सदरलँड, अर्ल विल्बर (ज्युनिअर) : (१९नोव्हेंबर १९१५-९ मार्च १९७४). औषधिक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि शरीरक्रियाविज्ञान या विषयांचे अमेरिकन तज्ञ. त्यांनी वलयी अडिनोसीन मोनोफॉस्फेट (सायक्लिक एएमपी) या पदार्थाचे अलगीकरण केले आणि प्राण्यांमध्ये आढळून येणाऱ्या अनेक चयापचय प्रक्रियांमध्ये (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक प्रक्रियांमध्ये) त्या पदार्थाचा सहभाग असल्याचे दाखविले. हॉर्मोनांच्या कार्याच्या यंत्रणेविषयीच्या संशोधनकार्याबद्दल त्यांना १९७१ सालचे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैदयक या विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

सदरलँड यांचा जन्म बर्लिंगेम (कॅनझस) येथे झाला. त्यांनी वॉशबर्न कॉलेजची बी.एस्. (१९३७) आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलची एम्.डी. (१९४२) या पदव्या संपादन केल्या. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्यामध्ये वैदयकीय पथकात नोकरी (१९४३-४५) केल्यानंतर ते वॉशिंग्टन विदयापीठात औषधिक्रियाविज्ञानाचे निदेशक (१९४५-४६), जीवरसायनशास्त्राचे निदेशक (१९४६-५०), सहायक प्राध्यापक (१९५०-५२), सहयोगी प्राध्यापक (१९५२-५३), क्लीव्हलँड येथील वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन या ठिकाणी औषधिक्रियाविज्ञान विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख (१९५३-६३), व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन या ठिकाणी शरीरक्रिया- विज्ञानाचे प्राध्यापक (१९६३-७३) आणि युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मेडिकल स्कूल येथे जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक (१९७३-७४) होते.

सदरलँड सतत वीस वर्षे ⇨हॉर्मोनां वर संशोधन करीत होते. अड्नेनॅलीन हॉर्मोन जेव्हा कोशिकेवर (पेशीवर) परिणाम करीत असते, तेव्हा रासायनिक संदेशक (निरोप्या) वापरला जातो. हा संदेशक वलयी अडिनोसीन मोनोफॉस्फेट (अडिनोसीन ३, ५ फॉस्फेट) हा पदार्थ असतो. तो कोशिकाभित्तीपासून तयार होतो व त्याचे स्वरूप एखादया विशिष्ट ⇨एंझाइमा सारखे असते. सदरलँड यांनी लावलेल्या या शोधानंतर सर्वच हॉर्मोने अशाच प्रकारे कार्यान्वित होतात, असाही शोध लागला. हॉर्मोन विकृती, मधुमेह व कर्करोग यांवरील संशोधनकार्यात या शोधामुळे बहुमोल मदत होईल, असा उल्लेख त्यांच्या नोबेल पारितोषिक पुरस्कारात केला आहे.

सदरलँड यांची १९६६ मध्ये अमेरिकेतील नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेवर सदस्य म्हणून निवड झाली. त्यांना सॉलमान पुरस्कार (१९६९), गैर्डनर फाउंडेशन पुरस्कार (१९७०) आणि लास्कर पुरस्कार (१९७०) हे बहुमान मिळाले. त्यांनी जी.ए. रॉबिन्सन आणि आर्. डब्ल्यू. बूचर यांच्यासमवेत सायक्लिक एएमपी या गंथाचे लेखन केले (१९७१). अल्पशा आजारानंतर सदरलँड यांचे मियामी येथील जैक्सन मेमोरियल रूग्णालयात निधन झाले.

भालेराव, य. त्र्यं.