ज्ञानेश्वर : (१२७१ किंवा १२७५–१२९६). महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक. बापविठ्ठलसुत, ज्ञानाबाई, ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व बहुतेक अभंग-गाथा ह्यांत ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात; परंतुनामदेव, ⇨ मुक्ताबाई, ⇨ एकनाथ इ. संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो.

आपेगाव (तालुका पैठण) हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. आडनाव कुळकर्णी. हे माध्यंदिन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मण. गोत्र पंचप्रवरान्वित वत्स. आज ज्ञात असलेले त्यांचे पहिले पूर्वज त्यांच्या पणज्यांचे पणजे हरिपंत कुळकर्णी हे इ. स. ११३८ च्या सुमारास आपेगावचे कुळकर्णपण पाहत असत. या घराण्यातील ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यांस त्यांची पत्नी निराई हिच्यापासून पंचावन्नाव्या वर्षी एक पुत्र झाला. त्याचे नाव विठ्ठल. हेच विठ्ठलपंत ज्ञानदेवांचे जनक होत. विठ्ठलपंतांनी वेद, काव्य, व्याकरण व विविध शास्त्रे ह्यांचे अध्ययन केले. ऐन तारुण्यातच वैराग्य, भक्ती व ज्ञान उत्पन्न होऊन पुष्करादी तीर्थांची यात्रा करावी, म्हणून मातापित्यांना वंदन करून त्यांनी तीर्थाटन केले आणि इंद्रायणीतीरी असलेल्या आळंदीस आले. तेथे थोर ब्राह्मण सिदोपंत ह्यांची भेट घेऊन त्यांचे चरण त्यांनी वंदिले. सिदोपंतांच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. नंतर त्यांच्याच रखुमाई या कन्येशी विठ्ठलपंतांचे शास्त्रोक्त रीतीने लग्न झाले.

विठ्ठल-रखुमाई हे दोघे पतिपत्नी पंढरपूरला सिदोपंतांबरोबर यात्रेस गेले. पुढे आपेगावी येऊन गृहस्थाश्रम स्थिरपणे करावा की तीर्थाटन करीत देह झिजवावा, असा प्रश्न विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता. विठ्ठलपंत आपेगावी न परतताच सिदोपंतांचा निरोप घेऊन नामसंकीर्तन करीत तीर्थाटनास गेले आणि बरीच तीर्थे पाहून परत आळंदीस येऊन ते सिदोपंतांस भेटले. सिदोपंतांची आज्ञा घेऊन अखेरीस त्यांच्याबरोबरच आपेगावी येऊन त्यांनी मातापित्यांचे दर्शन घेतले. मातापिता दोघेही फार वृद्ध होती. स्वानंदपूर्ण स्थितीत ती दोघे वैकुंठवासी झाली; परंतु विठ्ठलपंत विरक्त होते. सिदोपंत आपेगावी आले आणि विठ्ठल-रखुमाई या दोघांना बरोबर घेऊन आळंदीस आले. अनेक वर्षे झाली तरी विठ्ठलपंतांस अपत्य झाले नाही. त्यांनी पत्नीस सांगितले की, वाराणसीस जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रखुमाईने संततीवाचून संन्यास घेऊ नये, ही गोष्ट पतीस पटवा, असे आपल्या पित्यास सांगितले; मात्र विठ्ठलपंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असता त्यांनी गृहत्याग केला, असे ज्ञानेश्वरादींना पैठणस्थ ब्राह्मणांनी दिलेल्या बोपदेवलिखित शुद्धिपत्रात म्हटले आहे. विठ्ठलपंत वाराणसीस गेले. तेथील एका प्रसिद्ध संन्यासी महंतांपासून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. ह्या संन्यासी महंतांचे नाव नामदेवांनी सांगितलेले नाही. श्रीपाद म्हणून त्यांचा निर्देश केला आहे. संन्यासी व्यक्तीचा श्रीपाद ह्या आदरार्थी अभिधानाने निर्देश करावा, असे यतिधर्मसंग्रह ह्या संन्यासाश्रमाच्या धर्मशास्त्राच्या संस्कृत ग्रंथात म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी संन्यासविषयक अभंगगाथेतही संन्यासी व्यक्तीचा श्रीपाद ह्या आदरार्थी सामान्य संज्ञेने निर्देश केला आहे. काही चरित्रकार (उद्धवचिद्धनकृत श्रीज्ञानेश्वरचरित्र) ह्या विठ्ठलपंतांच्या संन्यासी गुरूचा नृसिंहाश्रम असा, तर काही (बोपदेवलिखित शुद्धिपत्र) रामानंद असा, निर्देश करतात. अर्थात हे रामानंद कबीरकालीन प्रसिद्ध रामानंद नव्हते. विठ्ठलपंतांच्या संन्यासग्रहणानंतर त्यांना चैतन्याश्रम हे अभिधान गुरूंनी दिले.

इकडे आळंदीस रखुमाईने जीवित सार्थक व्हावे म्हणून अश्वत्थाची सेवा आरंभिली. तेथे कालांतराने वाराणसी येथील एक संन्यासी आले. योगायोगाने तेच विठ्ठलपंतांचे गुरू होते. रखुमाईने नमस्कार केला. महंतांनी ‘पुत्रवती हो’ असा आशीर्वाद दिला. तिला हसू आले, विनोद वाटला. महंतांनी विचारले, ‘मिस्किलपणे का हसतेस ?’ ती म्हणाली, ‘पतीने संन्यास घेतला आहे; मग आपले बोल खरे कसे होणार?’ महंतांनी सगळी हकीकत विचारून घेतली. रखुमाईने मातापित्यांची महंतांशी भेट करविली. महंतांची अर्घ्यपाद्यपूजा व भोजन झाले. महंत रामेश्वरच्या यात्रेला निघाले होते. सिदोपंतांनी प्रार्थना केली की, दयावंत होऊन वाराणसीस लगेच परतून जावयांचे मन वळवा. महंतांना वाटले : आपण विठ्ठलपंतांस अवेळी म्हणजे पत्नी तरुण व संतती नाही अशा स्थितीत संन्यास दिला, ह्याचा दोष आपणासही लागतो, आपले पुण्य लयाला जाते. विठ्ठलपंतांनी, आपल्यामागे तसा पाश नाही इ. खोटेच सांगून गुरूंपासून संन्यास घेतला, असे काही चरित्रकारांनी ह्या संदर्भात सांगितले आहे; परंतु नामदेव तसा उल्लेख श्रीज्ञानेश्वरांची आदिमध्ये करीत नाहीत. हा अनुल्लेख गुरूंच्या ह्या उक्तीशी सुसंगत ठरतो. खोटे सांगून संन्यास घेतला असता तर गुरूंकडे दोष गेला नसता म्हणून महंतांनी लगेच वाराणसीस प्रयाण केले व चैतन्याश्रमाला बोलावून घेतले. चैतन्याश्रमाने मान्य केले की, ‘कांतेचा त्याग करून मी आलो आहे.’ महंतांनी आज्ञा केली की, ‘पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार.’

तेव्हा चैतन्याश्रम स्वदेशी परतले. संन्यासाश्रम टाकून त्यांनी पुनश्च गृहस्थाश्रम पत्करला. त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. अशी बारा वर्षे निघून गेली. चार अपत्ये झाली ती म्हणजेनिवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, ⇨ सोपानदेवमुक्ताबाई. मुलगे व्रतबंधाला योग्य झाले. द्विजवृंदाच्या अनुज्ञेनुसार विठ्ठलपंत भार्या, पुत्र व गृह यांचा त्याग करून व द्विजवृंदाला नमस्कार करून देहान्त प्रायश्चित्त घेण्यासाठी निघून गेले.

बहिष्कारामुळे आपली वंशावळी जातिकुळावेगळी झाली असल्यामुळे प्रायश्चित्त घेणे अवश्य आहे, असा विचार विठ्ठलपंतांनी केला. त्यांनी ब्रह्मसभा भरविली व त्या सभेत ‘ह्या दीनाला अपराधाची क्षमा कराʼ अशी प्रार्थना केली. तेव्हा निवृत्ती ब्रह्मसभेला उद्देशून म्हणाले, ‘आम्हांला मार्ग सांगाʼ. द्विजांनी सांगितले की, ‘पैठणला जा, तिकडून शुद्धिपत्र आणा, ते मान्य होईलʼ. निवृत्ती म्हणाले, ‘आमची परंपरा सगुण व निर्गुण ह्यांच्या पलीकडील आहे. जाती, कुळ, वर्ण किंवा विश्वातील पंचमहाभूते, विराट, महत् ह्यांपैकी आम्ही काही नाही, निजबोधस्वरूप आहोत.’ ह्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, ‘आपली पावन अवस्था असली, तरी धर्मशास्त्राच्या पद्धतीने आपण चालले पाहिजे.’ ह्यावर सोपान म्हणाले, ‘पांडव, व्यास वाल्मीकी, वसिष्ठ ह्यांचे तरी कुळ किंवा जाती शुद्धकुठे आहे? तसेच आमची भक्ती हाच आत्मस्थितीचा उपाय होय, जाती किंवा कुळ नव्हे.’

अखेर द्विजांचे पत्र घेऊन, पैठण येथे ही मंडळी गेली. ब्रह्मसभा भरली. पत्र सादर केले. संन्याशाचे पुत्र आहेत असे कळल्यावर सभेने निर्णय दिला की, उभयता कुळभ्रष्ट आहेत, म्हणून प्रायश्चित्त नाही आणि उपनयनाधिकारही नाही. एकच उपाय उरला आहे : अनुतापूर्वक ईश्वरभजन करावे; गाय, गर्दभ, श्वान, अंत्यज ह्यांच्याही ठिकाणी ब्रह्मभावना करून वंदन करावे. चारी भावंडे हे ऐकून संतुष्ट झाली. त्यांची लोकविलक्षणनावे ऐकून काही ब्राह्मण हसले. एकजण म्हणाला, ‘तो जो पलीकडे पखाल वाहत आहे, त्या रेड्यासही ज्ञाना म्हणतात.’ ज्ञानदेवांनी म्हटले, ‘तोही माझा आत्माच आहे.’ त्या रेड्यावर आसूड मारले गेले. त्यांचे वळ ज्ञानदेवांच्या पाठीवर उठले. ब्राह्मण म्हणाले, ‘ह्या रेड्याकडून वेद वदवा.’ रेडा विधिपूर्वक ऋग्वेद म्हणू लागला. ब्रह्मवृंद चकित होऊन म्हणू लागला, ‘हे तिघे साक्षात देवावतार असून मुक्ताई आदिमाया आहे; आम्ही फार चूक केली; देहबुद्धी व अहंकार यांनी भरलेले आम्ही नुसते कर्मठ आहोत. ह्यांचा वंश व कुळ खरोखर धन्य आहेत.’ सकल द्विजांनी नमस्कार करून त्यांचा जयजयकार केला. उलट ज्ञानदेव व निवृत्ती ह्यांनी त्या ब्रह्मवृंदाला संत समजून त्यांचे स्तवन केले ‘आपल्या दर्शनाने धन्य झालो.’ असे त्यांस म्हटले. ह्या पैठण येथील घटनेचे वर्णन नामदेवांनी केले आहे. ह्यातील चमत्काराचा भाग वगळला तर असे सूचित होते की, ज्ञानदेवादिकांचे वर्तन, वृत्ती व कीर्तन-प्रवचन पाहून, त्यांचा परमार्थातील अधिकार तेथील ब्राह्मणपंडितांना व त्यामुळेच एकंदरीत सर्व समाजालाही पटला उपनयनाचा अधिकारही मान्य झाला; परंतु अगोदरच नाथपंथांची दीक्षा मिळाली होती उपनयनाची आवश्यकताच नव्हती. तीन पिढ्यांची नाथपंथाची परंपरा होती. वंशपरंपरागत विद्वत्तेचा वारसा पित्याकडून त्यांना प्राप्त झाला होता. जन्मत:च विलक्षण बुद्धिमत्ता व प्रतिभा असल्यामुळे कौमारावस्थेतच त्यांची प्रज्ञा परिणत झाली होती. अखेरीस पैठणचा ब्रह्मवृंद व सर्व समाज ह्या बालसंतांना शरण आला ह्याचे प्रत्यंतर त्या प्रसंगानंतर लगेच ज्ञानेश्वरीचे लेखन झाले त्यावरून मिळते. ज्ञानेश्वरीत श्रोतृवृंदाच्या महत्तेची, प्रगल्भतेची व जाणकारपणाची जी वारंवार प्रशंसा आढळते, त्यावरून ज्ञानेश्वरीचे लेखन व प्रवचन चालू असतानाच विलक्षण लोकप्रियता ज्ञानेश्वरांना लाभली होती, ह्याबद्दल शंका राहत नाही. पुराण, हरिकीर्तन, वेदान्तव्याख्यान हे सर्व पैठण येथील दीर्घकालीन मुक्कामात चालूच होते. नामदेव म्हणतात की, तेथील ब्रह्मवृंदावर त्यामुळे त्यांची विलक्षण छाप पडली. सामान्य जन वेधून घेतले गेले आणि ह्या बालसंतांना घरी बोलावून त्यांनी पितृश्राद्ध केले. त्यावेळी ह्यांनी मंत्र म्हटले व साक्षात पितर अवतरले, असे संत नामदेव म्हणतात. अखेरीस शुद्धिपत्र मिळाले. ब्राह्मणांना प्रदक्षिणा व साष्टांग नमस्कार करून चारी भावंडे नेवाश्यास आली. त्यांच्यामागून रेडाही आला. नेवाश्यात शिरले, तो एक सती मृतपतीजवळ बसून आक्रोश करताना दिसली. पतीचे नाव सच्चिदानंद होते तो नेवाश्याचा कुळकर्णी होता. ‘सच्चिदानंदाला मृत्यू नसतो’, असे ज्ञानदेव उद्गारले, तोच तो मृत पुरुष एकदम उठून उभा राहिला व ज्ञानदेवांना शरण आला. तोच ज्ञानेश्वरी लिहून घेणारा. त्याने पुढे ज्ञानेश्वरविजय नामक ओवीबद्ध रचनाही केली.


ज्ञानेश्वरांनी नेवाश्यास प्राकृत गीतादेवी म्हणजे ज्ञानेश्वरी रचली. त्यानंतर निवृत्तिदेवांच्या आदेशावरून स्वतंत्र अनुभवामृत ग्रंथही रचला. नंतर चौघे नेवाश्याहून आळंदीकडे निघाली. सकळ-कवित्व-कला असलेली ही भावंडे हरिनामकीर्तन करीत आळ्याच्या वनात उतरली. तेथे रेडा मेला. त्याची समाधी बांधून शेंदूर लावून पूजा केली व नंतर सर्व भावंडे आळंदीला गेली. सर्वांनी तेथेच कायम वसती केली. ज्ञानेश्वरीमुळे देशी भाषा गौरवसंपन्न झाली, अध्यात्मविद्येचे रूप मराठीत प्रकट झाले. दीर्घजीवी वृद्धयोगी चांगदेवांच्या कानी त्यांची कीर्ती गेली.

महिपतीबाबांनी ज्ञानदेव वचांगदेव यांच्या भेटीचा वृत्तांत दिलेला आहे. चांगदेवपासष्टी हे पासष्ट ओव्यांचे प्रकरण चांगदेवांकरिता ज्ञानदेवांनी लिहिले. यात त्यांनी शांकर-मायावादाचा सिद्धांत सांगून नंतर चिद्विलासाचा अद्वैतवाद प्रतिपादिला आहे. ह्यात चांगदेवांचा चांगया व चक्रपाणी ह्या दोन नावांनी निर्देश केला आहे. चांगदेवांचे कोरे पत्र व त्याला दिलेले ज्ञानदेवांचे उत्तर म्हणजे चांगदेवपासष्टी होय.

चांगदेव व्याघ्रारूढ होऊन आपल्या सिद्धीचे सामर्थ्य दाखवीत आळंदीस पोहचले, तेव्हा ही चारी भावंडे एका भिंतीवर बसली होती. अतिथीच्या स्वागतार्थ सामोरे जाण्याकरिता भिंतच चालू लागली. त्याबरोबर व्याघ्रावरून खाली उतरून चांगदेव ह्या चतुर्मूर्तींना शरण आले. नंतर ज्ञानदेवांच्या आदेशावरून चांगदेवांनी मुक्ताबाईंचा अनुग्रह घेतला. चांगदेवांना उपदेश करणारे मुक्ताबाईंचे अनेक अभंग व एक पदही प्रसिद्ध आहे आणि मुक्ताबाईंचा गुरू म्हणून निर्देश करणारे चांगदेवांचेही अभंग आहेत.

विसोबा चाटी नावाचा एक कर्मठ ब्राह्मण आळंदीत राहत होता. तो ह्या भावंडांचा द्वेष करू लागला. त्यांच्यावर बहिष्कार पडावा, अशी त्याची मनीषा होती. गावच्या कुंभारांनाही त्याने बजावले की, रांधण्याची मातीची भांडी ह्यांना देऊ नका. एकदा निवृत्तिनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली; परंतु कुंभाराने मांडे भाजण्याचे खापर दिले नाही. योगधारणा करून ज्ञानदेवांनी आपली पाठ मांडे भाजण्यास योग्य इतकी तापविली व मुक्ताबाईंनी तिच्यावर मांडे भाजले. हे ऐकून विसोबा चाटीस पश्चात्ताप झाला, तो शरण आला. ज्ञानदेवांच्या ताटातील उच्छिष्ट, प्रसाद म्हणून त्याने उचलले. ज्ञानदेवांनी त्याला ‘खेचरा, पलीकडे सर’ असे म्हणून धुडकावले, परंतु त्याने ऐकले नाही. खेचर ह्या संबोधनात गूढार्थ होता. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेच्या ईशोपनिषदातील अखेरचा मंत्र ‘खं ब्रह्म’ असा आहे. ‘ख म्हणजे ब्रह्म’ असा त्याचा अर्थ खेचर म्हणजे ब्रह्मात संचार करणारा. ह्या आदेशातच विसोबांना ज्ञानदेवांचा उपदेश व अनुग्रह झाला. विसोबांनी म्हटले आहे, ‘महाविष्णूचा अवतार । श्री गुरू माझा ज्ञानेश्वर ।विसोबा खेचरच नंतर नामदेवांचे गुरू म्हणून प्रसिद्धीस आले.

ज्ञानदेवांना तीर्थाटनाची इच्छा झाली. चारी भावंडे नामदेवांच्या भेटीकरिता पंढरीस जाण्यास निघाली. त्यांनी प्रथम चाकणास मुक्काम केला. चाकण येथील महिपतराव नावाच्या एका भाविक श्रीमान गृहस्थाचा पाहुणचार घेतला व नंतर पंढरीस नामदेवांच्या भेटीकरिता आली. तीर्थयात्रा नामदेवांबरोबरच करावी, म्हणजे नामदेवांसारख्या श्रेष्ठ दर्जाच्या भक्ताचा सहवास काही काळ सतत लाभेल हाच त्यातील हेतू होता. नामदेवांना अलिंगन देऊन तीर्थयात्रेचा मानस ज्ञानदेवांनी प्रकट केला. नामदेवांनी म्हटले की, ‘भगवंतांनी आज्ञा दिली तरच मी येतो.’ दोघेही विठोबापुढे उभे राहिले. पंढरीनाथांनी सांगितले की, ‘ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती आहे. तुझ्या संगतीचा त्यांना आदर आहे. तू फार भाग्यवान आहेस. जा, स्वस्ति क्षेम असो.’ देवांनी तीर्थयात्रेस संमती दिली व बोळवण करून देव परतले. मंगळवेढ्याचे चोखामेळा, आरणभिंडीचे सांवता माळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, विसोबा खेचर इत्यादी अनेक संतांची प्रभावळ ह्या तीर्थयात्रेत सामील झाली. चालत चालत सर्व मंडळी कराडजवळ येऊन पोचली. कराड हे कृष्णातीरचे आदिक्षेत्र म्हणून मानले जात होते. कराडचा राजा रामराय हा चाकणच्या महिपतरावाचा जावई होता. सीताबाई ही महिपतरावाची कन्या त्याला दिली होती. रामराय संतमंडळींच्या विरुद्ध होता. सीताबाईला साधुसंतांचे प्रेम होते. त्याच वेळी रामरायाचा मुलगा फार आजारी होऊन मृत्यू पावला. ज्ञानदेवांनी त्या पुत्राला जीवदान दिले. त्यामुळे रामरायाही संतांचा भक्त झाला.

मार्गक्रमण करीत असता नामदेवांना पंढरीची आठवण व्हायची पंढरीचा वियोग सहन होईना विठ्ठलमूर्तीच्या भेटीकरिता हृदय तळमळत होते. ही गोष्ट ज्ञानदेवांच्या लक्षात आली. ते म्हणाले, ‘नामया, प्रेममूर्ती अद्वैत असा आत्मा सर्वांभूती आहे. तुला भक्तीचे भाग्य लाभले आहे तो भक्तिमार्ग आम्हास तूच सांगावा.’ नामदेवाने ज्ञानदेवांच्या चरणांवर मिठी मारून सांगितले की, ‘मी पंढरीरायाच्या कृपेने पोसलो आहे. ज्ञान देण्याचे भाग्य मला नाही. मी वैष्णवांचा नम्र दास आहे तुम्ही ज्ञानाचे कल्पतरू किंवा कामधेनू आहात माझ्यासारख्या कृपणाचे द्वारी तुम्ही याचक म्हणून का यावे ?’ ज्ञानदेव म्हणाले, ‘असे बोलू नकोस. तू अनुभवी आहेस. तुझे बोलणे म्हणजे केवळ कवित्व नव्हे. व्युत्पन्न, बुद्धिवंत, चतुर वक्ते, आत्मज्ञानी, योगी, जीवन्मुक्त ह्यांचीही तुझ्याशी तुलना होऊ शकत नाही. तुझ्या कीर्तनाचा रस हा अद्भुत आणि निरुपम आहे.’

पश्चिमेकडची प्रभास, द्वारका इ. तीर्थे ह्या मंडळींनी उरकली. गिरनारची यात्रा संपवून मारवाडात शिरले. तेथे पाण्याचा खडखडाट ! सर्व तृषाक्रांत झाले. वाटेत एक कूप खूप खोल होता. ज्ञानदेवांनी अणिमालघिमांसारख्या सिद्धींचा अवलंब करून खोल विहिरीतील पाणी पिण्याचा चमत्कार दाखविला. परंतु नामदेवांनी हृदयी केशिराजास आठवून नेत्र मिटले व प्रार्थना केली, ‘तवं गडगडीत कूप उदके ओसंडला । कल्पांती खवळला सिंधुजैसा ॥ पाणी खळखळाट करीत वर आले. सर्वजण तृप्त झाले. अयोध्या, प्रयाग, काशी, गया इ. तीर्थक्षेत्रांची यात्रा संपवून पुन्हा पंढरीस परतले.

ज्ञानदेवांनी तीर्थयात्रेची समाप्ती संतमंडळींसह पंढरीस केली. ज्ञानदेवांनी पंढरीनाथाला आळंदीस जाऊन अखेरची समाधी घेण्याचा आपला संकेत कळविला. अनुज्ञा मिळाली. देव आणि संत आळंदीस आले. विठोबांनी ज्ञानेश्वरांस समाधीस बसण्याची अनुज्ञा दिली. गुरू निवृत्तिदेवांच्या चरणावर ज्ञानदेवांनी लोटांगण घातले; त्यावेळी निवृत्तिदेव उन्मनी अवस्थेत होते. सोपानदेव व मुक्ताबाई ह्यांनी ज्ञानदेवांचे चरण धरले. लगेच निवृत्तिनाथांची समाधी क्षणभर बाजूला झाली. ते म्हणाले, बाळपणी आईबाप सोडून गेले, तेव्हा झाले नव्हते इतके दुःख ह्यावेळी होत आहे. इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराचे पुरातन स्थान आहे. तेथे सिद्धेश्वराच्या डाव्या बाजूस अजानवृक्षाच्या छायेखाली समाधिस्थान तयार करविले होते. शके १२१८, कार्तिक वद्य एकादशीला सर्वांनी हरिजागर केला. नामदेवांचे हरिकीर्तन झाले. द्वादशीला पारणे सोडले. तिसरे प्रहर भक्त कान्हु पाठक हे केंदूरहून ज्ञानदेवांच्या दर्शनास आले. सर्व संतांच्या आग्रहावरून त्यांनी द्वादशीचे कीर्तन केले. त्रयोदशीला प्रातःकाळी तुळशी, बेल अंथरून आसन तयार झाले. समाधिस्थानाची शिळा तयार होती. ज्ञानदेव समाधीकडे जाण्यास उठले. अवघ्यांनी वंदन केले. भगवंतांनी ज्ञानदेवांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात पुष्पहार घातला. भगवंतांनी प्रेमाने निरोप दिला. आर्तस्वरांनी संतमंडळी भजन करीत होती. त्यांच्या नामघोषाने दशदिशा भरून टाकल्या. एक हात भगवंतांनी व दुसरा निवृत्तिनाथांनी धरून आसनावर बसविले. ज्ञानदेवांनी डोळे मिटले. संतांनी समाधीला शिळा लावली. नऊ दिवस कीर्तन-महोत्सव झाला.

ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेव, मुक्ताबाई व निवृत्तिनाथ ह्यांनी एका वर्षाच्या आतच देह ठेवले.

ज्ञानदेवरचित ज्ञानेश्वरीची सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी फार संपन्न होती. ज्ञानदेवांच्या कालखंडात महाराष्ट्रातील भौतिक व आध्यात्मिक संस्कृतीचा उत्कर्ष होत होता. ज्ञानेश्वरी हे त्या उत्कर्षाचेच उत्कृष्ट फलित होय. सातशे वर्षे झाली तरी धर्म, तत्त्वज्ञान व काव्य ह्यांची अनुपम परिणती म्हणजे ज्ञानेश्वरी असे अजून म्हणता येते. तत्पूर्वी सु. शंभर-दीडशे वर्षे मराठी भाषेतील साहित्य विकास पावत होते. हा काळ महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे. स्वतः ज्ञानदेवांनीच श्रीरामचंद्र ह्या यादव राजाचे यदुवंश-विलास, सकळकळानिवास व न्यायाचा पोषक क्षितीश म्हणून वर्णन केले आहे. दोनशे-अडीचशे वर्षांच्या ह्या कालखंडात देवगिरीच्या यादवांचे राज्य विस्तारत व विकास पावत होते. भास्कराचार्य, हेमाद्री, बोपदेव ह्यांच्यासारखे विद्वान ह्या कालखंडात झाले.भास्कराचार्य हे भारताच्या गणित व ज्योतिष विद्येचे शिरोमणीच होते. भास्कराचार्यांच्या वंशातील सात पिढ्या लगोलग चतुरस्र विद्वानांच्या झाल्या. ज्योतिष, वैद्यक, धर्मशास्त्र, न्याय, मीमांसा, वेदान्त व व्याकरण ह्यांचे अध्ययन विदर्भासह महाराष्ट्रातील निरनिराळ्या पाठशाळांमध्ये चालू होते. बोपदेवांनी व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यशास्त्रावर तीन, भागवतावर चार व ज्योतिषावर एक असे २७ प्रबंध लिहिले होते. बोपदेवांचे भागवतावरील हरिलीला, मुक्ताफळ, परमहंसप्रियामुकुट हे चार ग्रंथ विद्वन्मान्य झाले होते. ह्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रात श्रीमद्भागवताचा महिमा फार होता; नाथसंप्रदायाचाही प्रभाव होता, हे ज्ञानदेवांच्या तीन पिढ्यांवर नाथसिद्धांचा अनुग्रह होता ह्यावरून लक्षात येते. शांकर अद्वैताला महाराष्ट्रात फारच मोठी प्रतिष्ठा लाभली होती, हे ज्ञानेश्वरीवरून लक्षात येते. अजंठा, वेरूळ इत्यादी लेण्यांवरून महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या अगोदर सुमारे हजार-बाराशे वर्षे मूर्ती, चित्र व स्थापत्य ह्या कला अनेक अंगांनी विकसित होत होत्या, ह्याचे प्रत्यंतर मिळते. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही हेमाडपंती शैलीची आहेत, असे म्हणतात म्हणजे असे की, स्थापत्यकलाही फार लोकप्रिय झाली होती. ज्ञानेश्वरी हे त्या भव्य संस्कृतीचे सुंदर व पवित्र प्रतीक व प्रतिबिंबच आहे, असे म्हणावे लागते. इतक्या श्रेष्ठ साहित्यकृतीला श्रेष्ठ सांस्कृतिक पार्श्वभूमीच प्राप्त व्हावी लागते. त्याशिवाय ती निराधार ठरते, तिची सामाजिक उपपत्ती लागू शकत नाही.

बहिणाबाईने एका अभंगात भागवत धर्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला, असे म्हटले आहे कारण तोपर्यंत धर्माची मुख्य भाषा किंवा माध्यम संस्कृत भाषाच होती. भगवद्गीतेचा व भागवताचा प्रचार सर्वत्र होता परंतु हे ग्रंथ संस्कृतमध्ये अडकले होते. लोकभाषेला परमार्थ विचाराचे समर्थ माध्यम प्रथम ज्ञानदेवांनी केले. संस्कृत ही देववाणी होती व धर्मामृत ह्या देववाणीत बंद होते. ह्या अमृताला पैजेने जिंकणारी देशी भाषा ज्ञानदेवांनी निर्मिली; धर्म, तत्त्वज्ञान व साहित्यकला ह्यांचे सामान्यजनांपर्यंत पोहचवणारे माध्यम निर्माण केले. शांतरस प्रतिपादिला. तो रस श्रेष्ठ ठरविल्यामुळे विवेकबुद्धीला उजाळा मिळाला आणि भक्तिमार्गाला ज्ञानेश्वरांनी शुद्ध केले. शिवाय भगवान बुद्धांपासून शंकराचार्यांपर्यंत संन्यासाश्रमच श्रेष्ठ असे परमार्थाचे साधन मानले गेले व ज्ञानदेवांपर्यंत संन्यासच श्रेष्ठ मानला जात होता; परंतु अनासक्तीचा गृहस्थाश्रमच परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग म्हणून प्रथम ज्ञानदेवांनी दाखवून दिला. संन्यासमार्गाऐवजी गृहस्थाचा भक्तिमार्ग उजळविला. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूपच होय, त्याचाच उल्हास होय, असे सांगून, सगुण व निर्गुण ह्या दोन्ही एकाच परमसत्याच्या बाजू होत, असे वारंवार प्रतिपादले.

ज्ञानदेवांची निश्चित ग्रंथरचना म्हणजे भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अनुभवामृत, चांगदेवपासष्टीअभंगगाथा ही होय. अभंगगाथेत काही थोडे अभंग प्रक्षिप्त असावेत, अशी शंका राहते.

ज्ञानेश्वरांच्या चरित्रात रेड्याच्या तोंडून वेद वदविले, श्राद्धात प्रत्यक्ष पितर मंत्राद्वारे उपस्थित केले, मृत माणूस जिवंत केला इ. कथा दिल्या आहेत; कारण अशा प्रकारच्या अद्भुत कथा संतचरित्रात असतात. संतचरित्राचा किंवा धार्मिक कथांचा अद्भुत पुराणकथा हा आवश्यक असा भाग असतो. त्या कथांच्या संदर्भाने त्यानंतरचे साहित्य निर्माण झालेले असते.

जोशी, लक्ष्मणशास्त्री