समदाब रेषा : एखादया क्षेत्रावरील पृष्ठावर एखादया दिवशी ठराविक वेळी असलेला हवेचा दाब प्रत्येक ठिकाणाजवळ लिहून हवेच्या दाबाचा नकाशा तयार केला जातो. अशा नकाशावर हवेच्या दाबाचे ठराविक मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेस त्या मूल्याची समदाब रेषा असे संबोधिले जाते. प्रत्येक वेधशाळेत समुद्रसपाटीवरील दाबाचे संगणन केले जाते. त्यासाठी वेधशाळेतील वायुभारमापकाच्या पातळीपासून समुद्रसपाटीपर्यंत हवेचा एक स्तंभ आहे, अशी कल्पना केली जाते. ह्या हवेच्या स्तंभाचे सरासरी तापमान वेधशाळेतील स्टीव्हन्सन स्कीनमध्ये ठेवलेल्या तापमापकाने दर्शविलेल्या तापमानाएवढे आहे, असे समजले जाते. हवेच्या स्तंभाची उंची ( म्हणजे वायुभारमापकाची समुद्रसपाटीपासून उंची ) आणि स्तंभातील हवेचे सरासरी तापमान यांवरून ह्या हवेच्या स्तंभाचा दाब किती राहील याचे संगणन केले जाते. हा दाब वायुभारमापकाच्या पातळीवरील दाबात मिळविला म्हणजे समुद्रसपाटीवरील दाब प्राप्त होतो. हवेचा दाब हा हवामानाचा एक महत्त्वाचा घटक आहे. वातावरणविज्ञानीय कार्यालयात समुद्रपृष्ठावरील हवेच्या दाबाचा नकाशा प्रत्येक दिवशी निरनिराळ्या वेळेकरिता तयार केला जातो. अशा नकाशावर दाबाच्या निरनिराळ्या मूल्यांच्या समदाब रेषा काढून हवेच्या दाबाचे विश्लेषण केले जाते. या विश्लेषणावरून न्यूनदाब व उच्च्दाब क्षेत्रे कोठे आहेत हे समजते. चक्री वादळ असेल, तर ते कोणत्या क्षेत्रावर आणि किती तीव्र आहे, हे कळते. नकाशावर साधारणपणे २ हेक्टोपास्कालच्या अथवा मिलिबारच्या अंतराने समदाब रेषा काढल्या जातात. अशाच विश्र्लेषण केलेल्या आधीच्या वेळेच्या नकाशाशी चालू नकाशाची तुलना केली म्हणजे न्यूनदाब/उच्च्दाब क्षेत्रे तसेच चक्री वादळ कोणत्या दिशेकडे आणि किती सरकले हे कळते. समुद्रसपाटीपासून कोणत्याही ठराविक उंचीवरील पृष्ठावर समदाब रेषा काढता येते. वातावरणातील ज्या पृष्ठावर सर्वत्र हवेच्या दाबाचे एक ठराविक मूल्य आहे, अशा पृष्ठास समदाब पृष्ठ असे संबोधिले जाते. वातावरणविज्ञानीय कार्यालयात काही ठराविक मूल्यांच्या (१०००, ८५०, ७००, ५००, ३००, २०० आणि १०० हेक्टोपास्काल ) समदाब पृष्ठांचे दोन वेळांचे नकाशे रोज तयार केले जातात. अशा नकाशांत समदाब पृष्ठावरील हवेचे तापमान, हवेची आर्द्रता आणि पृष्ठांची उंची निरनिराळ्या ठिकाणांजवळ लिहिण्यात येते. या नकाशावर समउंची किंवा समताप/समआर्द्रता रेषा काढून समदाब पृष्ठावरील हवेच्या गुणधर्मांचे तसेच त्या पृष्ठावरील वातावरणाच्या सदय:स्थितीचे विश्लेषण केले जाते. जलवायुविज्ञानाच्या अभ्यासात सरासरी मासिक/ऋत्विक/वार्षिक हवेच्या दाबाच्या नकाशांचे विश्र्लेषण केले जाते.

गोखले, मो. ना. मुळे, दि. आ.