गॅल्व्हानी, लूईजी: (९ सप्‍टेंबर १७३७ – ४ डिसेंबर १७९८). इटालियन भौतिकीविज्ञ. विद्युत् शास्त्रातील प्रयोगांसंबंधी व प्राणिज विद्युतासंबंधीच्या सिद्धांताकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म बोलोन्या येथे झाला. वैद्यकाचा अभ्यास केल्यानंतर त्यांची बोलोन्या येथे १७६२ मध्ये शारीर विषयाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

त्यांनी पक्ष्यांच्या जनन-मूत्र (प्रजोत्पादक पेशी व मूत्र वाहून नेणाऱ्या) मार्गासंबंधी व श्रवणेंद्रियांसंबंधी संशोधन करून एक प्रबंध लिहिला व त्यामुळे तुलनात्मक शारीरविज्ञ म्हणून त्यांची ख्याती पसरली. १७९१ साली बेडकांसंबंधी काही प्रयोग करीत असताना, बेडकाच्या पायातील स्‍नायूला तांब्याचा व संबंधित तंत्रिकेला (मज्‍जेला) लोखंडाचा स्पर्श झाल्यास बेडकाच्या पायाची जोरजोरात हालचाल होते असे गॅल्व्हानी यांना आढळून आले. तंत्रिकेला व स्‍नायूला जोडण्यासाठी त्यांनी दोन निरनिराळ्या धातूंचा चाप तयार केला. बेडकाच्या पायाची हालचाल विद्युत् प्रवाहामुळे होते असे त्यांनी प्रतिपादन केले. मात्र स्‍नायू व तंत्रिका यांतील द्रव्यामुळेच विद्युत् प्रवाह निर्माण होतो हा चुकीचा विचार मांडला. पुढे व्होल्टा यांनी हा प्रवाह दोन निरनिराळ्या धातूंच्या संपर्कामुळे निर्माण होतो आणि या ठिकाणी स्‍नायू व तंत्रिका हे केवळ संवाहक आहेत, असे स्पष्टीकरण दिले. गॅल्व्हानी यांच्या या प्रयोगांमुळे विद्युत् आविष्कारांसंबंधी संशोधन करण्यास मोठी चालना मिळाली. ते बोलोन्या येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.