे, हे कळते आणि विसंगतीत पुढे बदल कसा होईल याचा कधीकधी अंदाज बांधता येतो. समुद्रपृष्ठाच्या, वातावरणातील समदाब पृष्ठांच्या अथवा समउंची पृष्ठांच्या एखादया ठराविक वेळेच्या तापमानाच्या नकाशावर समविसंगती तापरेषा काढता येते.
गद्रे, कृ. म. मुळे, दि. आ.