शृंगी भेक : सरीसृप वर्गातील सरडा. इग्वानिडी कुलातील फ्रिनोसोमा प्रजातीतील सरडे शृंगी भेक या नावाने ओळखले जातात. त्यांच्या १४ जाती आहेत. या लहान प्राण्यांच्या डोक्यावर सामान्यतः आखूड शिंगे असतात. ते नैर्ऋत्य कॅनडा ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा अर्धा पश्चिम भाग आणि मेक्सिको ते ग्वातेमाला या भागांत आढळतात. ते समुद्रसपाटीपासून २,७५० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात आढळतात. ते रेताड व ओसाड कोरड्या भागात राहतात. त्यांचे शरीर बरेच पसरट असून लांबी १२–१५ सेंमी. असते. शेपटी आखूड असते. सर्व शृंगी भेकांच्या कवटीच्या मागील कडेवर शिखा असते. फ्रिनोसोमा डिट्मार्सी या जातीशिवाय इतर सर्व जातींमध्ये या शिखेपासून सु. १·२ सेंमी. लांबीचे पुष्कळ काटे निघतात. या शिंगांची मांडनी, संख्या, आकारमान व उतार हे जातीपरत्वे बदलतात, इतर प्राण्यांवर हल्ला करण्यासाठी या शिंगांचा उपयोग होत नाही, मात्र बचावासाठी त्यांचा उपयोग होतो. त्यांची त्वचा आर्द्रशोषी असते.
त्यांच्यापैकी काही अंडी घालतात व काही सरळ पिलांना जन्म देतात. आखूड शिंगांची जाती एका वेळी ३० पिलांना जन्म देते, तर अंडी घालणारी एक जाती एका वेळेस ४० पर्यंत अंडी घालते. हे प्राणी निरुपद्रवी असून शांतताप्रिय आहेत पण त्यांना खूप त्रास दिल्यास ते आपल्या डोळ्यातून निमेषक पटलाच्या तळाशी असलेल्या कोटाराद्वारे रक्ताची चिळकांडी ९० सेंमी. पर्यंत लांब उडवितात. ते क्वचितच चावतात.
जमदाडे, ज. वि.