समताप रेषा : हवामानाचा अभ्यास करण्यासाठी हवामानाच्या निरनिराळ्या घटकांचे नकाशे तयार करून त्यांचे विश्लेषण केले जाते. एखादया घटकाच्या दृष्टीने वातावरणाची एखादया पृष्ठावर सदय:स्थिती कशी आहे, हे विश्लेषण केलेल्या नकाशावरून कळते. हवेचे तापमान हा हवामानाचा एक महत्त्वाचा घटक आहे. एखादया पृष्ठावर (उदा., सागरी पृष्ठ किंवा कोणत्याही विशिष्ट उंचीवरील पृष्ठ, अथवा हवेचा विशिष्ट दाब असलेले पृष्ठ) एखादया दिवशी, एखादया ठराविक वेळी निरनिराळ्या ठिकाणी असणारे हवेचे तापमान नकाशावरील त्या ठिकाणाजवळ लिहिले म्हणजे त्या पृष्ठाचा तापमानीय नकाशा तयार होतो. अशा नकाशावर ठराविक तापमान असलेली ठिकाणे एका रेषेने जोडतात. अशा रेषेस समताप रेषा असे संबोधिले जाते. अशा प्रकारे ठराविक तापमानाच्या अंतराने निरनिराळ्या तापमानांच्या समताप रेषा नकाशावर काढून तापमानाच्या नकाशाचे विश्लेषण केले जाते. या विश्लेषणावरून कळून येते की, नकाशाच्या कोणत्या भागांवर तापमान जास्त वा कमी आहे, कोणत्या भागांवर तापमान उतार जास्त वा कमी आहे.

वेधशाळेने घेतलेले तापमानाचे निरीक्षण भूपृष्ठापासून सु. ४ फूट (सु. १·१२ मी.) उंचीवरील हवेचे तापमान असते. निरनिराळ्या ठिकाणी भूपृष्ठाची सागरी पृष्ठापासून उंची निरनिराळी असते. साधारणपणे समुद्र-सपाटीपासून उंची वाढली म्हणजे हवेच्या तापमानात घट होते. त्यामुळे भूपृष्ठावरील हवेच्या तापमानाच्या नकाशावर समताप रेषा काढून काहीही उपयोग होत नाही. ठिकाणाचे भूपृष्ठीय तापमान, ठिकाणाची समुद्रसपाटीपासून उंची व साधारणपणे उंचीमुळे तापमानात होणारा ऱ्हास या गोष्टी लक्षात घेऊन समुद्रपातळीवर त्या ठराविक वेळी आणि ठराविक दिवशी प्रत्येक ठिकाणी तापमान किती राहील, याचे संगणन केले जाते. अशा संगणित तापमानाचा उपयोग करून समुद्रपृष्ठीय तापमानाचा नकाशा तयार केला जातो आणि नंतर त्यावर समताप रेषा काढल्या जातात. असे समताप रेषा काढलेले नकाशे निरनिराळ्या उंची (१·५, ३·०, ६·०,… किमी.) अथवा निरनिराळे समदाब पृष्ठ (८५०, ७००, ५००, ३००, २००, १०० व ५० मिलिबार अथवा हेक्टोपास्काल) या पृष्ठांकरिता तयार केले जातात. अशा नकाशांचा विमान वाहतुकीसाठी बराच उपयोग होतो. सरासरी मासिक किवा ऋत्विक / वार्षिक हवेच्या तापमानाचेही असे नकाशे तयार करून त्यावर समताप रेषा काढल्या जातात. अशा सागरी व इतर पातळींवरील सरासरी मासिक / ऋत्विक / वार्षिक समतापीय नकाशांचा उपयोग जल-वायुविज्ञानाच्या अभ्यासाकरिता केला जातो.

मुळे, दि. आ.