विल्यम शेक्सपिअरशेक्सपिअर, विल्यम : (२३ ? एप्रिल, १५६४–२३ एप्रिल, १६१६). जागतिक कीर्तीचा महान इंग्रज कवी व नाटककार. शेक्सपिअर स्ट्रॅटफर्ड – ऑन – ॲव्हनचा रहिवासी. त्याची जन्मतारीख परंपरेने २३ एप्रिल समजण्यात येते. स्ट्रॅटफर्डच्या चर्चमधील त्याच्या स्मारकावर २६ एप्रिल, १५६४ ही त्याच्या बाप्तिस्म्याची तारीख आढळते. तो आठ भावंडांत तिसरा. त्याचे वडील शेती व विविध वस्तूंचा व्यापार करून श्रीमंत झाले होते. स्ट्रॅटफर्डच्या पंचायतीत विविध जबाबदारीच्या जागांवर त्यांनी काम केले परंतु १५७७ च्या सुमारास त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. त्यांची अधिकारपदे काढून घेण्यात आली. त्यामुळे स्ट्रॅटफर्डच्या मोफत शाळेत शिकणाऱ्या शेक्सपिअरचे शिक्षण थांबले व काहीतरी कामधंदा करणे त्याला भाग पडले. १५८२ मध्ये शेक्सपिअरने आपल्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या तरुणीशी–ॲन हॅथवेशी–विवाह केला. या वेळच्या त्याच्या व्यवसायाची माहिती नाही. शेक्सपिअरला तीन अपत्ये झाली. १५८४ मध्ये शेक्सपिअरला स्ट्रॅटफर्ड सोडावे लागले कारण असे सांगतात की, त्याने टॉमस ल्यूसी या श्रीमंत गृहस्थाच्या मळ्यात चोरी केली. मेरी वाइव्ह्ज ऑफ विंडसर नाटकातले जस्टिस शॅलोचे पात्र रंगवून शेक्सपिअरने याचा वचपा काढला, असेही म्हणण्यात येते. १५८५ ते १५९२ हा शेक्सपिअरच्या जीवनातील संपूर्णपणे अज्ञात काळ. या काळात त्याने काय केले, याविषयी अनेक तर्क करण्यात आले. उदा., कोर्टात कारकुनी, वैद्यकी, मोतद्दार, शिक्षक, सैनिक, मुद्रक. १५९२ साली तो माहीत झाला, तो नाट्यजगतातील नवोदित तारा म्हणूनच. यावरून आधीच्या सात वर्षांत त्याने नाट्यव्यवसायात विविध प्रकारची उमेदवारी केली, नाटकाच्या सर्व तंत्रांचा कसून अभ्यास केला व विविध अनुभव मिळविले हे निश्चित. लेखी पुराव्याप्रमाणे १५९३ मध्ये शेक्सपिअर लॉर्ड चेंबरलिन्स मेन या राजाश्रय असलेल्या नाटकमंडळीत होता. अल्पावधीत व्यावसायिक यश मिळवून त्याने ⇨ रॉबर्ट ग्रीनसारख्या पदवीधर नाटककाराचा मत्सर जागृत केला. ‘इतरांची पिसे लावून मिरवणारा डोमकावळा’ असे ग्रीनने त्याच्याविषयी उपहासाने म्हटले.

 

नाट्यगृहे १५९२ ते १५९४ पर्यंत प्लेगमुळे बंद होती. या काळात शेक्सपिअरने व्हीनस अँड अडोनिस व द रेप ऑफ ल्यूक्रीझ ही नितांत सुंदर काव्ये लिहिली. तो इटली, डेन्मार्क व जर्मनीलाही जाऊन आला असा तर्क आहे. १५९४ मध्ये नाट्यगृहे परत सुरू झाली. या वर्षापासून शेक्सपिअरचे नाव सतत अग्रभागी दिसते. तो लॉर्ड चेंबरलिन्स मेन या नाटकमंडळीत होता. ह्याच मंडळीचे पुढे ‘किंग्ज मेन’ असे नाव पडले. या मंडळीसाठी शेक्सपिअरने १५९४ ते १६०३ या काळात दरवर्षाला दोन याप्रमाणे नाटके लिहिली. या नाटकांचे प्रयोग लंडनमधील निरनिराळ्या नाट्यगृहांत झाले. ह्या मंडळीने ⇨ बेन जॉन्सन, डेकर इ. इतर नाटककारांचीही नाटके बसविली. ह्याच व्यवसायातून शेक्सपिअरचे आर्थिक वैभव उभे राहिले. तो ‘किंग्ज मेन’ चा भागीदार झाला. त्याने स्ट्रॅटफर्डला घरे व शेते खरेदी केली व आपल्या वडिलांना स्ट्रॅटफर्डचे बेलिफ म्हणून मिळालेले मानचिन्ह संपादन केले. त्याचे वडील स्ट्रॅटफर्डलाच १६०१ मध्ये मरण पावले.  

शेक्सपिअरचे १६०८ पर्यंत वास्तव्य लंडनमध्येच होते. त्याला राजदरबारी मानमरातब मिळाला. समकालीन नट व नाटककारांबरोबर त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. उदा., जेम्स बर्बेज, बेन जॉन्सन, राजवर्तुळातील त्याचा चाहता सौदॅम्टन हा उमराव इत्यादी. या काळातच श्रेष्ठ नाटककार व कवी असा शेक्सपिअरचा वारंवार उल्लेख व गौरव होऊ लागला. १६१० च्या सुमारास शेक्सपिअर स्ट्रॅटफर्डला कायम वास्तव्यासाठी गेला. तेथेच ह्या थोर नाटककाराचे निधन झाले. या जगविख्यात नाटककाराच्या जीवनातील काही गोष्टी अज्ञातच राहिल्या. त्याचे शिक्षण किती झाले, त्याने गाव का व केव्हा सोडले, लंडनमध्ये त्याने सुरुवातीच्या काळात कशी उपजीविका केली, ह्यांसारख्या प्रश्नांना उत्तरे न मिळण्याचे कारण म्हणजे नाट्यव्यवसायाला त्या काळी सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, हे होय.

शेक्सपिअरच्या अस्तित्वाविषयीचा वाद : खुद्द शेक्सपिअर नावाचा नाटककार होता की नाही, असाही एक वाद झाला आहे. शेक्सपिअर ह्या टोपणनावाखाली इतर कुणीतरी नाटके लिहिली, हे या वादाचे प्रमुख सूत्र. ⇨ फ्रान्सिस बेकनने (१५६१–१६२६) शेक्सपिअरची नाटके लिहिली असा वाद स्मिथने सुरू केला व तो खूप गाजला. ऑक्सफर्डचा सतरावा अर्ल एडवर्ड डी व्हेरी डर्बीचा सहावा अर्ल विल्यम स्टॅ न्ली नाटककार ⇨ क्रिस्टोफर मार्लो (१५६४–९३) ही आणखी काही नावे. या प्रत्येकाने शेक्सपिअर हे टोपणनाव का घेतले, याची वेगवेगळी कारणे देण्यात येतात. हा वाद मुळात उत्पन्न होण्याचे कारण असे की, स्ट्रॅटफर्डच्या शेक्सपिअरचा उपलब्ध असलेला त्रोटक जीवनवृत्तांत लक्षात घेता, अशा माणसाने महान प्रतिभाशाली कलाकृती निर्माण केल्या, यावर विश्वास बसत नाही. खेडेगावातील सामान्य कुटुंबात वाढलेल्या व्यक्तीला दरबारी रीतिरिवाज, भाषा व इतिहासादी विषयांचे आश्चर्यकारक सखोल ज्ञान कोठून आले ? या प्रतिभाशाली कवीचे एकही हस्तलिखित उपलब्ध असू नये ? का लेखक अज्ञात राहावा म्हणून ही हस्तलिखिते नष्ट करण्यात आली? एक गोष्ट खरी की, शेक्सपिअर नव्हताच म्हणणाऱ्यांना अजून निखालस पुरावा देता आलेला नाही. त्याच्या अस्तित्वाविषयी मात्र खात्री पटावी, असा भरपूर पुरावा सादर करण्यात आला आहे.

शेक्सपिअरच्या कविता : व्हीनस अँड अडोनिस (१५९३), द रेप ऑफ ल्यूक्रीझ (१५९४) या दीर्घ कथनात्मक कविता व एकशे-चोपन्न सुनीतांची माला (१६०९) ही शेक्सपिअरची काव्यसंपदा. या कवितांच्या कथा प्राचीन रोमन कवी ⇨ ऑव्हिडच्या (इ. स. पू. ४३–इ. स. १८) मेटॅमॉर्फसिस ह्या काव्यामधून घेतल्या आहेत. शेक्सपिअरची सुनीत-माला इंग्रजी साहित्याचा बहुमोल अलंकार होय. सुनीत-मालांच्या संकेताप्रमाणे यात शेकस्पिअरने दोन प्रेमिकांच्या प्रेमाचा वृत्तांत दिला आहे पण या सुनीत-मालेतील १ ते १२६ सुनीते एका कोवळ्या, देखण्या, उच्चकुलीन तरुणास उद्देशून आहेत तर १२७ ते १५२ सुनीतांची नायिका एक अज्ञात स्त्री आहे. ह्या दोन व्यक्ती कोण, हाही संशोधनाचा एक वादग्रस्त प्रश्न आहे. ही सुनीते आत्मवृत्तपर आहेत. नाटकांपेक्षाही या सुनीतांतून आपण शेक्सपिअरच्या व्यक्तिमत्त्वाच्या निकट जाऊन पोहोचतो, यावर अभ्यासकांचे मतैक्य आहे. म्हणूनच ह्या सुनीतांभोवती असलेल्या गूढतेचा छडा लावण्याचे अविरत प्रयत्न चालू आहेत. या सुनीतांच्या अर्पणपत्रिकेतील ‘डब्ल्यू. एच्.’ ही व्यक्ती कोण याचाही उलगडा होत नाही. ‘द फीनिक्स अँड द टर्टल’ (१६०१) ही शेक्सपिअरची आणखी एक शोकात्म कविता. ‘ए लव्हर्स कंप्लेट’ ही कविताही त्याचीच असावी असा तर्क आहे.

शेक्सपिअरची नाटके : शेक्सपिअरच्या नाटकांच्या छापील आवृत्त्यांबाबत गोंधळाची परिस्थिती आहे. शेक्सपिअरच्या नाटकांची एकत्र संपादित आवृत्ती (फर्स्ट फोलिओ) जॉन हेमिंग व हेन्री काँडेल यांनी १६२३ मध्ये प्रसिद्ध केली. त्यांतील छत्तीसपैकी अठरा नाटके प्रथमच छापली गेली. इतर अठरा अगोदर वेगवेगळी (क्वार्टो आवृत्त्या) छापून प्रसिद्ध झाली होती व त्यांची कायदेशीर नोंदही झाली होती. फर्स्ट फोलिओत पेरिक्लीझ हे नाटक नाही. काही नाटकांच्या फोलिओ व क्वार्टो आवृत्त्यांतील संहितेत कमालीचा फरक दिसतो. काही क्वार्टो आवृत्त्यांतील संहिता तर भ्रष्ट स्वरूपात आहेत. ही नाटके कुणीतरी नाट्यप्रयोग पाहताना किंवा नंतर स्मरणातून लिहून काढली, असा तर्क आहे. या आवृत्त्या विनापरवाना छापल्या असाव्यात, असेही म्हणतात. असे प्रकार त्या काळी सरसहा चालत.


 शेक्सपिअरच्या ऑथेल्लो नाटकातील एक दृश्य, १९४३.चार फोलिओ आवृत्त्या १६८५ पर्यंत प्रसिद्ध झाल्या. तिसऱ्या आवृत्तीत शेवटी पेरिक्लीझ व शेक्सपिअरने न लिहिलेली इतर चारपाच नाटके आहेत. शेक्सपिअरच्या नावावर किंवा त्याने लिहायला मदत केलेली अनेक नाटके आहेत. त्यांचे लेखी पुरावे मिळतात. ह्या सर्वच विषयांवर अजूनही संशोधन चालू आहे. शेक्सपिअरने नक्की किती नाटके लिहिली, या नाटकांची खरी व प्रक्षिप्त संहिता कितीमध्ये किती प्रमाणात आहे, त्यांपैकी चोरून किती छापली गेली, यांसारखे प्रश्न कायम आहेत. निकोलस रो, ⇨ अलेक्झांडर पोप, ल्यूइस थीओबॉल्ड, टॉमस हॅन्मर, विल्यम वॉरबर्टन, डॉ. जॉन्सन, एडवर्ड कॅपेल, एडमंड मेलन, ए. डब्ल्यू. पॉलर्ड, ⇨ आर्थर टॉमस क्विलर-कूच, विल्यम जेम्स क्रेग इ. शेक्सपिअरच्या संहितेत व्यासंगी अभ्यासक होत. आपला मुद्दा खरा करण्यासाठी दडपून पाठभेद देणे, मजकूर चोरणे, खोट्या जुनाट आवृत्त्या तयार करणे, यांसारखे अपप्रकारही झाले आहेत.

नाटकांचा कालानुक्रम : हाही स्वतंत्र संशोधनाचा विषय झाला आहे. या संदर्भातला पहिला प्रयत्न मेलनने १७७८ मध्ये केला. फर्स्ट फोलिओत हा क्रम दिलेला नाही. नाटकांचा अनुक्रम ठरविताना निरनिराळ्या पुराव्यांचा उपयोग करण्यात आला. उदा., क्वार्टो आवृत्त्या, स्टेशनर्स रजिस्टर नावाचे नोंदणी-पुस्तक, रोजनिशीतील उल्लेख इत्यादी. तसेच इतरही काही कसोट्यांचा उपयोग करण्यात आला. उदा., नाटकातील अनुप्रासयुक्त व अनुप्रासरहित ओळींचे परस्परांशी प्रमाण. शेक्सपिअरच्या व्यक्तिमत्त्वाच्या व नाट्यप्रतिभेच्या विकासाचे सुसंगत चित्र त्याच्या नाटकांतून उभे राहते का, हे पाहण्यासाठी हा कालानुक्रम ठरविण्याचा प्रयत्न चालू आहे. ई. के. चेंबर्सने दिलेला कालानुक्रम या विषयावरील चर्चेला आधारभूत मानतात.

नाटकांचा आढावा : शेक्सपिअर १५९० पासून १६१२ पर्यंत अखंडपणे नाटके लिहीत होता. रंगभूमीच्या प्रेक्षकांची नाडी त्याने अचूकपणे ओळखली होती. नाटकांचे विषय, मांडणी व वातावरण यांत नित्य काही नवे करण्याचा त्याचा प्रयत्न असे. या गोष्टीचा शेक्सपिअरच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंध लावता येतो का ?–स्थूलमानाने एवढेच म्हणता येते की, काही विशिष्ट विषय, मांडणी व वातावरण नाटककाराला विशिष्ट कालखंडात प्रिय वाटले. या दृष्टिकोनातून शेक्सपिअरचा अभ्यास झालेला आहे. यात भरपूर मतमतांतरे असली, तरी काही निष्कर्षांबाबत अभ्यासकांत एकवाक्यता दिसते.

 शेक्सपिअरच्या नाटकांचे चार प्रकार आहेत : ऐतिहासिक, सुखात्मिका, शोकात्मिका व सुखदुःखांचे मिश्रण असणारे रोमान्सेस. सुरुवातीस शेक्सपिअरने हे बहुतेक प्रकार कसे काय जमतात, हेच जणू पाहिल्यासारखे वाटते. ⇨ हेन्री द सिक्स्थ- ३ भाग (१५९०–९२) हे ऐतिहासिक नाटक. टायटस अँड्रॉनिकस (१५९३) हा खून व भीषण रक्तपाताने रंजित असा त्यावेळचा लोकप्रिय नाट्यप्रकार. द कॉमेडी ऑफ एरर्स (१५९०) हे ⇨ प्लॉटस ह्या विख्यात रोमन सुखात्मिकाकाराच्या मेनीकमी ह्या सुखात्मिकेचे इंग्रजी रूपांतर. रिचर्ड द थर्ड (१५९२-९३) ही दारुण शोकात्मिका. द टेमिंग ऑफ द श्रू (१५९४) हा अदभुतरम्य फार्स किंवा प्रहसन. या सर्व नाट्यप्रकारांच्या हाताळणीत शेक्सपिअरचे खास वेगळेपण व कौशल्य जाणवते व त्याने रॉबर्ट ग्रीन ह्या ज्येष्ठ नाटककाराचा मत्सर का जागृत केला हेही समजते. आपल्या सर्व नाटकांची सामग्री शेक्सपिअरने लोकांना अगोदरच माहीत असलेल्या साहित्यातून निवडली आणि या परिचित कथावस्तूंना आपल्या दिव्य प्रतिभेने अभिनव सर्जनशील रूप प्राप्त करून दिले.

ऐतिहासिक नाटकांत शेक्सपिअरने इंग्लंडचा इतिहास उभा करून लँकेस्टर व यॉर्क घराण्यांची भांडणे व त्यांच्यातील यादवी युद्ध यांचे दुष्परिणाम सूचित केले. तसेच राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व व आदर्श राजाची प्रतिमा ह्यांचे कलात्मक दर्शन घडविले. त्याच्या ऐतिहासिक नाटकांत इंग्लंडचे बहुतेक ट्यूडर राजे आलेले आहेत. उदा., चौथा, पाचवा, सहावा हेन्री दुसरा, तिसरा रिचर्ड जॉन राजा, तिसरा रिचर्ड, पाचवा हेन्री ही त्यांची काही अमर व्यक्तिचित्रे. त्यांतून शेक्सपिअरचे मानवी मनाचे सखोल व सूक्ष्म ज्ञान व निरीक्षण प्रत्ययास येते. पश्चिमी प्रबोधनकाळात जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना नव्यानेच सर्व युरोपीय देशांत निर्माण झाली. शेक्सपिअरने इंग्लंडच्या राष्ट्रप्रेमाचा आपल्या नाटकांतून परिपोष केला.

द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना (१५९४), लव्ह्‌ज लेबर्स लॉस्ट (१५९४), मिडसमर नाइट्स ड्रीम (१५९६), द मर्चंट ऑफ व्हेनिस (१५९६), मच अडू अबाउट नथिंग (१५९८), ॲज यू लाइक इट (१५९९), ट्‌वेल्फ्थ नाइट (१५९९) या सुखात्मिकांतून शेक्सपिअरच्या असामान्य प्रतिभेने नाट्यकलेचे सर्व पैलू उजळून काढले. त्यांत मानवी जीवनाचे चौफेर, सूक्ष्म व सावध निरीक्षण आहे. खोचक, बोचक तसेच खळाळून हसविणाऱ्या अव्वल दर्जाच्या विनोदाची कारंजी त्यांत आहेत. असंख्य संस्मरणीय व्यक्तिरेखा आहेत. उदा., शायलॉक, माल्व्होलिओ इत्यादी. रमणीय, बुद्धिमान व जीवनाकडे टवटवीत मनाने पाहणाऱ्या नायिकांचे या सुखात्मिकांत वर्चस्व दिसते. त्यात स्वर्गीय प्रेमभावनेची तरफदारी व कृत्रिम भावनाविवशतेची गोड थट्टाही आहे. डॉगबेरी, व्हर्जेस, विदूषक अशी अनेक विनोदी पात्रे अतिसहजपणे कथावस्तूचा अविभाज्य भाग म्हणून निर्माण करण्यात आली आहेत.

ह्या सुखात्मिकांची संविधानके अनेक गोष्टी, कथा, हकीकती वगैरेंच्या बेमालूम मिश्रणातून तयार झाली आहेत. त्यांतील रचनाकौशल्याने मन स्तिमित होते. घटनांचा क्रम व संगती प्रत्यक्ष जीवनात असावी, इतक्या सहजपणे साधण्यात आली आहे आणि नाटकांच्या संदर्भातही त्यांना तितकीच सहज अपरिहार्यता प्राप्त करून दिली आहे. अव्वल दर्जाचे काव्य, समृद्ध भाषा, नवे शब्द व वाक्प्रचार, गेय गीते यांची या सुखात्मिकांत लयलूट आहे. जीवनाचा भाष्यकार शेक्सपिअर या सुखात्मिकांच्या कालखंडात जीवनाकडे प्रसन्न, आशावादी व ध्येयदृष्टीने पाहत आहे, हे जाणवते.


रिचर्ड द थर्ड व रोमिओ अँड ज्यूलिएट (१५९७) ह्या नाटकांपासून शेक्सपिअरने शोकात्म नाटके लिहिण्यास सुरुवात केली. इ. स. १५९९ ते १६०६ या काळात त्याने जगप्रसिद्ध शोकात्मिका लिहिल्या. उदा., ज्यूलिअस सीझर (१५९९), हॅम्लेट (१६००), ऑथेल्लो (१६०३), किंग लीअर (१६०५), मॅकबेथ (१६०६), अँटनी अँड क्लीओपात्रा (१६०७), टायमन ऑफ अथेन्स (१६०५–०८). यांचा अभ्यास गेली तीनशे वर्षे सतत चालू आहे. यांतील प्रत्येक शोकात्मिका वेगवेगळ्या कारणांसाठी श्रेष्ठ आहे. प्रत्येकीने मानवी जीवनातील गूढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व शोकात्मिका एकाच कालखंडात व सुखात्मिकांचा नजराणा प्रेक्षकांना दिल्यानंतर लिहिल्या गेल्या, ही गोष्ट अभ्यासकांना फार अर्थपूर्ण वाटते. या शोकात्मिकांतून खुद्द शेक्सपिअरच्या भावनिक व मानसिक संघर्षाचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न नित्य चालू आहे.

मानवी जीवनातील दुःखे नेमकी कशामुळे निर्माण होतात ? ग्रीक दृष्टिकोनाप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला दुःखच येणे, ही त्या व्यक्तीची नियती असते. तसेच केवळ योगायोगाने जीवनात दारुण घटना घडतात, हेही दिसून येते. पण व्यक्ती हीच आपल्या विशिष्ट स्वभावामुळे स्वतःच्या दुःखांना कितपत जबाबदार धरता येईल, असा गहन प्रश्न शेक्सपिअरने उपस्थित केला. स्वभावातील एखादी उणीव हीच व्यक्तीच्या दारुण शोकात्म जीवनास कारणीभूत होते, हे हॅम्लेट, लीअर, ऑथेल्लो इत्यादींच्या चित्रणातून शेक्सपिअरने दाखवून दिले. फारसा अभिनिवेश न बाळगता व्यक्तीच्या दुःखमय जीवनास थोडी नियती, थोडा योगायोग, थोडाफार त्या व्यक्तीचा विशिष्ट स्वभाव इ. कारणीभूत होतात, असे तो सुचवितो. या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्यक्ष संघर्षापेक्षाही व्यापक स्वरूपाचा तिचा अंतःसंघर्ष चालू असतो वा तो शिव व अशिव यांतील संघर्ष असतो. या संघर्षांतून शेवटी चांगलेच निर्माण होते परंतु ते चांगल्या गोष्टींच्या विनाशाची जबर किंमत देऊनच, असेही शेक्सपिअरने सूचित केले आहे. पण एकंदरीने जीवन हे एक अनाकलनीय गूढ आहे, हेच जाणवत राहते. ⇨ अँड्रू सिसिल ब्रॅडलीने या दृष्टिकोनातून शेक्सपिअरच्या शोकात्मिकांचा तपशीलवार अभ्यास केला.    

प्रमाद, दुःख आणि पाप यांचे कडू जहर या शोकात्मिकांना झाकोळून टाकते. त्यांतील दैवाचा खेळ क्रूर आहे. उदा., ऑफेलिया, डेस्डेमोना, कॉर्डेलिया यांसारख्या निष्पाप नायिकांचा बळी. मानवी जीवन म्हणजे केवळ क्रौर्य व राक्षसीपणा त्यात सद्-गुणांचा विजय व दुर्गुणांचा पराजय वगैरे काही नाही, असे या शोकात्मिकांतून सुचविले आहे. या भीषण जीवनदर्शनाची छाया या काळातल्या ट्रॉइलस अँड क्रेसिडा (१६०२), ऑल्स वेल डेटा एंड्स वेल (१६०२), मेझर फॉर मेझर (१६०४) या सुखशोकमिश्रित नाटकांवरही (रोमान्सेस) पडली आहे.

जगविख्यात व्यक्तिचित्रे (हॅम्लेट, इआगो, लीअर) सखोल तत्त्वज्ञान (हॅम्लेटची स्वगते, लीअर व त्याच्या विदूषकाची जीवनावरील भाष्ये) दर्जेदार काव्य मानवी जीवनातल्या सर्व रहस्यांचे अमोघ भाषेत अनावरण परिचित कथासामग्रीवरील दिव्य प्रतिभेचे संस्करण ही शेक्सपिअरच्या शोकात्मिकेची वैशिष्ट्ये होत.

शेक्सपिअरच्या शेवटच्या कालखंडातील नाटके म्हणजे पेरिक्लीझ (१६०८), सिंबेलाइन (१६०९), द विंटर्स टेल (१६१०) व टेंपेस्ट (१६११). या काळात शेक्सपिअर स्ट्रॅटफर्डला स्थायिक झाला होता. त्याला भरपूर लोकप्रियता, कौटुंबिक स्वास्थ्य व ऐश्वर्य मिळाले होते. त्याचा प्रभाव या नाटकांवर पडला आहे असे मत मांडले गेले आहे. ह्या नाटकांची रचना काहीशी सैल आहे. त्यांत जादू, चमत्कार, असंभाव्य घटना, सुख-दुःखांचे मिश्रण, संगीतिकेतील दृश्यकाव्य व संगीत यांचे एक विलक्षण रसायन झालेले दिसते. शेक्सपिअरच्या वृत्तीतील स्थिरता त्यांतून प्रत्ययाला येते. झाले गेले विसरून उदार अंतःकरणाने क्षमाशील बनणे, हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ गुणविशेष आहे, हेही त्यांतून सूचित झाले आहे.

शेक्सपिअरच्या नाटकांचा केवळ कालानुक्रमे अगर केवळ नाट्यप्रकारांच्या आधारे विचार करता येत नाही. कारण एकाच कालखंडात त्याने विविध नाट्यप्रकार हाताळले आहेत. विशेषतः ह्या नाटकांतून शेक्सपिअरच्या वृत्तीतील स्थित्यंतराचा मागोवा घेण्यास त्यामुळे अडचण निर्माण होते.

शेक्सपिअरच्या द टेंपेस्ट नाटकातील एक दृश्य, सॅन फ्रॅन्सिस्को, १९७०-७१.

शेक्सपिअरची रंगभूमी अगदी साध्या पद्धतीची होती. प्रेक्षक रंगमंचाच्या तीनही बाजूंस गर्दी करून उभे राहत. त्यामुळे अंतर्गत सजावटीस व निरनिराळे पडदे ठेवण्यास वाव नव्हता. यामुळे उत्तम संवादरचना, भरपूर मोठ्या आवाजात संवाद पेश करणारा नटसंच व संवाद पाठ करण्यास सुलभ व्हावे, म्हणून ते वृत्तबद्ध व काव्यात्म करणे असे त्या वेळच्या सर्वच नाटकांचे स्थूलमानाने स्वरूप दिसते, म्हणूनच शेक्सपिअरकालीन नाटके काव्यगुणांनी रसरसली. [→ रंगभूमी].

शेक्सपिअर-समीक्षा : शेक्सपिअरवर इतक्या विविध दृष्टिकोनांतून लिहिले गेले आहे की, त्यामुळे समीक्षेच्या कक्षाच विस्तारल्या आहेत. प्रत्येक शतकाने आपापल्या अभिरुचीप्रमाणे शेक्सपिअरचा अभ्यास केला आहे. त्याच्यातील कलात्मकतेच्या व प्रतिभेवरील हुकमतीच्या अभावाचे दिग्दर्शन करूनही त्याचा समकालीन बेन जॉन्सन त्याला अभिजात ग्रीक नाटककारांच्या पंक्तीत बसवतो. ⇨ जॉन मिल्टन व ⇨ जॉन ड्रायनने (सतरावे शतक) त्याच्या निसर्गदत्त प्रतिभेचा गौरव केला व या प्रतिभेच्या दीप्तीने आपल्या ठायी असलेल्या व्युत्पन्न विद्वत्तेच्या अभावाची जाणीव त्यास होऊन दिली नाही, असे म्हटले. शेक्सपिअरच्या शिक्षणाचा ऊहापोह करणारी पुस्तकेही प्रसिद्ध झाली. अठराव्या शतकात शेक्सपिअर व त्याचे समकालीन यांच्याविषयी माहिती गोळा करण्यात आली. शेक्सपिअरच्या नाटकांतील उणिवा व दोषस्थळांची यादी करण्यात आली. शेक्सपिअरखंडाच्या आपल्या विद्वत्तापूर्ण व विवेचक प्रस्तावनेत डॉ. जॉन्सन शेक्सपिअरबद्दल गौरवोद्गगार काढतो पण त्याच्याविषयी न्यायाधीशाचीच भूमिका घेतो. शेक्सपिअरने योजिलेल्या प्रतिमांच्या आधारे त्याच्या सर्जनशील प्रतिभेचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न अठराव्या शतकापासून आजतागायत चालू आहे. शेक्सपिअरच्या नाटकांतील व्यक्तिरेखांचा अभ्यास अठराव्या शतकाच्या मध्यापासूनच सुरू झाला. शेक्सपिअरच्या पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण अत्यंत एकसंध रीतीने होते. त्याच्या नाटकातले व्यक्तिचित्रण म्हणजे सतत विकसित होत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ अल्पसे दर्शन वाटावे इतकी त्या व्यक्तिचित्रात सूचकता असते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतही ⇨ विल्यम हॅझ्लिट, ⇨ सॅम्युएल टेलर कोलरिज, फ्रेडरिक जे. फर्निव्हल, ए. सी. ब्रॅडली, ⇨ हार्ली ग्रॅन्‌व्हिल-बार्कर, जॉन डोव्हर विल्सन या अभ्यासकांनी शेक्सपिअरच्या पात्रांचा विविध दृष्टिकोनांतून अभ्यास केला.


शेक्सपिअरच्या प्रत्येक कलाकृतीचा अभ्यास त्या त्या कलाकृतीतून मिळणाऱ्या सूत्रांच्या आधारानेच झाला पाहिजे, असे आग्रहाने प्रथम सांग़णारा समीक्षक कोलरिज. त्याने व ⇨ जॉन कीट्सने शेक्सपिअरच्या सर्जनशील प्रतिभेच्या विविध विशेषांकडे वाचकांचे लक्ष वेधले. कीट्स व शेक्सपिअर यांच्या प्रतिभेमधील साम्यावर विसाव्या शतकात खूप लिहिले गेले. जर्मन अभ्यासकांनी (उदा., ⇨ आउगुस्ट व्हिल्हेल्म फोन श्लेगेल, ⇨ गोट्होल्ट एफ्राइम लेसिंग इ.) शेक्सपिअरची नाटके तत्त्वज्ञानातल्या जटिल समस्यांची उकल करतात असे म्हटले आहे. ब्रॅडलीने शेक्सपिअरच्या पात्रांचे सखोल मानसशास्त्रीय विश्लेषण करून नाटकांची रचना व त्यांतील काव्य यांना गौण मानले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अनेक शेक्सपिअर सोसायट्या स्थापन झाल्या. ⇨ वॉल्टर पेटरचा शेक्सपिअरचा अभ्यास (१८८९) विद्वत्तापूर्ण व शास्त्रीय संशोधनात्मक स्वरूपाचा आहे. एडवर्ड डाउडेनने (१८४३–१९१३) शेक्सपिरच्या नाट्यकृतींचे प्रकारांत व कालखंडांत वर्गीकरण करून त्यांतून शेक्सपिअरच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास दाखविण्याची शक्यता प्रतिपादन केली.

विसाव्या शतकात शेक्सपिअरचा अभ्यास अनेक अंगांनी बहरून आला. ई. के. चेंबर्स हा शेक्सपिअरचा अधिकारी अभ्यासक. त्याचा शेक्सपिअरवरील ग्रंथ प्रमाणभूत मानतात. तसेच ए.सी. ब्रॅडली याची शेक्सपिअरच्या शोकात्मिकांची समीक्षा अतिशय प्रभावी ठरली. नाटकातील वास्तवता व जीवनातील वास्तवता भिन्न असतात, या दृष्टिकोनातून ई. ई. स्टोलने शेक्सपिअरच्या पात्रांचे विश्लेषण केले. ग्रॅनव्हिल-बार्करने शेक्सपिअरच्या नाटकांची प्रयोगक्षमतेच्या दृष्टिकोनातून मीमांसा करून याबाबतीतही शेक्सपिअर निर्विवादपणे श्रेष्ठ ठरतो असे म्हटले आहे. शेक्सपिअरचा अभ्यास तत्कालीन समाजाची मानसशास्त्रीय बैठक विचारात घेऊनही झालेला आहे.

⇨ सिग्मंड फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय सिद्धांतांमुळे शेक्सपिअरविषयक समीक्षेत विविध दृष्टिकोनांची गर्दी उसळली. या सिद्धांतांमुळे शेक्सपिअरच्या पात्रांच्या स्वभावांतील विसंगतीवर वेगळाच प्रकाश पडतो. शेक्सपिअरच्या नाटकांतील काव्य व प्रतीकांच्या अभ्यासासही जोराची चालना मिळाली (उदा., जे.एम. मरी विल्सन नाइट मिस. स्पर्जन यांची समीक्षा). अशा अभ्यासातून एकांगी, आग्रही व खळबळजनक मतेही मांडण्यात आली आहेत (उदा., विल्सन नाइट टी. एस. एलियट यांची समीक्षा). शेक्सपिअरच्या भाषा व शैलीचा अभ्यासही पुष्कळवेळा अत्याग्रही झालेला दिसतो. मग त्याची प्रतिक्रियाही उमटते. क्रेग व टिलयार्ड यांनी शेक्सपिअरकालीन लोकभ्रम, समजुती इत्यादींचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्याचे आगळेपण अट्टाहासाने सिद्ध करण्याच्या प्रवृत्तीस आळा बसला. शेक्सपिअरच्या नाटकांच्या संपादित आवृत्त्यांत आर्डेन, न्यू ऑक्सफर्ड, ग्लोब, वॉर्विक, फर्निव्हल (व्हेरिओरम आवृत्त्या), केंब्रिज, व्हेरिटी इत्यादींनी संपादिलेल्या आवृत्त्या फार मोलाच्या आहेत. 

याशिवाय शेक्सपिअरने वापरलेले शब्द, वृत्ते, तसेच राज्यशास्त्र, वैद्यक, ज्योतिष, नाट्यशास्त्र, संगीत इ. विषयांचे त्याचे ज्ञान यांचाही अभ्यास झाला आहे. त्याच्या नाटकांतील पात्रांची सूचीही तयार करण्यात आली. त्याच्या लेखनाच्या सवयींचा अंदाज बांधून त्याच्या नाटकांच्या संहितांचे व त्यांतील शैलीचे स्वरूप ठरविण्याचे प्रयत्न झाले आहेत. तत्कालीन मुद्रणकलेचा अभ्यास करून फर्स्ट फोलिओ कसा छापला गेला असेल, याचाही अभ्यास झाला आहे (उदा., विलोबी हि न्मन). शेक्सपिअरवर लिहिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची, लेखांची व व्याख्यानांची नोंद करणारे संदर्भग्रंथही प्रसिद्ध झाले आहेत. हे काम नित्य चालूच आहे.

शेक्सपिअरचे स्मारक, होली ट्रिनिटी चर्च, स्ट्रॅटफर्ड.

शेक्सपिअरविषयी चर्चा करण्यात आलेले प्रमुख साहित्यिक स्वरूपाचे प्रश्न असे : शेक्सपिअर कवी म्हणून श्रेष्ठ की नाटककार म्हणून ? शेक्सपिअरच्या नाटकांची आजची लोकप्रियता त्यांतील नाट्यगुणांमुळे की काव्यगुणांमुळे ? त्याच्या नाटकांतून त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा सुसंगत क्रम दिसतो काय ? त्याच्या नाटकांत उल्लेखिलेल्या व्यक्ती, प्रसंग व घडामोडी त्यावेळच्या प्रत्यक्ष जीवनात झाल्या होत्या का ? त्याच्या कित्येक काव्यपंक्तींचा नक्की अर्थ काय ? त्याच्या कित्येक व्यक्तिचित्रांभोवती असलेले गूढतेचे वलय दूर करून त्या व्यक्तिचित्रांचे निश्चित स्वरूप समजून घेता येईल काय ? त्याच्या सर्जनशील प्रतिभेचे निश्चित स्वरूप कसे आहे ? इत्यादी. या प्रश्नांची उत्तरे समीक्षा शोधत राहील आणि ती शोधताना नवे प्रश्नही निर्माण होतील पण एक गोष्ट खरी, की मॅथ्यू आर्नल्डने म्हटल्याप्रमाणे शेक्सपिअरची वाङ्‌मयीन महानता सदैव वादातीत राहील.

शेक्सपिअरचे स्मारक : शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्ड-ऑन-ॲव्हन या जन्मगावी यथोचित स्मारक करण्यात आले आहे. तो येथील हेन्ले रस्त्यावरील एका घरात जन्मला. १८४७ साली हे घर शेक्सपिअर-विश्वस्तांच्या स्वाधीन करण्यात आले. न्यू प्लेस या शेक्सपिअरच्या घराचा मात्र फक्त चौथरा शिल्लक आहे. शेजारच्या वस्तुसंग्रहालयात शेक्सपिअरशी संबंधित वस्तू ठेवल्या आहेत. स्ट्रॅटफर्डच्या चर्चमध्ये त्याचे थडगे व अर्धाकृती पुतळा आहे. ॲव्हन नदीच्या काठावर एक नाट्यगृह, ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. ग्रंथालयात शेक्सपिअरवरील दहा हजारांवर दुर्मिळ पुस्तके व हस्तलिखिते आहेत. २३ एप्रिल हा दिवस शेक्सपिअरचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीत देशोदेशींचे वकील व मुत्सद्दी भाग घेतात. मार्च ते ऑक्टोबरपर्यंत येथे शेक्सपिअरची नाटके करतात. हा स्मृतिदिन १७६९ पासून सुरू झाला.


पहा : इंग्रजी साहित्य रंगभूमी.

संदर्भ :  1. Bradely, A. C. Shakespearean Tragedy, New York, 1955.             2. Brown, Ivor, Shakespeare, London, 1949.             3. Campbell, O. J. Quinn, E. G. Ed. The Reader’s Encyclopedia of Shakespeare, New York, 1966.             4. Charlton, H. B. Shakespearean Comedy, New York, 1961.             5. Dowden, E. Shakespeare : A Critical Study of His Mind and Art, New York, 1962.             6. Ellis-Fermor, U. Brooks, H. F. Jenkins, H. Ed. The New Arden Shakespeare, 37 Vols., Cambridge (Mass.), 1951.             7. Fluchere, A. Shakespeare, New York, 1964.             8. Furness, H. H. Ed. The New Variorum Shakespeare, Vols. 1-14, 21-25, Philadelphia, 1871.             9. Knight, G. Willson, The Wheel of Fire, New York, 1949.              10. Lawrence, W. W. Shakespeare’s Problem Comedies, New York, 1960.             11. Muir, Kenneth Schoenbaum, Samuel, Ed. A New Companion to Shakespeare Studies, Cambridge, 1971.             12. Quiller-Couch, A. T. Wilson J. D., Ed. The New Cambridge Edition, Cambridge (England), 1921-1963.             13. Tillyard, E. M. W. Shakespeare’s History Plays, New York, 1964.             14. Tillyard, E. M. W. Shakespeare’s Last Plays, New York, 1964.             15. Traversi, D. A. Shakespeare : The Roman Plays, Stanford (Calif), 1963.             16. Wilson J. D. Shakespeare’s Happy Comedies, Evanston (III), 1963.             17. Wilson J. D. The Essential Shakespeare : A Biographical Adventure, New York, 1960.             १८. करंदीकर, विंदा, राजा लिअर, मुंबई, १९७४.

             १९. केळकर, ग. ह. शेक्सपिअर व तत्कालीन इंग्रजी रंगभूमी, नागपूर, १९३२.

             २०. ढवळे, वि. ना. व इतर, संपा. शेक्सपिअर परिचय, मुंबई, १९७९.

             २१. देशपांडे, परशुराम शेक्सपिअरची सुनीते, पुणे, १९९७.

             २२. पाडगावकर, मंगेश वादळ, मुंबई, २००१.

             २३. वाटवे, गो. म. संपा. रूपकम, मुंबई, १९६५.

             २४. शिरवाडकर, के. रं. शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य, पुणे, १९९४.

             २५. शिरवाडकर वि. वा. शोध शेक्सपिअरचा, पुणे, १९८३. 

देवधर, वा. चिं.