सप्टेंबर : हा गेगरियन कॅलेंडरमधील नववा महिना आहे. यात तीस दिवस असतात. इ. स. पू. १५३ पर्यंत रोमन कॅलेंडरमध्ये हा सातवा महिना होता. तेव्हा १ मार्चला वर्षाची सुरूवात होत असे. सेप्टम् या सातवा अर्थाच्या लॅटिन शब्दावरून या महिन्याचे सप्टेंबर हे नाव पडले आहे. यात एकेकाळी २९ दिवस असत. नंतर वर्षाची सुरूवात १ जानेवारी पासून मानण्यात येऊ लागली तेव्हा हा नववा महिना झाला. ज्यूलियन कॅलेंडरमध्ये सप्टेंबर महिन्यात ३१ दिवस होते. ऑगस्टस या रोमन समाटांनी आपल्या नावाच्या ऑगस्ट महिन्यात १ दिवस घालून त्याचे ३१ दिवस केले, तेव्हा सप्टेंबर महिन्याचे ३० दिवस करण्यात आले. सप्टेंबरच्या २२ किंवा २३ तारखेला शरत् संपातदिन किंवा विषुवदिन असतो. अमेरिका व कॅनडा या देशांत सप्टेंबर महिन्यातील पहिला सोमवार हा कामगार दिन म्हणून पाळतात व त्या दिवशी सुट्टी असते. या दिवशी उत्तर गोलार्धातील उन्हाळा संपतो, अशी अमेरिकेत परंपरा आहे. ज्यू धर्मियांचे नवे वर्ष बहुतकरून सप्टेंबर महिन्यात सुरू होते. स्वित्झर्लंडमध्ये हा सुगीचा महिना मानला जातो.

दाक्षिणात्य संत कवी व संगीतरचनाकार सुब्रह्मण्य भारती (१२ सप्टेंबर १९२१) व समाजसुधारक राजा राममोहन रॉय (२७ सप्टेंबर १८३३) यांची पुण्यतिथी आणि कवी दासोपंतांचा जन्म (२४ सप्टेंबर १५५१) या सप्टेंबर महिन्यातील काही विशेष घटना होत.

पहा : महिना.

ठाकूर, अ. ना.