समन्यूट्रॉनांक : ज्या दोन वा अधिक अणुकेंद्रांतर्गत न्यूटॉनांची संख्या समान असते, त्यांना परस्परांचे समन्यूट्नॉनांक असे म्हणतात. अशा रीतीने क्लोरीन (३७) व पोटॅशियम (३९) हे समन्यूट्रॉनांक आहेत. कारण क्लोरीन (३७) च्या अणुकेंद्रामध्ये १७ प्रोटॉन २० न्यूट्रॉन असतात, तर पोटॅशियम (३९) च्या अणुकेंद्रात १९ प्रोटॉन व २० न्यूट्रॉन असतात. विशिष्ट अणूचा द्रव्यमानांक A ( अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूटॉन यांची एकूण संख्या ) व अणुकमांक Z ( त्याच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या ) असेल तर त्यांचा न्यूट्रॉनांक A – Z एवढा येईल. समजा, दुसऱ्या एका अणुकेंद्राचे हे अंक अनुकमे A’ व Z’ आहेत. मग A – Z = A’ - Z’ असल्यास ही दोन अणुकेंद्रे समन्यूट्रॉनांक होतील किंवा अणूच्या वा अणुकेंद्राच्या एका जातीची अणूच्या किंवा अणुकेंद्राच्या दुसऱ्या जातीशी तुलना केल्यास त्यांच्यातील न्यूट्रॉनांची संख्या समानच असते. म्हणजेच समन्यूट्रॉनांकांच्या अणुकेंद्रातील न्यूट्रॉन व प्रोटॉन या घटकांच्या एकूण संख्येत फरक असला, तरी त्यांच्यातील न्यूट्रॉनांची संख्या तेवढीच असते. नैसर्गिक रीतीने आढळणाऱ्या समन्यूट्रॉनांकांच्या संख्येमुळे विशिष्ट न्यूट्रॉन विन्यासाच्या स्थैर्यासंबंधीचा उपयुक्त पुरावा उपलब्ध होतो. उदा., नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या ५० व ८२ न्यूट्नॉन असलेल्या समन्यूट्रॉनांकांच्या सापेक्षत: मोठया संख्या ( अनुकमे सहा व सात ) हे अणुकेंद्रीय विन्यास खास करून स्थिर असल्याचे सूचित करतात. याउलट विषम संख्येने न्यूट्रॉन असलेले बहुतेक अणू हे असमन्यूट्रॉनांकी असतात, या वस्तुस्थितीव्ररून विषम न्यूट्रॉनयुक्त अणुकेंद्रीय विन्यास सापेक्षतः अस्थिर असतात.

पहा : अणुकेंद्रीय भौतिकी.

फाळके, धै. शं.