सदसद्‌बुद्धी : ‘ सत् ’ म्हणजे चांगले आणि ‘असत् ’ म्हणजे वाईट, यांत विवेक करणारी बुद्धी. सामान्यतः व्यक्ती सामाजिक-राजकीय नियम, रूढी व रीतिरिवाज, नीतितत्त्वे, धार्मिक विधि-निषेध यांच्यानुसार वर्तन करते. परंतु जेव्हा उपलब्ध पर्यायांपैकी कोणता निवडावा असा संभम पडतो तेव्हा शास्त्र व उपदेशक यांचा कितीही सल्ल घेतला, तरी शेवटी व्यक्तीला स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यावा लागतो. असा निर्णय घेताना प्रिय, उपयुक्त व लाभदायक यांचा विचार नैतिकतेच्या विचारावर मात करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी नैतिकेतर बाबींची दखल घेणारी पण त्यांच्या आहारी न जाता अचूक नैतिक निवाडा करणारी बुद्धी म्हणजे सदसद्विवेकबुद्धी. “सतां हि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्त-करणप्रवृत्तयः! “ ही कालिदासाची उक्ती प्रसिद्धच आहे. दोन नैतिक तत्त्वे किंवा श्रेयस् आणि प्रेयस्, कर्तव्य आणि उपयुक्त यांतील काय निवडावे असा संदेह पडतो, तेव्हा सज्जन व सत्प्रवृत्त व्यक्ती आपली अंतः करणप्रवृत्ती म्हणजेच सदसद्विवेकबुद्धी प्रमाण मानते. या सदसद्विवेकबुद्धीला चार प्रमुख अंगे आहेत : (१) कृतीच्या किंवा हेतूच्या नैतिक गुणात्मकतेच्या संदर्भात सर्व बाबींचा साधकबाधक विचार करून योग्यायोग्यतेबाबत निवाडा करणारे विमर्शात्मक किंवा वैचारिक अंग. ही न्यायाधीशाची भूमिका आहे. (२) अशा निवाडयानंतरही तसे वागण्यास प्रवृत्त न होता उलट नीतीने वागण्याचा फायदा काय ? असे विचारून नैतिक निवाडा धुडकावून लावणाऱ्या व्यक्तीस सदसद्विवेकबुद्धी नाही असेच म्हणावे लागते. म्हणून नैतिक निवाडयानुसार जे सत् हितकर, योग्य आहे ते करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करणारे प्रेरक अंग. ‘ जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः !’ हे वचन ह्या प्रेरक अंगाचा अभाव दाखविते. (३) व्यक्ती नैतिक आचरण करण्यास प्रवृत्त झाली, तरी कित्येकदा कामक्रोधलोभमोहादी विकार प्रबल शत्रू ठरतात. म्हणून विकारांवर ताबा मिळवून निर्णय कार्यान्वित करण्याची प्रबल शक्ती हे तिसरे नियमनात्मक किंवा शासनात्मक अंग आणि (४) निर्णय कार्यान्वित करण्यात अपयश आल्यास सत्प्रवृत्त व्यक्तीला वाटणारी खंत, टोचणी किंवा पश्चात्ताप हे भावनात्मक चौथे अंग. अशी वैचारिक किंवा विमर्शात्मक, प्रेरक किंवा प्रवृत्त्यात्मक, शासनात्मक किंवा नियमनात्मक आणि भावनात्मक ही चार अंगे आहेत.

या चार अंगांतील कोणतेही एक अंग सर्वांत महत्त्वाचे मानणे गैर होईल. परंतु कृतीच्या नैतिक समर्थनाच्या दृष्टीने वैचारिक अंग महत्त्वाचे नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने व्यक्तीचे निर्णयस्वातंत्र्य महत्त्वाचे, सद्गुण किंवा चारित्र्याच्या दृष्टीने शासनात्मक अंग महत्त्वाचे आणि पतन झाल्यास चारित्र्य सुधारण्याच्या दृष्टीने टोचणी लावणारे भावनात्मक अंग महत्त्वाचे असे ढोबळपणे म्हणता येईल.

तीन दृष्टिकोन : विविध क्षेत्रांतील ज्ञानाचे प्रामाण्य ठरविण्यासाठी प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इ. प्रमाणे स्वीकारली जातात. त्याप्रमाणे नैतिक दृष्ट्या चांगले-वाईट ठरविण्याचे सदसद्विवेकबुद्धी हे स्वतंत्र व स्वायत्त प्रमाण आहे का ? व ते कितपत विश्वसनीय आहे ? या प्रश्नाचे उत्तर सदसद्विवेकबुद्धीकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. अशा दृष्टिकोनांपैकी धार्मिक दृष्टिकोन असा : प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ईश्वरी तत्त्व किंवा अंश असतो असे मानणारे ईश्वरवादी धर्म सदसद्विवेकबुद्धीला दिव्य ईश्वरी आवाज मानतात. त्यामुळे ती स्वतः प्रमाण ठरते. मानसशास्त्र, समाजशास्त्र अशा शास्त्रांच्या दृष्टिकोनांतून सदसद्विवेकबुद्धी व्यक्तीच्या जन्मापासून तिच्यावर होणाऱ्या धार्मिक, नैतिक, सांस्कृतिक संस्कार, राजकीय – सामाजिक कायदे, रूढी व रीतिरिवाज यांचा सामूहिक परिपाक आहे. वडिलांच्या आज्ञेची जरब व आज्ञा मोडल्यास मिळणाऱ्या कडक शिक्षेची भीती याचेच हे मानसिक भूत असल्याचे फॉइड मानतो. बाह्य नियमपालनाचे आंतरीकरण (इंटर्नलायझेशन) म्हणजेच ‘ आतला आवाज ’ (इनर व्हॉइस) म्हणून सदसद्विवेकबुद्धी ही समाजसापेक्ष, संस्कृतिसापेक्ष असते. नरमांसभक्षक जमात माणसाचे मांस खाणे घृणास्पद मानीत नाही परंतु अन्य मांसाहारी समाज ते घृणास्पद मानतो आणि शुद्ध शाकाहारी समाज तर सर्व मांसाशन निषिद्ध मानतो. यांतील कोणाची सदसद्विवेकबुद्धी प्रमाण मानायची हे ठरविण्याला निकष नाही. म्हणून सदसद्विवेकबुद्धी व्यक्ती-समाज-संस्कृती सापेक्ष आहे. नैतिक दृष्टिकोनानुसार सदसद्विवेकबुद्धी ही व्यक्तीच्या चारित्र्याची, विशिष्ट आदर्श व तत्त्वे यांना तिच्या असलेल्या बांधिलकीची अभिव्यक्ती असते. व्यक्तीचे निर्णयस्वातंत्र्य, परिपक्वता, चारित्र्य आणि एकूण नैतिक सचोटी यांची सदसद्विवेकबुद्धी कसोटी असते.

जोसेफ बटलर (१६९२-१७५२) याने आपल्या नीतिशास्त्रीय उपपत्तीत सदसद्विवेकबुद्धीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले. व्यक्ती नैसर्गिक प्रेरणांमुळे विशिष्ट गोष्टी साध्य करण्यासाठी कृती करते. या सर्व कृती आत्मप्रेम आणि परहित या दोन तत्त्वांखाली मोडतात. परंतु या दोन तत्त्वांपेक्षा श्रेष्ठ असे योग्यायोग्याचा निर्णय घेणारे तत्त्व म्हणजे सदसद्विवेकबुद्धी असे बटलर मानतो. निर्णय, प्रेरकत्व आणि नियमन (जजमेंट, डिरेक्शन आणि सुपरिटेंडन्सी) ही तीन तिची घटकतत्त्वे असल्यामुळे ती सर्वश्रेष्ठ आहे. मानवी प्रकृतीचे नियमन करणे आणि सत्ता चालविणे हा तिचा अधिकार आहे. जर तिच्यात अधिकारानुरूप सामर्थ्य आणि सत्तेनुरूप शक्ती असती तर तिने विश्वावर निरंकुश सत्ता चालविली असती असे बटलरला वाटते.

सदसद्विवेकबुद्धी ही गूढ आंतरिक शक्ती आहे, की जिच्या निर्णयांचे व आदेशांचे विचारविमर्शाद्वारा आकलन व समर्थन करता येते अशी बौद्धीक शक्ती आहे याविषयी दुमत आहे. परंतु नैतिक जीवनात तिचे अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते.

पी. एच्. नोअल – स्मिथच्या मते सदसद्विवेकबुद्धी अनेक पर्यायांपैकी एका पर्यायाचे समर्थन करणारी फक्त वकील आहे. तिला ‘ आंतरिक न्यायाधीश ’ मानल्यामुळे तिचा निर्णय अंतिम मानण्याचा दोष घडतो आणि व्यक्ती तिचा गुलाम होण्याचा धोका संभवतो. यामुळे कर्तव्यपालनाला ऐकान्तिक महत्त्व प्राप्त होते. कर्तव्यपालनाचा हेतू हा एकमेव सद्हेतू नाही तसेच केवळ कर्तव्यपालनाला नेहमीच नैतिकता असते असे नाही. कारण त्याग, परोपकार इ. कित्येक उदात्त कृती कर्तव्यपालनाहून श्रेष्ठ असतात आणि कर्तव्यपालनाचा हेतू कित्येकदा व्यक्तीला कूरकर्माही बनवतो. अशा तृहेने नोअल – स्मिथ सदसद्विवेकबुद्धीच्या मर्यादा दाखवतो.

संदर्भ : 1. Broad, C. D., Five Types of Ethical Theory, London, 1930.

2. MacIntyre Alasdari, A short History of Ethics, London, 1967.

3. Mackenzie, J. S., A Manual of Ethics, London, 1957.

4. Nowell–Smith, P. H. Ethics, Harmondsworth, 1964.

अंतरकर, शि.स.