सप्तवार्षिक युद्ध, यूरोपीय : जर्मनीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन देशांत इ. स. १७५६ ते १७६३ या सात वर्षांत झालेला संघर्ष. या युद्धात यूरोप खंडातील बहुतेक प्रमुख राष्ट्राने सहभागी झाली आणि त्याचे दूरगामी परिणाम झाले.

ऑस्ट्रियाची समाज्ञी ⇨माराया टेरिसा हिची सायलीशिया या जर्मन प्रांतावर अधिसत्ता मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती. हा प्रांत तिच्या सत्तागहणापूर्वीच प्रशियाच्या ⇨फ्रीड्रिख द ग्रेट ⇨कार. १७४०-८६) याने पादाकांत केला होता. तो परत मिळविण्यासाठी टेरिसाने अथक प्रयत्न केले. याकामी तिला रशियाची राणी झारिना एलिझाबेथ हिने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. फ्रान्स हा ऑस्ट्रियाचा पिढीजात शत्रू असल्यामुळे त्याच्या मदतीची मारायाला अपेक्षा नव्हती परंतु ग्रेट बिटन हा त्याचा शत्रू प्रशियाच्या बाजूने उभा राहताच फ्रान्सने ऑस्ट्रियास मदत करण्याचे ठरविले. दरम्यान टेरिसाने आपल्या वेन्झेल अन्टॉन फोन कौनिट्स या धूर्त व मुत्सद्दी परराष्ट्रमंत्र्याच्या मध्यस्थीने ग्रेट बिटनला प्रशियाबरोबर करार करून तटस्थ ठेवण्यास सुरूवातीला यश मिळविले. यामुळे प्रशियाचा मित्र फ्रान्स प्रशियाने विश्वासघात केला म्हणून नाराज झाला आणि ऑस्ट्रियास मिळाला.

फ्रीड्रिख द ग्रेट ऑस्ट्रियाच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. त्याने ऑगस्ट १७५६ मध्ये सधन व मोक्यावरील सॅक्सनी हा जर्मन प्रांत आणि त्याची राजधानी ड्नेझ्डेन काबीज केली. त्यानंतर त्याने ऑस्ट्रियन सैन्याच्या अनेक आघाडयंवर विजय मिळविला आणि ६ मे १७५७ रोजी प्रागची महत्त्वाची लढाई जिंकली मात्र जून महिन्यातील कोलिनच्या युद्धातून ⇨ बोहीमिया ) अपरिमित सैन्यहानीमुळे त्यास माघार घ्यावी लागली. तत्पूर्वी त्याने सर्व सॅक्सन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले होते. या सुमारास प्रशियाविरूद्ध ऑस्ट्रिया, फ्रान्स, रशिया, स्वीडन, सॅक्सनी व अन्य जर्मन प्रांत एकत्र आले होते. त्यांपैकी स्वीडनने प्रशियन पॉमेरेनीयावर हल्ल केला, तर रशियाने पूर्व प्रशिया व फ्रान्सने पश्चिम प्रशिया यांवर आकमण केले. ऑस्ट्रियाने सायलीशियाकडे कूच केले. फ्रीड्रिखने निर्धाराने सर्व आघाडयांवर आक्रमक धोरण ठेवले. त्याने फँको-जर्मन सैन्याचा रॉसबाख ⇨सॅक्सनी प्रांत ) येथील लढाईत ५ नोव्हेंबर १७५७ रोजी पराभव केला. या युद्धात त्याचे सैन्य शत्रूसैन्यापेक्षा निम्मेसुद्धा नव्हते तथापि डावपेच आणि कुशल नेतृत्वामुळे त्यास निर्णायक विजय मिळविता आला. या युद्धात ५५० प्रशियन सैनिक कामी आले, तर फँको-जर्मन सैन्यातील सात हजार मृत्युमुखी पडले. त्यानंतर लॉइटनच्या लढाईत फ्रीड्रिखने ऑस्ट्रियनांचा धुव्वा उडविला.

सततच्या युद्धांमुळे प्रशियाची युद्धसाम्रगी मर्यादित झाली आणि खजिन्यातही खडखडाट झाला. त्यामुळे फ्रीड्रिखची केविलवाणी स्थिती झाली. यावेळी शत्रूला चांगली संधी होती पण त्यांनी संयुक्त मोहीम योजनाबद्ध रीतीने राबविली नाही. याच वेळी ग्रेट ब्रिटनने प्रशियाला सकिय सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्याकरिता सुसज्ज सैन्याची उभारणी केली. एवढेच नव्हे, तर आर्थिक मदत देण्याचेही ठरविले. अँग्लो-हॅनोव्हेरियन सैन्याने २३ जून १७५८ रोजी फ्रान्सच्या सैन्याचा केफेल्ट येथे पराभव केला. फ्रीड्रिखने रशियन सैन्याचा २५ ऑगस्ट १७५८ रोजी झॉर्न डॉर्फ येथे पराभव केला परंतु सॅक्सनी ऑस्ट्रियनांच्या ताब्यातून सोडविण्याचा फ्रीड्रिखचा प्रयत्न असफल झाला आणि १२ ऑगस्ट १७५९ रोजी ऑस्ट्रो-रशियन सैन्याने त्याचा कूनर्स डॉर्फ येथे दारूण पराभव केला.

ग्रेट ब्रिटनने करारानुसार फ्रीड्रिखला भरपूर अर्थसाहाय्य केले आणि सैन्याची मदतही दिली. त्यांना फ्रान्सचा पराभव करून उत्तर अमेरिकेतील त्यांच्या वसाहती तसेच भारतातील काही फ्रेंच ठाणी हवी होती. या सुमारास १७६२ मध्ये रशियाची सम्राज्ञी एलिझाबेथ मरण पावली आणि तिसरा पीटर रशियाचा राजा झाला. तो फ्रीड्रिखचा चाहता व हितचिंतक होता. त्याने प्रशियाबरोबर शांततेचा स्वतंत्र तह केला. यामुळेही फ्रीड्रिखची आर्थिक विवंचना नाहीशी झाली आणि संयुक्त उठावातूनही तो सुटला. रशियासारखा मित्र गेल्यामुळे ऑस्ट्रियात शांततेच्या वाटाघाटी सुरू होऊन हूबेरटुस्बुर्क येथे १७६३ मध्ये तह करण्यात आला. या तहानुसार सायलीशियाचा बहुतेक भूप्रदेश प्रशियाच्या आधिपत्याखाली राहिला आणि उर्वरित सीमा युद्धापूर्वीप्रमाणे जैसे थे ठेवण्यात आल्या. यूरोप खंडात प्रादेशिक बदल काहीच घडले नाहीत. फ्रान्स, ग्रेट बिटन आणि स्पेन यांत नंतर १० फेबुवारी १७६३ रोजी पॅरिस येथे परस्परांतील तंटे मिटविण्यासाठी आणखी एक स्वतंत्र तह झाला. त्यानुसार फ्रान्सने उत्तर अमेरिकेतील तसेच भारतातील काही फ्रेंच ठाण्यांचा कबजा सोडला. साहजिकच फ्रेंच साम्राज्याचा संकोच होऊन ग्रेट बिटनची साम्राज्यवादी आगेकूच सुरू झाली.

पहा : ऑस्ट्रिया (इतिहास ) प्रशिया.

देशपांडे, सु. र.