सबनीस, वसंत : (६ डिसेंबर १९२३-१५ ऑक्टोबर २००२). मराठी विनोदकार आणि नाटककार. मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस. जन्म सोलापूर येथे. पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलमधून वसंत सबनीस मॅट्रिक (१९४२), पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून बी.ए. (१९४६). शासकीय नोकरीत अ स ता ना ते साहित्यनिर्मितीही करीत. त्यांच्या कविता अभिरूची सारख्या दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध होत. पुढे ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्धी पावले. रंगभूमीवर त्यांची नाटकेही गाजली. पानदान हा त्यांचा ललित लेखसंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांपैकी चिल्ल्रखुर्दा (१९६०), भारूड (१९६२), मिरवणूक (१९६५), पंगत (१९७८), आमची मेली पुरूषाची जात (२००१) हे प्रसिद्घ होत. आत्याबाईला आल्या मिशा (१९८५), विनोदी द्वादशी (१९८८), बोका झाला संन्यासी (२००१) हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह. निळावंती (१९६३), म्हैस येता घरा (१९६९), सौजन्याची ऐशी तैशी (१९७५), घरोघरी हीच बोंब (१९७७), मामला चोरीचा (१९८६), कार्टी श्रीदेवी (१९८८), गेला माधव कुणीकडे (१९९४) ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली नाटके विच्छा माझी पुरी करा (१९६८) ह्या त्यांच्या लोकनाटयाने यशस्वितेचा विक्रम केला. ते प्रथम वीणा मासिकातून ‘छपरी पलंगाचा वग’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. तमाशा या लोककलाप्रकाराला आधुनिक रूप देण्याचा पहिला महत्त्वाचा प्रयत्न म्हणून हा वग उल्लेखनीय ठरतो. दादा कोंडके, राम नगरकर या अभिनेत्यांची सबनीसांच्या उत्कृष्ट, चुणचुणीत संवादांना समर्थ साथ मिळाली. मार्मिक राजकीय भाष्य आणि चतुर संवाद हे ह्या लोकनाटयाचे वैशिष्टय. लोकनाटयाला नवी परिमाणे देणाऱ्या विच्छा … चे सैंया भये कोतवाल हे हिंदी रूपांतरही लोकप्रिय झाले. ह्या लोकनाटयच्या बतावणीत आरंभी सबनीस काम करीत असत. अदपाव सुतार, पावशेर न्हावी व सवाशेर शिंपी (१९५९) हे त्यांचे विच्छा … च्या आधीचे लोकनाटय. प्रेक्षकांनी क्षमा करावी (१९६१) आणि चिलखतराज जगन्नाथ (१९७१) हे त्यांच्या एकांकिकांचे संग्रह. त्यांच्या दोन विनोदी नाटयकृतींना १९६३ व १९७२चे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ते किशोर मासिकाचे संपादक होते.
विनोदी लेखकाला जीवनाकडे, त्यातील विसंगतींकडे पाहण्याचा वैशिष्टयपूर्ण दृष्टिकोण, मार्मिक निरीक्षणशक्ती आणि सहज, उत्स्फूर्त शैली ह्यांमुळे त्यांच्या लेखनाला जिवंतपणाचा, रसरशीत स्पर्श असे.
मुंबई येथे ते निधन पावले.
कुलकर्णी, अ. र.