सद्‌वृत्त : ( आयुर्वेद ) विचाराने शांत, समाधानी, शुची ( पवित्र ) असलेल्या व्यक्तीच्या म्हणजे सज्जनाच्या वर्तनाला सद्वृत्त म्हणतात. तसेच सज्जनांच्या मानसिक, वाचिक व शारीरिक प्रवृत्ती आचरणात आणण्यालाही सद्वृत्त म्हणतात. सद्वृत्त हे केवळ व्यावहारिक हिताचे नसते तर ते शरीराच्या हिताचेही असून आरोग्यकर व आरोग्यवर्धक असते. कोधमत्सरादी भाव मनात क्षोभ निर्माण करून रक्तादी धातू दुष्ट करून रोग निर्माण करतात. अशुची व्यक्तीवर भूतगह ( जंतू ) हल्ल करून रोग उत्पन्न करतात. शांत मन, विचारी बुद्धी, समाधानी मन यांमुळे इंद्रियनिगह होऊन शरीर व मन यांच्यामार्फत हितकर द्रव्यांचाच उपयोग मित प्रमाणात केला जातो. कोणत्याही द्रव्याचा हीनमिथ्यातियोग होत नाही व ⇨प्रज्ञापराध घडत नाहीत. म्हणून रोग होत नाही आरोग्य वाढते व श्रेष्ठ प्रतीचे शरीर घटक बनण्याची प्रकिया शरीरात सुरू असते. शुचित्वाने भूतग्रहांचे शरीरावर आक्रमण होत नाही आणि झाले, तरी विशुद्ध-विशुद्धेतर धातू त्यांचा प्रतिकार करून आरोग्यास धक्का लागू देत नाहीत.

जोशी, वेणीमाधवशास्त्री